आज
शशांकनं आपल्या हातात कप पकडून अर्धा कप दूध प्यायलं... गेल्या पंधरा दिवसांपासून
तो आणि मी, आम्ही दोघंही झटत होतो की, दुधाचा छोटा कप हातात धरायचा. अगदी एका हातात नाही, पण दोन्ही हातांनी धरायचा आणि तो तोंडापर्यंत
न्यायचा. सुरुवातीला रिकामाच कप घेऊन प्रयत्न केला... नंतर थोडंसं पाणी कपात घातलं आणि ते
पिण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कप तोंडापर्यंत पोचायचा, पण पाणी काही पिता यायचं नाही. ते सांडायचं...
अनेक वेळेला शशांक हताश व्हायचा. मलाही वाईट वाटायचं... पण दुसर्या दिवशी नव्या
उमेदीनं आम्ही दोघंही पुन्हा प्रयत्न करायचो... आज त्या प्रयत्नांना यश मिळालं... आम्हा दोघांनाही केवढा आनंद झाला... शशांक त्याच्या परीनं आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न
करत होता, हातापायांची वेडीवाकडी हालचाल करून...
ती हालचाल पाहून मला गहिवरून आलं.
एखादी
छोटीशी क्रिया करायला जमणं म्हणजे फार मोठं काहीतरी मिळवलं आहे असं वाटत होतं.
किती छोट्या-छोट्या गोष्टी करण्यासाठी आम्ही दोघंही झटत होतो... एखादी नवीन गोष्ट
करायची असं ठरवायचं आणि ती गोष्ट करता यावी म्हणून दिवस आणि दिवस प्रयत्न करत
राहायचं. दुसरं काहीच आमच्या हातात नव्हतं... तेच आता आम्हा दोघांचं विश्व झालं
होतं. त्या मर्यादित विश्वात आम्ही दोघं आमचा आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होतो...
तो आनंद मिळवण्यासाठी धडपडत होतो...
माझी
धाकटी लेक मधुरा आता नोकरी करायला लागली होती... तिचं शिक्षण पूर्ण होऊन तिला
नोकरीही मिळाली होती. ती खुशीत होती. मित्र-मैत्रिणींबरोबरचं तिचं आयुष्य अतिशय
वेगानं पुढं चाललं होतं. तिचं वेगानं बदलत जाणारं जग माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी
होतं. मंदार, माझा नवरा; माझ्यापासून किती लांब गेला आहे ह्याची त्यालाही जाणीव नव्हती आणि मलाही...
माझं आणि त्याचं विश्वच वेगळं होतं...
मी, माझा मोठा मुलगा शशांक, धाकटी लेक मधुरा आणि माझा नवरा मंदार आमचं
चौकोनी कुटुंब असलं, तरी त्याचे कोन मात्र तीनच होते. मी आणि शशांक आमचा एक कोन, मधुराचा दुसरा कोन आणि मंदारचा तिसरा कोन.
मंदार
एका मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. त्याच्या मीटिंग्ज, त्याचे देशातले आणि परदेशातले दौरे, त्याची स्वतःचीच स्वतःशी असलेली स्पर्धा ह्यांत तो अगदी गुरफटून गेला होता.
मधुरा, शशांकनंतर तीन वर्षांनी तिचा जन्म झाला आणि माझ्या, आम्हा तिघांच्या विश्वात एक सुंदर परी आली. आम्हा तिघांचीही ती अतिशय लाडकी
आहे. तिच्यासाठी आम्ही तिघंही काय-काय करायचो, हे आठवलं तरी मन अगदी हरखून जातं. किती छान दिवस होते ते... त्या वेळी मंदार
एका छोट्या कंपनीत मॅनेजर होता. आजच्यासारखी स्पर्धा नव्हती... अगदी सरळ सोपं
आयुष्य जगत होतो आम्ही चौघं. पैसा नसला तरी सुख होतं, आनंद होता, एकमेकांना वेळ देण्याची ओढ होती.
