परवा पुणे-रत्नागिरी प्रवासात एक मजेदार दृश्य
पाहिलं.
दोन व्यक्तींमध्ये
संभाषण चालू होतं; म्हणजे खरं तर एक व्यक्तीच बोलत होती- अखंड आणि दुसरी नाइलाजाने ते ऐकल्यासारखं
दाखवत होती, जांभया देत. ड्रायव्हरने चहासाठी मध्येच कुठेतरी
गाडी थांबवली. त्या संधीचा फायदा घेऊन ऐकणारी
व्यक्ती घाईघाईनं खाली उतरली, ऐकण्याच्या भयंकर शिक्षेतून वाचण्यासाठी बहुतेक.
खूपदा
माणसं असं नुसती बोलत सुटतात, भसाभसा वाहणाऱ्या पाण्याच्या नळासारखी. समोरच्या ऐकणाऱ्याचं लक्ष असो किंवा
नसो, त्याला त्या विषयात स्वारस्य असो किंवा नसो याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. कधी कधी असं वाटतं की अशा अव्याहत
बोलणाऱ्या माणसाला नाममात्रच एक श्रोता हवा असतो. त्याला प्रतिसादाची विशेष अपेक्षाही
नसते. कदाचित स्वतःचा बोलणं स्वतःच ऐकून
अशी माणसं धन्य होत असावीत. पण ही संभाषणाची पद्धत आहे का?
एखाद्या विषयावर व्याख्यान द्यायला वक्त्याला बोलावलेलं असतं तेव्हा तो एकटाच बोलणार हे गृहीत असतं. व्याख्यान विषयावरचे त्यांचे विचार ऐकायलाच श्रोते आलेले असतात. तरीही भाषणाच्या विषयाच्या व्यक्त केलेल्या विचारांच्या काठाकाठाने श्रोत्यांचाही अखंड विचारप्रवाह चाललेला असतो. एक मूक वक्ताच जणू श्रोत्यांच्या रूपाने समोर जागरूक बसलेला असतो. एका वेगळ्या स्वरूपातलं ते संभाषणच असतं. पण त्या वेळीसुद्धा मूळ विषयाला सोडून भरकटत चाललेल व्याख्यान किंवा त्यातलं पाल्हाळ अथवा रटाळपणा ऐकून घेतला जात नाही. अशा वेळी श्रोत्यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया लगेच उमटतात.
संत ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांशी केलेला ‘शब्देविना संवादू’ हे तर फारच वरच्या पातळीवरचं संभाषण - ये हृदयीचे ते हृदयी घालणार. पण अगदी रोजच्या गप्पा, संभाषण यांचेही काही अलिखित नियम असतात. पण त्याबद्दल थोडीशीही समज काही वेळा बोलणाऱ्यांना नसते. मी, माझं, मला अशा मीपणाचा उद्घोष या बोलण्यात अनेक वेळा दिसतो. अशा वेळी तिथे कुठलाही प्रस्थापित ‘संवाद’ नसतो असतो केवळ ‘स्व-वाद’. बहुतेकदा आपल्या स्वत:च्या तथाकथित कर्तृत्वाच्या कहाण्या मुक्तपणे ऐकविल्या जातात. माझंच कसं बरोबर- माझ्यामुळे कार्य कसं सुंदरपणे पार पडलं - मला कळतं - मी कसं कुणाचंच ऐकून घेत नाही वगैरे वगैरे. अशा संवादांमध्ये खरं तर सांगण्याचा मुद्दा केव्हाच संपून गेलेला असतो, उथळ पाण्याचा खळखळाट मात्र जाणवत राहतो. कित्येकदा अनेक वेळा ऐकलेला प्रसंग परत परत सांगितले जातात किंवा समोरच्या व्यक्तीला माहीत असलेल्या घटना, विचार, तत्त्व पुन्हा ऐकवले जातात. मध्ये कोणी काही बोलण्याचा, थांबवण्याचा, अथवा विषय बदलण्याचा प्रयत्न केलाच तर त्याकडे दुर्लक्ष करून आपलीच गाडी पुढे ढकलली जाते. या प्रकारचे संवाद किमान एका बाजूसाठी तरी आल्हाददायक ठरत नाहीत.
काही माणसांना समोयांर येईल त्या व्यक्तीकडे आपल्या व्यथा-वेदना, आपल्यावर होणारे अन्याय सांगण्याची घाई झालेली असते. अशा संभाषणातून लोकांना समोरच्या व्यक्तीला काय वाटलं, आपली-त्याची कितीशी ओळख आहे याचाही विचार डोक्यात येत नाही. या पलीकडे काहींच्या गप्पा खूपच पाल्हाळिक असतात.
अशा अनेक प्रकारचे संवाद थोड्या वेळातच कंटाळवाणे होतात. संभाषणातील श्रोता व्यक्ती संधी मिळताच तेथून काढता पाय घेते. अशा माणसांची जास्त ओळख किंवा सहवासही नकोसा वाटू लागतो.
आपणा सर्वांचीच कधीना कधी अशा कोणत्या तरी व्यक्तीशी गाठ पडलेली असेलच. या व्यक्तींकडून किंवा घटनांमधून आपण काही धडा घेऊ शकतो का? संभाषण ही एक कलाच आहे. त्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतात. समोरच्या व्यक्तीचा मानसिकतेचा त्याच्या वेळेचा त्याच्या आणि आपल्या ओळखीचा त्यांच्या मतांचा विचार संभाषण करताना जरूर व्हायला हवा. खरं तर त्याच्याही आधी समोरच्या व्यक्तीची कुवत, त्याच्या आवडीनिवडी त्यांचा योग्य आदर करून संभाषणाचा विषय व भाषा ठरवायला हवी. आवडीचे विषय अचूक माहिती व आकर्षकपणे मांडण्याची कला अवगत असेल तर गप्पा गोष्टी जुळून येतातच, पण बऱ्याचदा गप्पांची तासंतास अर्थपूर्ण अशी मैफिल जमू शकते.
- मधुस्मिता अभ्यंकर

No comments:
Post a Comment