I श्री गणेशाय नमः I
शिवसुता,
नर्मदामातेचे हे अथांग महात्म्य!
महर्षी द्वैपायन
व्यासांनी अनेक पुराणांमध्ये हजारो श्लोकांमधून नर्मदामातेचे महात्म्य भरभरून
गायले आहे. ते वाचताना क्षणाक्षणाला नर्मदा मातेचे निरंजनी, दु:खभंजनी, तापहारिणी रूप
डोळ्यासमोर उभे राहते. शब्दाशब्दातून तिची नित्य नवीन, अनाकलनीय, अनंत असंख्य रूपे
उलगडत जातात आणि मन तिच्या किनाऱ्यावर परत परत परिक्रमा करू लागते. खरे म्हणजे
परिक्रमा ही मनानेच करायची असते. शरीर हे फक्त एक साधन, मुक्तीसाठी दिलेले एक
उपकरण होय. ही कलियुगातील सर्वश्रेष्ठ तपश्चर्या. कोणत्याही वर्णाच्या स्त्री,
पुरुष, लहान, थोर, गरीब, श्रीमंत, गृहस्थ, संन्यासी, योगी, मुनी, साधक कोणीही करावी
अशी हे सर्व समुद्र पार केला तेव्हा जाणवते. कोणीही करावी अशी साधना. पण फिरणे
किंवा पर्यटन अजिबात नव्हे. शरीराला केवळ कष्ट देणे नव्हे. दुसऱ्यानी केले म्हणून
मी ही करावे असा पराक्रम सिद्ध करणे नव्हे, तर मैय्यावर विश्वास ठेवून, नितांत
श्रद्धा ठेवून, तिला माता म्हणून नतमस्तक होऊन, तिला सर्वस्व समर्पित करून, तिच्या
प्रेमात देहभान विसरून केलेली प्रदक्षिणा... आज
१६ डिसेंबर, बडवानीकडे मार्गस्थ होण्यापूर्वी ममलेश्वरला संकल्प केला, तेव्हा नर्मदा
मैय्याची ओटी भरली व ७ कन्यांना आपल्या शक्तीनुसार दान केले. इथे परिक्रमेत शिरा करून
त्याचा नैवेद्य दाखवतात. त्याला कढई म्हणतात. आज आम्हाला १९० किमीचा प्रवास करून
बडवाईला मुक्काम करायचा होता. निघाल्यावर लगेच मध्ये 'रावेरखेडी' लागले.
बाजूला नर्मदेचे विशाल पात्र आहे. पहिले बाजीराव १७४० साली जेव्हा उत्तरेकडे एक लाख
सैनिक घेऊन निघाले तेव्हा इथे, या जागी त्यांचे उष्माघाताने निधन झाले. इथे
त्यांची समाधी आहे. पुढे भारतीय पुरातत्व विभागाने ही जागा आपल्या ताब्यात घेतली व
समाधीची डागडुजी केली. समाधीचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो.
रावेरखेडीयेथील बाजीरावांची
समाधी
भर दुपारी आम्ही
'मसावद' इथे पोहचलो. नर्मदेच्या या तीरावर शंकराचे जुने मंदिर व पलीकडील
तीरावर 'माहेश्वर' आहे. शककर्ता शालिवाहन राजाने ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता व इथे त्यांचा
आश्रम पण आहे. जे पायी परिक्रमा करतात त्यांच्यासाठी इथे राहण्याची व्यवस्था आहे.
त्यांचे सैंपाकघर व अन्नछत्रपण आहे. तिथे आम्हालापण खिचडी करता आली व आमच्या
दुपारच्या जेवणाची सोय झाली. दाट जंगल,
एका बाजूला नर्मदेचे मन प्रसन्न करणारे पात्र, शंकराचे पुरातन मंदिर, गरमागरम
खिचडी त्यावर साजूक तूप व सोबत लोणचे. उदरभरण होऊन मन प्रसन्न झाले. आम्ही सर्व
सहप्रवासी सारख्या ध्येयांनी प्रेरित होतो त्यामुळे सहभोजनाचा आनंद द्विगुणित झाला.
