अरुणाचल
प्रदेशातल्या अंशू जामसेन्पा या ३८ वर्षांच्या आईने
सर्वोच्च शिखर असलेल्या एव्हरेस्टवर अलीकडेच केलेल्या विश्व विक्रमांची ही कहाणी—तिच्याच शब्दांत!
७
वर्षांपूर्वीपर्यंत जिला गिर्यारोहण म्हणजे काय हेच माहीत नव्हतं त्या अरुणाचलच्या
अंशू जामसेन्पा या एका ३८ वर्षे वयाच्या
आईने जगातील सर्वोच्च शिखर असलेलं एव्हरेस्ट हे शिखर आत्तापर्यंत तब्बल पाच वेळा
सर केलं आहे. हा विक्रम करणारी ती भारतातली पहिली
महिला आहे. पण विशेष म्हणजे तिच्या नावावर आता दोन विश्व विक्रम जमा आहेत. आत्ता
मेमध्ये अवघ्या ५ दिवसात दोनदा ते सर करून तिने पहिला विश्वविक्रम तर नोंदवलाच, पण ‘फास्टेस्ट डबल अॅसेंट ऑफ एव्हरेस्ट बाय अ वुमन’ हा विश्व विक्रमही आज तिच्या नावावर नोंदला
गेला आहे. मात्र तिचं यश एवढ्यापुरतं मर्यादित नाही. आत्तापर्यंत दोनदा
एव्हरेस्टवर डबल अॅसेंट करणारी ती जगातली पहिली महिला व पहिली आई ठरली आहे.
हा
प्रवास अर्थातच लिहिलंय इतका साधा नव्हता. प्रचंड मेहेनत, मृत्यूशी वारंवार पडणारी गाठ, त्यावर मात
करण्याचं तिने दाखवलेलं असामान्य धैर्य आणि जिद्द, देवावर आणि स्वतःवर असणारी दृढ श्रद्धा-विश्वास व त्याचबरोबर
कमालीचा पॉझीटीव्ह दृष्टीकोन यामुळेच हा अचाट पराक्रम ती करू शकली आहे.
ती मूळची
अरुणाचलची...हिमालयाच्याच कुशीत असलेलं हे नितांत सुंदर, निसर्गसंपन्न राज्य. ती राहते बोमदिलाला. १४ व
१० वर्षांच्या दोन लहान मुलींची ती आई आहे. तिचे पती त्सेरीन वांगे हे ‘ऑल अरुणाचल माउंटेनीयरिंग असोसिएशन’चे तसंच ‘अॅड्व्हेंचर
स्पोर्ट्स असोसिएशन’चे अध्यक्ष. पण अन्शुचा ७
वर्षापूर्वीपर्यंत गिर्यारोहणाशी प्रत्यक्ष संबंध आला नव्हता.
ती
म्हणाली, ‘‘मी त्या बाबत ऐकलं होतं. फोटो
बघितले होते. पण गिर्यारोहण म्हणजे काय हे मला माहीत नव्हतं. त्याचं प्रशिक्षण
असतं हे मला माहीत नव्हतं. पण मला फार प्रकर्षाने असं वाटतं की या जगात आलेल्या
प्रत्येकालाच एक दिवस मरायचं तर आहेच. पण जगण्याची संधी एकदाच मिळणार आहे. मग
भरभरून जगून घेऊ या नं... त्यामुळे मला सगळं करून बघायला आवडतं. मी सौंदर्य
स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. ‘क्रॉसिंग
द ब्रिज’ नावाच्या एका चित्रपटात काम केलंय. त्या
चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. मी बिझिनेस सुरू करून तो यशस्वी करून
दाखवलाय. हवा खराब असतानाही पॅराग्लायडींग करून बघितलंय. राफ्टींगचा थरार
अनुभवलाय. तेच गिर्यारोहणाच्या बाबतीतही घडलं. मला वाटलं करून बघावं. म्हणून मी
त्या कॅम्पला गेले. आधी ‘रॉक क्लायम्बिंग’ केलं. ते मला सहज जमलं. मग गिर्यारोहण केलं.
