मनोदीप उजळला...

"दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा" हे शाळेच्या वर्गात शिकवलेले वाक्य मनात ठसत ते सुगंधित उटण्याचे अभ्यंगस्नान, फराळी पदार्थांचा खमंग वास, पणत्या-कंदिलांची रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी  या सर्वांच्या सहभागानेच. मात्र दिवाळी असण्याचा, दिवाळी जगण्याचा आणि दिवाळी सण म्हणून साजरी करण्याचा बेत व्यक्तिगणिक वेगळा. यंदा बंगळुरुपासून  ७० कि.मी. असणाऱ्या 'इरुलिगाराडोड्डी' येथील वनवासी मुलांसह 'दीपोत्सव' साजरा करण्याची संधी मिळाल्याने ही दिवाळी माझ्यासाठीही खास ठरली.




वाटेत पाहिलेली उंचच उंच नारळाची झाडे,  दुतर्फा पसरलेल्या हिरव्या गालिचांमधून अलगद वळणे घेणाऱ्या पायवाटेवरून प्रवास करताना मन प्रफुल्लित झाले होते. तेथे पोहोचलो तेव्हा आकाशभर पसरलेल्या मावळतीच्या तांबूस, केशरी छटांनी आमचे स्वागत केले. एका गटाने लगेचच रांगोळी काढून सभोवती पणत्यांची रोषणाई करण्याचे काम सुरू केले. तर दुसऱ्या गटाने कुतूहलाने आम्हाला पाहणाऱ्या मुलांना एकत्र करून त्यांचे सांघिक खेळ घेतले. खेळून दमलेली मुले नंतर लाडवांचा आस्वाद घेत दिवाळीच्या गोष्टी ऐकण्यात रंगून गेली. कार्यक्रमाचा शेवट झाला साऱ्यांच्याच आवडत्या आतषबाजीने... खेळ खेळताना,  फटाक्यांचे वाटप करतानालहानांना सांभाळून घेताना,  शेवटी सर्व कचरा गोळा करून मैदान साफ करताना मुलांनी दाखवलेली शिस्त,  एकजूट  कौतुकास्पद होती.  त्या आतषबाजीपेक्षाही मुलांच्या मनात उजळलेली आणि डोळ्यांतून प्रकट होणारी निरागस आनंदी दीपज्योत मला अधिक भावली.
परतीच्या प्रवासात मनात तेच विचार सुरू होते.  डोळे मिटले तरी त्या अंधारातही आपण प्रकाशाचाच शोध घेत असतो. अंधार कुणालाच आवडत नाही, म्हणून रोजच्या जगण्यातही तो नसावा असेच आपल्याला नेहमी वाटते.  अमावास्येच्या घनगर्द रात्री सुरू होणारा  दिवाळीचा प्रकाशोत्सव ही हेच सुचवत असेल नाही का? "अंधारावर मात करणारा बोधाचा चंद्र अंतर्मनाच्या आकाशात उद्यापासून कलेकलेने वाढणार आहे. " पण गतिमान जगण्यात आपल्याला इतकी उसंत आहे कुठे? इन्स्टंटच्या या वेगवान जगात कृत्रिम झगमगाटात आपण इतके रमतो की खरा प्रकाशच विसरण्याची भीती वाटते. आपल्याला चिंता, काळजी, विवंचना,  कमतरता यांची वरवर चढलेली काजळी दिसते, पण सगळे संपले तरी शून्यातून विश्व निर्माण करणारी आत्मविश्वासाची उजळलेली इवली ज्योत मात्र दिसत नाही.

त्यासाठी आपल्याच मनात डोकावून बघता यायला हवे. दिनदर्शिकेवरील दिवाळीचे दिवस, महिने दरवर्षी वेगवेगळे असतात तरीही इतर दिवसांपेक्षा ते निराळे, अधिक उत्साही वाटतात. आपण त्या दिवसात आनंद निर्माण करतो,  दुसऱ्यांमध्ये वाटतो आणि त्यांच्या कडून मिळवतोही.  मग हाच प्रयत्न  दरदिवशी  केला तर प्रत्येकच दिवस प्रकाशाचा असेल नाही का... समाजात आपल्या भरीव कार्याने ज्ञानाचे,  प्रगतीचे,  सेवाकार्याचे   लख्ख दीप प्रज्वलित करणारी अनेक असामान्य माणसे आहेत. तेवढे शक्तिशाली नाही, पण निदान छोट्या परिघाला प्रकाशित करणारी ज्योत नक्कीच होता येईल.










वनबाळांचा संग लाभता हर्ष उरी दाटला
अवघा भेदाभेद निमाला मनोदीप उजळला

हात तयांचे घेता हाती ममत्व मनी जागले
मुक्ताकाशी खेळ खेळिता शैशव मज स्मरले
कृत्रिमतेचा शहरी शेला सहजच मग ढळला

भारतभूची शुभचिह्नांकित रंगावली रेखिली
दीपांची आरास मनोरम दृष्टी आनंदली
तेजाच्या त्या पुनित संगमी आसमंत नाहला

कथा सणांच्या तया सांगता बालमुखे हर्षली
सुरात गाता सूर मिसळुनी समरसता जागली

शिवभावाने जिवसेवेचा अर्थ खरा उमगला

- मानसी काळेले-फडके

No comments:

Post a Comment