सामान्यत: सर्वसामान्य लोक संगीताकडे फक्त एक करमणूकीचे किंवा मनोरंजनाचे साधन
म्हणूनच बघतात. सर्वसामान्य लोकच कशाला, नवशिके संगीतार्थी सुद्घा संगीताला प्रामुख्याने मनोरंजनाचे साधनच समजतात. पण
ज्या रसिकजनांना किंवा संगीतार्थींना थोडी प्रगल्भता प्राप्त होते, त्यांना हे उमगू लागते की संगीताचा आणि मानवी जीवनाचा सरळ
संबंध आहे.
ते कसे काय? तर ते असे. 'संगीत' कशाला म्हणतात?
किंवा म्हणू शकतो? याविषयी अनेक विद्वानांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. त्यातील बरयाचश्या सादरीकरणाच्या किंवा
समीक्षेच्या दृष्टीने आहेत. पण आपण इथे अगदी मूलभूत रीतीने संगीत कशाला म्हणता
येइल,
याचा विचार करू. तर जे ऐकायला छान वाटेल, सुंदर वाटेल, जे पुन्हा ऐकावेसे वाटेल, ज्याला काही
आकार आहे,
ज्याच्यात कही अमूर्त आणि अवर्णनीय का होईना, पण अर्थ आहे असं जाणवेल, त्याला 'संगीत' म्हणता येईल.
आता हे असे चांगले संगीत होण्यासाठीच्या मूलभूत गोष्टी कुठल्या आहेत? तर स्वर आणि लय, हे आपल्याला माहीत आहे. त्यातील दर्जे, हा पुढचा भाग झाला. पण मुळात स्वर आणि लय ह्या दोन प्रमुख गोष्टी आहेत. स्वर
हे सौंदर्याचे, नेमकेपणाचे, योग्यपणाचे द्योतक
आहे तर लय ही 'वेळेचे आणि गतीचे भान' किंवा 'timing' चे द्योतक आहे. स्वराच्या, लयीच्या आधारावर संगीत खुलते. जीवनातही तसेच आहे.जगताना सौंदर्याची, नेमकेपणाची दृष्टी, योग्यपणाची जाण आणि वेळेचे, गतीचे भान
असेल तर साध्या गोष्टीही खुलून दिसतात, सुंदर वाटतात.
गाण्यात 'समे'ला फार महत्त्व आहे. समेच्या अनुषंगानेच गायक, वादक गाणे खुलवत असतो. समेच्या अनुषंगानेच कुठली जागा कितपत
खुलवायची,
किती (तालाच्या) मात्रा जाऊ द्यायच्या, कुठून कुठली जागा उचलायची, कशी उचलायची हे ठरवले जाते, जेणेकरून
समेवर सुंदरतेने येता येईल. हीच गोष्ट आयुष्यातही लागू आहे. वागण्यात, बोलण्यात, केव्हा काय
बोलायचे,काय बोलायचे नाही किंवा करायचे, करायचे नाही, जेणेकरून आपले ईप्सित योग्य प्रकारे साध्य
होईल, याचे भान असेल व
त्याप्रमाणे वागले बोलले, तर ईप्सित
योग्य प्रकारे साध्य होऊ शकेल, कार्य सुंदर
पद्धतीने होऊ शकेल.थोरामोठ्यांच्या चरित्रात उदा: शिवाजी महाराजांसारख्यांच्या
चरित्रात तर ही गोष्ट प्रकर्षाने आढळते. कुठली गोष्ट कशी करायची, केव्हा करायची किंवा करायची नाही, याचे सतत भान ठेवूनच त्यांनी प्रत्येक कार्य केले आहे. पण
त्यामागे विचार हा 'सुराज्य' निर्मितीचाच होता. एकप्रकारे ही प्रत्यक्ष आयुष्यातली
संगीतनिर्मितीच आहे. भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात तर हे जीवनसंगीत फारच
प्रकर्षाने खुललेले आढळते. साधू संतांच्या, समाज सुधारकांच्या चरीत्रातही आपल्याला हेच आढळेल.
