गेल्या आठवड्यात मला अचानक आठवण झाली
एका दंगलीची. ती दंगल १९८२ सालच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात घडली असावी. त्या वेळी
मी महिंद्रा अॅन्ड महिंद्रा ह्या कंपनीच्या वरळी येथील कार्यालयात काम करत होते.
मला नक्की दिवस आठवत नाही, पण त्या एकाच दिवशी मला माणसाची दोन भिन्न रूपं एकाच वेळी पाहायला
मिळाली आणि खरं तर त्या दिवसापासून माझा माणुसकीवर ठाम विश्वास बसला.
साधारणपणे १२-१२.३०च्या सुमारास
आमच्या कार्यालयात आम्हाला ती बातमी कळली, किंबहुना त्याचा अनुभवच घेता आला.
आमच्या कार्यालयाच्या कंपाउंडमध्ये अचानकपणे सोडावॉटरच्या बाटल्या येऊन पडल्या.
खरं तर आम्ही सगळेच घाबरून गेलो होतो. त्या वेळी मोबाइल, इंटरनेट अशी संपर्काची साधनं नव्हती,
त्यामुळे बाहेर नक्की काय झालं आहे, ह्याबद्दलची
कोणतीच विश्वासार्ह माहिती मिळत नव्हती. आता आपण काय करायचं? घरी कसं कळवायचं? घरी कसं जायचं? असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले
होते. थोड्या-थोड्या वेळानं निरनिराळ्या बातम्या येत होत्या... अमुक ठिकाणी एक
गाडी जाळली आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेली रेल्वे बंद आहे. बेस्टची वाहतूकही बंद
आहे. त्या वेळी आमच्या कंपनी व्यवस्थापनानं आम्हाला कार्यालयात थांबवून ठेवलं
होतं. बाहेरची परिस्थिती कशी आहे, ह्याचा आढावा घेतल्यावरच आम्हाला कंपनीबाहेर सोडण्यात आलं.
आमच्याबरोबर आमचे सहकारीही होते. त्या वेळी आम्ही गोरेगावला राहत होतो. त्यामुळे
पश्चिम रेल्वेनं जाणारे आम्ही सगळे सहकारी एकत्रच निघालो. बस, टॅक्सी अशी सार्वजनिक वाहतुकीची साधनं
बंदच होती. आम्ही सगळे चालत निघालो... खरं तर जीव मुठीत घेऊन चालू झालेल्या त्या
प्रवासाचा शेवट काय असणार आहे, हे आमच्यापैकी कोणालाच माहीत नव्हतं. एकमेकांच्या आधारानं आणि सोबतीनं
आमचा प्रवास चालू झाला. कोणीतरी सांगितलं होतं की, बांद्र्यापासून पुढे गाड्या चालू
आहेत. त्या कोणाच्यातरी सांगण्यावरून आम्ही बांद्रा रेल्वेस्टेशनचा रस्ता धरला आणि
चालू लागलो.
आम्ही जेव्हा बाहेर पडलो तेव्हा दंगल
बरीचशी शांत झाली होती, पण रस्त्यात ठिकठिकाणी दंगलीच्या खुणा दिसत होत्या. भरपूर जाळपोळ झाली
होती. दुकानं बंद होती. वाटेतच एखादी जळलेली गाडीही दिसत होती. रस्त्यावर खासगी
वाहनं अजिबातच दिसत नव्हती. हे सगळं का झालं आहे, कोणी केलं आहे, त्याबद्दलची कोणतीच माहिती आम्हाला
मिळाली नव्हती. घरी गेल्यानंतर बातम्या पाहिल्या की कळेल, असा विचार करून आम्ही सगळे जण वाटचाल
करत होतो.
कोणीच एकमेकाशी बोलत नव्हतं. कोणत्या
क्षणी काय घडेल ह्याचा काहीच नेम नव्हता. एकमेकांचे हात धरून, एकमेकांना मूक आधार देत आम्ही १०-१५
जण निघालो होतो. हळूहळू वातावरणातला तणाव कमी होत गेला. आम्ही नक्की कुठे येऊन
पोचलो होतो ते कळत नव्हतं, पण त्या रस्त्यावर मात्र एक वेगळंच दृश्य दिसत होतं.
तिथं अनेक रहिवासी इमारती होत्या...
