!! श्री साई !!
गीत रामायण ....
एक अविस्मरणीय अनुभव
चैत्र प्रतिपदा, साडेतीन
मुहुर्तांपैकी एक मुहूर्त, हिंदु नववर्षारंभ आणि राम नवरात्रीचा पहिला दिवस.. अशा
या शुभ दिवशी स्वर्गीय ग.दि. माडगुळकर रचितआणि स्वर्गीय सुधीर फडके स्वरबद्धीत
'गीत रामायण' आपल्या बंगलोरच्या रसिकांना ऐकायला मिळाले. तेही ह्या अजरामर गीतांचा
वारसा लाभलेले श्री. श्रीधर फडके ह्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजात. हे भाग्यच
मानावे. जणू पाडव्याच्या शुभमुहुर्तावर श्री रामप्रभुंचा आशिर्वाद आपल्या सर्वांना
लाभला ह्या अलौकीक अशा गीतांद्वारे.
ह्या कार्यक्रमाचे हायलाईट म्हणजे 'श्रीधरजींनी
मंडळावर सोपवलेल्या दोन महत्वाच्या जबाबदाऱ्या..कोरस आणि निवेदन.' आपल्या स्वरानंद
ग्रुप चे चार गायक व गायिका या अतुलनीय गीतांचा भाग झालेत ते म्हणजे सौ. ज्योती कुलकर्णी,
सौ. लीना गोखले व केदार कुलकर्णी आणि स्वरानंदचे backbone योगेश सेवक. ह्या
चौघांनीही मिळालेल्या संधीचे सोने केले, आणि सिद्ध केले की बंगलोर मध्येही उच्च
प्रतीचे गायक कलाकार आहेत.
निवेदन....
सौ. गंधाली सेवक ह्यांना जणु काही श्री रामाच्या आज्ञेवरूनच श्रीधरजींनी ह्या
कार्यक्रमाचा 'निवेदनाचा सेतु' बांधण्याचे काम दिले. गंधाली नेही ते
तितक्याच जबाबदारीने उत्तम रित्या पार पाडले. सादर झालेल्या प्रत्येक गाण्याच्या
आधीचे प्रसंग, 'शब्दरूपी' उचलुन तिने प्रेक्षकांच्या मनात बांधले आणि त्याच
प्रसंगावरुन श्रीधरजींनी एक एक गीत रसिकांच्या मनात सहजरित्या उतरवले. त्या शब्दरूपी
शिळामध्ये माझेही चार शब्द सामील झाल्याने मलाही त्या रामाच्या वानरसेनेत खारीचा
वाटा उचलण्याचे अहोभाग्य लाभले.
गीत रामायणातील एकुण ५६ गीतांमधील
काही निवडक गाणीच श्रीधरजींनी सादर केली कारण संपूर्ण गीतांसाठी ४ दिवस सलग असावे
लागतात. त्यांनी सादर केलेली सर्वच गाणी इतकी मधुर होती की प्रत्येक गीत घोळुन
घोळुन म्हणण्याचा किंवा ऐकण्याचा मोह पडल्याशिवाय राहत नव्हता. काही गीतांना गदिमांनी
असा रंग उतरवला आहे आणि बाबुजींनी अशी चाल लावली आहे की तो तो प्रसंग जणु
डोळ्यासमोर घडतो आहे अशी भावना बळावून श्रोत्यांची शरीरे तदनकुल हालचाली
केल्याशिवाय राहत नाही.
साम वेदसे बाळ बोलती
सरगा मागुन सर्ग चालती
सचिव मुनिजन स्त्रिया डोलती
कुशलव रामायण गाती !
लवकुशांच्या मुखांतुन बाहेर पाडलेल हे पहिलं गीत ऐकताच या गीतेतील अयोध्या
नगरीचे व श्री प्रभुरामचंद्राचे संपूर्ण दृश्यच डोळ्यासमोर भासु लागते.
'दशरथा घे हे पायसदान' हे गीत सुरु असतांना तर जणू आपणही त्या शरयू
तिरावरील अयोध्या नगरीत राज्य करणाऱ्या राजा दशरथांनी केलेल्या पुत्रकामेष्ठी
यज्ञात सामील आहोत असे चित्र उपस्थित असलेल्या
प्रत्येक श्रोत्याच्या डोळयांसमोर आल्याशिवाय राहत नाही.
रामजन्माच्या सोहळ्याचे गीत 'राम
जन्माला ग सखे' गाण्यापूर्वी, या अजरामर गीताचा जन्म गदिमांच्या लेखणीतून कसा झाला
याचा किस्सा जेंव्हा श्रीधरजींनी रसिकांना सांगितला तेंव्हा गदिमांबद्दलचा आदर
निश्चितच द्विगुणीत झाला असावा. जेंव्हा श्रीधरजी हे गीत गात होते आणि आपले कोरसही
साथीला होते तेंव्हा उपस्थित प्रत्येक श्रोता तल्लीन होऊन रामजन्माच्या सोहळ्यात
अयोध्येच्या प्रजाजनांसोबत त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या आनंदात सामील होतांना भासले.
"ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई
दशरथा, आज मी शापमुक्त जाहले" ही गीते ऐकताच रसिक भारावून गेलेत.
'स्वयंवर झाले सीतेचे' गीत रामायणातील अतिशय आनंददाई
प्रसंगांपैकी एक. गदिमांनी हे गीत लिहितांना राजा जनकाचा दरबारच जणू डोळ्यांसमोर
उभा केला आहे, आणि आपणही ह्या सोहळ्यात सामील आहोत असे दृष्य आपोआपच डोळ्यांपुढे
येऊ लागते. श्रीधरजींनी जेंव्हा 'थांब सुमंता थांबवी रे रथ' हे गीत गायले तेंव्हा
उपस्थित अनेक रसिकांच्या डोळ्यांत अश्रु झळकले असतील.
'दैवजात दु:खे भरता दोष न कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा'
मध्यंतरा नंतर हे गीत गायच्या
अगोदर श्रीधरजींनी बाबुजी व गदिमांच्या कांही आठवणी रसिकांना सांगितल्या. ह्या
गीताशी जोडलेला अनुभव, तेही वीर सावरकर आणि विनोबा भावे ह्यांच्या सारख्या
स्वातंत्र्य सेनानी सोबत घडलेला, रसिकांना सांगितला. हे गीत नसून मानवाच्या जीवनाचे
सार आहे असेही गदिमा म्हणतात. गांधालीनेही ह्या गीताचा प्रसंग आणि त्याचे मानवी
जीवनातील महत्व अत्यंत सुरेख शब्दात मांडले.
'सेतु बांधा रे सागरी' ह्या
गीताच्या वेळेस तर कोरस सोबतच रसिकही त्यांना साथ देऊ लागले होते. जेंव्हा वानरगण "सेतु
बांधा रे सागरी" अशी गर्जना करतात तेंव्हा आपणालाही चेव येतोच.
'मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे?' असा
असहाय सीतेचा करुण प्रश्न ऐकून आपले डोळे पाणावू लागतात. सीतेच्या मनाची अवस्था
काय झाली असेल याची कल्पना करताच डोळे भरून येतात.
'गा बाळांनो श्री रामायण', श्रीधरजींनी
मैफिलीचे शेवटचे गीत गायच्या अगोदर ह्या गाण्याच मर्म पटवून सांगितल.
'जोवरी हे जग जोवरी भाषण
तोवरी नूत नीत रामायण'
माडगुळकरांच्या भाषेत गीत नव्हे हा
अमृत संचय. ह्या सर्व ५६ गीतांमधून माडगुळकरांचे प्रतिभा स्फुरण अतिशय प्रेरक झाले आहे.
श्रीधरजींनी ह्या अजरामर
रामचरित्राची सफर आपल्या सर्व बंगलोरच्या रसिकांसाठी घडवून आणल्याबद्दल त्यांचे व
मित्र मंडळाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
गदिमा, बाबुजी आणि श्रीधरजी
ह्यांच्या अलौकिक प्रतिभेच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा आमचे ते तीन तास पुलकित होऊन
गेल्याचे उपस्थित प्रत्येक श्रोत्याला जाणवले.
बाबुजींच्या गीताबरोबरच आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या गीत
रामायणातील अतिशय लोकप्रिय झालेल त्याच्यासोबतच निवेदन, दोन गाण्यांना जोडणारी
रामकथा श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे करत असे. हे पवित्र काम ह्या कार्यक्रमात
सौ. गंधाली सेवक ह्यांना करायला मिळाले व तिच्यासोबत मलाही चार शब्दांचा खारीचा
वाटा उचलायला मिळाल्याने मी व गंधाली सेवक श्रीधरजींचे, आणि अध्यक्ष नरेन नंदे आणि
मित्रमंडळ बंगलोरचे मन:पूर्वक आभारी आहोत.
जाता जाता एव्हढेच सांगावेसे वाटते,
"गीत रामायणाच्या महासागरात जेवढे खोल जाल तेवढे तुम्हाला मानवी जीवनाचे सार
त्याच्या प्रत्येक गीताच्या शब्दशिंपल्यात सापडतील".
"जन्मोजन्मी न संपणारी आस
म्हणजेच
गदिमांचे व बाबुजींचे हे गीत
रामायण".
तुकारामाची गाथा जशी पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगत राहिली तसे गदिमांचे शब्द
आणि बाबुजींचे संगीत काळाच्या ओघात पुसून न जाता लोकमानसावर तरंगत राहील.
स्वाती ब्रम्हे
No comments:
Post a Comment