एअरपोर्ट ते हॉटेल असा दीड तासाचा
प्रवास आणि त्यात ‘सेल्फी’च्या कलाकारांबरोबर मारलेल्या
गप्पा.
‘सेल्फी’ची टीम साधारण ६ वाजता
बेंगळुरू एअरपोर्टवर पोहोचली. थोडे
थकलेले पण खूप उत्साही सगळे आम्हाला भेटून म्हणाले, “जरा साउथ इंडीयन कॉफी मिळाली तर मज्जा
येईल.” आम्ही लगेचच जवळच्या kappa
hatti मधून कॉफी ऑर्डर
केल्या. कॉफी घेता घेताच टीम
बरोबर आमचा पहिला सेल्फी घेतला...
मग २
गाड्यांमध्ये विभागून हॉटेलकडे निघालो. श्वेताच्या
गाडीत होत्या ३ देखण्या आणि मजेदार तारका- ऋजुता देशमुख, पूर्वा गोखले आणि
सोनाली पंडित.
तुमची तिघींची बंगलोरला ही पहिली भेट?
पूर्वा याआधी काही वर्षांपूर्वी आली होती, पण बाकी दोघींची पहिलीच भेट. आम्ही
खूप एक्सायटेड
आहोत, पण खूप टाईट शेड्यूल असल्यामुळे काही फिरता
येणार नाही याची खंत आहे.
या नाटकाचे साधारण किती प्रयोग झाले?
एकूण १३३ प्रयोग झालेत आणि हा १३४वा. पण शोच्या वेळी पहिल्या
प्रयोगाएवढाच उत्साह असतो आमच्यामध्ये. आम्ही सगळ्या खूप छान मैत्रिणी असल्यामुळे
आम्ही एकत्र जाम धम्माल करतो.
कुठे कुठे दौरे झाले?
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी- मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, दौंड तसेच बडोदा (गुजरात) आणि दिल्लीमध्ये प्रयोग झाले.
आता हा बंगलोरमध्ये. आणि ह्यावर्षी जूनमध्ये अमेरिकेचा एक महिन्याचा दौरा होता.
वा! अमेरिकेतही पोहोचलं नाटक?
हो, अमेरिकेत ८ प्रयोग होते- ऑस्टीन, अटलांटा, न्यूयॉर्क, बॉस्टन, डेट्रॉइट, ह्यूस्टन, सिअॅटल, लॉसएंजेलिस असा एक महिन्याचा दौरा होता. ह्या
दौऱ्यादरम्यान खूप मज्जा केली आम्ही. खरंतर एक महिना घरापासून दूर कसं राहायचं असं
वाटलं होतं, पण इतकी एक्साईटमेंट आणि प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम,
यामुळे प्रचंड हुरूप आला होता. मधल्या वेळेत थोडं अमेरिका दर्शनही झालं. युनिव्हर्सल स्टुडिओ, न्यूयॉर्क मधली hop-on
hop-off टूर, बोस्टनमधली डक टूर आणि
त्यानंतर डेट्रॉइट मधली मिस्टरी हिल्स!. अनेक सेल्फी काढून झाले.
भारताबाहेर राहूनही मराठी नाटकासाठीचं प्रेम पाहूनही खूप बरं वाटलं. आणि मैत्रिणी
म्हणून आमच्यामधला बॉण्ड ह्या दौऱ्यानिमित्त आणखीन स्ट्रॉंग झाला.
तुम्ही नाटक आणि बाकीचे प्रोजेक्ट एकत्र कसे मॅनेज करता? नाटक करत असताना
बाकीचे प्रोजेक्ट्स घ्यायला कोणाची हरकत?
नाही, मुळीच नाही. आमच्यावर असं काहीच बंधन नसतं. नाटक नवीन असताना आणि
पहिल्या काही प्रयोगांदरम्यान आम्हाला बाकी प्रोजेक्ट्स करण सहसा जमत नाही. पण
नाटक रुजल्यानंतर आम्ही मोकळे असतो बाकीची कामं करायला. शेवटी बाकी कामांचा
नाटकावर परिणाम होणार नाही ह्याची काळजी आम्ही घेतोच. आणि नाटक जिथे लागेल तसं
आमचा शेड्युल आम्ही अडजस्ट करतो.