शिवाय पायी परिक्रमा करणारे पण तिथे भेटले. त्यांचे अनुभव ऐकून त्यांना सदिच्छा
दिल्या व आमच्या परीने मदत केली. आता रात्रीचा मुक्काम बडवानीला करायचा होता. बसमध्ये
संध्याकाळी सायंस्मरण वगैरे सर्वांनी मिळून केले. त्यात गणपती स्तोत्र, रामरक्षा हनुमान
चालीसा, कालभैरवाष्टक, आरत्या सर्व झाले व दिवसभराचा प्रवास करून संध्याकाळी
सातच्या सुमारास बडवानीला पोहचलो.
नर्मदामैय्या व पलीकडील महेश्वर
पुरातन शिव मंदिर
इथे एक प्रशस्त
गुरुद्वारा आहे. नर्मदेपासून फक्त ५ किमी अलीकडे. तिथे आमची रात्रीच्या मुक्कामाची
सोय झाली. बायकांची, पुरुषांची वेगवेगळी व्यवस्था
झाली. गरमागरम जेवून रात्री थोडे भजन झाले. आमच्या ग्रुपमध्ये २-३ जण
चांगले भजन करणारे होते. व्यवस्थापक कुलकर्णी यांनी नर्मदाष्टक व नर्मदेची आरती
म्हणायला शिकवली. आता सर्वांनाच जमिनीला पाठ टेकायची होती. हो, आम्हाला परिक्रमेत असताना
गादीचा वापर न करता जमिनीवरच झोपायचे होते. व्यवस्थापक एक मोठी सतरंजी देत. बाकी
आमचे स्वत:चे अंथरूण, पांघरूण होतेच. सकाळी लवकर उठून ५ किमी दूर असलेल्या 'राजघाट'
या नर्मदेच्या किनाऱ्यावर जायचे होते. म्हणून लगेच निद्रादेवीच्या स्वाधीन झालो.
दुसऱ्या
दिवशी १७ डिसेम्बरला सकाळी प्रातर्विधी आटोपून लवकर लवकर राजघाटला आलो.
सूर्योदयाची वेळ होती. वरून खालच्या नर्मदेचे विलोभनीय दृष्य दिसत होते. एका बाजूला एक खूप मोठा पूल दिसत होता.
असं म्हणतात की सरदार सरोवरामुळे हा पूल पण पाण्यात जाईल. पायऱ्यांवरून नर्मदेच्या
काठावर उतरलो. नर्मदा मैय्याच्या स्वच्छ पाण्यात अंघोळ केली. इथे वरती एकमुखी
दत्ताचे मंदिर आहे. दर्शन घेऊन नर्मदा मैय्याची पूजा केली, नर्मदाष्टक म्हणून
नर्मदेची आरती केली. नंतर आपला जप वगैरे केला. खूप प्रसन्न वाटले. पायी परिक्रमा
करणारे इथूनच शूलपाणीच्या जंगलाकडे
जाण्यास निघतात. हा टप्पा अत्यंत अवघड व
आव्हानात्मक असा आहे. घनदाट जंगल, जवळजवळ ७०-७५ लहानमोठे डोंगर चढून उतरावे
लागतात. मार्गपण अत्यंत अरुंद, त्यात पाठीवर आपले समान. या भागात भिल्ल लोक राहतात.
ते स्वत:ला नर्मदेचे भाऊ मानतात. म्हणजेच परिक्रमावासीयांचे ते मामाच झाले की. पण
काही वर्षांपूर्वी हेच मामा लोक या भागातून पायी जाणाऱ्या परिक्रमावासीयांना
लुटायाचेपण. काही परिक्रमावासी या मार्गाने न जाता सरळ डांबरी रस्त्यांनी जाणंच
पसंत करतात. हा रस्ता अर्थात दूरचा पडतो पण सोपा आहे. पण आम्हाला बसने जायचे होते.
