तू आहेस तरी कोण?


तुक्याला सापडला त्याने लिहिले; पण माझा पहिला आणि शेवटचा प्रश्न हाच- तू आहेस तरी कोण?
अलौकिक अनामिकाला प्रश्न विचारतो आहे तरुण कवी अविनाश वसंत किनकर
------------------------------------------------
तुक्याला सापडलास त्याने लिहले; पण तरी माझा प्रथम प्रश्न की तू कोण आहेस? शेवटचा प्रश्न तू कोण आहेस? तुला उत्तर द्यायचे नसेल तर तसे सांगपण माझ्यासारख्या कित्येक वेड्यांना तू कामाला लावले आहेस. तू शक्ती की सामर्थ्य, जड की चैतन्य, जाणीवेतला की नेणीवेतला, मर्त्य की अमर्त्य, दगड की देव, ह्यातला की त्यातला, असे अनेक व्दंव्द तू खेळवतोस अनेकांच्या डोक्यात कामालाच लावसे जणू म्हणजे तू नक्की कोण आहेस?.......
गेली अनेक वर्षे तुला अव्दैतात ठेवून बघताहेत, तू त्यात बसलास का, मला माहीत नाही मात्र सर्वांना मार्गस्थ जरूर केले. या वारीला तू लोकांना घरदार सोडून बोलवतोस ते पण निलाज-या सारखा...बरं मानल तुला मूलतत्वपण तुझे नाव तेच का? वेगळे का नाही तू पुराणात का दिसत नाही वा वेदातही?
...हो लोक लावतात कसली तरी सांगड. एका लोककथेत मात्र फिरुन फिरून येतोस. माऊली तर नक्कीच तुला तयार केला नाही.
का खेळ खेळवतो तू..?
अरे वेड्या किती लांबून चालवतो कितीरे स्वार्थी रे तू!
फक्त तुझ्याच खुशी साठी ना ..
तुलाच ओढ त्यांची ..
तुलाच करायचेय का तुझे शक्ती प्रदर्शन?
चुंबक रे तू बाकी लोखंडासोबत खेचले जातात.
जा ना प्रत्येकाकडे; पण तुलाही नाही बघवत का हा मानव शांत राहिलेला?
का त्यांनाही हे ध्यान तिकडे आल्यावरच शिकवणार?
खरंच सांग तू हात का ठेवले आहे रे कंबरेवर?
डोक्यावर का नाही ठेवले.?
सरळच का नाही सोडलेत्या हाताने किती रे हंगामा केलाय किती तरी जणांच्या डोक्यात हे माहीत नसेल नाही!...अरे माहिती असेल तुला, चुकले माझे मूलतत्व ना तू;पण खाजगीत विचारतो, ती वीट कुठून आणलीस? आता झिजली रे; पण विटेवरच का, लाकूड नाही भेटले का आणि तू असा की आमची शाखा कुठेही नाही. फक्त एकच कंबरेवर हात विटेवर उभा जरा कधी बसून बघितले असते. मग मागे तुक्याने सांगितले तू ध्यान आहेस. वाचले होते कुठेतरी, तिबेटमध्ये ध्यानाचा प्रकार आहे असा, विटेवर उभे राहणे कंबरेवर हात ठेवून. संतुलन करायचे फक्त ज्या वेळी सर्वांगातून चेतना वाहिली की झालं मूलतत्व ...तेच सांगत आहेस का? जास्तच बडबड झाली ना ..तुझ्या ध्यानात अडथळे आले नाही ना...
तू कोण म्हटल्यावर तू कोठून आलास हे ओघाने आलेच. तू कानडा आहेस, असे कळाले पण तिथेही तू कुठे आहेस ..शाखाच नाही तुझी. तू फक्त अतर्क्य काही तुला 'डेयटी' तर काही त्या 'कंट्रोल' करणा-यां बरोबर जोडून देतात अन मोकळे होतात. अजून एक तुझा आणि रुक्मिणीचा रूसवा का? अरे महदेशचा सालस रे ती; तू तर बोलून चालून रांगडा. शब्दाचा उच्चार करतानाही कंठ आणि जिभेतून तालव्य तयार होऊन कसली तरी भेदक कंपने तयार होतात. मस्तक कलियुगातील मानवापासून वेगळे व्हायला बघते. जाऊ दे रे, तुला कसली फिकीर; पण अगोदरच सांगतो रुक्मिणीला काय बोलायचे नाही....
फार बुध्दिवादी विचार नाही रेपण मन खाते रे म्हणून विचारतो तू काळा का? त्यावेळी रंग उपलब्ध नव्हते का? दगड नव्हता का दुस-या रंगाचा,नाहीतर लगेच हे प्रश्न उठावतात रे. तू आर्य की अनार्य? तुझ्या मस्तकावर नाग का आहे आणि वगैरे वगैरे...तू खरंच आहेस का ? हे असले खेळ तूच खेळो जाणे. किता त्रास होतो, माहिती आहे का? एवढ्यातच डोके आहे- नाही, याचा विचार सुरू झालाय. तुझा माग घेताना माऊली अन तुकोबाला काय झाले असेल, याचा विचार करवत नाही. छळून छळून बोलवायचा हा धंदा लय भारी हाय....
आजच कोणीतरी सांगितले सुख आणि दुःख मिळून जीवन असते. नुसते सुखही काय कामाचे अन दुख ही...पण मला सांग ही व्याख्या करणारा कोण? का तू बनवून दिली आहे कोणाला? मोजमाप कसे करतात कळू दे की जरा..डोळे बंद करून बसला आहेस, जरा डोळे उघडे कर ना. कळेल तुला काय चालू आहे ते ..हे पण तूच करत असशील, नाही का..?
ही भारी कला आहे तुझ्याकडे प्रश्नांपासून भरकटवायची. लांब घेवून चालला होतास;पण फ्रॉइडचा भडिमार होतोय त्यामुळे कळले आणि आलो परत  ...मान्यय रे त्यांनी सांगितलेय; पण आळशी बनवलेस तू ..त्यांचा तू समजायला ही अनेक वर्षे लागतील. इथे मुखोद्गत असणार-यांना तरी कुठे कळला आहेस तू? मान्य मला तू सगळ्यांसाठी वेगळा आहेस ...स्त्री वा पुरूष, रंग ना वर्ण वा जात ना वर्ग, दगड ना देव ....फक्त मूलतत्व ....हीच व्याख्या करू का ?? बस ना एवढेच ?..तरी जेव्हा परत कधी येशील, तेव्हा सांग मला नक्की ...तू कोण आहेस?......का एवढेच लक्षात ठेऊ माऊलीने सांगितल्या परी...
विश्वाचे आर्त माज्यामधे सामावले अवघेची जाहले देहब्रम्ह!
-अविनाश वसंत किनकर



No comments:

Post a Comment