तेही सहज जमलं. त्या प्रशिक्षकांनी माझ्या पतीना सांगितलं की हिच्यामध्ये
गिर्यारोहणाची नैसर्गिक कला आहे. तिला ते शिकू द्या.
“मग
मी आधी मणीपूरला जाऊन गिर्यारोहणाचा ‘क्रॅश
कोर्स’ केला. तो एवढा कठीण होता की पहाटे ४
ते रात्री दहापर्यंत अखंड प्रशिक्षण चालायचं. थकून जायला व्हायचं. लष्करही
आमच्यावर लक्ष ठेवून असायचं कारण त्यांनाही प्रश्न पडायचा की ‘सिव्हीलीयन्स’ना का एवढं खडतर प्रशिक्षण देतायत? त्या प्रशिक्षणात तसंच नंतर मी गिर्यारोहणाचे ‘बेसिक’ व ‘अॅडव्हान्स्ड’ असे दोनही अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले. तिथल्याही
प्रशिक्षकांचं मत असं होतं की प्रत्येक गिर्यारोहकाचं जे स्वप्न असतं ते एव्हरेस्ट
सर करण्याची पूर्ण पात्रता माझ्यात आहे. त्यासाठीची शारीरिक क्षमता, तांत्रिक कौशल्य व मनोवृत्ती माझ्याकडे
असल्याने मी जरूर प्रयत्न करावा. मी संसारी असल्याने व २ लहान मुलींची आई असल्याने
मी कदाचित हे करणार नाही असं वाटल्याने एकाने माझ्या मिस्टरांना फोनही केला. पण
मलाच खात्री नव्हती, तसंच त्यासाठी खर्चही बराच येतो. त्यामुळेही मनाची तयारी होत
नव्हती.’’
मात्र प्री-एव्हरेस्ट मोहिमेसाठी ती सिक्कीमला गेली. तिने तिथे अगदी रेस्क्यूपासून समीट सर करण्यापर्यंत सगळंच यशस्वीपणे केल्यावर मात्र सगळ्यांचीच खात्री पटली की ती एव्हरेस्टवर प्रयत्न करू शकते. तिलाही तो विश्वास आला.
ती २०११
साली पहिल्यांदा एव्हरेस्ट मोहिमेवर गेली.
ती
सांगत होती, “जिथे मृत्यू मिठी मारण्याची पूर्ण
शक्यता आहे तिथे जाण्यापूर्वी छोट्या मुलींना कसं सांगायचं की कदाचित मी परत नाही
येऊ शकणार, हा प्रश्न माझ्यापुढे होता. पण त्यांना मोघम सांगून तेही दिव्य कसे बसे
पार पाडले. माझ्या छोट्या मुलीला काही समजत नव्हतं. तिला वाटत होतं की आई कुठल्या
तरी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घ्यायला चालली आहे. त्यामुळे ती मला म्हणाली की ‘ममा फर्स्ट होके आना’. मी हो म्हटलं आणि रवाना झाले. तेव्हा एव्हरेस्टवर
जाण्याच्या ध्यासाने मला इतकं पछाडलं होतं की खाणं-पिणं झोप यातलं काही सुचतच
नव्हतं. त्या वर्षी रूट खूप लवकर उघडला. आम्ही ७ला समीटवर चढाई करायचं ठरवलं. मी
कॅम्प २ वरून थेट समीटला जाणार होते. पण बर्फाचं इतकं जबरदस्त वादळ सुरू झालं की
समोरचं काहीच दिसतं नव्हतं. आम्हाला बेस कॅम्पवरून सूचना दिल्या जात होत्या की सर्वांनी
परत यावं. तेव्हा आम्ही, म्हणजे मी व माझा शेर्पा ‘यलो बेंड’ पर्यंत पोहोचलो होतो. बर्फाच्या व वाऱ्याच्या
माऱ्यात तोही खाली उलटा पडला. मी त्याला सरळ करून वर आणले. क्रॅम्पोन घुसल्याने
