'गोड बोलणे' या विषयावर लिहिणे ही एक अवघड परिक्षाच आहे कारण 'बोलणे' जेवढे सोपे तेवढेच 'लिहिणे' अवघड!! आणि 'गोड खाणे' जितके 'प्रिय' तितकेच 'गोड बोलणे' अशक्य!
वयाने, अनुभवाने आणि ज्ञानाने, व्यासंगाने श्रेष्ठ अशा व्यक्ती जेव्हा बोलतात तेव्हा वेळप्रसंगी त्यांचे काहीसे कडू-तिखट बोलणेही गोड लागते. त्याचा परिणामही गोड होतो. हे सांगणे एखाद्या sugarcoated pill प्रमाणे काम करते. वरवर गोड लागते आणि व्याधींवर औषधासारखे कामही करते!
देवाने आपल्याला दोन कान आणि एकच तोंड दिले आहे, ते आपण त्यांचा उपयोग त्याच प्रमाणात करावा म्हणून! पण एकाच तोंडाला 'खाणे' आणि 'बोलणे' अशी दुहेरी कामगिरी मिळाल्यामुळे माझ्यासारख्या वाचाळ आणि खादाड व्यक्ती त्याचा चौपट उपयोग करुन घेतात.
मला वाटतं या दुहेरी कामगिरीमुळेच खाणे आणि बोलणेही एकमेकांना पूरक आहेत. बघा ना... आपणही 'तिखट' टीका, 'कडवे 'बोल, 'आंबट' शेरा, 'झणझणीत' भाषण अशी चविष्ट विशेषणे बोलण्याला लावतोच की नाही?
लहानपणी आईने ताईला सांगितलेली cooking tip आठवली. "अग, गोडाच्या पदार्थात कणभर मीठ घालावं म्हणजे पदार्थ अधिक चविष्ट लागतो." मला वाटतं गोड बोलणंही असंच असावं... नर्म विनोदाचा आंबटपणा, परखड सल्ल्याचं किंचित कडवट बोट, शिस्तीचं पालन किंवा नीतिमूल्यांचं आचरण करणाऱ्या नियमांचं जरासं तिखट आणि त्याज्ज गोष्टींचा उल्लेख करणारा तुरटपणा प्रमाणात घालून बोलणं गोड केलं तर त्याचा उपयोग आणि प्रभाव जास्त होतो!
आपसूक पिकलेलं फळ जसं आपल्या अंगच्या गोडव्यानं खाणा-याला तृप्त करतं, तसं उत्स्फूर्त गोड बोलणं असतं. वरुन साखर घातलेलं किंवा आजकालच्या ट्रेण्डप्रमाणे शुगरफ़्री घालून केलेल्या पक्वान्नासारखंच 'साखरपेरणी' करणारं बोलणं उपायापेक्षा अपायच करतं.
उदाहरण द्यायचं तर... नीरस कंटाळवाणं आभारप्रदर्शनाचं भाषण... 'गोड' कामगिरी गुळगुळीत शब्दात पार पाडताना ती 'गोड' मानून घ्यायची 'कडक' शब्दात 'नम्र' विनंती करणारी भाषणे!
ज्याप्रमाणे अन्नाचे रुपांतर 'रक्तशर्करे'त होते, त्याचप्रमाणे श्रोता वक्त्याचे बोलणे कसे आत्मसात करतो त्यावर बोलणे गोड का कडू हे ठरते... आता हेच बघा ना, मी इतके तुम्हाला पकवलेच की नाही!
-- देवयानी कुलकर्णी
No comments:
Post a Comment