सय सोयऱ्यांची


सर्वसाधारण मराठी मध्यमवर्गीय पापभीरू घरात असते तसं माझ्याही घरात देवघर आहे. अगदी खूप मोठं नाही, पण गेल्या वीसबावीस वर्षांत, स्वतंत्रपणे देवपूजा चालू केली तेव्हापासून, अधून मधून त्यात भर पडत गेली आहे. जेव्हा घर बंद नसतं तेव्हा सकाळी देवपूजा आणि संध्याकाळी देवापुढे दिवा ही आता सवय झाली आहे. त्यात काही कारणामुळे खंड पडला तर चुकल्याचुकल्यासारखं वाटावं, इतका देवभोळा मी नक्कीच आहे.

आता देवपूजा हा काही माझ्यासाठी तास दोन तासांचा कार्यक्रम नसतो. किंबहुना, माझी देवपूजा हा घरात चेष्टेचाच विषय आहे. निर्माल्य काढून, हळद-कुंकू, नवी फुलं वाहणं, दिवा, उदबत्ती, आणि शेवटी मनःपूर्वक नमस्कार याला कितीसा वेळ लागणार? आणि त्यावरून चेष्टा करायचा चान्स बायको थोडीच सोडणार?

नोकरीनिमित्त बंगलोरला यायला निघालो तेव्हा बायकोने माहेरहून आणलेला बाळकृष्ण व अन्नपूर्णा बरोबर घेतली; वडिलांनी गडावरच्या देवीचा फोटो आणि सासऱ्यांनी साईबाबांचा फोटो दिला. आमचं लग्न झालं तेव्हा सासरे प्रवरानगरला होते – शिर्डी संस्थान तिथून जवळ – त्याची आठवण म्हणून मग कधीतरी –सत्यनारायण पूजेला लागते म्हणून शंख-घंटा आल्या. आईवडील तिरुपतीला गेले होते तिथून त्यांनी बालाजीची एक प्रतिमा आणली; बायको कोल्हापूरला गेली असताना, तिच्या माहेरची कुलदेवी म्हणून अंबाबाईची मूर्ती आली. एका मावशीने दिलेलं गणपतीचं नाणं छान वाटलं, तेही पूजेत आलं. एका ट्रीपमध्ये बाबांनी शंकराची पिंड देवांत ठेवायला आणली. आणि अगदी रीसेंटली कैलास–मानसरोवराच्या सफरीतून तिथली आठवण म्हणून आणलेला कैलासाच्या पायथ्यातला एक दगड आता देवघरात स्थापन झाला आहे. मी देवभोळा नाही म्हणत हा फारच पसारा मी जमवला आहे.

तर, माझी देवपूजा म्हणजे रोज या सर्व देवमूर्तींना हळद-कुंकू, फुलं वाहणं आणि रोज अशीच पूजा करता यावी असं – आर्थिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक स्वास्थ्य मला असावं यासाठी मनःपूर्वक प्रयत्न करण्याची आठवण स्वत:ला करणं! शेवटी देव तरी किती जणांकडे एकाच वेळी लक्ष देणार – तेव्हा आपला उद्धार आपणच करणं योग्य, या मताचा मी आहे.

कदाचित वाढत्या वयाचा आणि पांढऱ्या होत चाललेल्या केसांचा परिणाम असेल,अलीकडे या पूजेला माझ्यासाठी थोडा वेगळा अर्थ येत आहे. वडील गेल्यानंतरची गोष्ट. शंकराच्या पिंडीला फुलं वाहात असताना त्यांनी ती खास आमच्यासाठी आणल्याची आठवण झाली आणि डोळे किंचितसे ओलावले. मग ती आठवण नेहेमीचीच झाली. शिक्षणानिमित्त मुलं घराबाहेर पडली तेव्हा त्यांची आठवण बाळकृष्णाला हळद-कुंकू लावताना येऊ लागली. आता नित्यपूजा ही माझ्या आयुष्यातल्या सगेसोयऱ्यांची आठवण ठेवण्याची वेळ झाली आहे.

माझ्या देवघरातला गणपती हा विघ्नहर्ता आहे. त्याची प्रार्थना ही सर्व कठीण प्रसंगाना चिकाटीने सामोरं जाण्याचं स्वत:ला दिलेलं वचन असतं. गडावरची देवी हे आमचं कुलदैवत आहे. देवीला नमस्कार माझ्या आईसाठी असतो. देवीबरोबर तिरुपतीचा बालाजी हेसुद्धा! कुलदैवत-बालाजीला नमस्कार हा माझ्या आजोळच्या सर्व नातेवाइकांसाठी असतो. तर अंबाबाईला हळदकुंकू लावताना सासरच्या मंडळींची आठवण असते. अन्नपूर्णेला नमस्कार ही घरच्या अन्नपूर्णेची सय असते. आणि ती अन्नपूर्णा ही – गृहिणी, सखी, मैत्रीण (आणि अधूनमधून प्रेयसी सुद्धा असते J) – याचीही आठवण स्वत:ला करून देत असतो. पूजेतल्या बाळकृष्णामध्ये मला माझी मुलं दिसतात. शंकराच्या पिंडीत माझे वडील असतात. शंकरासारखेच – भोळे, तापट आणि अत्यंत साधे!! 

श्रीचक्राच्या टाकाला फूल वाहताना, माझ्या घरा-कुटुंबातली लक्ष्मी ही कायम ‘सुवासिक’च राहील असा विश्वास असतो. शंख मला माझ्या मित्रांची आठवण देतात, तर घंटा ही मला माझ्या आयुष्यातले धोक्याची सूचना देणारे हितचिंतक लक्षात आणून देते. साईबाबांच्या फोटोला वाहिलेलं फूल हे मला माझ्या आयुष्यात काहीतरी ‘धडे’ देऊन गेलेल्या सर्व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ‘शिक्षकां’ साठीची कृतज्ञता असते.

या सगळ्यांकडे मागणं एकच. लोभ आहेच – तो असाच ठेवा! राग असेल तर जरा धार कमी करा!

शेवटी देवभक्ती कशासाठी? माझं आयुष्य समाधानाचं व्हावं यासाठी चिंतन करण्यासाठीच ना? आणि आपल्या आप्तमित्रांशिवाय ते कसे शक्य होणार? या सर्व मंडळींचा जाणूनबुजून विचार करणं, आपल्या आयुष्यात त्यांच्या असण्याबद्दल मनोमन का होइना – कृतज्ञता व्यक्त करणं हेसुद्धा त्याच दिशेने टाकलेलं एक ‘स्वार्थी’ पाऊल – निदान माझ्यासाठी तरी. मग माझ्या दहा मिनिटांत संपणाऱ्या देवपूजेची भलेही चेष्टा होवो...

अभिजित टोणगांवकर


No comments:

Post a Comment