Demonetization - एक विचार

लहानपणी शाळेत एक निबंध लिहिला होता - "पाण्यावर चालता आले तर ...". आज आपली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. "पायाखालची जमीन द्रवमय झाली तर ..." हा आपला आजचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे बघा हं, झोपेतून उठल्यावर असे लक्षात यावे की, आपण १० फूट  खोल पाण्यात आहोत आणि ती पाणी नाही तर जमीनच आहे. म्हणजे किनारा असण्याचा प्रश्नच नाही. पाणी, म्हटलं तर खोल नाही, पण उभं राहणं शक्य नाही, अशा खोलीचं. माशासारखी सतत हालचाल केल्याशिवाय गत्यंतर नाही. जवळ पैसा तर भरपूर आहे पण वापरता तर येत नाही. बँकेत टाकला तर वापरता येईल, पण आहे हे income टॅक्सवाल्यांना कळेल, त्यामुळे जवळ आहे हे सांगता पण येत नाही! तोंड दाबून बुक्क्यांचा मार- असा सगळा प्रकार. 

८ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता पंतप्रधानांनी जी घोषणा केली, त्यानंतर आपली ही अवस्था झाली आहे. गेल्या आठवड्यात या विषयावर इतकं चर्वितचर्वण झालंय, की मला मांडायला फारसा वेगळा मुद्दा नाही. असंख्य मतमतांतरे, व्हॉट्सऍप जोक्स, अर्थधुरिणांची समीक्षा- एखादा पराठा खरपूस करण्यासाठी सर्व बाजूनी भाजावा, पण त्या नादात तो खमंग होण्या ऐवजी, त्याचा कोळसा व्हावा असं काहीसं या गोंधळाचं होतंय. 
पण तरी दोन विचार मांडावेसे वाटतात - 
आज बाजारात जो असंतोष आहे तो छोट्या दुकानदारांमध्ये आहे. सगळा व्यवहार रोखीत आणि लोकांकडे त्याचीच कमतरता. गरिबी नाही, पण रोख रक्कम नाही, असलेली रोकड न वापरण्याकडे कल. माझ्या आजोबांकडून अश्या गोष्टी ऐकल्या होत्या, पण त्यानंतर आता परत-रोखीने खरेदी करण्यापूर्वी ही 'अत्यावश्यक' या कॅटॅगरीत मोडते का - हा विचार यायला लागला आहे आणि ते चांगलचं  आहे. यात छोट्या दुकानदारांचा धंदा मात्र कमी झाला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, हे तात्पुरते आहे- काही दिवसातच कळेल की, ही  मंदी तेजीत बदलणारका या मध्यमवर्गीय व्यावसायिकांचं कंबरडं मोडणार ते. 


   
एक गोष्ट नक्की. सरकारचा हा निर्णय धाडसी आहे, आमूलाग्र बदल करणारा आहे, व्यवसाय करण्याच्या आपल्या पारंपारिक पद्धतीत बदल करायला भाग पाडणारा आहे. रोखीशिवाय व्यवहार करण्याचे बरेचसे ऑशन्स असतांना, 'धंदा करेन तर रोखीतच, प्लास्टिक पैशात नाही' हा करारी बाणा याच दुकानदाराला कराकरा कापून जाण्याचीच शक्यता जास्त! ११ तारखेला, कलकत्त्यात याचं प्रत्यंतर आलं- १०००/५०० च्या नोटा रद्द केल्यानंतर दोन दिवस गेलेले, गोंधळाची नुकतीच सुरुवात होती, दोन शेजारीशेजारी असलेल्या मिठाई दुकानांपैकी एकात गर्दी तर दुसऱ्यात तुरळक वर्दळ. कारण साधं होतं, एका दुकानात, PayTMने पैसे देता येत होते, दुसऱ्यात फक्त रोख रक्कम. आता त्या दोन दुकानांपैकी चांगली मिठाई कुठली होती ते मला माहीत नव्हते पण PayTM वाले दुकान जास्त धंदा करत होते हे नक्की. 

