आज सीमा फार बेचैन होती...
तिला वाटलं होतं, की
जाणार्या प्रत्येक दिवसागणिक जखम भरत चालली आहे. जे काही व्हायचंय ते घडून गेलं
होतं. तिचं असं एक वेगळं आयुष्य सुरू झालं होतं. मुलांनीही ही गोष्ट हळूहळू
स्वीकारली होती.
तिचा मुलगा हृषीकेश तसा लहानपणापासूनच खूप
समजूतदार आणि
जबाबदार होता. आपल्या धाकट्या बहिणीला, रियाला किती मायेनं
सांभाळायचा तो! खरंतर चारचौघांत, 'रिया माझी बहीण आहे', हे
सांगायला खूप मोठं काळीज पाहिजे, ते हृषीकडे होतं. आत्ता
हृषी त्याच्या आयुष्याच्या अशा वळणावर होता की, त्याला
त्याचं करियर करण्यासाठी परदेशात जायचे वेध लागले होते. त्याला अडवायचं नाही हे
सीमानं ठरवलं होतं. हृषीनं तिच्यासाठी आणि रियासाठी त्याच्या उज्ज्वल भविष्यावर
पाणी का म्हणून सोडायचं? ज्यानं तिचा विचार करायला
हवा होता, त्यानं
तर केला नाही; मग
मुलाकडून ही अपेक्षा का करायची?
खरंतर रियाच्या जन्मानंतर सगळं चित्रच हळूहळू
बदलत गेलं. रियाच्या गरजा वेगळ्या होत्या, पण त्या
जमेल तशा पूर्ण करणं, रियाला मोठं करणं, ह्या
ध्यासानं सीमाला जणू झपाटून टाकलं. पहिल्या मुलानंतर जराशा
उशिराने जेव्हा तिला दिवस गेले, तेव्हा अॅबॅार्शन न
करण्याचा निर्णय तिनं आणि समीरनं मिळून घेतला होता. त्यात धोका असूनसुद्धा
येणाऱ्या बाळाचं स्वागत करायला ते सिद्ध झाले होते. रियाच्या जन्मानंतर जेव्हा हे
लक्षात आलं की ह्या गोंडस मुलीचं आयुष्य वेगळं असणार आहे, तेव्हा
सीमा पुरती उन्मळून पडली. पण मग त्या नवराबायकोनी मिळून ठरवलं की, रियाला
खूप प्रेमानं मोठं करायचं, त्यासाठी सीमानं आपलं करियर
बाजूला ठेवण्याचा निर्णय घेतला आणि समीरनं घरची आर्थिक बाजू सांभाळायची असं ठरलं.
रियाला मोठं करताना हृषीकडे दुर्लक्ष होता
कामा नये, रियाच्या
अपंगत्वानं हृषीच्या हुशारीवर, समंजसपणावर मात करू नये
म्हणून सीमा सारखी धडपडायची. पण ह्या सगळ्या ओढाताणीत तिचं समीरकडं, त्याच्या
गरजांकडे, त्याच्या
आवडीनिवडींकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. सीमालाही हे कुठंतरी कळत होतं, पण
तिच्या प्रायोरिटीज बदलल्या होत्या. नव्हे तिला त्या नाइलाजानं बदलाव्या
लागल्या होत्या. तिनं स्वत:च्या आवडीनिवडीही नव्हत्या का बाजूला ठेवल्या? ह्या
सगळ्या कसरतीत तिला समीरची म्हणावी तशी साथ मिळत नव्हती.
रियासाठी डॅाक्टरांचे
दवाखाने पालथे घालणं, तिला निरनिराळ्या थेरपीजना घेऊन जाणं यात तिचा
दिवस कसा संपत होता तेच कळत नव्हतं. तिला खूप वाटायचं की समीरला वेळ द्यावा, दोघांनी
मिळून हिंडावं-फिरावं, गप्पा माराव्यात. पण...
मनात असूनही ते शक्य होत नव्हतं!
समीर मात्र या सगळ्यामुळे दिवसेंदिवस हतबल होत चालला होता, त्यांच्यातला दुरावा हळूहळू लक्षात येण्याइतपत जाणवत होता. म्हणूनच की काय, पण समीरनं स्वत:ला कामात पार बुडवून घेतलं. त्या दोघांच्यात हल्ली मनमोकळ्या गप्पाही होत नव्हत्या, कारण सीमाला रिया आणि हृषीशिवाय जग नव्हतं. समीरच्या ऑफिसात, मित्रमंडळींत काय चाललंय यात तिला फारसा रस उरला नव्हता. त्या दोघांना सिनेमा/नाटकाची खूप आवड होती, पण रियाला सोडून इतके तास घराबाहेर राहणं सीमाला शक्य व्हायचं नाही. छोट्याछोट्या गोष्टींत एकमेकांना खूश करणं, एकमेकांच्या आवडीनिवडी सांभाळणं मागे पडायला लागलं.