आम्ही सगळ्याच सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स वर कामं करतोय आणि हे नाटकही एन्जॉय करतोय.
वेब-सिरीजविषयी तुमचं काय मत
आहे? तुम्हाला करायला आवडेल?
हो नक्कीच! सध्या वेब-सिरीज खूप लोकप्रिय
आहेत. खूप सहज कंटेंट एका वेळी बऱ्याच
लोकांपर्यंत पोहोचवता येतात. Phone/Laptop वर, लोक कुठेही सहज असताना
आपलं काम पाहू शकतात आणि लगेच त्यावर फीडबॅकही देऊ शकतात.
सोनाली : मी केली होतो एक वेब-सिरीज, I Don't Watch TV नावाची आणि खूप मजा आली ती करताना. अजूनही करायला नक्की आवडेल.
नरेनच्या गाडीत अजित सर, सुकन्याताई आणि शिल्पाताई होत्या. आता आपण
त्यांच्या गप्पा ऐकू या!
अजित भुरे पहिले अभिनेता की दिग्दर्शक झाला?
अजित : मी इंटरकॉलेज स्पर्धेत अभिनय करायचो. त्यानुसार माझा अभिनेता प्रवास
आधी सुरू झाला. नंतर अंतरनाट्य संस्थेत दिग्दर्शन १९८४ साली प्रायोगिक नाटक. ’नामदेव
मुळे‘ पहिलं नाटक, जे commercial होतं.
या नाटकाचे ३००+ प्रयोग झाले आणि ते खूप गाजलं. नंतर निर्मिती क्षेत्रात पदार्पण झालं.
‘काटकोन त्रिकोण’, ‘अलिबाबा आणि चाळीशीतले चोर’ आणि
‘सेल्फी’ नाटकांची निर्मिती झाली. मग ‘सौजन्याची ऐसी तैसी’ निर्माण झालं.
अशा प्रकारे या संस्थेतर्फे १३ नाटकं, गेल्या दहा वर्षांत आणली गेली.
‘सेल्फी’ ची निर्मिती कशी झाली? त्याबद्दल
थोडं सांगा ना!
अजित : शिल्पा नवलकर, जिने माझ्या पहिल्या नाटकात १९८४ साली अभिनेत्री म्हणून
काम केलं होतं , ती लेखिकापण उत्तम आहे. तिने अनेक दूरदर्शन मालिका पण लिहिल्या
आहेत व चित्रपटांचे स्क्रीनप्ले पण लिहिले आहेत. तिने पहिल्यांदा एक नाटक लिहिलं, 'सेल्फी',
लेखिका म्हणून तिचं ते पहिलं नाटक. तिला तिचं हे नाटक तिच्या चार मैत्रिणींना घेऊन
करायचं होतं. आम्ही सहा जण चांगले मित्र आहोत. या मैत्रीतूनच या नाटकाची निर्मिती
झाली. मला तिने हे नाटक एक मित्र आणि दिग्दर्शक म्हणून ऐकवलं आणि विचारलं कसं झालंय?
पहिल्या वाचनातच मी हे नाटक करायचं ठरवलं. सोपं लिहिणं खूप कठीण असतं. यातले संवाद
अगदी सुलभ आहेत आणि भाषेचा वापर अगदी सरळ प्रकारे केला आहे. नाटकाची पात्रं पण खूप
छान रेखाटली आहेत. या पाच मैत्रिणी माझ्या पण मैत्रिणी असल्याने हा सर्व योग छान
जुळून आला. नियतीनी पण या घटनेला खूप सुंदर साथ दिली. महिन्या-दीड महिन्यात नाटक
उभं राहिलं. ३ ऑक्टोबर २०१५ साली पहिला प्रयोग झाला. पहिले पाच प्रयोग हाउसफुल झाले.
प्रेक्षकांना आवडल्याची ही पावतीच होती. नंतर हा प्रवास असाच दीड वर्ष चालू आहे.