त्याचा बूट फाटला. तिथे मी माझा स्कार्फ बांधला. नाही तर त्याला ‘फ्रॉस्ट बाईट’ झाला असता. आम्ही जवळच्याच टेंटमध्ये घुसलो. रात्री तर वादळाची
तीव्रता इतकी वाढली की आम्ही वाचणे शक्य नाही याची आमची खात्री पटली. मी प्रार्थना
केली. माफी मागितली. पण त्याही परिस्थितीत मला मुलीचे शब्द आठवत होते की ‘फर्स्ट होके आना’. मी परत फिरूच शकत नव्हते. मी तिला शब्द दिला होता. सकाळी बाहेर आलो
तर बाजूचे सगळे टेंट उडून गेले होते. आमच्या टेंटचीही वाट लागली होती. खाली
येण्याशिवाय पर्याय नव्हता. झोप नाही,
खाणे नाही यामुळे थकवाही आला होता. आम्ही खाली कॅम्प २ पर्यंत आलो. २ दिवस तिथेच
थांबलो. पण वादळ शमेना. २ दिवसांनी निघालो. हवा खराबच होती ‘साउथ
समीट’पर्यंत आलो. एव्हरेस्टचं शिखर तिथूनच
दिसतं. पण वादळामुळे काही दिसत नव्हतं. बाकीचे टीम मेम्बर्स खाली गेले होते. माझा शेर्पाही तेच सांगत होता. मी सांगितले की मी फार
कष्टाने येथपर्यंत आलेय. परत गेले तर पुन्हा नाही येऊ शकणार. शेवटी तोही तयार झाला
आणि काहीही दिसत नाही इतकी भीषण परिस्थिती असताना मी ती मोहीम यशस्वी केली. तो शेर्पा जेव्हा म्हणाला की ‘मॅम हेच समीट आहे’ तेव्हा माझ्या अंगावर शहारे आणि डोळ्यात
अक्षरशः पाणी आले. तिथे मी तिरंगा फडकवला. परत येताना एका जपानी गिर्यारोहकाचा
मृतदेह दिसला. मी खाली आले. पण मी पूर्णपणे फिट होते. त्यामुळे मी पुन्हा चढाई
करायचं ठरवलं. मात्र कागदपत्रांची पूर्तता करायला त्या लोकांनी एवढा वेळ घेतला की
मी पुन्हा समीट केलं, पण ते १० दिवसांनी झालं.’’
त्यानंतर
२०१३ साली संपूर्ण ईशान्य भारताची टीम एव्हरेस्टवर गेली. त्याची उपनेता होण्याची
संधी अंशुला मिळाली. नेतृत्व म्हणजे जबाबदारी आलीच. त्यात गिर्यारोहणासारख्या
साहसी खेळाकडे सरकारी व सामजिक दुर्लक्ष एवढे आहे की गेलेल्या टीमकडे सगळी साधन
सामग्रीही नव्हती. त्यामुळे धोक्यात आलेले अनेकांचे प्राण तिने वाचवले आणि शेवटी
टीमचं मिशन यशस्वी ठरवण्यासाठी बाकी सगळ्यांनी हातपाय गाळल्यावर सुजलेल्या
डोळ्यांनी तिनेच समीटही केलं.
ती
सांगत होती, “समीट करून जेव्हा मी खाली आले तेव्हा
आमच्या बरोबर आलेल्या एका ज्येष्ठ गिर्यारोहकांनी माझा हात त्यांच्या डोक्यावर
ठेवून अशी शपथ घ्यायला लावली की मी पुन्हा माझा जीव धोक्यात घालणार नाही.’’
अन्शुने
२०१४, २०१५ ला पुन्हा प्रयत्न केले. तिला ‘फास्टेस्ट डबल अॅसेंट’ करायचाच होता. पण आयत्या वेळी, खराब
हवामानामुळे या दोन्ही मोहिमा रद्द झाल्या. पैसे तर गेलेच; पण स्ट्रेस, मनस्ताप,
शारीरिक ताण हे सगळे वाट्याला आले.
