‘गोड़ बोलणे’

सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् 
न ब्रूयात् सत्यमप्रियम् ।
नासत्यं च प्रियं ब्रूयात् 
एष धर्मः सनातनः ॥

खरं बोलावं, गोड़ बोलावं...
कटू सत्य बोलून कशास कुणा दुखवावं ? 
आणि खोटं कितीही गोड़ वाटलं, 
तरीही ते न बोलावं...।।

गोड़ बोलण्याने इतरांना सुख मिळते. चार गोड शब्द बोलायला पैसे पडत नाहीत, तरीही माणूस गोड बोलत नाही. हृदयात जिव्हाळा, प्रेम, आपुलकी, माया, ममता, असेल  तर सहजपणे आपण गोड़ बोलतो.  इतरांना समाधान देण्याचे जे सामर्थ्य करोडो रुपयांच्या आर्थिक ताकदीतही नाही, ती ताकद चार गोड शब्दात मात्र खचाखच भरलेली असते.
बोलण्यामध्येही निर्हेतुक प्रेम असेल, बोलणे  हळू, नम्र स्वरात, साधे, सहज, आपुलकीचे, आणि प्रसन्न असेल, तरच ते सहजसुंदर 'गोड़' बनते. अशी माणसे  सर्वांची आवडती होतात, हवीहवीशी वाटतात.

पोटी स्वार्थ ठेवून 'गोड' बोलणारे  लोकही जगात भेटतात. आपले  काम साधून घेण्यापुरते काही लोक प्रेमाने वागतात. तसे नसावे.  ते 'कृत्रिम' व  'दिखाव्याचे'  गोड बोलणे झाले. अशी 'नाटकी' गोड माणसे कालांतराने आवडेनाशी होतात.  

आपले बोलणे अगदी गोड असावे याचा अर्थ नेहमी स्तुतिपरच बोलावे असे नाही. एखाद्याकडून खरंच काही चूक झाली असेल तर त्याला चारचौघात न बोलता स्वतंत्रपणे एकांतात, विश्वासात घेऊन शांतपणे समजावून सांगावे, हेही एक प्रकारचे गोड बोलणेच आहे. 

गोड बोलणे ही एक कला आहे; इतर सर्व कलांसारखीच तीही जन्मजात असते आणि 'रियाज' करून ती जोपासावी लागते! 
गोड बोलल्यावर लगेच डायबेटीस होत नाही तसेच डायबेटीस ऑलरेडी असेल तरी गोड खायला बंदी असते, बोलायला नाही! हे ठाऊक असूनही माणसे गोड बोलायला कचरतात. 

गोड बोलणे हे, 'आभासी' ( whats appवर, फेसबुकवर ) नेहमीच सोपे असते! व्यक्ती आणि तिच्यामुळे निर्माण होणार्‍या समस्या आपल्यासमोर आल्यावरही आपल्या मुखातून गोड शब्द बाहेर येणे हा संस्कार रक्तात भिनवणे तशी साधी गोष्ट नाही. यासाठी जिभेला वळण लावण्याची एक तपश्चर्याच करायला हवी!

-- सुजाता मोघे

No comments:

Post a Comment