यात निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून खूप शिकता येतं आणि मित्र म्हणून खूप शिकविता
पण येतं. पाच जणींना एकत्र आणून नाटक यशस्वी करायला लेखनात व दिग्दर्शनात खूप ताकद
असावी लागते. या पाच जणींनी एकत्र यायचं ठरवलं म्हणूनच हे नाटक यशस्वी झालं.
शिल्पाताई, तुमचा लेखिका म्हणून प्रवास ऐकून छान वाटलं, तुम्हीपण थोडं सांगाल का या
प्रवासाबद्दल?
शिल्पा : सेल्फीचा प्रवास अजितनी सांगितला आहेच. आम्ही
पाच जणींनी एकत्र कामे पण केली आहेत. मी आणि सुकन्यानी शाळेपासून एकत्र काम केलं
आहे, एवढी जुनी मैत्री आहे आमची. पाच जणींनी एकत्र काम करण्याची इच्छा होतीच. असं
स्क्रिप्ट शोधायला लागलो. आम्ही पाच जणी आमच्या करीअरच्या अशा टप्प्यात आहोत की कोणी
एक जण “protagonist” आणि बाकी “supporting” असं आम्हाला चाललंच नसतं. पाच सारखी पात्रं
असणं आवश्यक होतं. असं स्क्रिप्ट असणं मुश्कील होतं. मग ही जबाबदारी माझ्यावर आली.
मला पण कुठेतरी असं लिखाण करावंसं वाटतच होतं. मी स्वतःला एक उत्तम प्रेक्षक समजते.
त्यातूनच लिखाणाची पण आवड निर्माण झाली. मला या लिखाणाचा खराखुरा फीडबॅक हवा होता
आणि या मैत्रिणींनी तो दिला. जमलं नसतं तर लगेच त्यांनी मला तसं सांगितलं असतं. पहिला
अंक लिहिल्यानंतर त्यांनी मागे लागून नाटक पूर्ण करवून घेतलं माझ्याकडून. नंतरची
प्रक्रिया खूपच सुरळीत पार पडली आणि काही कळण्याआधीच नाटक सुरू पण झालं.
तुम्ही सकाळमध्ये पण खूप लिखाण केलं आहे. त्याबद्दल
थोडं सांगा ना.
शिल्पा : मुळात माझा लेखिका म्हणून प्रवास दूरदर्शन
मालिका लिहिण्यामधूनच सुरू झाला. स्क्रीनप्ले लिहिण्यात खरं कौशल्य आहे असं मला वाटतं.
सेल्फी’चं नाव आम्ही घोषित केल्यावर दर्शकांनी खूपच
चांगला प्रतिसाद दिला.
सुकन्याताई, तुम्ही इथे खूप प्रसिद्ध आहात ते तुमच्या उत्कृष्ट अभिनयामुळे. तुम्ही पण तुमचा ‘सेल्फी’चा अनुभव सांगा ना!
सुकन्याताई, तुम्ही इथे खूप प्रसिद्ध आहात ते तुमच्या उत्कृष्ट अभिनयामुळे. तुम्ही पण तुमचा ‘सेल्फी’चा अनुभव सांगा ना!
सुकन्या : ‘सेल्फी’बद्दल बऱ्याच लोकांचा समज होता की हे
नाटक दहा प्रयोगांनंतर बंद पडेल. पण आम्ही तो समज पूर्णपणे चुकीचा ठरविला. आज या
नाटकाचे १४० प्रयोग झाले आहेत. आम्ही सर्व मैत्रिणी मोकळेपणानी बोलणाऱ्या आहोत.
एकमेकींचे गुणअवगुण सांगून मैत्री टिकवून आहोत. माझी आणि शिल्पाची मैत्री ‘दुर्गा
झाली गौरी’या नाटकापासून आहे. ऋजुता आणि मी ‘कळत नकळत”’ मध्ये एकत्र आलो. पूर्वा,
सोनाली आणि मी, आम्ही एक ‘रिमझिम’ नावाची मालिका केली होती, तेव्हाची आमची मैत्री
आहे. अजित पण जुना मित्र आहे. तो माझ्या नवऱ्याचा ‘टाकी मित्र’ आहे. लहानपणापासून
ते दोघं गच्चीत टाकीवर बसून चर्चा करत असत. ‘सेल्फी’च्या पहिल्या तालमीलाला मला डेंग्यू
झाला होता. तरीसुद्धा इतकी ओढ होती की त्यापायी आम्ही एकत्र प्रवास केला. एकत्र एक
विदेश दौरा पण झाला आमचा. बायका एकत्र येऊन भांडणंच होतात असं नाही. या मैत्रीणींनी
माणूस म्हणून खूप शिकवलं मला. प्रत्येक मैत्रिणीनी एक-एक वेगळा धडा मला दिला. त्या
दृष्टीने हे नाटक फार महत्त्वाचं ठरलं. २०१६ वर्ष खूप चांगलं गेलं. ‘सेल्फी’ बरोबर
“ventilator” सिनेमा पण रिलीज झाला.