आमचेही हे निरीक्षण आहे की ज्या लोकांना संगीताची, विशेषतः लयीची चांगली जाण नसते, त्यांच्या वागण्या -बोलण्यात, उठण्या -बसण्यात काम करण्याच्या पद्धतीत 'timing' चे काहीच भान नसते. त्यामुळे
त्यांच्या कुठल्याच गोष्टीत आकर्षकपणा आणि विवेक, विचार दिसत नाही. बहुतेक वेळी असे लोक नको तेव्हा, नको तिथे, नको त्या
पद्धतीने वागून बोलून कामे बिघडवून ठेवतात. काही वेळा असे लोक "कशाला एवढा विचार करायचा, जे वाटेल ते करून मोकळे व्हावे" अशी विधाने करताना
आढळतात. हे म्हणजे "कशाला समेवर यायचे, कसेही गात राहावे" असे म्हणण्यासारखे आहे. अर्थात, हे प्रत्येकाच्या बाबतीत असेच असेल असे नाही, पण बऱ्याच लोकांच्या बाबतीत असे आढळून येते. आम्हाला वाटते
की अश्या लोकांनी संगीत शिकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यातील ही उणीव काही अंशी
तरी भरून काढता येईल. नाहीच साध्य झाले, तरी निदान त्यांच्यातल्या या उणीवेची त्यांना जाणीव होईल आणि याबाबतीत ते
विनम्र होतील. हे ही नसे थोडके!
संगीतातील आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे गायकाचा मूळ स्वर किंवा ज्याला आपण
सामान्य भाषेत 'पट्टी' म्हणतो, तो. ही 'पट्टी' किंवा स्वर हे
प्रत्येकाच्या स्वाभाविक वृत्ती -प्रवृत्तीचे किंवा स्थायीभावाचे द्योतक आहे, ज्याला आपण इंग्रजीत 'comfort zone' म्हणतो. आपल्या पट्टीत गाताना गायक सुखी समाधानी असतो आणि
त्यातच तो त्याचे गाणे सुंदर रीतीने खुलवू शकतो. ऐकणारयांनाही ते छान वाटते. न
झेपणाऱ्या पट्टीत गायक गायला लागला, की त्याचे गाणे त्यालाही समाधानकारक वाटत नाही आणि ऐकणार्यांनाही आनंददाई वाटत
नाही,
सुंदर वाटत नाही. यालाच भगवद्गीतेत 'स्वधर्मे निधनं श्रेयः' म्हटले आहे. अर्थात, या वचनाची
व्याप्ती फार मोठी आहे, पण हाही
त्यातला एक अर्थ आहे. उदा: आयुर्वेदात कफ प्रकृती, वात प्रकृती, पित्त प्रकृती
इ. शरीराच्या प्रकृती सांगितल्या आहेत. आता एखाद्या घरात दिवसातनं अनेक वेळा चहा
घ्यायची सगळ्यांना सवय असू शकते. पण त्याच घरातील एखादा माणूस बिचारा पित्त
प्रकृतीचा असेल, तर त्याला या सवयीचा त्रास
होईल. तोच एखादा कफ प्रकृतीचा असेल तर त्याला या सवयीचा फारसा त्रास होणार नाही.
कारण दोघांची प्रकृती वेगळी आहे. म्हणजेच दोघांची 'पट्टी' वेगळी आहे. पु.लं.च्या 'तुझे आहे तुजपाशी' या नाटकातील शेवटच्या अंकात पु.लं.नी हीच उपमा वापरली आहे. जेव्हा खोटेपणाने
आचार्यपणा मिरवणारे 'आचार्य पोफळे
गुरुजी'
हे प्रांजळपणे कबुल करतात की हे आचार्यपण त्यांच्यावर लादले
गेले होते आणि शेवटी त्यांचा दुराग्रहीपणा सोडून, आयुष्यभर मनात साठून राहिलेल्या दुःखाला अश्रुंवाटे वाट मोकळी करून देतात, त्यांच्या मानस कन्येला 'लग्न कर, सुखानी संसार कर' असा मोकळ्या मनानी आशीर्वाद देतात आणि खोटा आचार्यपणा सोडून, सामान्य माणसासारखं जगण्याचा निश्चय करून निघून जायला
लागतात,
तेव्हा तिथे उपस्थित असलेले 'काकाजी' आचार्यांच्या मानसकन्येला
सांगतात "थांब..जाऊ दे त्यांना.. त्यांच्या आयुष्याचे तंबोरे आता मस्त जुळून
राहिलेत.. " अर्थात, आता त्यांना
त्यांचा खरा सूर सापडला.
संगीतातला आणखिन एक महत्त्वाचा पैलू म्हणजे गाण्याचा मजकूर व त्याचा आराखडा
यावर विचार करून गाणे, वाजवणे. अशा
वेळेस गायक त्या रागातील सगळे संभाव्य रंग अथवा भाव खुलवून दाखवू शकेलच असे नाही.
