टिपिकल पुणेकर, घाईत असलेला
मुंबईकर, मग आम्ही बंगलोरकर कोण? एका शब्दात डिफाईन होणारी माणसं मराठी
बंगलोरकर नसतात. ह्यांच्यात बरंच वर्गीकरण करावं लागतं. पहिलं
हे की पुरुष बंगलोरकर नि बाई बंगलोरकर. पुरुषांमध्ये पुढची
वर्गवारी नसते. असली तरी मायनर असते.
साधारणपणे ते मान्यता टेक पार्क, इलेक्ट्रॉनिक सिटी, बागमाने टेक पार्क, ITPL अशा तत्सम ठिकाणी
ट्रॅफिकशी दोन हात करून सकाळी सकाळी पोचतात. संपूर्ण दिवस तिथे घालवल्यावर , रात्री स्वस्थ
बसायला मनाई हुकूम असल्यासारखे, CALL नामक इव्हेंट अटेंड करतात. ह्यांना
मित्र असले काय नि नसले काय, सारखेच! आपल्या बायकोच्या मैत्रिणींचे नवरे ते
आपले मित्र, असा खाक्या असतो. Semiconductor industryत काम करणारे ते
सर्व बस कंडक्टर सारखे वागायला लागतात. सुट्टीच्या दिवशी जसा कंडक्टर बसमध्ये
चढायला मागत नाही, तसा हा प्राणी सुट्टीच्या दिवशी कारमध्ये चढणं नाकारतो. ज्याचं
ऑफिस घरापासून ५ km
पेक्षा कमी अंतरावर असतं त्याला लकी
समजण्यात येतं. असा लकी सहसा कुणीच नसतो. ह्यांना dead line नावाची चिंता खात असते. ह्यांच्या बायका निरागस असतात, नवऱ्यावर त्यांचा
पूर्ण विश्वास असतो. आधीच टेंशनमध्ये असणाऱ्या नवऱ्याला आपल्याकडून त्रास नको
म्हणून त्या वर्षनुवर्षं समजूतदारपणे वागतात.
काही काही लोक ह्याला अपवाद असतात.
ह्यांना मराठी माणसासाठी काहीबाही करण्याची तळमळ असते. ते पॅण्टवर कुडता घालतात.
त्यांची तबला, पेटी, गाणं, नाटक इत्यादीशी जवळीक असते, स्टेज, माईक, पोडियम ह्या गोष्टी वाहून नेण्यापासून त्यांचा वापर करण्यापर्यंत
सर्व गोष्टी ते हौसेने करताना दिसतात. जुन्या ओळखीच्या लोकांकडे तोंड रुंद करून हसतात. नवीन
लोकांच्या ओळखी करून घेतात. कणकेत मिठाचं प्रमाण जेवढं तेवढंच यांचं प्रमाण असतं. सोमवार ते शुक्रवार हेही कोणत्या ना
कोणत्या टेक पार्कमध्ये शिरतात. ट्रॅफिक जॅम त्यांनाही लागतात. CALL , dead line त्यांच्याही पाचवीला पुजलेल्या असतात. पण dead line मुळे dead
होणं त्यांच्या स्वभावात नसतं.
त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज दिसून येतं. ते कुठून येतं ते समजायला मार्ग
नाही.
गणपती उत्सवासारख्या मराठी
कार्यक्रमांमध्ये हे स्टेजवर नसले तर प्रेक्षकांत प्रेमळ पित्याची भूमिका पार
पाडताना दिसतात. ह्यांच्या बायका निरागस असतात. त्यांच्या चेहऱ्यावर तुकतुकी दिसून
येते. आपले नवरे हे कुणीतरी विशेष आहेत हि भावना त्या बाळगतात. त्यामुळे कमानदार
भुवया कोरून नि दिमाखदार लिपस्टिक फासून कार्यक्रमांत सहभागी होताना दिसतात.
काही काही लोक ह्याला अपवाद असतात. हे
साधेभोळे आणि अतिशय आतिथ्यशील असतात. शनिवार ,रविवार मित्रांना बिअर पाजली नाही तर
ह्यांचा जीव तीळतीळ तुटतो. सोमवारी इलेक्ट्रॉनिक
सिटीसारख्या ठिकाणी ते नव्या दमाने नि नव्या उत्साहाने घुसतात. रात्रीचे कॉल्स
घ्यायलाही ते तरतरीत असतात. ही तरतरी त्यांना कुठून येते हे कळायला काही मार्ग
नाही. ह्यांच्या घरातला लखलखणारा बार ही त्यांच्या अभिमानाची गोष्ट असते. ह्यांच्याही बायका निरागस असतात. त्या खपून खपून स्टार्टर्स बनवतात. क्रोकरी,
कटलरी नि क्रिस्टल कट ग्लासेस हे त्यांच्या घराचं वैभव असतं. त्या चील्ड आऊट असतात
नि दिसतात. घरात बर्फाचे क्यूब्ज नसले तर त्यांची
पंचाईत होते.
थोड्याफार फरकाने सर्व कुटुंबं मराठी
वैशिष्ट्यं जपताना दिसतात. मराठी नाटक, गाणं, गप्पा, पदार्थ जेव्हा
जेव्हा आणि जिथं जिथं मिळेल तेव्हा तेव्हा आस्वाद घेतात. या सर्व कळपाबाहेरही मराठी माणूस असतो, जो DRDO, ISRO, IISC, Air Force सारख्या ठिकाणी महत्त्वाची नि जोखमीची कामं करत असतो.
पण हे प्रमाण अगदीच फुटकळ. डॉक्टरही औषधापुरताच!
बंगलोरकर मराठी बाई ही विशेष
उल्लेखनीय जमात आहे. त्या OFC असतात. Other Forward Class . ह्या अष्टभुजा सकाळी चूळ भरण्याआधी नि रात्री शेवटची जांभई येऊन
गेल्यावर Online असतात. जुजबी कन्नडा यायला लागल्यावर समाधानी पावतात. इडली, डोसे, उत्तप्पे यांमध्ये लवकरच प्राविण्य मिळवतात. चटणी पुडी, सांबार पुडी करत करत सर्व प्रकारच्या पुड्यांना kitchen मध्ये स्थान देतात.
पटकन like minded मैत्रिणी मिळवतात नि झटकन पॉटलक सुरू करून टाकतात. तोंडात आता गुढी
पाडव्याच्या ऐवजी युगादी यायला लागतं. गणपती गौरीचा गौरीगणेशा होतो. मसालेभात ऐवजी
चित्रान्ना, मुगाच्या खिचडीऐवजी बिसीबेळेबाथ शिजायला लागतो. गोडाच्या शिऱ्याला केसरीबाथ
हे नाव जास्त योग्य वाटायला लागतं. पैठणीऐवजी कांजीवरम हौसेची साडी बनते.
हे सर्व काही इतक्या fast forward मध्ये होतं कि ज्याचं नाव ते. महाराष्ट्रात जे मिळणार नाही ते त्यांना
इथे मिळतं- स्वतंत्र आयडेंटिटी! जी खूप हवीहवीशी असते.
बेंगलोरला शिफ्ट होण्याचा निर्णय
बरोबर ठरतो. नाइलाजाने बेंगलोरला आलेले मराठी लोक आता बेंगलोरमध्ये मुरायला
लागतात.
-- रूपा भदे
No comments:
Post a Comment