आज ते
सगळंच हरवलं आहे. मंदारला माझ्यासाठी वेळच नसतो. मधुरा माझ्यापासून खूप दूर गेली
आहे. खूप तुटक वागते ती माझ्याशी... अनेक वेळा विचार करूनही ती असं का वागते आहे, हे कळतच नाही. आजी होती तोपर्यंत तिचं आणि आजीचं चांगलं मेतकूट होतं... दोन
वर्षांपूर्वीच आजी गेली आणि तिनं आपलं वेगळं विश्व तयार केलं आणि त्यातच ती
रमायला लागली. तिच्या आणि माझ्या नात्यातला हा कोरडेपणा मला हल्ली फार जाणवू लागला
आहे. काय घडलं असेल असं की ती माझ्यापासून एवढी दूर गेली आहे? वरवर पाहता सगळं
अलबेल आहे असं वाटतं... तिचा माझ्यावर राग नाही... ती बेजबाबदारीनं वागत नाही...
तिच्या आयुष्यातल्या अनेक लहानमोठ्या घटना ती मला आवर्जून सांगते... पण तरीही
तिच्या आणि माझ्या नात्यात कुठंतरी कोरडेपणा, दुरावा जाणवतो... मंदारचंही थोडंफार तसंच आहे...
शशांकला
पलंगावर झोपवता-झोपवता माझ्या डोक्यात विचारांचं वेगळंच चक्र आज सुरू झालं
होतं....
#####
त्या
दिवशी मी नेहमीप्रमाणे तयार होऊन शाळेत निघाले होते. मधुराला तिच्या शाळेत सोडलं
आणि मी माझ्या शाळेकडे निघाले होते. शशांक दहावीला होता. त्याचे अभ्यासवर्ग आणि
त्याचा अभ्यास ह्यांत तो अगदी मश्गूल होता. तो सकाळीच घरातून निघाला होता. त्याची
आणि मधुराची शाळा एकच होती, पण वेळा वेगवेगळ्या
होत्या.
आम्हा
दोघांनाही शशांकची दहावी आणि त्याचं पुढचं करियर ह्याबद्दलची उत्सुकता होती. मी
आणि मंदार शशांकला ह्याची जाणीव करून देत
होतो. त्याच्या फार मागे लागत नसलो, तरी
त्याला ही जाणीव वेळोवेळी करून देणंही जरा जास्तच होत होतं. शशांकची शाळा, त्याचे शिक्षक आणि आम्ही दोघं, आम्हा
सगळ्यांनाच शशांककडून फार अपेक्षा होत्या. तो बोर्डात येण्याची स्वप्नं आम्ही
सगळेच पाहत होतो.
अगदी
त्या दिवशीही मी आणि मंदार शशांकवरूनच बोललो होतो... पण नियतीच्या मनात काही
निराळंच चाललं होतं. शशांकची सहामाही परीक्षा सुरू होती आणि त्या दिवशी शेवटचा पेपर
होता... पेपर संपवून शशांक सरळ घरीच येणार होता. त्यानं आज बटाटेवड्याची फर्माईश
केली होती. मी सकाळीच बटाटे उकडून ठेवले होते. घरी गेल्याबरोबर गरमगरम बटाटेवडे
लेकाला खायला घालायचे होते.
त्या
दिवशी माझ्या शाळेतही जरा जास्तच काम होतं, पण मला घरी जाण्याची ओढ लागली होती. कधी एकदा घरी जाते आणि शशांकशी
परीक्षेवरून बोलते असं झालं होतं... आणि अचानक माझ्या टेबलावरचा फोन खणखणला... आता
कोण असेल, असा विचार करत जरा अनिच्छेनंच फोन उचलला. पलीकडून
शशांकचे प्रधानसर बोलत होते. त्यांनी जे काही सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची
जमीनच सरकली... सगळंच कसं अकल्पित घडलं होतं... काही विचार करायला वेळच नव्हता...
मी माझी पर्स उचलली आणि माझ्या सहशिक्षकांना सांगून निघाले...
धावतपळत
रिक्षा मिळवली आणि त्याला गोडबोले हॉस्पिटलला रिक्षा घे असं सांगितलं. हॉस्पिटल
येईपर्यंत जीव थार्यावर नव्हता... काय झालं असेल शशांकला, कसा असेल तो, ह्या विचारांचा गोंधळ
मनात होता... अचानक आलेल्या संकटामुळे माझं आयुष्य किती बदलणार आहे, माझ्या आयुष्यात किती उलथापालथी होणार आहेत ह्याची पुसटशीही कल्पना माझ्या
मनाला शिवली नव्हती.
रिक्षा
हॉस्पिटलपर्यंत पोचली आणि रिक्षेवाल्याच्या हातात शंभराची नोट कोंबून मी धावत
सुटले... हॉस्पिटलच्या दारातच शाळेचा शिपाई उभा होता. मला पाहताच त्यानं मला
सांगितलं की, तिसर्या मजल्यावर प्रधान सर तुमची वाट पाहताहेत...
