महिला दिवस

ह्या लेखाचा ऑडिओ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 

                       ऑडिओ - महिला दिवस

स्त्री आणि पुरुष ही जीवन रथाची दोन चाके. महिला सबलीकरणाने या रथाचा समतोल साधला जायला खरोखर मदत होत आहे काय?

प्राचीन भारतात गार्गीमैत्रेयी यांच्यासारख्या बुद्धिमान महिला फिलॉसॉफर म्हणून प्रसिद्ध होत्या. गार्गी वाचक्नवी  हिला 'ब्रह्मवादिनी' (जिला ब्रह्म ज्ञान आहे) असंही म्हटले जायचे. ब्रह्मयज्ञामधे पुरुष पंडितांबरोबर फिलॉसॉफिकल डिबेट करण्यासाठी तिला पाचारण करण्यात आले होते. वेदांतावरच्या अनेक चर्चांमध्ये तिने गाढ्या पंडितांना मागे सारले होते. अशा या ज्ञानवंत गार्गीचा शिक्षण प्रसारामध्ये फार मोठा वाटा होता. मैत्रेयीलासुद्धा 'ब्रह्मवादिनी' म्हणत असत. ती अतिशय बुद्धिमान स्त्री होती. वेदांवर चर्च‍ा करण्याइतके त्या दोघींचे वेदांवर असामान्य प्रभुत्त्व होते. 
मैत्रेयी आणि गार्गी या वेदकाळातील स्त्री शिक्षणाच्या प्रगतीचे उतुंग प्रतीक आहेत.

पण मधल्या काही शतकांमध्ये स्त्री ही चूल, मूल व घर यातच अडकून पडली. उंबरठ्याबाहेरचे जग तिच्यासाठी बंदच होते. बालविवाह, त्यामुळे लवकर येणाऱ्या जबाबदाऱ्या, दुर्लक्षित आरोग्य यामुळे स्त्रियांचे जीवन कष्टप्रद होते. विधवा स्त्रियांचे जीवन अधिकच कठीण होते. केशवपन, दुसरे लग्न करण्याची बंदी, अशा अनेक कर्मठ चालीरितींनी तो काळ बांधला गेला होता. विधवा स्त्रीचे दर्शन हा अपशकुन मानला जात होता.

अशा ह्या स्त्रियांसाठी कष्टमय कालखंडामध्ये राजा राममोहन रॉय, ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यासारख्या महान व्यक्तींनी समाजाच्या विरोधाला तोंड देत स्त्रियांच्या विकासासाठी चळवळी सुरू केल्या. राजा राममोहन रॉय ह्यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी पुढाकार घेतला. ज्योतिबांनी स्त्रीशिक्षण स्वतःच्या घरातून, आपल्या पत्नी श्री. सावित्रीबाई फुले यांच्यापासून सुरू केले. आणि म. कर्व्यांनी स्वतः विधवेशी विवाह करून उदाहरण घालून दिले आणि विधवाविवाहाच्या प्रश्नाला हात घातला. 

आज एकविसाव्या शतकात स्त्रियांच्या चौफेर घोडदौडीमध्ये शिक्षणाचा फार मोठा वाटा आहे. त्या अनेक क्षेत्रे धडाडीने पुरुषांबरोबर पादाक्रांत करत आहेत. उदाहरणे घ्यायची झाली तर श्री. चंदा कोचर (मॅनेजिंग डायरेक्टर आयसीआयसीआय बँक), ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू दीपा कर्मकार अशी अनेक देता येतील. स्त्रिया बऱ्याच अंशी आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र झाल्या आहेत, होत आहेत. स्वतः निर्णय घेऊन त्या घराबाहेर राहूनही शिक्षण पूर्ण करतात. कामानिमित्त बाहेरगावीही राहतात. त्यामुळे त्या सक्षम आणि स्वयंपूर्ण होतात. कुठल्याही गोष्टीत त्यांना कोणावरही आर्थिकदृष्टय़ा अवलंबून राहावे लागत नाही, कधी कधी तर त्या घराचा भक्कम आधार होऊन राहतात ही एक अभिमानाची गोष्ट आहे.

विवाह करताना पुरुष शिकलेली, इंडिपेंडंट, स्मार्ट मुलगी निवडतात. मग कधी तिने घेतलेले निर्णय स्वतःपेक्षा वेगळे असले की मान्य करायला त्यांना जड जाते. कधी स्त्रिया करिअरमध्ये पुरुषांपेक्षा पुढे जातात, अशा वेळी 'मेल इगो' आड येतो आणि मतभेदांना सुरुवात होते. कधी कधी अति आत्मविश्वासामुळे कर्तबगार स्त्रियासुद्धा आपला निर्णय चूक असू शकतो हा विचार करू शकत नाहीत. रथाची चाके डळमळू लागतात.

स्त्री आणि पुरुष जीवन रथाची खरोखरच दोन चाके आहेत. दोघांच्या समतोलामुळेच  जीवनाची गाडी पुढे जात राहते. ती गाडी पळण्यासाठी दोन्ही चाके एकाच गतीने, म्हणजे सामंजस्याने पळली पाहिजेत. स्त्री पुरुषांमध्ये biologically फरक आहेचमातृत्वाची अनमोल देणगी मात्र निसर्गाने फक्त स्त्रियांनाच दिली आहे. ह्या देणगीबरोबर येणारी शारीरिक आणि मानसिक जबाबदारी स्त्रिया इतक्या समर्थपणे शतकानुशतके पार पाडत आहेतकुठलीही जबाबदारी निभावून नेण्याची आंतरिक शक्ती त्यांच्यात असतेच. 

स्त्रिया शिकलेल्या आणि सक्षम असतील तर सहजीवन चांगल्या प्रकारचे होते. घरातील वातावरण, विचारांची देवाणघेवाण, मुलांचे संगोपन हे जाणीवपूर्वक उत्तम रीतीने करता येते. दोघांनीही विचारपूर्वक एकमेकांचे strong points आणि weak points समजून, विचार करून स्वीकारले पाहिजेत. जसे एखादी स्त्री खूप चांगलं करिअर करू शकत असेल (उदा. इंद्रा नूयी) तर तिला सपोर्ट करून वेळप्रसंगी कुटुंबाकडे स्वतः जास्त लक्ष देऊन तिला पुढे जाण्यासाठी पुरुषांनी, तसेच सर्व नातेवाईकांनी, मुख्यत: दोघांच्या आईवडिलांनी प्रोत्साहन द्यायला पाहिजे. एखाद्या पुरुषाचे करिअर मध्यम असेल पण तो घर चांगले सांभाळत असेल तर त्यात कमीपणा वाटता कामा नये. 

परस्परांबद्दल आदर, त्याग, आपले आयुष्य यशस्वी करण्याच्या दिशेने ठेवलेला focus आणि acceptance  या गोष्टी दोघांनीही प्रयत्नपूर्वक आचरणात आणल्या तर जीवनाचा रथ आनंदाने पळत राहील.

स्त्रियांच्या, शिक्षण आणि इतर अनेक क्षेत्रांत झालेल्या प्रगतीची परिणती ही "दोन दिशांना दोघे आपण" अशी न होता एक स्वस्थ, आनंदी, समृद्ध घर आणि पर्यायाने समाज आणि जग निर्माण करू शकते. 
                              भारती सप्रे 



No comments:

Post a Comment