निरनिराळ्या थेरपीजना, उपचारांना
रिया कसा छान प्रतिसाद देतेय हे सीमाला समीरला सांगांवसं वाटायचं. तर समीरला
वाटायचं की सीमानं त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांकडे यावं, सगळ्यांमध्ये
मिसळावं. हळूहळू त्या दोघांच्या गरजा, आवडीनिवडींत बदल होत गेले. दोघांमधल्या
शारीरिक दुराव्याबरोबरच मानसिक दुरावाही वाढत गेला.
आयुष्य यंत्रवत होत गेलं...
मधल्या काळात खूप काही घडून गेलं. समीरनं
वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. सीमानं फारसा आकांडतांडव न करता हे स्वीकारलं. पण
अर्धवट वयातल्या हृषीला हे सत्य स्वीकारणं फार कठीण गेलं. नात्यांच्या ह्या
गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी म्हणूनच की काय, पण त्यानं शिक्षणासाठी
अमेरिकेला जायचा निर्णय घेतला. सीमा आणखीनच एकटी पडली. हृषीच्या
शिक्षणाचा खर्च समीर करत होता. तो कधीतरी वीकएन्डला रियालाही त्याच्या घरी घेऊन
जायचा. समीरनं मुलांशी त्याचं नातं छान जपलं होतं आणि सीमानंही त्याला कधी विरोध
केला नव्हता. असं असलं तरी समीरच्या आयुष्यात मुलांचं स्थान ठरलेलं होतं. त्यांना
महत्त्व होतं, त्यांच्यासाठी
पैशाची तजवीज तोच करत होता. पण मुलं म्हणजे त्याचं आयुष्य नव्हतं. त्याच्या
आयुष्यात इतर गोष्टीही होत्या आणि हाच समीर-सीमाच्यातला फरक होता.
आता हृषीच्या जाण्यानं मात्र सीमाचं जग
आणखीनच संकुचित झालं. सकाळपासून रात्रीपर्यंत सीमाला एकच ध्यास असायचा रिया, रिया आणि
रिया! कधीकधी तीही थकायची, हे सगळं सोडून दूर कुठंतरी
निघून जावं असं वाटायचं. पण रियाचा निरागस चेहरा आणि परावलंबी शरीर
दिसलं की तिला भडभडून यायचं. आपण असा विचार तरी कसा करू शकतो याची लाज
वाटायची. रिया तिचा श्वास होती, रिया म्हणजेच तिचं जग होतं.
अचानक एके दिवशी सीमाला सासूबाईंचा फोन आला. बराच वेळ त्या बोलत होत्या. त्या दोघांना, म्हणजे सीमाच्या सासू-सासऱ्यांना घरी यायचं होतं. दोन दिवस त्यांच्या नातीबरोबर, रियाबरोबर राहायचं होतं! तिनं आनंदानं होकार दिला. पूर्वीपासूनच त्या सासूसुनेचं छान जमायचं. समीर आणि ती वेगळे झाले, कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला, तरी सासू-सासऱ्यांनी सीमाशी असलेलं त्यांचं अनोखं नातं जपून ठेवलं होतं. ठरल्याप्रमाणे ती दोघं आली, दोन दिवस राहिली, त्यामुळे रिया खूप खूश होती. तिला जरी बोलून दाखवता येत नसलं, तरी तिच्या डोळ्यातली चमक खूप काही सांगत होती. सीमालाही खूप बरं वाटलं. नाहीतरी हृषी अमेरिकेत गेल्यापासून फार एकटं-एकटं वाटत होतं. मात्र जाताजाता सासूबाईंनी जे सांगितलं त्यामुळे सीमा परत एकदा कोलमडली. त्यांच्या मुलानं, तिच्या नवर्यानं, समीरनं ह्या वयात दुसरं लग्न केलं होतं म्हणे आणि म्हणूनच त्या दोघांना बोलावून घेतलं होतं!!
