शब्द

कुणीही जरी सोबत नसलं
तरी शब्दच फक्त साथ देतात
अगदी सुरुवातीपासून, शेवटानंतरही
तेच खरे सोबती असतात.
 
सखे जीवलग सोबत असतीलही
पण शब्दच जाणतात मनीचं मर्म
निष्प्राण शांततेतही ते घुमत रहातात,
फोडत बांध, भेदत वर्म!

शब्द आग ओततात, कधी फुंकरही घालतात
अंतरात्मा चेतवून कधी, कधी शांत निजवतात.
खोल आत गाभाऱ्यात, कधी अखंड चालू घंटानाद
मंद हसू तरी चेहेऱ्यावरती, जशी संथ ती जळती वात!

वाट तुझी पहाताना, शब्दच आले मेघ बनूनी
आणी लेखणीतून झरझर, ओघळले गालांवरूनी.
कधी प्रेमासाठी, कधी स्पर्शासाठी, तरी, शब्दांसाठी होते व्याकूळ,
काही शब्द तूंही कधी, ओतावे होतेस, भावांनी लपेटून..!
  
कल्लोळ असा हा शब्दांचा,
कधी कधी तर असून नसतो
लख्ख चमकत्या आरशापुढे

एक रुपडं, प्रतिबिंब शोधत रहातं..

- प्रज्ञा घारपुरे 

No comments:

Post a Comment