'गोड' बोलण्यामुळे आफत

खूपदा ऐकलंय, वाचलंय- जिभेवर साखर नि डोक्यावर बर्फ असला की आयुष्य सुखाने जगता येते... पण कधी कधी या गोड बोलण्याने नसती आफत ओढवते. असाच एक प्रसंग... मी अर्थात प्रेक्षक. 

तर झालं असं की लेक तिसरी-चौथीत होती. शाळा सुटायच्या वेळी तिची वाट बघत शाळेच्या पटांगणात थांबले होते. शाळा सुटली... पोर दंगा करत, ओरडत पाय-या उतरून येत होती तेवढ्यात एका पोराला मारत, शिव्या देत एक आई ओढत घेऊन  येत होती. आता माझं शालेय शिक्षण ग्रामीण भागात झाल्यामुळे असले कुणाचे ना कुणाचे कौतुक सोहळे रोज बघायची सवय होती. छडी लागे छमछम वगैरे मनावर बिंबवण्याच कामच शाळेत नि घरातूनच होत असे. पण जवळच एक समाजसेवक पालक बाई उभारल्या होत्या. त्यांना हे नवीन असावं किंवा त्यांच्यातली समाजसेविका जागी झाली असेल. त्या गोड हसून मवाळ आवाजात त्या मारणा-या आईची समजूत घालू लागल्या...


"अहो कशाला मारताय छोट्याला, कित्ती लहान आहे"

चिडलेल्या मातेने एक जळजळीत कटाक्ष समाजसेवक बाईंवर टाकला.

"कोन छोटा? आत सातवीत जैल. मुडदा रोज मारामा-या करून येतुय... बाईंची रोज तक्रार... कपडे, पुस्तकं फाडून येतंय... किती पैसा घालायचा? यानं शिकाव म्हणुन याचा बा राबराब राबतोय... म्या शिवणकाम  करते... आमाला परवडतोय व्हय असल्या साळेचा खर्च? पण ह्यो शिकून काय तर बनेल म्हून पोटाला चिमटा काडून र्हातोय तर... या कार्ट्याचं शिकण नाहीच... रोज कटकट-"

"असू दे हो... लहान आहे... याच वयात हे वागणार. नका मारू आणि तुमच्या अपेक्षांचं ओझं त्याच्यावर लादू नका, राग काढू नका"

"आत्ता ग बया, राग कसला काढतेय? गोड बोलून सुदरला असता तर कशाला?"

"तुम्हाला असं वाटत नाही, तुम्ही कुठला तरी राग याच्यावर काढताय?"

 "ओ ताई, अस्लं काय ते तुम्ही शिकली सवरलेली लोकं वागता... आमी जिकडचा राग तिकडंच काढतो. आतबाहेर येगळं काय नाय बघा!"

समाजसेवक बाई आणखी गोड आवाजात, "अहो... त्याच्याशी शांतपणे बोलल पाहिजे, सुधारेल नक्की."

अर्थात हे सगळं करून थकून मग मार देणारी ती आई वैतागली. "असं म्हणताय? मग न्या कार्ट्याला तुमच्या घरी... सांभाळा, मग सांगा. बोलाया काय जातंय नुस्तं..."

पोराला समाजसेवक बाईंकडे ढकलून चिडलेली आई तरातरा जाऊ लागली. समाजसेवक बाईंचा चेहरा कसनुसा. तेवढ्यात माझी लेक आली नि पुढचा सिन बघायला मी नाही थांबले.

-- गौरी देशपांडे



No comments:

Post a Comment