पर्यावरण दिन


ज्या गोष्टींची समाजाला आवश्यकता असते पण त्याचे महत्त्व समाजत नसते किंवा त्याची कमतरता अथवा उणीव असते, अशा गोष्टींचे सर्वसाधारणपणे  ‘दिन ठरविले जातात. ज्यायोगे लोकांना त्याची आठवण राहील आणि काही अंशी ती उणीव भरून निघेल. अशा विचारधारेतून अमुक दिन’,‘तमुक दिन यांचा उदय झाला. परंतु, आजकाल एवढे दिन साजरे केले जातात, की दिवस लक्षातच रहात नाहीत. पाश्चात्त्यांनी आणलेल्या दिवसांचे काही जण अनुकरण करतात किंवा काही “आमच्या वेळी असले काही प्रदर्शन करायला लागायचे नाही” असे म्हणून त्याकडे कानाडोळा करतात. काही दिवस जागतिक पातळीवर तर काही दिवस आपल्या भारतामध्येच साजरे केले जातात. तो दिन आला की सगळीकडे त्याविषयीच चर्चा असते. जाहिरातींचे फलक, सार्वजनिक कार्यक्रम, शिबिरे, खरेदीवर सूट अशा अनेक गोष्टी निदर्शनास येतात. दिवस संपला की दुसऱ्या दिवशी सगळे विसरायचे. पण काही दिवस असे असतात की त्याकडे खूप गांभीर्याने बघण्याची आवश्यकता असते. त्यापैकीच एक दिवस म्हणजे जागतिक पर्यावरण दिन.

युनायटेड नेशन्सने ५ जून १९७४ रोजी हा दिवस सुरू केला. हवा प्रदूषण, सागरी प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, वन्यजीव व पाळीव प्राणी संदर्भातले गुन्हे इत्यादी गंभीर गोष्टींचा सामना करण्यासाठी म्हणून एक जागतिक पातळीवर चळवळ सुरू झाली. जाणवणारी एखादी समस्या ओळखून प्रत्येक वर्षी एखाद्या देशाला यजमानपद दिले जाते. ‘Beatplasticpollution’ हा २०१८ या वर्षीचा फोकस. रोजचा २५,००० टन प्लास्टिकचा कचरा गोळा करणाऱ्या आपल्या भारत देशाकडे या वर्षीचे यजमानपद आले.

भारत देशाच्या संस्कृतीमध्ये निसर्गालाच देव मानणारे आपले पूर्वज. निसर्गाशी जुळवून त्याला धक्का न देता आनंदाने जगणारे! पण कालांतराने माणूसपण हरविले आणि सध्याची परिस्थिती निर्माण झाली. आपणच आजच्या भीषण पर्यावरण ऱ्हासाला जबाबदार आहोत. डोंगरामधले खोदकाम, भौगोलिक अभ्यास न करता बांधली गेलेली धरणे यामुळे ढगफुटी, भूकंप होताना दिसतात. याचे उदाहरण म्हणजे हिमालयातून आलेल्या नद्यांवर तिथल्या मातीचा अभ्यास न करता बांधली गेलेली धरणे. अनिर्बंध बांधकाम उद्योगामुळे नद्यांना पूर येणे, भूगर्भीय पाण्याची पातळी खाली जाणे अशा दोन्ही गोष्टी होताना दिसतात; उदाहरणार्थ बिहार राज्य. एकूणच वातावरणातील बदलामुळे आपल्या दक्षिण आशियामध्ये  ‘Atmospheric brown cloud’चे वायू प्रदूषण निदर्शनास येते. हिमनगाचे वितळणे, वादळे, पावसाचे उशिरा किंवा बेभरवशी आगमन, black carbon च्या प्रमाणत वाढ, समुद्राच्या पातळीत वाढ इत्यादी अनेक गोष्टी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण, उर्जेचा अतिरिक्त वापर, ‘वैयक्तिक वाईट सवयी या सगळ्याला कारणीभूत ठरतात. आपल्याला आपले घर स्वच्छ लागते परंतु सार्वजनिक ठिकाण अस्वच्छ करण्यात आपलाच पुढाकार असतो. कचरा रस्त्यावर टाकणे, रस्त्यावर पाळीव प्राण्यांद्वारे होणारे उत्सर्जन करविणे, भरपूर प्रमाणात प्लास्टिकचा वापर करणे इत्यादी. प्लास्टिक कचऱ्यामुळे कसदार जमिनी नापीक  होतात, पाणी तुंबते, सांडपाण्याचे पाईप तुंबतात. सागरी जीवांना धोका निर्माण होतो. पिकाचे अवशेष आणि प्लास्टिकचा  कचरा जाळून विषारी वायू निर्मिती होते. या अमोनिया एमिशनमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. पर्यटक जंगलात निसर्गाचा आनंद घ्यायला फिरायला जातात, पण तिथेही कचरा करतात. विकासाच्या नावाखाली वारेमाप जंगलतोड केली जाते आणि चळवळवाद्यांना प्रगतीच्या आड येणारे समजले जाते. आपल्या राजधानी दिल्लीमध्ये १७००० मोठी झाडे कापायला परवानगी दिली आहे. खरे तर नियमाप्रमाणे त्याच्या दहा पट, म्हणजे १७०००० रोपे त्या परिसरात लावायला हवीत. परंतु तेवढी रोपे लावायला त्या परिसरात जागा तरी आहे आहे का, याचा विचार परवानगी देण्यापूर्वी नको का करायला?

