संक्रांत

संक्रांत म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत झालेले संक्रमण. हे दर महिन्याला होते. पण जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा, म्हणजे साधारणपणे १४ जानेवारीच्या आसपास संक्रांतीचा सण साजरा केला जातो. भारत हा कृषिप्रधान देश आहे व शेतकरी हा राजा आहे. त्याला अनुसरून सण असतात. गहू, हरभरा व तांदूळ नवीन निघाल्याने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस असतात. निसर्गात बदल होतो. शिशीर ऋतू असतो. थंडी थोडी कमी व्हायला लागते. तेव्हा आपण संक्रांत साजरी करतो.
यानिमीत्त संक्रांतीच्या मुहूर्तावर सवाष्ण बायका, ब्राम्हणांना व सवाष्णींना खिचडी, पैसे व विविध धातूंची भांडी, शेतातील नवीन  धान्य असे दान देतात. जेणेकरून समाजातील सर्व बलुतेदारांना (कुंभार, कासार वगैरे) काम मिळेल. संक्रांतीच्या आधीचा दिवस असतो 'भोगी'. या दिवशी मिश्र भाजी, तीळ लावलेली भाकरी व खिचडी असा जेवणाचा बेत असतो. संक्रांतीचे दान केल्यावर तिळगुळाची पोळी व कोसल्या ( एक प्रकारची करंजी) बेत असतो. थंडीत हे पदार्थ छान लागतात. शरीरात उष्णतापण येते. नंतर दुसऱ्या दिवशी 'करे' ला नवीन आलेल्या तांदळाचे धिरडे व खीर असते. आपल्या पूर्वजांनी ऋतूनुसार किती योग्य बेत आखले आहेत.
या दिवसांत लहान मुले पतंग उडवतात. आकाशात ते रंगीबेरंगी पतंग छान वाटतात. पतंग आकाशांत कितीही उंच उडाला तरी त्याचा दोरा खाली मुलाच्या हातांत असतो. सर्व मोठ्यांना हा जीवनाचा संदेशच असतो. कितीही उंची गाठा, स्वैर वर जा पण पाय जमिनीवर असू द्या. अथवा आपली पण दोरी परमेश्वराच्या हातात आहे ह्याची आठवण ठेवा. मग हळदीकुंकू असते. ह्यात स्त्रिया व मुली रथसप्तमीपर्यंत व्यग्र असतात. आता माझ्या आठवणीतील संक्रांत म्हटली तर मला आठवते परकर-पोलके. वर्षभर कसा परकर पोलका हवा हे आम्ही ठरवायचो.
मग तिळगूळ खाण्याची मज्जा. थंडीत वड्या, लाडू छान वाटायचे. आई साखरेच्या वड्या करायची, पण मला मात्र तिळगूळच आवडतो. आम्ही चार भावंडे. तिळगूळ डब्यातून फस्त करायचो. पण संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणी पाहुणा आला तर तिळगूळ घेतल्याशिवाय / दिल्याशिवाय जात नसे. कुठे कुठे लपवायची ती माऊली तिळगूळ! पण गृहिणी म्हणजे काय? हे संस्कार तिने नकळत आम्हा तिन्ही बहिणींंवर केले. मला तिचे खूप कौतुक वाटते.
हळदीकुंकूही दर वर्षी सामाजिक स्तरावर व कल्पकतेने केले जायचे. दर वेळेला नवनवीन वस्तू लुटल्या जायच्या. कधी बटवे, पिशव्या शिवून, कधी सुविचार लिहून, तर कधी अक्षरसुधार पाठ पण लुटले जायचे. जनजागृती यातून असायची. तर कधी करमणूक म्हणून लॉटरी पद्धतीने चिठ्ठी काढायची व त्यात आलेली वस्तू महिलांना मिळायची. आईने कधीच एकटीने हळदीकुंकू केले नाही.
त्यासाठी तयारी अगदी घरी केलेल्या हलव्यापासून असायची. माझ्या लहानपणी तिला व बहिणींना हलवा करताना मी बघायची. ती स्वच्छता, ती मंद शेगडी. थंडीत त्याची ऊब छान वाटायची. वेगवेगळ्या (मुरमुरे, खसखस, तीळ) पदार्थांवर चढलेला काटा सुरेख दिसायचा. त्यांना केशरी/पिवळा रंग चढवायचा. पुढे मी पण हलवा करायला लागली. ते तीन-चार दिवस बसणे चिकाटी वाढवणारे असायचे.