छोट्या अंतरासाठी, रिक्षा करणारे आता पायी जाणे पसंत करतात किंवा मग ओला व उबर या सारखे बिनरोखी पर्याय पसंत करतात. यात फक्त-रोख वाले रीक्षावाले कुणाचं भलं करताहेत? स्वतःचं नक्कीच नाही. मला स्वतःला HAL मंडईतुन भाजी आणायला आवडते, पण त्या मंडईची एक चक्कर म्हणजे- १००च्या कमीतकमी ६ नोटांची माझ्या पाकीटातुन जावक- मग star bazaar मधली भाजी जी इतकी ताजी नाही पण क्रेडिट कार्डने घेता येते ती अचानक छान वाटायला लागते. 


तेंव्हा एक छोटासा बदल- electronically पैसे घेण्याचा- हा या दुकानदारांना परत त्यांच्या धंद्याला मूळ पदाला, किंबहुना, थोडा जास्तच तेजीला नेणारा होउ शकतो. आणि हा बदल फार अवघड आहे असेही नाही. मग घोडं कुठं अडतंय

आणि ते माझं दुसरं observation आहे.

आपणा भारतीयांनायोग्य तो आयकर देणे, यासारखी दुसरी क्लेशदायक गोष्ट क्वचितच असेल. रोख व्यवहार या साठी की केलेल्या  व्यवहाराची कागदोपत्री कुठेही नोंद न करता, पर्यायाने त्यावर कर देण्याची जबाबदारी नाकारतधंदा चालू असतो. एखाद्या अनोळखी माणसाच्या शब्दावर इतका विश्वास क्वचितच दाखवला जातो! यात जो काही १०/१५ टक्के कर वाचेल तेवढा वाचवायचा, आणि असेच व्यवहार पुढे करत हा मिळालेला पैसा खर्च करायचा! 'मला मिळणाऱ्या उत्पन्नावर मी योग्य तो कर भरेन'- ही आपल्यासाठी इतकी अनैसर्गिक संकल्पना आहे की कर बुडवण्यासाठी कुठल्याही थराला जायला आपण तयार असतो- अगदी आपल्या शारीरिक, मानसिक स्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामाची पर्वा न करता!! आणि यामुळे आपल्याभोवती असणाऱ्या खराब रस्त्यांची, वेळोवेळी द्याव्या लागणाऱ्या छोट्या मोठ्या लाचेची, आपल्याला न पटणाऱ्या, न आवडणाऱ्या, असंख्य गोष्टी मुक्याने पाहू शकण्याची सहनशक्ती आपण बालपणापासून आपल्या अंगी बाणवतो, आपल्या मुलांना त्यासाठी तयार करतो. "चलता हैं"- हे आपण आपल्यालाच ठसवतो कारण अश्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणं म्हणजे करबुडवेपणा बद्दल आवाज असतो; जो कुठेतरी आपल्यालाही लागू होतो!! म्हणून, ''तेरी भी चूप, मेरी भी चूप" हा सोयीस्कर विचार बनतो. 

सरकारचा हा निर्णय योग्य, अयोग्य, अकाली, पुरेसा विचार न करता घेतलेला, धाडसी, राजकीय दृष्ट्या आत्मघातकी- हे काही काळात स्पष्ट होईल. तोपर्यंत कदाचित आपण सर्वच या नवीन परिस्थितीत कमी अधिक होरपळत, जुळून जाऊ- पण एक गोष्ट नक्की; या निर्णयाने सगळ्यांनाच आपल्या पैसा वापरण्याच्या सवयी परत तपासायला लावल्याकाळ्या पैशाबद्दल विचार करायला लावला- घरातला काळा पैसा बाहेर काढला; अनाठायी खर्च काही दिवस तरी कमी केला- हे ही नसे थोडके. 

-- अभिजित टोणगांवकर

No comments:

Post a Comment