नर्मदा परिक्रमा - ३


I श्री गणेशाय नमः I

नर्मदा मातेने दर्शन दिल्यावर राजाच्या मुखातून स्तोत्र  बाहेर पडले, "हे माते, तुझ्या दर्शनाने जे शास्त्र श्रवण केलं होत त्याचा अर्थ कळला. हे पापनाशिनी नर्मदे देवी! तुला नमस्कार असो. भगवान शंकरांनी जिला केवळ लोककल्याणाकरिता निर्माण केले आहे, जिच्या पूजनाने पुण्यवर्धन होते, तिला माझा नमस्कार असो. लौकिक शरिराला जन्म देणारी माता केवळ बाह्य मलिनता धुवून टाकते. तू तर तुझ्या बालकांची, शुष्क व आर्द्र सर्व मलिनता अंतर्बाह्य धुवून टाकतेस. माते, तुझा जयजयकार असो. ज्याप्रमाणे ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्यामध्ये भेद नसतो, त्याचप्रमाणे गंगा, नर्मदा, सरस्वती यांच्यात भेद नाही. तू पाप, संताप हरण करणारी परम शक्ती आहेस. तुझ्या कृपेवाचून लोकांचे कल्याण शक्य नाही."

     आज सोमवार, तारीख १८ डिसेंबर, त्यात अमावस्या. म्हणजे आज तर सोमवती अमावस्या. आजच्या पवित्र दिवशी नर्मदा स्नान झाले. आमचे पुण्यच म्हणायचे. तर नर्मदेत स्नान करून आल्यावर दत्तात्रयाचे दर्शन घेतले. नंतर गरम गरम पिठलंपोळी खाऊन प्रतापे महाराजांचा निरोप घेतला. आणि आम्ही भालोद सोडले. आम्हाला आज समुद्र पार करायचा होता. बरेच वाचले होते. कठपोरमार्गे विमलेश्वरला आलो. इथे परीक्रमावासियांसाठी उतरण्याची सोय आहे. आम्ही तिथे दुपारी १२च्या सुमारास पोहचलो असू. पाहतो तर काय, जिकडे तिकडे परिक्रमावासी. पायी आणि बसने परिक्रमा करणारे. चौकशी केली असता कळले की समुद्राला भरती आल्यावरच नावा किनाऱ्यावर येऊ शकतात. मग त्यात बसून सागरातून नर्मदामैय्या जिथे सागराला मिळते ते पार करूनच नर्मदामाईच्या  उत्तर तटावर जाता येते.

     आम्ही सर्व साधारणपणे ३०० /३५० परिक्रमावासी तिथे असू. नंबर लागेल तसा समुद्र पार करायचा. इथे स्त्री, पुरुष, योगी, संन्यासी, साधक सर्व भेटले. मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावांतून आलेले. आम्हाला त्यांचे अनुभव ऐकायचे होते. अनेक जण कालपासून बोटीत नंबर न लागल्यामुळे विश्रांती घेत पडले होते. जे पायी परिक्रमावासी होते त्यातील काही जणांची ओळख झाली. त्यांनी नुकतेच शूलपाणीचे जंगल पार केलेले होते. ते खूपच थकलेले दिसत होते. आम्हापैकी काही जणांना सोमवार होता. त्यांनी व मॅनेजरनीसुद्धा पिठलेपोळी बरोबर घेतली होती. त्यांनी त्या काही परीक्रमावासींना विचारले की आमच्याबरोबर आधी पोटोबा शांत करणार का?  त्यांना आमच्या जवळचे फराळाचे व पिठले पोळी दिले. खूप दिवसांनी पोळी खायला मिळाल्यामुळे त्यांना त्याचे अप्रूप वाटले आणि खूप छान वाटले. मग त्यांचा पायी परिक्रमेचा अनुभव ऐकला. आमच्या बरोबरच्या काही प्रवाशांना भविष्यात पायी परिक्रमा करायची होतीच.