पुढे बहिणींची लग्नं झाल्यावर भाच्यांची लूट व बहिणींचा सणपण केला. पुढे माझे लग्न झाल्यावर माझ्यासाठी पण हत्तीवरून (छोटा हत्ती) सण आला. जावयाला हार, अंगठी, मला विविध रंंगाच्या वड्या असे सर्व त्यात होते. माझ्या आजेसासूबाईंनी पण वयाच्या ७०व्या वर्षी कौतुकाने नातसुनेसाठी सुरेख दागिने केले होते. त्यानिमीत्त आठ दिवस आम्ही सर्व जमत असू. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मदत करीत असू. त्यासाठी वेगवेगळे हलवे लागतात. नाजूक खसखशीचा, हारासाठी मुरामुऱ्यावरचा, मंगळसुत्राच्या वाट्यांसाठी डाळीवरचा. किती कल्पकता असायची. बायकांना सृजनशीलता (creativity) दाखविण्यासाठीच हे सर्व सण असायचे.
माझे मिस्टर संरक्षण खात्यात. बदलीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेलो। कानपूर, पुणे, मुंबई, दिल्ली. मला पण लोकांची आवड. त्यामुळे मी दरवर्षी सगळीकडे हळदीकुंकू करायची. कानपूरला हिंदी लोकांना समजावून सांगावे लागायचे, ‘तिळगुळ का घ्यायचा व का द्यायचा ? ’. त्यांना सांगता सांगता लहानपणी ऐकलेल्या, कानावर पडलेल्या सर्व गोष्टींमागचा विचार कळायचा.
पुण्याला व मुंबईला पद्धत आहे की, लहान मुले-मुली नटूनथटून मोठ्यांना तिळगूळ द्यायला घरोघरी जातात. मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतात. परंतु नागपूरला त्याच्याउलट असते. मोठ्यांनी लहानांच्या हातावर तिळगूळ ठेवायचा. लहानांनी नमस्कार करून आशीर्वाद मागायचा. तिळगूळ खायला सर्वांना खूप आवडतो. मग आम्ही आमच्या आजीआजोबांना जास्त नमस्कार करायचो. जेणेकरून संक्रांतीच्या काळात ३/४ वेळातरी  एकेकाकडून तिळगूळ मिळावा. तेंव्हा कळत नव्हते, पण तेवढेच जास्त आशीर्वाद घेतले हे आता कळते. माझी मुले हा सण दोन्ही पद्धतीने साजरा करीत असत.
मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातही हे सण आवर्जून साजरे करतात. लोकलमध्येसुद्धा हळदीकुंकू करून स्वतःला समृद्ध करतात व मनोरंजन पण करून घेतात. वेळ नाही हे कारण देत नाहीत. पण मला वाटते, तेच पुण्यात मात्र ह्याच कारणांनी उच्चभ्रू समाज हळदीकुंकू करायचे टाळतो. पार्ट्या करतो पण हळदीकुंकू करणे मागासलेपणाचे वाटते.  
मुंबईला असताना या हळदीकुंकवाच्या निमित्ताने घरी बोलावलेल्या बायकांमधून एक women’s welfare society ची मी स्थापना करू शकले. त्यातूनच पुढे बायकांसाठी लघुद्योग करायला सरकारकडून जागा मिळवली. दरवर्षी प्रदर्शने भरवून त्यांनी केलेल्या कलेला विक्रीचे स्थान मिळवून दिले. असे विधायक कार्य झाले.
या धरतीवर दिल्लीतील संक्रांत खूपच भावली. इथल्या महिलांनी वेळ नसतो, यावर छान उपाय शोधला. रोज रोज हळदीकुंकवाला जाऊन घर विस्कळीत व्हायला नको म्हणून १५/२० सदस्य संक्रांतीच्या १५ दिवस आधी एक मीटिंग घेतात. कधी व कुठे हळदीकुंकू करायचे ते व मेन्यू ठरतो. लुटायचे वाण काय व कोणी आणायचे ते पण सर्व ठरते. मग या २० सदस्या प्रत्येकी त्यांच्या दोन मैत्रिणींना बोलावतात. अशा ६० जणी ठरल्या दिवशी बगीच्यात जमतात. दुपारी मुलांच्या शाळा असतात. दिल्लीच्या थंडीत दुपारी सर्व मिळून हळदीकुंकू करतात. नवीन ओळखी होतात. खाणेपिणे, हळदीकुंकू होते. सोबत गप्पागोष्टी पण होतात. या निमित्तानी सर्व जणी एकत्र येतात व संक्रांतीची संस्कृती टिकून राहते. ३-४ तास एकत्र राहून छान आनंद लुटतात. ‘इच्छा तिथे मार्ग’ याचे हे उत्तम उदाहरण आहे.
-- वर्षा संगमनेरकर

No comments:

Post a Comment