संकल्प

मिडल क्लास ते हाय मिडल क्लास अशी वाटचाल होऊन जवळपास तप उलटून गेलं होतं आणि आमची पुढच्या टप्प्याकडे आगेकूच सुरू झाली होती. कोणत्याही क्षणी 'मिडल' गळून पडणार होतं. आम्ही दोघे नवरा-बायको हाय सोसायटीच्या उंबरठ्यावर उभे होतो. बर्‍याचशा गोष्टींसाठी this is so middle class, that is so middle class अशी feelings मलाही यायला लागली होती. पण माझ्यातल्या 'त्या' values गळून पडत नव्हत्या आणि 'ती' mentality चेंज होत नव्हती. त्यामुळे माया साराभाई सारखीच्या ग्रुपमध्ये शिरकाव करणं खूपच दूरची गोष्ट होती. 'तिच्या ग्रुपमध्ये शिरण्याचा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' असा संकल्प मी केला. 
श्रीकृष्ण ज्वेलर्स, भीमा ज्वेलर्सकडून डायमंड्सची खरेदी मीही केली होती. पण 'गंजममध्ये बसून व्हाईट वाईनचे घुटके घेत घेत डायमंड्स निरखणं-पारखणं मला अजून जमलं नव्हतं. श्रीकृष्ण आणि भीमा ज्वेलर्स कस्टमर्सना वाईन पाजत नाहीत that is so middle class!

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन पैसा वसूल होईपर्यंत बुफे हादडणं खूप लोकं करतात. मीही केलं होतं! पण तिथे जाऊन garlic clear soup आणि greek and latin salad order करण्यातली गंमत मी अनुभवली नव्हती. डेझर्ट म्हणून गुलाबजाम with ice cream ऐवजी freshly cut fruits with honey lemon dressing वगैरे खाणं हा विचार माझ्या मनाला आत्तापर्यंत शिवला नव्हता. क्लबमध्ये जाऊन शटल ठोकत बसण्याचा उपक्रम मी वर्षानुवर्षं केला होता, पण आता पाणी डोक्याच्या वर चढायला लागलं होतं. काहीतरी लवकरात लवकर करणं भाग होतं. आता खेळायचं ते गोल्फच! त्यासाठी कितीही तंगडतोड करावी लागली तरी बेहत्तर! वॉर्डरोबमध्ये ठेवायचं ते मनीष मल्होत्रा, सत्या पॉल, परेश लांबा यांना! How can I forget सव्यसाची? व्हेकेशनला जायचं ते मेडिटेरियन क्रूझवर! तेही कुटुंबकबिल्यासह नाही. Family outing is so middle class!

योगा करायचा तो केरळातल्या रिसॉर्टमध्ये! प्राणायाम करायचा तो ऋषीकेशला! हेअरकट करायचा तो, 'बी ब्लंट'मध्ये, मॉकटेलचे सिप्स घेत घेत! पेडीक्युअर करायचं ते बॉडी क्राफ्टमध्ये! टॅटू करायचा तो बेली बटनजवळ! माया साराभाईची दातखीळच बसायला हवी.

टिरिंग टिरिंग टिरिंग टिरिंग... दारावरची बेल वाजत होती. दारात दूधवाला. 'दीदी, कूपन रखने को भूल गयी हो इसलिए बेल बजाई'. रोज रात्री दुधाचं कूपन दाराबाहेर ठेवणं
.
.
.
is so damn middle class
!

रूपा भदे

No comments:

Post a Comment