तोही खूप यशस्वी झाला. २०१७ सुरू होताना माझा अजून एक सिनेमा सुरू झाला.
‘सेल्फी’ला कोण प्रोड्यूसर मिळणार याचा विचार सुरू असताना
असा विचार केला की कोणीतरी असा माणूस असावा, जो एक वेगळा दृष्टिकोन देऊ शकेल. शिल्पाने
मग अजितचं नाव सुचविलं. तोच मग मागे लागला आणि त्याने हे नाटक अस्तित्वात आणलं.
प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं आम्हा सर्व कलाकारांवर. समीक्षकांनी पण खूप
प्रोत्साहन दिलं आम्हाला. असाच प्रवास पुढे पण होवो हीच इच्छा आहे आमची.
त्यासाठी आम्हा सर्वांतर्फे खूप शुभेच्छा. Openness actually increases the strength in the relationship and outcome in any initiative. Selfie is the best example of this for sure.
सुकन्या : मागच्या वर्षी जेव्हा ‘फॅमिली ड्रामा’ नाटकासाठी
मी आले होते इथे, तेव्हा मित्रमंडळाची खूप छान ओळख झाली. माझी एक कपड्यांची पेटी
सामानात आली नाही. त्या वेळी मित्र मंडळाच्या सभासद मैत्रिणींनी मला त्यांचे ड्रेसेस
आणि साड्या देऊन प्रयोग पार पडला. खरच मी आभारी आहे त्याबद्दल.
अजित सर, ‘रेस्टॉरंट’ ही तुमची पहिली फिल्म होती.
सोनाली कुलकर्णी यांनी त्या सिनेमात काम केलं होतं. त्या पहिल्या फिल्मविषयी काही
सांगाल का?
अजित : हो, ती माझी पहिली फिल्म होती. २००६ मध्ये केलेली. सचिन कुंडलकर माझ्याकडे
त्याची स्क्रिप्ट घेऊन आला. सिनेमा निर्मितीचा मला काही अनुभव नव्हता. जनरली बऱ्याच
वेळा सिनेमात synopsis नुसता असतो, पण संवाद
वगैरे असं बाईड केलेलं नसतं. पण त्याने मला तयार स्क्रिप्ट दिलं. मी ते वाचलं, मला
आवडलं. सिनेमा करण्यासाठी पैसे लागतात ते माझ्याकडे नव्हते, पण तरीही मी तो सिनेमा
करू शकलो. माझ्या आयुष्यात मला चांगले मित्र लाभलेत, त्यांनी मला तेव्हा मदत केली.
महाराष्ट्र शासनाचं सेकण्ड बेस्ट फिल्मचं त्या वर्षीचं award मिळालं. सोनाली
कुलकर्णीची भूमिका होती त्यात. मी नवखा प्रोडूयसर, तर ती नावाजलेली अभिनेत्री
होती. पण आपल्यातलाच कोणीतरी एक निर्मिती क्षेत्रात उतरतोय म्हटल्यावर तिने
सहकार्य केलं. तिलाही त्या फिल्ममध्ये award मिळालं. सिनेमाचं प्रॉडक्शन हे नेहेमी
तुमच्या बजेटवर अवलंबून असतं. यश, अपयश हे असतंच. पण सिनेमा वेळेवर पूर्ण होणं हेही
महत्त्वाचं असतं. माझा तो पहिल्या निर्मितीचा अनुभव चांगला होता.