कारण वेळेचं बंधन व वेळेचं भान ठेवूनच
गावे लागते. म्हणून असलेल्या वेळेत काय उत्तम रीतीने मांडता येईल, खुलवता येईल, याचे भान ठेवून, अनावश्यक ते
टाळून गायक आपले गाणे रंगवत असतो. यालाच रोजच्या व्यवहारात आपण 'prioritization'
म्हणतो, जे अत्यंत
आवश्यक असते. यातून चुकीच्या अपेक्षा ठेवल्याने येणारे अनावश्यक दुःख आणि 'एक न धड भाराभर चिंध्या' या दोन्ही गोष्टी टाळता येतात. पर्यायाने, माणूस बऱ्याच अंशी सुखी समाधानी राहू शकतो. आणि जो स्वतः सुखी समाधानी असतो, त्याची सोबत इतरांनाही सुखावहच वाटेल. इथे व.पु. काळ्यांचे
एक वाक्य नमूद करावेसे वाटते की "आयुष्याचे संगीताप्रमाणे आहे. जसे एखाद्या
विशिष्ट रागात काही सूर वर्ज्य असतात. याचा अर्थ ते सूर वाईट असतात असं नाही. पण
तो विशिष्ट राग मांडताना ते सूर वर्ज्य करावे लागतात.” त्याचप्रमाणे आयुष्यात काही
विशिष्ट गोष्टी साध्य करताना काही गोष्टी तेवढ्या पुरत्या बाजूला साराव्या लागतात.
संगीत ही केवळ करमणुकीची आणि मेहनत करून सादर करण्याची गोष्टच नव्हे. संगीत ही
खरं तर साहित्याप्रमाणेच, संस्कारांची
गोष्ट आहे. पुष्कळांना हे कळत नाही. नुसताच घोटून घोटून रियाझ करत असतात. पण अनेक
वर्ष रियाझ करून आणि गाणी बसवून देखिल त्यांच्या स्वभावात (किंबहुना स्वभाव दोषात)
काहिही सुधारणा होत नाही. पुन्हा जैसे थे!
स्वतःला पंडित म्हणवणारे सुद्धा अतिशय सुंदर राग अत्यंत नीरस आणि रटाळ
पद्धतीने सादर करतांना आपण ऐकतो. मग त्यांच्या त्या संगीत साधनेचा काय उपयोग ? अर्थात, यात त्यांचा
संपूर्ण दोष आहे असे म्हणता येणार नाही. कारण अनेक शब्द जे सांगू शकत नाहीत, जे सांगून जाण्याची ताकद संगीतात आहे, अशी प्रत्यक्ष अनुभूती देणारे संगीतकार सापडणे कठीण आहे.
ज्यांना असे संगीतकार ऐकायला मिळाले नाहीत, तेचि पुरुष दुर्भाग्याचे. पण ज्यांना असे संगीतकार व त्यांचे संगीत ऐकायला
मिळाले आहेत, तेच 'संस्कारी' लोक ही
अनुभूती इतरांनाही देऊ शकतात. निदान तसा प्रयत्न तरी करू शकतात.
पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा संगीतार्थी लोक निव्वळ 'विहिरीतील बेडूक' बनून न राहता, चौफेर लक्ष
ठेवून मधमाशी प्रमाणे चहूकडून संगीताच्या संस्कारांचा साठा करत राहतात आणि ती
अनुभूती इतरांनाही देतात. आणि असा शोध घेता घेता जर शब्दातीत अनुभूती देऊ शकणाऱ्या
संगीतकारांची, गायकांची गायकी, त्यांचे संगीत त्यांना अनुभवता आले तर निश्चितच तो
संगीतार्थी लीन होईल, विनम्र होईल.
आणि विनम्रता ही मनुष्याचे व्यक्तिमत्त्व सुंदर बनवते, माणसाला शहाणे बनवते आणि माणसाला नेहमी विद्यार्थी दशेतच
ठेवते. सोक्रेटीसचे एक सुंदर वाक्य आहे
"All I know is I know nothing".
आम्हाला वाटते की आमचे सांगणे आपल्यापर्यंत पोहोचले आहे. सूज्ञास अधिक सांगणे
न लगे. शेवटी आम्हीच वर लिहिल्याप्रमाणे, किती विस्तार करावा आणि कुठे थांबावे याचे भान संगीतप्रेमींना असायला पाहिजे.
म्हणून आम्हाला एवढा 'विस्तार' पुरे वाटतो आणि आमचे म्हणणे आम्ही येथेच थांबवतो.
No comments:
Post a Comment