२१व्या शतकातील आई
आहे अष्टावधानी
झाशीची राणी लढली ब्रिटिशांशी
ही लढते मुलांच्या समस्यांशी
शिक्षण, नोकरी, घर; संसार लागला मार्गी
मागच्या पिढीतल्या आईची जबाबदारी संपली.
हौस, मौज, दुखणी, बाबी
काढते आपल्या आईसारखी;
पण शाळा, अभ्यास, क्लास अन् activities,
हीच असते सहभागी!
बाबाही डोकाऊन जातो; पण खरी कसरत आईची
मुलाच्या जन्माचा आनंद क्षणभर;
मग काळज्या सुरू भराभर -
मुलाचा व्यक्तिविकास बघायला हवा.
आरक्षण नि स्पर्धा - दोन्ही जीवघेणी;
घर, नोकरी सांभाळून सर्व करायचं,
अवघड कसरत तारेवरची.
सगळ्या आघाड्यांवर नाचायचं,
कामावालीवाचून तिचं पान नाही हलायचं.
मुलाना पाळणाघरात, थोरांना वृद्धाश्रमात,
सगळेच बोल लावतात -
ते झेलते ती मनातल्या मनात.
प्रोजेक्ट असतो मुलाचा -
काम मात्र आईचं;
स्पर्धा परीक्षा मुलीची,
धांदल धावपळ आईची!
पिकनिक, ट्रिप्स नि मित्रांचे वाढदिवस;
आई राबतीय रात्रंदिवस
नवीन दिवस उजाडतो, नवीन समस्या घेऊन ..
आयुष्य आहे ताण तणावाचं,
चिंता काळज्या आहेत वेढून
गर्भवती झाली की होतं तिला धस्स ..
गर्भातल्या जीवाचेही तेवढेच असतात सुखाचे दिवस!
नर्सरीच्या प्रवेशापासून ताण सुरू होतो,
पैशाच्या गाठोड्याने तो कमी करावा लागतो
गाठोडं भरायला आईही बाहेर पडते
वाढली महागाई, महाग झाली आई -
गैरहजेरीचा गैरफायदा मुलांनी घेऊ नये म्हणून
डोळ्यात तेल घालत राही
पण ही आई नाही केविलवाणी;
हुशार, कर्तबगार अन् खंबीर आहे
जगाकडे डोळसपणे बघत आहे
व्यवहारीपणाच्या तिच्या कक्षा रुंदावत ठेवते आहे
तिच्याजवळ पैसा आहे, टोकाचं व्यक्तिमत्व आहे
तिच्याजवळ व्हील आहे - गाडीचं आणि घराचं...
सक्षम आहे, सबला आहे - व्हावंच लागतं तिला!
नाहीतर जबाबदारीचं शिवधनुष्य पेलेल कसं तिला?
बदलत्या काळाचे फटकारे झेलते -
मुलांसाठी ढाल होऊन लढते
पण ही २१व्या शतकातल्या आई एका ठिकाणी चुकते
अवाजवी अपेक्षा मुलांवर लादते!
एक मात्र खरं -
मुलं तिची दुरावत चालली आहेत!
बाहेरचं जग त्यांना साद घालतय-
परदेशाचा राक्षस तिला कॉम्पिटीशन देतोय.
पण आई ती आईच! मागल्या पिढीतली किंवा २१ व्या शतकातली -
मुलं हा वीक पोईंट असणारी; मुलांचा वीक पोईंट असणारी!!
अंजली टोणगांवकर
No comments:
Post a Comment