एक नैतिक प्रश्न

म्हणजे बघा हं, एखादी तरुण, सुंदर परंतु अनोळखी मुलगी आपल्याच तंद्रीत मेकप करत असतांना, तिच्या नकळत ते न्याहाळण हे नैतिकदृष्ट्या योग्य का अयोग्य? उत्तर सरळ आहे - नाही का? पण विश्वास ठेवा, प्रत्येक वेळी उत्तर इतकं साधं नसतं. 

म्हणजे झालं असं, की ऑफ़िसला निघालो होतो. बंगलोरची रहदारी, बंपर-टू-बंपर गाड्या चाललेल्या. त्या गर्दीत भर घालत मीही. रस्त्यावर पुढे कुठेतरी अपघात असावा (किंवा नसावाही! बंगलोरला ट्रॅफ़िक जॅम व्हायला कारण लागत नाही). बराच वेळ कार एका जागी उभी होती. वेळ घालवायला इकडे तिकडे बघत होतो. मागच्या कारमध्ये एक मुलगी हातवारे करत बोलत होती. बहुधा handsfree वर. तो मूकपट आजूबाजूच्या देखाव्यापेक्षा  बरा होता. माझ्या उजवीकडे एक बिल्डर जमातीतला लठ्ठ आणि सोन्याने लगडलेला हिरवा सफारी होता. डावीकडे, आपल्या पेशाला न शोभण्याइतका गरीब, दाढी वाढलेला टॅक्सीवाला होता. वाहतूक चालू होण्याची शांतपणे वाट बघत तो निवांत होता. 


मागच्या गाडीतल्या मुलीचा फोनवाला मूकपट संपला होता. ती पण इकडे तिकडे बघत वेळ काढत होती. पुढे एखादा ट्र्क हलला असवा. गाड्या थोड्या हलल्या आणि परत थांबल्या. आता त्या मुलीने पर्समधून मेकप किट काढले.  पावडर, रूज लावून झाले. मग आय-लायनर - एक पाच-दहा मिनिटे मान वेळावत, डोळे उडवत - हे सगळे झाले. अधून मधून आम्ही सर्वच गोगलगायीच्या मोठ्ठ्या थव्यासारखे पुढे जात होतो. आय-लायनरनंतर अर्थातच लिपस्टिकची पाळी होती. आणि पावडर लावताना इतक्या माना वेड्या वाकड्या केल्यानंतर, लिपस्टिकसाठी ओठ मुरडणं साहजिकच होतं! आणि हे सगळं पाहणं चूक आहे हे कळत असूनही केवळ दुसरा उद्योग नाही म्हणून हि गम्मत न्याहाळत मी!

-- अभिजित टोणगावकर

No comments:

Post a Comment