शशांकला त्यांनीच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आहे... मी कसाबसा तिसरा मजला गाठला.
प्रधान सर तिथं माझी वाट पाहत उभेच होते. त्यांनी मला आयसीयूकडे नेलं आणि आणि
आयसीयूच्या खिडकीतून मला शशांक दिसला... डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते...
सलाईन लावलं होतं... ऑक्सिजनचा मास्क नाकाला लावला होता. त्याला त्या अवस्थेत
पाहिलं आणि माझा तोलच गेला. मी मटकन खाली बसले... प्रधानसर आणि दीक्षितबाईंनी मला
कसंबसं सावरलं. आता मंदारला फोन करून कळवायचं होतं. मधुराला शाळेतून आणायचं होतं.
आणि ते मलाच करायचं होतं. थोड्या वेळानी मी स्वतःला सावरलं. आधी मंदारला फोन करून
सांगितलं आणि मधुराला शाळेतून आणायचं आहे हेही त्याला सांगितलं. माझा आवाज ऐकून
मंदारही घाबरलाच होता, पण त्यानं त्या वेळी तरी
मला धीर दिला आणि लगेचच पोचतो असं सांगितलं.
थोड्या
वेळानी प्रधानसर मला म्हणाले की, आता आपण डॉक्टरांना जाऊन
भेटू या का? इतका वेळ मी शशांकला पाहतच बसले होते... त्याला काय
झालं आहे, कसं झालं हे, असं काही विचारायचं भानच नव्हतं मला. डोकं बधीर झालं होतं आणि मन फक्त शशांकचा
विचार करत होतं.
जड
पावलांनी मी डॉक्टरांच्या खोलीत गेले. डॉक्टरांचा गंभीर चेहरा बरंच काही सांगत
होता, पण ते काय सांगताहेत ह्याकडेच लक्ष होतं. कशी सुरुवात
करावी, हे बहुधा डॉक्टरांनाही जरा जडच जात होतं... शशांकच्या
मेंदूला मार बसला आहे आणि आता सिटीस्कॅन करणं गरजेचं आहे एवढंच त्यांनी सांगितलं.
खरं तर मला काहीच कळत नव्हतं पण मग मी विचारलं की, पण तो शुद्धीवर कधी येईल? मला त्याच्याशी बोलायचं
आहे... डॉक्टरांनी खांदे उडवले आणि त्यांनी समोरच्या विठोबाकडे बोट दाखवलं. आता
सगळं त्याच्याच हातात आहे असं म्हणाले. काय बोलावं काहीच कळत नव्हतं... काय करावं
हेही उमगत नव्हतं. इतक्यात डॉक्टरांच्या खोलीचा दरवाजा ढकलून मंदार आत आला आणि
माझा बांध फुटला. मी मंदारला घट्ट मिठी मारली आणि हमसून हमसून रडू लागले. मला
वाटतं त्या क्षणी माझ्या हातात तेवढंच होतं. मंदार मला धीर द्यायचा प्रयत्न करत
होता, पण तोही तसा हदरलेलाच होता. दीक्षितबाई मला बाहेर
घेऊन गेल्या आणि मग पुढे काय करायचं हे पाहण्याची जबाबदारी मंदारनं घेतली. त्यानं
स्वतःला सावरलं आणि तो डॉक्टरांशी बोलू लागला. अधूनमधून तो प्रधानसरांनाही काही
विचारत होता. नक्की काय झालं हे त्यानं प्रधानसरांकडून समजावून घेतलं आणि आमच्या
शशांकला त्यानं डॉक्टरांच्या स्वाधीन केलं.
शाळेचे
जिने उतरताना शशांकचा पाय घसरला आणि तो पायऱ्यांवरून गडगडत खाली पडला होता.
त्याच्या मेंदूला जबरी दुखापत झाली होती आणि बराच अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे तो
बेशुद्ध झाला होता. नक्की काय झालं आहे हे पाहण्यासाठी सिटीस्कॅन करणं आवश्यक
होतं. मंदारनं डॉक्टरांना सांगून लगेचच सिटीस्कॅन करून घेतलं. सगळे सोपस्कार पूर्ण
केले आणि तो माझ्याजवळ येऊन बसला. काय बोलायचं काहीच कळत नव्हतं. त्यानं माझ्या
खांद्यावर ठेवलेला आश्वासक हात मात्र मला बरंच काही सांगून गेला. त्यानं मला आधार
दिला होता पण त्यालाही आधाराची गरज होती....
