गजरा!

गजरा! आहाहा........
नुसतं नाव घेतलं तरी घमघामायला होतं, नाही?  

मोगरा, जाई, जुई, शेवंती, सुरंगी, बकुळी, अबोली... कितीतरी प्रकार या गजऱ्याचे... मार्केट मध्ये टोपलीत गोलाकार मांडून ठेवलेल्या गजऱ्यांकडे नुसतं पाहूनही मन कसं प्रसन्न होतं नै? 

पायाच्या एका अंगठ्याला दोरीची गाठ मारून एका हाताने दोरीचं दुसरं टोक पकडून त्यात फुलं रोवून गाठी मारून गजरा तयार करण्याचा सोहळा तर बघत राहावा असा असतो.

भारतीय स्त्रीचा शृंगार गजऱ्याशिवाय अपूर्ण असतो. 

गजरा हा विषय आज मी लिहिण्यासाठी घेण्याचं कारण म्हणजे, आज सकाळीच एका मैत्रिणीने गजऱ्यावर एक पोस्ट फॉरवर्ड केली होती. मग त्यावरून इतरांचे रिप्लाय, चर्चा असं करता करता अर्धा तास तरी व्हॉट्सपचा आमचा ग्रुप गजऱ्यासारखा घमघमून गेला. अगदी गजरेमयच होऊन गेला. 

आणि मी??
मी भूतकाळात शिरले... माझ्याही नकळत... अगदी अलगद! 

लहानपणी शाळेत असताना मला केसांच्या बोमध्ये गजरे माळायला खूप आवडायचं. तेव्हा शाळांमध्ये फुलं डोक्यात घालून यायचं नाही वगैरे सक्ती नव्हती. तेव्हा म्हणजे 90 च्या दशकात हं!

मी केसाच्या बोला एक साईडला गजरा अशा तऱ्हेने माळायचे की गजऱ्याची एक बाजू गालावर रुळेल. आणि मान मुद्दाम हलवून त्या गजऱ्याचं अस्तित्व दुसऱ्याला जाणवून देण्यात एक प्रकारची गम्मत वाटायची. 

मग बोभोवती गजरा गोल गुंडाळून जाणं ही पण एक स्टाईल होती आम्हा मुलींची शाळेत. 

या सर्व स्टाईल्समध्ये आमचं ध्यान अगदी प्रेक्षणीय दिसत असणार याबद्दल वाद नाही. त्यावेळचे जुने फोटो पाहून ईईईई होतं आता. पण तेव्हा माझ्यासारखी सुंदरा मीच असं वाटायचं इतकं नक्की. 

पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर गजराबिजरा ओल्ड फॅशन्ड झाले, मग ते प्रकार बंद झाले. 

घरी बाबा मम्मीसाठी आठवड्यातून दोनतीनदा तरी गजरा आणायचेच. संध्याकाळी कामावरून आले की हातात भाजी, फिश किंवा दुधाच्या पिशव्यांसोबत हिरव्या ओलसर पानात बांधलेली गजऱ्याची पुडी ही वरचेवर दिसायचीच. मम्मीवर असणारं प्रेम व्यक्त करायची पद्धतच होती ती जणू. बाबा गेल्यावर तो गजराही गेलाच!

गजऱ्याची अजून एक आठवण म्हणजे, माझ्या आत्याला गजऱ्याचे भारी वेड. त्यातही अबोलीचा गजरा म्हणजे अगदी जीवच तिचा. मे महिन्याच्या सुट्टीत ती आम्हाला दुपारी अबोलीची भरपूर फुलं आणायला पाठवायची. आम्ही टळटळीत उन्हात, याच्या त्याच्या अंगणातील अबोलीची फुलं शोधायला दुपारभर भटकायचो. आपण किती महत्त्वाचं काम करतोय असं एक मस्त फिलिंग यायचं. सेम तस्सच फिलिंग जेव्हा मी शाळेत बाईंना गजरा द्यायचे तेव्हाही यायचं.  

शाळा संपली तसा गजऱ्याचा संबंध कमी कमी होत गेला. गावी जाणंही कमी कमी होत गेलं. 

नाही म्हणायला आजी असेपर्यंत तिच्या डोक्यात गजरा दिसायचा. पण तिच्या शेवटच्या आजारपणात तेही कमी म्हणजे बंद झालं. मला आठवतंय, एकदा गणपतीत आम्ही तिला गजरा आणून तिच्या डोक्यात माळलेला. असली खुश झालेली ती. आजारपणात तिची वाचा गेली होती. पण तिला झालेला आनंद तिच्या डोळ्यात दिसत होता. तो गजरा दुसरे दिवशी कोमेजून गेला तरी ती तो काढायला तयार नव्हती. 

त्या दिवशी एक जाणीव मनाला टोचून गेली की गजरा हा फक्त सुंदर दिसण्यासाठीची गोष्ट नसून ती एक भावना आहे. ही भावना आमच्यासारख्या लोकांना, ज्यांना गजरा माळणं ओल्ड फॅशन्ड वाटतं, त्यांना कळणं अशक्य आहे. 

आजी गेल्यानंतर गजऱ्याशी माझा संबंध साफच तुटला. नंतर सर्वच बदलत गेलं. कॉलेज, नोकरी, लग्न... नाही म्हणायला साखरपुडा, लग्न, अगदी डोहळजेवणात पण गजरा घातला... पण त्याच्या आधी, नंतर तर नाहीच! 

आजही लग्नात किंवा कुठे बाहेर बायकांच्या केसांत गजरा दिसला की मला आपोआप त्या गजऱ्याचा सुगंध येऊ लागतो. जुने दिवस अक्षरशः 5-6 सेकंदात डोळ्यासमोरून झर्रकन निघून जातात. 

गजऱ्याचा era अनुभवलेली मला वाटतं माझी पिढी ही शेवटची! 

अजून 20 - 22 वर्षांनी माझ्या मुलीने हा लेख वाचला तर तिला निदान कळेल तरी की, कोणे एके काळी गजरा हा बायकांचा जिव्हाळ्याचा विषय होता.... 

                          अनिष्का गणेश सावंत





No comments:

Post a Comment