तुम्हांला IOT म्हणजे काय हे माहिती आहे? अहो, म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स! अगदी सोप्या
शब्दांत सांगायचे, तर आता आपल्या घरात असणारी छोटी, छोटी उपकरणे आता आपल्या स्मार्ट फोन सारखी 'स्मार्ट'
होणार आहेत.
म्हणजे बघा हं, तुम्ही घरात शिरलात की तुमच्या
हॉलमधला दिवा लागेल. तुम्हाला हव्या त्या वेगाने पंखा लागेल. AC असला, तर AC लागेल. तुमचं
आवडतं संगीत घरात वाजू लागेल. तुमचं रात्रीचं जेवण जर फ्रीजमध्ये असेल, तर त्याच compartment मध्ये ते कमी थंड झाले असेल.
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये असेल, तर गरम झाले असेल.इ.इ.
सध्याची तरुण
पिढी या विचारांनी भारली आहे अगदी! अशीच एक मुलगी आपल्याला भेटते, cuddly या
शॉर्ट फिल्ममध्ये! तिने, म्हणजे तिच्या कंपनीने एक पाळणा/झुला तयार केलाय. अर्थात,
त्याला पाळणा म्हणायला ती तयार नाही. कारण त्याचे नाव कंपनीने ठेवलेय cuddly!
लहान मुले आणि
आईच्याही सोयीसाठी बनवलेला हा पाळणा. याला चाके आहेत. यामुळे आई बाळाला घेऊन
कुठेही फिरू शकते. यात बाळासाठी सर्व उत्कृष्ट दर्जाच्या गोष्टी वापरल्या आहेत.
त्याला कोणताही त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली आहे. यातील गादी अगदी मऊ आहे,
बाळाला हवा तसा आकार घेणारी आहे. बाळाला आरामदायी असणाऱ्या सर्व गोष्टी यात आहेत.
सुमारे ४० भाषांतील अंगाई गीते यात रेकॉर्ड केली आहेत. भाषा निवडली की त्या
भाषेतील मधुर स्वरातील अंगाई गीत चालू होईल आणि बाळाला गाढ झोप लागेल.
आपल्या
कंपनीच्या या अभिनव प्रॉडक्टची माहिती मुलगी आईला देत असते. आईला अर्थातच अनेक
प्रश्न पडत असतात. पण मुलगी या नव्या प्रॉडक्टने भारलेली असते. बोलता बोलता, ती थकून आईच्या मांडीवर डोके
ठेवते. आई प्रेमाने तिच्या डोक्यावरून, केसांतून हात फिरवत
रहाते आणि आपले प्रश्न मुलीला विचारत असते. पण दोनच मिनिटांत ती मुलगी गाढ झोपी
जाते.
फिल्म ही एवढीच.
जेमतेम पाच मिनिटांची. पण खूप काही सांगून जाणारी. स्मार्ट फोन उराशी कवटाळणारी ही
आजची पिढी, प्रेमाच्या,
मायेच्या ओलाव्याला दुरावलीय का? सुंदर साडी
नेसलेला फोटो मुलीने पाठवल्यावर, तिला मिठीत घ्यावंसं नाही
वाटत का आपल्याला? की नुसते thumbs up करून
आपल्या भावना पोचतात तिला? स्पर्श करणे, मुलांना जवळ घेणे म्हणजे लाड असतात की प्रेम दाखवण्याची एक पद्धत? बाळाला कुशीत घेणे, कडेवर घेणे हा कोणत्याही आईसाठी
अगदी परमोच्च आनंदाचा क्षण! पण हा आनंद हरवून तर जाणार नाही ना, अशी भीती ही फिल्म पाहिल्यावर वाटते. 'मदर्स डे'च्या मिनित्ताने तयार केलेली ही फिल्म तशी जुनीच आहे. पण यातील भावना
मात्र गेल्या वर्षी काय, या वर्षी काय, किंवा पुढच्या वर्षी काय, जुन्या न होणाऱ्या! बरेच
काही सांगणाऱ्या आणि बरेच काही विचारणाऱ्या!
No comments:
Post a Comment