संस्कारमाला भाग १ - "गर्भाधान"


संस्कार या पदाची  व्युत्पत्ती " संस्कृ " ह्या धातूपासून झाली आहे. "संस्कृ"चा अर्थ आहे पवित्र करणे, शुद्ध करणे, घडवणे. सृष्टीतील यच्चयावत  वस्तूजाती प्रारंभापासून प्राकृत म्हणजेच मूळ  प्रकृतीस अनुसरून असतात संस्कार झाल्यावर पूर्णत्वास प्राप्त होतात. उदाहरणच द्यायचे झाले तर गोवळकोंड्याच्या परिसरात लहान मुलांनी खेळांमध्ये घेतलेला दगड हिऱ्याच्या कारागिरांकडून घडवला गेला आणि कोहिनूर म्हणून जगप्रसिद्ध झाला. वैद्यकशास्त्रात एखाद्या धातूचा तात्काळ परिणाम अपेक्षित असेल तर तो रुग्णाला भस्माच्या स्वरूपात देतात, म्हणजेच विशिष्ट संस्कार करून देतात. ही संस्कारांची किमया जर निर्जिवाच्या बाबतीत होते तर सजीवांमध्ये का घडू नये?-  हे मर्म हेरून आपल्या पूर्वजांनी मानवाचे जीवन सर्व बाजूंनी संपन्न व्हावे यासाठी काही संस्कारांची योजना करून ठेवली आहे . मनुष्य जन्माला येण्याआधीपासून ते त्याच्या दिवंगत आत्म्याला मुक्ती मिळेपर्यंत सोळा संस्कारांचे विवरण व्यास स्मृतीमध्ये आहे . इतर काही स्मृती ग्रंथांमध्ये या संस्कारात व्यतिरिक्त अजून काही संस्कारांचा उल्लेख आढळतो  त्यांचा सखोल अभ्यास करताना असे जाणवते की प्रत्येकामागे अंधश्रद्धा नसून खूप शास्त्रीय अभ्यास आहे. जाणून घेऊ या ह्या विविध संस्काराबद्दल संस्कार मालेच्या चार भागांमध्ये.
सुरुवात करू या "गर्भाधान" या संस्कारापासून. विवाहानंतर योग्य मुहूर्तावर केला जाणारा हा आद्य संस्कार आहे. गर्भधारणा होताना उद्भवणाऱ्या विघ्नांचा निरास होऊन गर्भधारणा व्हावी यासाठी काही मंत्र, होमहवन याद्वारे देहशुद्धी केली जाते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी!
गर्भाचे ज्ञान झाल्यावर त्याला स्थैर्य प्राप्त व्हावे, कोणत्याही अदृश्य कारणाने गर्भ निरास होऊ नये व गर्भाची निकोप वाढ व्हावी या उद्देशाने गर्भवती स्त्रीवर केले जाणारे दोन संस्कार म्हणजे "पुंसवन" "अनवलोभन".

गर्भस्थ बालकाचे ठायी प्रगल्भ बुद्धी प्रस्थापित व्हावी व कुठलीही अदृश्य दुष्ट शक्ती गर्भवती स्त्रीकडे आकृष्ट होऊ नये यासाठी चौथ्या महिन्यात सिमंतोनयन” हा संस्कार केला जातो. यालाच आपल्याकडे "चोर चोळी" असेही म्हणतात. तीन महिन्यांनंतर गर्भ स्थिर होतो, त्यामुळे हा संस्कार झाल्यावर स्त्रीने गर्भवती असल्याची गोड बातमी उघड करावी अशी प्रथा आहे. हा संस्कार प्रात: समयी करतात. गर्भवतीला चौरंगावर बसवून तिची हिरव्या खणाने ओटी भरतात व तिला पंचामृत सेवनास देतात. पंचामृताचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व जाणाऱ्या आपल्या पूर्वजांनी किती सूचक सोय केली आहे. पूर्वीच्या काळी गर्भवतीने बाळंत होईपर्यंत रोज सकाळी पंचामृत सेवन करायचे हा नियम होता. दुसरी सुंदर पद्धत म्हणजे ओटीमध्ये मिळालेल्या या खणांचे नवजात बाळाला पाचव्या दिवशी टोपडे शिवायचे.

नंतरचा आठव्या महिन्यात येणारा संस्कार म्हणजे 'विष्णुबली". गर्भाचे उत्कृष्ट पोषण व्हावे व त्यात कोणतीही विकृती राहू नये, तसेच प्रसूती सुलभ व्हावी हा ह्या संस्कारामागचा हेतू. गर्भाधानपासून पुढील संस्कार जर काही कारणपरत्वे राहून गेले असले तर आठव्या महिन्यातच केला जाणारा संस्कार म्हणजे  "अठंगुळ".  ह्यामध्ये सर्व संस्कार एकत्रित केले जातात.




सातव्या महिन्यात गर्भाच्या टेस्ट बड्स विकसित होतात त्याला नवनवीन चवी आवडू लागतात. त्या चवीचे पदार्थ खाण्याची इच्छा मातेला होणे म्हणजेच डोहाळे लागणे. गर्भवतीच्या या कामनापूर्तीचा सोहळा म्हणजेच "डोहाळ जेवण" अथवा  दोहदपूर्ती". गरोदरपणात सातव्या अथवा नवव्या महिन्यात हा सोहळा करतात. ह्या समारंभांतर्गत गणपती पूजन, पुण्याहवाचन नवग्रह शांती केली जाते. स्त्रीची ओटी भरून तिला बांगड्या भरल्या जातात. ह्या बांगड्यांची किणकिण बाळापर्यंत पोहोचते जन्मल्यावर हा चिमुकला जीव त्या किणकिणीवरून आपली आई ओळखतो असा पूर्वापार समज आहे.


अशा सर्व संस्कारांनी पावन होऊन बाळ जन्म घेते तेव्हा त्याच्या आगमनाच्या स्वागतासाठी कानात काही पवित्र मंत्रोच्चार केले जातात त्याला "जातकर्म" म्हणतात.
ह्याच्या पुढील संस्कारांविषयी माहिती संस्कारमालेच्या भाग २ मध्ये.      

- सौ. आरती जोशी



No comments:

Post a Comment