जीए – मराठी साहित्यातले एक सक्षम
लेखक. कॉलेजच्या होस्टेलवर माझा त्यांच्या साहित्याशी परिचय झाला. त्यांचे ‘काजळमाया’
वाचताना पायाखालची जमीन एकदम द्रवरूप व्हावी आणि धडपडायला व्हावे तसे काहीसे झाले
होते. भाषाप्रभुत्व, अत्यंत सुरेख कल्पनाविलास, नियतीच्या हातातील बाहुले
असल्यासारखी वागणारी त्यांची पात्रे, मृत्यू, त्याचा अटळपणा - या सगळ्यातून कधी
अत्यंत वास्तववादी तर कधी अतिरम्य, काल्पनिक विश्व हे जीएंच्या कथांचे मला सापडलेले, आवडलेले,
खेचून घेणारे शक्तीत्व.
तर
हा लेख जीएंच्या कथांचे मूल्यमापन करण्यासाठी नसून, मी रेकॉर्ड केलेल्या त्यांच्या
तीन कथांबद्दल आहे.
पहिली
आहे – अस्तीस्तोत्र. अस्सल जीए भाषेचा अत्यंत सुरेख वापर – एखाद्या abstract
painterने राखी, करड्या, तपकिरी, पांढऱ्या, काळ्या रंगातून रंगवलेले चित्र असावे
तसे जीएंनी हे शब्दचित्र रंगवलेले आहे. ही कथा जर संगीत असती तर एखादा प्रचंड ढोल
कुठे लांबवर घनगंभीर आवाजात वाजतो आहे असे वाटले असते.
ऐकण्यासाठी
क्लिक करा : https://soundcloud.com/user-998628937/astistotr
दुसरी
गोष्ट आहे – भेट. बाहेरचे जग पाहण्यासाठी राजवाड्याबाहेर पडलेल्या राजपुत्र
गौतमाला, एक आपल्याला अतिपरिचित असा प्राचीन वृद्ध भेटतो आणि गौतमाच्या पर्यावसानी
कार्याशी स्वत:ची नाळ जोडतो. जीएंच्या कल्पनाविलासाचा एक सुरेख प्रत्यय!!
ऐकण्यासाठी
क्लिक करा : https://soundcloud.com/user-998628937/bhet
आणि
तिसरी – ‘चांदीची ३० नाणी’ - इतिहासाने घट्ट बांधलेल्या दोन व्यक्तींविषयी.
त्यातल्या एकाचे पाप प्रसिद्ध – पण ही गोष्ट वाचल्यावर वाटते, ते पाप तरी सर्वस्वी
त्याचा स्वत:चा विचार होते का? का ते विधिलिखित होते – जे तो टाळू शकलाच नसता –
आणि ज्याच्यावर अन्याय झाला असे आपण मानत आलो – तोसुद्धा त्यात काही अंशी सहभागी
होता, त्याने त्यात मदत केली त्याच्याही नकळत मदत केली होती?...
ऐकण्यासाठी
क्लिक करा : https://soundcloud.com/user-998628937/chandichi30nani/
जीएंबाबतीत
दोन कंपू आहेत – एक त्यांच्या साहित्यावर प्रेम करणारे आणि दुसरे – त्यांचे
साहित्य न पचवू शकणारे, न झेपणारे. मी पहिल्या गटात आहे. तुम्ही जर दुसऱ्यात असाल
तर ह्या कथा तुमच्यासाठी नाहीत. तुम्ही पुढच्या लेखाकडे वळावे हे उत्तम.
-अभिजित टोणगांवकर
No comments:
Post a Comment