ग्रेस - एक उत्कट काव्यानुभूती

मी कवितेचा समीक्षक नाही अभ्यासकही नाहीमात्र कवितांवर मनापासून प्रेम असणाऱ्या माझ्यासारख्या रसिकाला कविता दोन प्रकारचे अनुभव देते. एक म्हणजे प्रखर सामाजिक राजकीय किंवा सार्वजनिक अनुभव. उदाहरणार्थ कुसुमाग्रजांची "गर्जा जयजयकार" किंवा सुरेश भटांची "उष:काल होता होता" किंवा यशवंत मनोहरांची "कालचा पाऊस आमच्या शेतात पडलाच नाही ". या कविता एका क्षणात तुम्हाला वास्तवाची जाणीव करून देतात जगण्याचे भान देतात. तर दुसरा अनुभव म्हणजे निखळ वैयक्तिक, अंतरंग ढवळून टाकणारा, तुमच्या जगण्याशी अनामिक नाते जोडणारा

काही कवितांनी हा अनुभव पदोपदी दिला आहे विशेषकरून थोर कवी ग्रेस यांच्या
त्यांच्या कवितांवर दुर्बोध ,आत्ममग्न ,धुसर किंवा गूढ असल्याचा आरोप अनेक समीक्षकांनी केला आहे. मात्र ग्रेस स्वतः म्हणतात "माझ्या कवितेने मराठीला काय दिले याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, पण माझ्या कवितेने मराठी काव्यात निर्मितीची प्रक्रिया त्यातून सिद्ध झालेली कलाकृती तीच्या आस्वाद संबंधी अनेक महत्त्वाचे प्रश्न निर्माण केले आहेत. माझ्या  शब्द वेल्हाळ आणि अर्थ काहूर कवितेवर दुर्बोधतेचा आरोप केला जातो त्याचे निराकरण मी करीत नाही किंबहुना माझ्या कवितेच्या शब्द विसर्जनाच्या प्रदेशात ही दुर्बोधतेची  बेसर बिंदी मी अनेक ठिकाणी दडवून ठेवली आहे ". 
ही बेसर बिंदी आपल्याला वारंवार दिसते. प्रतिकांचा विलक्षण वापर, लयबद्धता आणि भावविश्वाशी ,दुःखाशी जोडलेले नाते हि मला जाणवलेली काही ठळक वैशिष्ट्य. या कवितांचे मूळ त्यांच्या insecure बालपणात आहे का असा प्रश्न पडतोउदाहरणार्थ 
" मी भिऊन अंधाराला अडगळीत लपूनही जाई ये हलके हलके मागे त्या दरीतील वनराई " , 
" रंगीत खेळणी माझी तू देना मज खेळाया या बाल मुठीतून इवल्या घे काढून आपली काया".
 त्यांच्या कवितांमधला romance पठडीपेक्षा अगदी वेगळा त्यात आर्जव नाही, confrontation नाहीआहे निखळ अनुभवउदाहरणार्थ 
" तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू वळावा सदस्य सुखाच्या काठी वळिवाचा पाऊस यावा"  ,
 " देहास आठवे स्पर्श तू दिला कोणत्या प्रहरी की धुके दाटले होते या दग्ध पुरातन शहरी".

ग्रेस हे लौकिकार्थाने निसर्ग कवी नाहीत पण निसर्गातील अनेक प्रतिकांचा वापर त्यांनी मुक्त हस्ताने केला आहे अगदी सहजपणे.
 " ते झरे चंद्र सजणांचे ती धरती भगवी माया झाडांशी निजलो आपण झाडात पुन्हा उगवाया"
 " संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा". 

ग्रेस यांना दु:खाचा महाकवी म्हणतात पण त्यांचे दुःख लाचार केविलवाणे किंवा सहानुभूतीचे कड काढणारे नाही. " सगळ्याच ऋतूंना मिळते दुःखाचे उत्कट दान "असे ते स्वाभाविक आणि उत्कट आहे
" अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता
हे शब्द कधीही वाचले तरी मनाला पिळवटून टाकतात. पण हे दुःख चिरंतन आहे अपरिहार्य आहे म्हणूनच ग्रेस म्हणतात 
" वेदनेला नाही वीण पडछाया तुडवित जाणेतू अंगाईत मुलींना हे सांग एवढे गाणे ".
 नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे या सुरंगी भावविश्वात गुरफटून जायला सीमा नाही

ग्रेस नी आम्हाला काय दिलं ? जे आपण कुठेही बोलू शकत नाही ते त्यांची कविता आपल्याशी बोलते. आपल्या सुख दुःखांवर तात्त्विक भाष्य करण्याच्या भानगडीत पडता त्यांची कविता आपली सोबत करते. आपली पर्सनल कंपॅनियन बनते. प्रतिभेने आपल्याला अचंबित करते , निर्मितीची प्रक्रिया उलगडून दाखवते. sympathy नाही पण empathy दाखवते आणि अशा अनुभवांचे संचित देते ज्याला तोड नाही. म्हणूनच ग्रेसच्या शैलीला कोणताही precedence नाही, follow करणारा कोणता so called पंथही नाही, ती स्वयंभू आहे खुद्द ग्रेस प्रमाणे
" मी खरेच चाललो दूर तू येऊ नको मागे " म्हणणारे ग्रेस आता आपल्यात नाहीत पण  "ते सरता संपत नाही  चांदणं तुझ्या स्मरणाचे" ही मात्र माझ्यासारख्या अनेक चाहत्यांची प्रामाणिक भावना आहे.  

                                                       गांधार धाराशिवकर


No comments:

Post a Comment