जवळजवळ ३८५ किमीचा टप्पा आणि तेही याच
जंगलातून. आम्ही परत आपल्या मुक्कामी आलो. दोऱ्या बांधून ओले कपडे वाळत टाकले.
सैपाकाला वेळ असल्यामुळे आम्ही काही जण गावात चक्कर टाकायला गेलो. येताना इथल्या
प्रसिद्ध कचोऱ्या घेतल्या. आल्यावर आपले समान आवरले. गरमागरम पोळीभाजी खाऊन
पुढच्या प्रवासाला निघालो.
बडवानीचा राजघाट
आता पहिले आम्हाला 'प्रकाशा' इथे जायचे होते. हेच गाव
महाराष्ट्रात आहे. दक्षिण तटावर याला
इकडची काशीपण म्हणतात. तापी नदीच्या काठावर एक लहानशी टेकडी आहे. वर 'केदारेश्वर'
आणि 'काशीविश्वनाथ' यांचे मंदिर आहे. त्यांचे दर्शन घेऊन जवळच्या दुसऱ्या एका
डोंगरावर गेलो. इथे एक शिवाचे मंदिर आहे. याच मंदिरात गंधर्व पुष्पदन्तानी
शिवाच्या स्तुतीसाठी महिम्न स्तोत्र रचले होते. इथून निसर्ग सुंदर दिसतो.
संध्याकाळची वळ होती. मंदिरात शिवाचे दर्शन घेतले व आम्ही शिवमहिम्नपण म्हटले. आणि
पुढच्या प्रवासाला निघालो.
पुष्पदन्तेश्वर मंदिर
साधारण दोन
तासांनी 'भालोद' इथे पोहचलो. एवढ्या दिवसभराच्या प्रवासाने खरे तर मन व
शरीर दोन्ही शिणले होते. पण तसेच भालोदच्या दत्तमंदिरात प्रवेश केला आणि
रात्रीच्या ९ वाजता श्री. प्रतापे महाराजांनी ज्या उत्साहाने आमचे स्वागत केले, आमचा सर्व शीण दूर पळाला.
त्यांनी मंदिराचा सर्व परिसर मोठ्या उत्साहाने आम्हाला दाखवला. अगदी चार पावले
चालले की नर्मदा मैय्याचा किनारा. समोर त्यांचे सैपाकघर आणि त्याच्यावर
राहण्यासाठी दोन रूम्स. अतिशय स्वच्छ. हे सर्व पाहून अगदी माहेरी आल्यासारखे
वाटले.
दत्तमंदिर
इथे पायी जाणारे परिक्रमावासी पण रात्री मुक्कामाला असतात.
आमच्या बरोबर पण तीन जण होते. ते शूलपाणीच्या जंगलातून आले होते. त्यांचीओळख करून
घेतली. त्यांचा अनुभव त्यांनी आमच्या बरोबर शेअर केला. नंतर भजन झाले. श्री.
प्रतापे महाराजांनी त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. अगदी साधारण तीस वर्षांपूर्वी
ते नागपूरला 'तरुण भारताचे' संपादक होते.आर.एस.एस.चे श्री. धनागरेकाकांबरोबर
त्यांनी पहिली नर्मदा परिक्रमा केली होती. काही वर्षांनी पुन्हा दुसरी परिक्रमा
केली तेव्हा त्यांना भालोद इथे राहण्याचा आदेश मिळाला. आणि नंतर एकदा असेच बडोदा
इथे काशीबाई निरखे यांच्याकडे गेले असता काशीबाईंनी ही दत्तमूर्ती त्यांच्या
स्वाधीन केली. काशीबाईंच्या आजोबांच्या स्वप्नात
श्री दत्तप्रभूंनी दर्शन देऊन सांगितले की "मी नर्मदेत अमुकअमुक ठिकाणी आहे.