अचानक एके दिवशी सीमाला सासूबाईंचा फोन आला. बराच वेळ त्या बोलत होत्या. त्या दोघांना, म्हणजे सीमाच्या सासू-सासऱ्यांना घरी यायचं होतं. दोन दिवस त्यांच्या नातीबरोबर, रियाबरोबर राहायचं होतं! तिनं आनंदानं होकार दिला. पूर्वीपासूनच त्या सासूसुनेचं छान जमायचं. समीर आणि ती वेगळे झाले, कालांतराने त्यांचा घटस्फोट झाला, तरी सासू-सासऱ्यांनी सीमाशी असलेलं त्यांचं अनोखं नातं जपून ठेवलं होतं. ठरल्याप्रमाणे ती दोघं आली, दोन दिवस राहिली, त्यामुळे रिया खूप खूश होती. तिला जरी बोलून दाखवता येत नसलं, तरी तिच्या डोळ्यातली चमक खूप काही सांगत होती. सीमालाही खूप बरं वाटलं. नाहीतरी हृषी अमेरिकेत गेल्यापासून फार एकटं-एकटं वाटत होतं. मात्र जाताजाता सासूबाईंनी जे सांगितलं त्यामुळे सीमा परत एकदा कोलमडली. त्यांच्या मुलानं, तिच्या नवर्यानं, समीरनं ह्या वयात दुसरं लग्न केलं होतं म्हणे आणि म्हणूनच त्या दोघांना बोलावून घेतलं होतं!!
ही बातमी ऐकली आणि सीमा फार अस्वस्थ झाली. कितीही विसरायचं म्हटलं तरी प्रेम केलं होतं तिनं समीरवर! संसार केला होता त्याच्याबरोबर! थोडाथोडका नाही तर चांगली १७ वर्षं. ह्या १७ वर्षांत तिनं जे काही कमावलं होतं, ते ह्या एका क्षणात तिच्या हातून निसटून गेलं होतं जणू. तिनं जपून ठेवलेली त्यांच्या नात्याची ओंजळ आज पूर्णपणे रिती झाली होती. घटस्फोट झाला तरी तिनं कधी समीरचा तिरस्कार केला नाही, की मुलांना त्याच्यापासून तोडलं नाही. समीरनं मात्र एवढा मोठा निर्णय घेताना तिला एका शब्दानं सांगितलं नाही.
खरंच एवढी तकलादू असतात का ही नाती, की एका कागदावर सह्या
केल्यानं उन्मळून पडतात. मग तिनं उदरात वाढविलेल्या त्यांच्या नात्याचं बीज, ज्याचं
अस्तित्व आज तिच्या दोन मुलांमध्ये उमटलंय ते तरी खरं कसं मानायचं? खरंतर
रियाचं संगोपन करताना तिला समीरच्या आधाराची सर्वांत जास्त गरज नव्हती का? रिया इतर
मुलांसारखी नव्हती हा काय तिचा एकटीचा दोष होता? रियाला
प्रेमानं मोठं करायचं, तिच्यासाठी जे-जे करता येईल ते-ते करायचं, हा
दोघांचा निर्णय नव्हता का? मग ह्या खडतर प्रवासात
जेव्हा सीमा प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती, तेव्हा समीर मागे का पडला? कधी आणि
कुठं हरवला तो? का
रियाचं अपंगत्व हे निमित्त ठरलं? गेल्या १३-१४ वर्षांत बायको
म्हणून ती वेळप्रसंगी कमी पडली, हे जरी खरं असलं तरी तिनंही
तिचं मन मारलंच की. मग समीरनं ज्या सहजपणानं नवीन मार्ग शोधला तसा सीमानं का नाही
शोधला?
प्रश्नांची गर्दी काही संपत नव्हती. १७
वर्षांतल्या कडूगोड आठवणी उफाळून वर येत होत्या. घटस्फोटानंतर झालेल्या जखमेवर
धरलेली खपली निघाली होती. डोळ्यांना धार लागली होती. इतके दिवस अडवून ठेवलेला
अश्रूंचा बांध आज ह्या अनपेक्षित धक्क्यानं फुटला होता. आईची अवस्था बघून रिया
कावरीबावरी झाली होती. आई आज नेहमीसारखी नाही हे तिलाही जाणवलं असावं आणि म्हणूनच
ती सीमाला आणखीनच बिलगून बसली होती. अश्रूंचा पहिला भर ओसरला होता तरी सीमाला
मधूनच येणार्या हुंदक्यांमुळे वातावरणातली शांतता मध्येच भंगत होती.
-- वीणा भागवत
No comments:
Post a Comment