आकाशात दाटून आली ढगांची गर्दी,
काळोखही सर्वदूर देण्या पावसाची वर्दी.
पावसाच्या चाहूलीने मी झालो प्रसन्न,
तो मात्र उद्याच्या भितीने झाला खिन्न विषण्ण.. |१॥
दाटलेल्या ढगांचा झाला गडगडाट,
मधूनच विजांचाही होई लखलखाट.
लागलीच सुरु आमचे पावसाळी बेत,
तो मात्र लगबगीने दुरूस्त करी घरचे छत.. ॥२॥
ढगांच्या पोटातून मग बरसे पाऊस,
धावत गेलो पुरविण्या भिजण्याची हौस.
त्याला खरं तर नको होता पावसाचा एकही थेंब,
पण घरातही झाला होता तो पुरता ओलाचिंब.. ॥३॥
आमच्या जिभेच्या चोचल्यांची आईला काळजी,
पावसासंगे गरम चहा आणि कांद्याची भजी.
त्याच्या समोर मात्र अर्धी भिजलेली चपाती,
पाव वाटी डाळीमध्ये मिसळे छतावरची माती.. ॥४॥
स्वतःच्या हौसेपायी आम्ही ओढवला सर्दी खोकला,
क्षुल्लक त्या आजारापायी घरी औषधांचा पसारा.
पावसाच्या तडाख्याने त्याला मात्र सणसणून भरला ताप,
औषधालाही घरी पैसा नाही, दारूत सदा डुबलेला बाप.. ॥५॥
एके दिवशी पावसाने केला कहर,
जलमय झाले अवघे शहर.
सहज बाहेर पडलो येण्या गंमत पाहून,
डोळ्यादेखत त्याचे बिचार् याचे घर गेले वाहून..
॥६॥
आता जेव्हा जेव्हा लागतो पाऊस बरसू,
एका डोळ्यात येती हसू परी दुसऱ्यात आसू.
आपल्यासाठी पाऊस म्हणजे मजा, आनंद, गंमत,
त्याच्या जागी उभं राहून पावसाला सामोरं जाण्या हवी
हिंमत.. ॥७॥
--- मोहित केळकर
No comments:
Post a Comment