संध्याकाळ
झाली आणि मला अचानक मधुराची आठवण झाली. मी मंदारला विचारलं, तेव्हा तो म्हणाला की त्यानं मधुराला घरी सोडलं आहे. मी त्यातल्या त्यात
निर्धास्त झाले. आता डॉक्टर काय म्हणतात, काय सांगतात ह्याकडे लक्ष लागून राहिलं होतं. मंदार आल्यानंतर थोड्या वेळानं
प्रधानसर आणि दीक्षितबाई परत गेले होते. आम्ही दोघंच होतो. एकमेकांकडे असहायपणे बघणं
एवढंच आमच्या हाती होतं. ह्या सगळ्यात किती वेळ गेला कुणास ठाऊक! थोड्या वेळानं
डॉक्टरांनी बोलावणं पाठवलं. त्यांना भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो.
त्यांनी जे सांगितलं ते ऐकून आमच्या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. आम्ही अगदी
स्तब्ध झालो होतो. डॉक्टरांनी आम्हाला कोणतीही आशा नाही असं सांगितलं होतं. मेंदूमधली
मुख्य नस दुखावली गेली होती. त्यामुळे मेंदूचं शरीरावरचं नियंत्रण पूर्णपणे संपलं
होतं. श्वास सुरू होता... जिवंतपणाचं तेच एक लक्षण होतं. आणि मग पुढचा महिनाभर तो
मृत्यूकडून जीवनाकडे परतण्याचा प्रवास सुरू होता... एकएक दिवस, एकएक क्षण..!
सगळ्यांनीच
आशा सोडली होती, पण मी मात्र आशा सोडली नव्हती. मी त्याच्या डोळ्यांत
जीवन शोधत होते. त्या काळात मी किती वेळा रडले असेन आणि किती वेळा देवाची करुणा
भाकली असेल माहीत नाही. महिन्याभरानंतर एक दिवस अचानक मला शशांकच्या शरीरात जीवन
दिसलं. त्यानं त्याचा पाय हालवला होता... एक आशेचा किरण दिसला होता. मी डॉक्टरांना
पाहून जायला सांगितलं. डॉक्टरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतरचा प्रत्येक
दिवस म्हणजे माझ्यासाठी आणि शशांकसाठी मृत्यूकडून जीवनाकडे परतण्याचा प्रवास होता.
त्या मार्गावर आम्ही दोघंच होतो आणि डॉक्टर आम्हाला मदत करत होते.
मंदारला
नवी नोकरी मिळाली आणि मग त्याचं हॉस्पिटलमध्ये येणं हळूहळू कमी होत गेलं. मधुराची
शाळा हेच तिचं आयुष्य बनलं होतं आणि तिची देखभाल तिची आजी, माझ्या सासूबाई करत होत्या. शशांकची जबाबदारी सर्वस्वी माझ्यावर येऊन पडली
होती. सहा महिन्यांनंतर मी शशांकला घेऊन घरी आले आणि मग शशांकच माझं जीवन झाला. मी
शाळेच्या नोकरीचा राजीनामा दिला.
आज
शशांकनं पायांची बोटं हालवली, आज शशांकनी हात वर केला, आज शशांकच्या तोंडातून अस्पष्ट आवाज आला, आज शशांकनी मला आई म्हणून हाक मारली... शशांकच्या दहावीनंतरच्या करिअरची
स्वप्न पाहणारी मी आज शशांकच्या छोट्या-छोट्या हालचालींमध्ये धन्यता मानत होते.
एका क्षणानं शशांकला जीवनमरणाच्या उंबरठ्यावर नेऊन उभं केलं होतं आणि मग त्याचा
मृत्यूकडून जीवनाकडचा अतिशय कंटाळवाणा असा प्रवास सुरू झाला होता... ह्या प्रवासात
मंदार माझ्या सोबतीला होताही आणि नव्हताही... मधुरानी कधी बोलून दाखवलं नाही, पण
तिनं माझ्याकडून आई म्हणून कोणतीही अपेक्षा ठेवली नव्हती... आईशिवाय जगणं तिनं
स्वीकारलं होतं... तिचे मार्ग तिनं स्वतःच शोधले होते... शशांकला माझी जास्त गरज
आहे, हे सत्य तिनं स्वीकारलं होतं...
- वृषाली
फडके
No comments:
Post a Comment