सरकारपुढे पर्यावरणविषयक अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी सरकारने ठोस कडक पावले उचलायला हवीत. रासायनिक कारखान्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया आणि उत्सर्जित रसायने यांची योग्य ती विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे सामूहिक यंत्रणा विषयक नियमांची जर कडक अंमलबजावणी झाली नाही तर बंगलोरमधल्या तलावांना आगी लागतच राहणार.  डम्पिंग ग्राउंडविषयक गोष्टींची धोरणे विचारपूर्वक आखली गेली पाहिजेत. जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली गेली पाहिजे. दवाखाने, हॉस्पिटल्स, संशोधन संस्था, आरोग्य शिबिरे या ठिकाणी कचरा हाताळणाऱ्या लोकांचे समुपदेशन, लसीकरण आवश्यक आहे. नद्यांच्या शुद्धीकरणाचे (उदाहरणार्थ क्लीन गंगा) आणि पुनरुज्जीवन (उदाहरणार्थ rallyforrivers), ‘पाणी फौंडेशन आणि नामयांसारख्या अनेक प्रकल्पांना सरकारने आणि लोकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले पाहिजे. संरक्षित सागरी जीवांच्या मासेमारीवर नियंत्रण हवे. संरक्षित सागरी जीव ओळखण्याचे प्रशिक्षण मच्छिमारांना देणे गरजेचे आहे.

भूगर्भीय पाण्याची पातळी कशी वाढेल यासाठी उपाययोजना करायला हव्यात. नाहीतर आफ्रिकेतल्या केप टाउनसारखी परिस्थिती इथे उद्भवायला वेळ लागणार नाही. योग्य ठिकाणी योग्य झाडे लावायचा उपक्रम धडाक्यात करायला हवा. घन कचरा आणि ओला कचरा व्यवस्थापनाची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे. पर्यावरणभिमुख पर्यटनस्थळांना भेट देण्याचा आजकालचा ट्रेंड ओळखून निसर्ग पर्यटन जाणीवपूर्वक वाढविले पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र सरकारने ठाणे खाडीच्या किनारपट्टीला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा दिला. त्यामुळे स्थानिक कोळी लोकांना पक्षी निरीक्षणाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळाला. प्लास्टिकला पर्याय उपलब्ध करणाऱ्या उद्योगधंद्याला चालना दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत.  स्थानिक अन्ननिर्मिती आणि विक्री यासाठी विशेष तरतुदी असल्या पाहिजेत. ई-वेस्ट संदर्भातदेखिल उपाययोजना हव्यात. जगातील इतर देशांना भेडसावणारे प्रश्न, त्यासाठीच्या त्यांनी केलेल्या उपाययोजना यांचा सखोल अभ्यास करणे पण गरजेचे आहे.

सर्व जबाबदारी फक्त सरकारची नसते, तर आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून काही पथ्ये पाळायला हवीत. इथे तिथे कचरा न टाकणे, प्लास्टिकचा वापर कसा टाळता येईल यावर भर देणे, नैसर्गिक विघटनशील घटक असलेल्या गोष्टी वापरणे म्हणजे साफसफाईसाठी लागणारी द्रव्ये इ.. स्टीलचे डबे, काचेच्या बरण्या वापरणे, solar, wind एनर्जीचा भरपूर वापर, LED चा वापर, ई-बिल्स भरणे, कागद वाचविणे, कारपूल आणि सरकारी वाहतूक व्यवस्थेचा वापर, घराचे बांधकाम करताना पर्यावरणाला मदत होईल अशा गोष्टींचा वापर करणे, रेन वाॅटर हार्वेस्टींग, पाण्याचा अपव्यय टाळणे यासारख्या  व अशा बऱ्याच गोष्टी  करता येतील. मानसिक स्वास्थ्यामध्ये देखील पर्यावरण महत्वाची भूमिका बजावत असतो. ते टिकविण्यासाठी  बाल्कनी अथवा टेरेस बाग फुलविणे हा अगदी खात्रीशीर चांगल्या पर्यायाचा आपण अवलंब करू शकतो. ३ ’R’s म्हणजे Reduce, Reuse, Recycle यांचा पुरेपूर उपयोग आपण करायला हवा.

ग्रीन टॅक्स (tax) ची अंमलबजावणी करणारा जगातला पहिला देश , जिथे hydro, wind, solar आणि geothermalenergy चा पुरेपूर वापर केला जातो असा  कोस्टारिका सारखा लहानसा देश जर पर्यावरण मित्र म्हणून बरेच काही साध्य करू शकतो, तर आपण का नाही? चला तर मग, माणसाच्या पुढील पिढ्यांच्या हरित भविष्यासाठी आपण आपल्यापासूनच सुरुवात करू या.

                             रुपाली गोखले 


No comments:

Post a Comment