आम्ही वरळीचा औद्योगिक परिसर ओलांडून बहुधा बांद्र्यात पोचलो होतो. साधारणपणे
एक-दीडच्या सुमारास आम्ही आमचं ऑफिस सोडलं होतं. जेवणाचे डबे कसेबसे खाऊन आम्ही
निघालो होतो. बरोबर एखादी पाण्याची बाटली बाळगण्याची तेव्हा पद्धत नव्हती किंबहुना
तशी गरजही कधी भासत नव्हती...
काही वेळापूर्वी भीतीमुळे कातर झालेली
आमची मनं आता माणुसकीच्या उजेडामुळे गहिवरली... प्रत्येक इमारतीसमोर त्या इमारतीत
राहणारी लहानमोठी मुलं आणि त्यांचे पालक पाण्याची पिंपं, सरबताची पिंपं, बिस्किटाचे पुडे असं बरंच काही घेऊन
उभे होते. पायी चालत जाणार्यांना पाणी देत होते, त्यांची विचारपूस करत होते...
आता सगळं निवळलं आहे, तुम्ही शांतपणे घरी जा असं सांगून दिलासाही देत होते.
कोणीतरी आम्हाला सांगितलं की बांद्र्यापासून नाही अंधेरीपासून गाड्या सुरू आहेत...
आता आपल्याला अंधेरीपर्यंत चालत जावं लागणार अशी खूणगाठ आपल्या मनाशी बांधून आम्ही
चालत होतो. मनावरचा ताण आपुलकीच्या दोन शब्दांनी हळूहळू कमी होत होता... पण आता
मनात एक वेगळंच वादळ सुरू झालं होतं.
मी सुखरूप आहे, माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत आणि
आम्ही उशिरा का होईना घरी सुखरूप पोचू; हे माझ्या घरच्यांना कसं कळवायचं... ते तर काळजीत असतील, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा, हेच कळत नव्हतं. पण घरच्यांच्या ओढीनं
आम्ही सगळेच घराच्या दिशेनं चालत होतो. थोडं पुढे गेल्यावर टॅक्सी दिसू लागल्या...
आता एक वेगळी चढाओढ सुरू झाली. सगळ्यांना आपापल्या घरी लवकरात लवकर पोचायचं होतं. त्यात
काही टॅक्सी ड्रायव्हर अवाच्या सव्वा पैसे मागत होते. सर्वसामान्य अर्थशास्त्र...
मागणी आणि पुरवठा ह्यांचं व्यस्त प्रमाण... पण नशिबानं आम्हांला एक चांगला टॅक्सी
ड्रायव्हर भेटला. तो अंधेरीला राहणाराच होता आणि त्यालाही त्याच्या घरी सुखरूप
पोचायचं होतं. आम्ही तिघी जणी आणि आमच्याबरोबर एक पुरुष सहकारी असे आम्ही चौघे
अंधेरीच्या दिशेनं निघालो. अर्धा जीव भांड्यात पडला होता. त्या टॅक्सीवाल्याकडून
इकडच्या तिकडच्या अनेक बातम्या कळत होत्या... पण आता ओढ लागली होती घरी
जाण्याची....
अंधेरी स्टेशनला सुखरूप पोचलो. आता
रेल्वेनी गोरेगावपर्यंत पोचायचं होतं. खरं तर मध्ये एकच स्टेशन होतं- जोगेश्वरी...
पण हा प्रवास आता कसा पार पडेल ह्याची धाकधूक मनात होतीच... आम्ही रेल्वे
प्लॅटफॉर्मवर पोचलो... समोरच बोरिवलीच्या दिशेनं जाणारी गाडी होती... गाडी चक्क
रिकामी होती... गाडीत फारशी गर्दी नव्हती. आमची गाडी गोरेगावला पोचली आणि मी
माझ्या मैत्रिणींचा निरोप घेऊन खाली उतरले. इतर दोघींना बोरिवली गाठायची होती...
आता मन अगदी हलकं झालं होतं. एका
मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडणं म्हणजे काय ह्याचा अनुभव गाठीशी घेऊन मी घरी
पोचले... माझी वाट पाहत आई दारातच उभी होती... मला पाहताच तिच्या चेहर्यावर आनंद
उमटला आणि माझ्या डोळ्यांत पाणी उभं राहिलं....
No comments:
Post a Comment