तुम्ही १५-१६ नाटकं केलीत. मध्यंतरी तुम्ही एक चित्रपटही केलात. आता परत काही
विचार आहे का चित्रपट निर्मिती करण्याचा?
अजित : हो, ‘बदाम राणी गुलाम चोर’ हा भागीदारीमध्ये एक चित्रपट केलेला. तो अनुभव
चांगला होता. आता सिनेमा करायचा विचार आहे. पण माझ्या पद्धतीचं, लायकिंगचं स्क्रिप्ट
आणि आर्थिक ताळेबंद ह्या दोन्ही गोष्टी जमल्या की मी नक्कीच करेन, मला आवडेल
करायला.
शिल्पाताई, तुमचा आता पुढचा प्रवास कसा असणार आहे, लेखिका म्हणून आणि
अभिनेत्री म्हणून?
शिल्पा : लेखिका म्हणून मला नवीन नाटक लिहायला नक्कीच आवडेल. मालिकांचं लेखन,
अभिनेत्री म्हणून माझं काम सुरूच आहे. बऱ्याच जणांना वाटतं की अभिनय करायचा तर
नाटक किंवा सिनेमातच करायचा, मालिकांमध्ये नको. पण मला स्वतःला मालिकांमध्ये काम
करायला खूप आवडतं. नवीन नाटकावर माझं काम चालू आहे, नवीन नाटक मी नक्कीच लिहीन. पण
ही खात्री आहे की ते २००% ‘सेल्फी’पेक्षा वेगळं असेल. वेगळा जॉनर असेल.
अजित सर, लेखिका स्त्री, सर्व कलाकार स्त्री-कलाकार
पण दिग्दर्शक मात्र पुरुष. त्यामुळे सेल्फी नाटक साकार करताना एक वेगळा दृष्टिकोन होता
का?
अजित : नक्कीच. तेवढा फरक पडतोच. आता मी दुसरं नाटक करतोय, त्यात ६-७ पुरुष
कलाकार, ३-४ स्त्री कलाकार आहेत. तेव्हा त्या नाटकातलं डिसिजन मेकिंग आणि या नाटकातलं
डिसिजन मेकिंग हे वेगवेगळं असतं. नवीन गोष्टी शिकायला मिळतात. व्यक्ती म्हणून
घडायला मिळतं. आता आमचे बाहेरगावी जेव्हा ‘सेल्फी’चे प्रयोग होतात तेव्हा आय मेक
इट अ पॉईंट की त्यांची व्यवस्था बरोबर होते आहे की नाही. माझं कर्तव्यच आहे ते. माझी
जबाबदारी आहे ती.
सुकन्या : या नाटकात बायकांचेच प्रॉब्लेम असतील, सगळं बायकांविषयी
असेल असं सगळ्यांना वाटतं. पण जो प्रत्यक्ष नाटक बघेल तेव्हा समजेल की हा
universal विषय आहे. वेगळा अनुभव येईल. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी एखादा
प्रसंग घडून गेलेला असेल.
अजित : नाटकाची थीम अशी आहे की तुम्ही स्वतःकडे वळून बघायला शिका.
पुरुषानेही विचार करावा.
सुकन्या : पण नाटकात कुठेही पुरुषाला दूषणं दिलेली नाहीत. तो असा
वागला म्हणून मी अशी वागले. तुझी कुठेतरी चूक आहे पण ती तू बघितली नाहीयेस.
त्यामुळे तुझ्याकडे तू वळून बघ म्हणजे तोही सुधारेल आणि तूही सुधारशील, अशी गम्मत
आहे.
शिल्पाताई, नाटकाचं नाव आधीच ठरलं होतं का? कारण अतिशय सार्थ नाव आहे.
शिल्पा : हो हो. आधीच ठरलं होतं. मग नाटक लिहिलं.
तुम्हा सर्वांना पुढील
वाटचालीसाठी खूप शुभेच्छा! धन्यवाद!
आणखीन बऱ्याच गप्पा मारायच्या, होत्या पण कधी हॉटेल आलं हे कळलंच नाही. ‘सेल्फी’च्या टीमबरोबर आणखीन
एक सेल्फी काढून आम्ही गाड्या
परत फिरवल्या.
No comments:
Post a Comment