ती
म्हणाली, “त्यामुळे मी २०१६ साली प्रयत्नच नाही
केला. पण या वर्षी मला पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेवर जावंसं वाटायला लागलं. परम
पूजनीय दलाई लामांचा आशीर्वादही मिळाला.”
ती
म्हणाली, “या वेळी त्या मानाने खूप सुरळीतपणे
सगळं पार पडत होतं. मात्र ऑक्सिजन रीफिलने खूप त्रास दिला. जो ऑक्सिजन मला दिला गेला
होता तो इतका ‘थर्ड क्लास लेव्हल’ चा होता की तो सारखा गोठत होता. हलवावा लागत
होता. तो खराब दर्जाचा असल्याने घसा कोरडा पडणे, खोकला येणे असेही त्रास झाले. १६ मे रोजी मी पहिले समीट केले. पण
परत येताना हवामान बिघडले. त्यामुळे मला माझा आधीचा प्लॅन बदलून थेट खाली यावे
लागले. या वेळी माझ्या ‘डबल अॅसेंट’च्या मोहिमेबाबत सारेच खूप उत्सुक आणि उत्साहात
होते. मी खाली बेस कॅम्पपर्यंत आलेयाचं पुराव्यादाखल चित्रीकरण केलं गेलं. मी पूर्ण
फिट होते, त्यामुळे दुसऱ्या दिवशी रात्री मी
लगेच पुन्हा चढाईला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी कॅम्प २ पर्यंत पोहोचल्यावर मी
फक्त २ तास झोप घेतली आणि पुन्हा चढायला लागले. तिसऱ्या कॅम्पच्या आधी मला थोडासा
अशक्तपणा जाणवायला लागला. मी शेर्पाला म्हटलं की मला थोडी विश्रांती घेऊ दे. तो
म्हणाला, ‘आता
थांबू नका. हवा वादळी व्हायला लागली आहे,
तुम्ही गारठाल. उठणार नाही.’ मी
सांगितलं की मी उठणार. मला समीट गाठायचेच आहे आणि खरोखरच अवघ्या १५ मिनिटांच्या
विश्रांतीनंतर मला इतका उत्साह आला की जे अंतर कापायला निष्णात गिर्यारोहकालाही २
तास लागतात ते फक्त ४५ मिनिटांत कापून मी शिखर गाठलं होतं. मी भाग्यशाली ठरले
होते. पण त्या वादळी हवेत सापडून एक गिर्यारोहक शिखराच्या खाली बाल्कनीजवळ कोसळून
मृत्युमुखी पडला होता. कुणी जुमारला लटकले होते. अडकले होते. मी शिखर गाठलं तरी हे
सगळं मृत्यूचं तांडव पाहून,
इतरांची अवस्था पाहून मला खरं तर
रडावंसं वाटत होतं... शक्य त्यांना मी मदत केली पण खरं तर एव्हरेस्ट एवढ सोपं
नाही. मी ५ वेळा एव्हरेस्ट करू शकले कारण मला खरंच वाटतं की एव्हरेस्टचं आणि माझं
काही नातं आहे. तिथे गेल्यावर मीच मला पुन्हा नव्याने गवसते.त्यामुळे या पाचही
मोहिमांत कमी अधिक प्रमाणात वादळाचा सामना करूनही न माझा जीव गेला, न मला हिमदंश झाला. मला पुन्हा पुन्हा तिथे जावंसं
वाटतं.’’
आता
संपूर्ण भारतातल्या महिलांची टीम घेऊन एव्हरेस्ट मोहीम करण्याची तिची इच्छा आहे.
मनात आलं की त्या लक्ष्याला १०० % देऊन ते यशस्वी करण्याचा तिचा स्वभाव आहे. त्या
मुळे ती त्या मोहिमेतही यश मिळवेल हे नक्की!
-जयश्री देसाई
No comments:
Post a Comment