तिथे येऊन तू मला घेऊन जा." त्याप्रमाणे आजोबांनी ही मूर्ती नर्मदेतून काढली. ही दत्ताची मूर्ती
शालीग्रामेत कोरलेली, एकमुखी, सहा हात असलेली व षटचक्र दर्शवणारी अशी होती.
त्यांनी पूजा-अर्चा केली. मुलानीपण केली. मुलाला एकच मुलगी होती. तिने पण लग्न न
करता पूजा केली. तीपण ८५ वर्षांची झाली. तिला काळजी पडली. मूर्ती खूपच सुरेख आहे. तिला
स्वप्न पडलेकी नर्मदा परिक्रमा करून एक व्यक्ती उद्या सकाळी येईल, त्यांना ही
मूर्ती सुपूर्द कर. श्री. प्रतापेंची सकाळी त्यांच्याशी भेट झाल्यावर त्यांना
स्वप्नाबद्दल सर्व सांगून काशीबाईंनी ही दत्तमूर्ती त्यांच्या स्वाधीन केली. श्री.
प्रतापेंनीपण आदेश मानून भालोद इथे औदुंबराच्या झाडाजवळ मूर्तीची स्थापना केली.
पुढे गावकऱ्यांच्या व परमेश्वराच्या इच्छेने आश्रम झाला. औदुंबराच्या खोडातपण गणपतीचा
आकार दिसतो आणि मूर्तीच्या वक्षस्थळावर गोमुख स्पष्ट दिसते. रोज छान पूजा-अर्चा
होते. मन प्रसन्न होते.
दत्ताची मूर्ती शालीग्रामेत
कोरलेली, एकमुखी, सहा हात असलेली व षटचक्र दर्शवणारी
ही सर्व माहिती जाणून घेईपर्यंत गरमागरम सैपाक तयार झाला. आम्ही
हातपाय धुवून दत्ताचे दर्शन घेतले व जेवायला बसलो. रात्री आराम करून १८ तारखेला
सकाळी नर्मदास्नान करून तिची पूजा, जप, अष्टक, आरती केली. दत्तमंदिरात आलो. इथे एक
पायी परिक्रमावासी होता. त्याने अभिषेक केला होता. पूजा आरती झाली. आम्हाला
दत्ताची मूर्ती अभिषेक करताना पाहता आली. प्रतापेंनी षटचक्रे पण दाखवली. नंतर थंडी
वाजते म्हणून स्वेटरपण घातला गेला. आज सोमवती अमावास्या होती. सकाळी गरमागरम पिठले-पोळीचे
जेवण झाले. हा मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय आहे. आश्रमासमोर नर्मदेचे विशाल पात्र,
सुंदर स्वच्छ पाणी, मोरांचा आश्रमातील वावर मनाला भुरळ घालतो. परत इथे यायचे हा
निश्चय करून आम्ही भालोद सोडले.
नर्मदामैय्या
अरे
हो, स्नानाला गेलो तेव्हा प्रतापेंनी सूचना केली होती की इथे नर्मदेत खूपमोठमोठ्या
मगरी आहेत. एक बाई कपडे धुवायला गेली असता तिला मगरेनी ओढून गिळंकृत केले. तरी
दिवस उजाडल्यावर तुम्ही जा. त्यामुळे सूर्याचे छान दर्शन झाले. उष:कालाचे आकाशातील
विविध रंग दिसले. गावातील व्यवहार पलीकडे दुसऱ्या किनाऱ्यावर नारेश्वरला
मोटारबोटीने जाऊन होत असे. आज आम्हाला १०० किमीचा प्रवास करून कठपोरला जायचे
होते. पुढे विमलेश्वरला अरबी महासागराचा आखात नावेतून पार करायचा होता.
थोडी उत्सुकता, थोडी हुरहूर लागली होती. रोज नवीन अनुभव येत होते. नर्मदा
परिक्रमेत आता समुद्र पार करायचा...
सौ. वर्षां संगमनेरकर
No comments:
Post a Comment