पुस्तक परीक्षण : अपूर्व बंगाल



बंगाल आणि महाराष्ट्र यांत एक अभूतपूर्व असे नाते आहे. गालात रसगुल्ला ठेऊन मिठास बोलणाऱ्या बंगाली भाषेबद्दल मराठी माणसाला उपजत आकर्षण प्रेम आहे. हे प्रेम साहित्याचे असो, नाट्यसृष्टीचे असो, चित्रपटाचे असो , कला संस्कृतीच्या धाग्याने मराठी माणूस बंगालशी बांधला गेला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र, शरदबाबू, सत्यजित रॉय, यांनी वंगसंस्कृतीच्या बहुविध दालनांची ओळख देशाला करून दिली आहे. लेखिका नलिनी आत्मसिद्ध यांचे 'अपूर्व  बंगाल’ हे  पुस्तक विविध क्षेत्रांत उच्चपदी पोहोचलेल्या पंधरा व्यक्तिमत्त्वांची ओळख करून देते. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, सत्यजित रॉय, अन्नपूर्णा  देवी, महाश्वेता देवी, शरदबाबू, अपर्णा सेन अशी अनेक डोंगरएवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेली, आपापल्या क्षेत्रात स्वतःचावेगळा असा ठसा उमटवलेली माणसे! यांच्या कर्तृत्वाला एका लेखात  सामावून  घेऊन, त्यांची ओळख करून देणे हे महाकठीण काम. लेखिकेने हे शिवधनुष्य पेलण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

काही उदाहरणेच पाहायची झाली तर... आपल्या सर्वच साहित्यातून शरदबाबूंनी वंगसंस्कृतीचे सम्यक दर्शन घडवले आहे. तेथील गावे, जमीनदारी, स्त्रियांची घुसमट, त्यांची भावुकता, त्याग, प्रेम सर्वच त्यांनी चित्रदर्शी शैलीत उभे केले. आजही त्यांच्या कथा, कादंबऱ्या, चित्रपटांचे विषय बनतात. त्यांच्या देवदास, श्रीकांत या कलाकृती आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.

सत्यजिय रॉय यांच्या 'पथेर पांचाली'ने बंगालचे नाव जगभर झाले. त्यांच्या वरील प्रदीर्घ लेख ही तर वाचकांना मेजवानीच आहे. स्त्रीच्या दुःखाला वाचा फोडून, तिच्या व्यथा, वासना, धीटपणे  पडद्यावर मांडणाऱ्या अपर्णा सेनचे कर्तृत्वही  तितकेच मोठे आहे.

जगावेगळी दंतकथा म्हणून ज्यांची ओळख लेखिकेने करून दिली आहे, त्या अन्नपूर्णा देवींवरचा लेख वाचकाला सुन्न करतो. चार दशके स्वतःहून अज्ञातवासात  जीवन कंठणारी, प्रसिद्धीच्या जगापासून चार हात दूर राहणारी ही सुरबहार वादक विदुषी अन्नपूर्णादेवी सतत मनात रेंगाळत राहते.

साहित्यातील ज्ञानपीठ हा उच्चतम पुरस्कार प्राप्त झालेल्या हजारो आदिवासींची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाश्वेता देवींचे लिखाण अंगात भिनणारे डोळस बनवणारे आहे. ज्यांच्या कर्तृत्वाला   मोजमाप नाहीच अशा अनेक म्हणजे झुम्पा लाहिरी, अमिताभ घोष, अनिल चॅटर्जी, नामवंत साहित्यिक सुनील गंगोपाध्याय यांच्या साहित्याचा,  व्यक्तिमत्त्वाचा परिचय लेखिकेने समर्पकपणे करून दिला आहे.

या सर्वांचे प्रेरणास्थान  असलेले रवींद्रनाथ म्हणजे भारताला पडलेले सुंदर स्वप्नच . त्यांची प्रतिभा, त्यांचे चिंतन, विचार, विचारांचे कृतीत रूपांतरण यातून निर्माण झालेली गीतांजलीसारखी नोबेल पारितोषिक विजेती साहित्यकृती. शांतिनिकेतनची निर्मिती, त्यातून घडलेले अनेक कलाकार, शिल्पकार, चित्रकार, साहित्यिक हे सारे बंगालचे वैभव आहे. स्वातंत्र्यानंतरचा   बंगाल समर्थपणे  उभा करणारे सुनील गंगोपाध्याय, सरमेश बाबू, कमलकुमार सेन इत्यादी ही परंपरा पुढे नेत आहेत. या सर्वांची ओळख करून देऊन आपल्याला बंगाली संस्कृतीची सफर करून आणणाऱ्या नंदिनी आत्मसिद्ध यांचे ऋण आपण मान्य केलेच पाहिजे.

- मीरा मुकुंद

No comments:

Post a Comment