पायी परीक्रमावासियांचे अनुभव ऐकताना
              
परिक्रमावासी विश्रांती घेताना     
 या परिक्रमावासियांमध्ये मराठी व हिंदी भाषिक लोक होते. अर्थात आमची मैत्री  मराठी भाषिक लोकांशीच झाली. त्यांना चालणे सुरू करून महिना होऊन गेला होता. त्यांत विविध वयोगटांतील लोक होते. अगदी तिशीतील, १० वर्षांची इन्फोसिसमधील नोकरी सोडलेला; नर्मदेच्या ओढीने अमेरिकेतील नोकरीचा राजीनामा दिलेला; चाळीस-पन्नाशीतल्या मैत्रिणी मुलांना, नवरा आणि आजी आजोबांच्या ताब्यात देऊन आलेल्या; एक पासष्ट-सत्तरीचे जोडपे, आता वानप्रस्थाश्रमात परिक्रमा करायला निघालेले; असे विविध प्रकारचे लोक भेटले. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक दिवस नर्मदामैय्याच्या सानिध्यात त्यांना नवीन वाटत होता. नर्मदामाईच्या किनाऱ्यावर वाटेत भेटणारे लोक किती दिलदार होते आणि या परीक्रमावासियांना नाना प्रकारे जमेल तशी मदत कसे करतात हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते. नर्मदामाईच्या किनाऱ्यावरील या लोकांनी त्यांना कधीच उपाशी नाही ठेवले. घरात एका दिवसापुरतेच तांदूळ असतानादेखील उद्याची चिंता न करता या लोकांना त्यांनी जेवू घातले होते. बरे त्यांना मोबदला म्हणून पैसे देऊ केले तर त्यांनी मुळीच कधी घेतले नाही. मैय्याच आमचे बघून घेईल असे म्हणायचे ते लोक. शिवाय मैय्यानीपण या परीक्रमावासियांची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण केली याचेपण त्यांनी वर्णन केले. त्यामुळे पायी चालताना झालेल्या जखमा, पायांत रुतलेले काटे याचे त्यांना काहीच वाटत नव्हते. ते खूप थकलेले वाटत होते पण त्यांचे चेहरे खूप तेजस्वी दिसत होते. फक्त मैय्या सर्व पार करून देईल हाच दुर्दम्य विश्वास उराशी बाळगलेला. 
          
     या जागेला एखाद्या छावणीचे रूप आले होते. कोणी आराम करत होते, तर कोणी ध्यान करत होते, तर कोणी सैंपाक. आपल्या बिट्ट्या/ रोट्या चुलीवर भाजून स्वत:च जेवण बनवत होते. आम्ही त्याच परिसरात असलेल्या गणपती, महादेव व नर्मदामैय्याची मूर्ती यांचे दर्शन घेतले. हे सर्व अनुभवत असताना, आपण एकदुसऱ्यांना जणू काही अनेक जन्मांपासून ओळखतो आहोत असे वाटत होते. जणू मैत्र जीवांचे होते.
   
 
आपल्या  बिट्ट्या / रोट्या चुलीवर भाजून स्वत:च जेवण बनवताना
 
परीक्रमावासियांशीचर्चा करताना
               
     संध्याकाळ झाली. चहाची वेळा झाली. आमचा चहा तयार होत असतानाच काही परिक्रमावासी आपले पेले घेऊन हजर झाले. आमच्या बरोबरच त्यांचे पण चहापान झाले. बरे वाटले. नंतर सर्व परिक्रमावासी नर्मदाष्टक व आरती म्हणू लागले. सर्व वातावरण कसे प्रसन्न झाल्यासारखे वाटत होते.             

मैय्याची आरती
                            
     रात्रीचे जेवण झाले. थोड्या पायी परिक्रमावासियांना पण आमच्या बरोबर जेवायला बोलावले. नंतर जरा आराम केला. रात्री १ वाजता समुद्राला भरती आल्यावर आखातात बोटी येणार होत्या, तेव्हा आम्हाला तिथे जायचे होते. वाळूतून साधारणपणे दीड कि.मी. चालत जायचे होते. काही उत्साही लोकांनी संध्याकाळीच  मार्ग बघून ठेवला होता. गर्दी इतकी होती की आपला ग्रुप सोडायचा नाही. अमास्येची रात्र होती. सर्वदूर काळोख. वर स्वच्छ चांदणे, जे आपल्याला शहरात कधीच बघायला मिळणार नाही. तिथे गेल्यावर एक दीड तास वाट बघून शेवटी ३ वाजता आम्ही बोटीत बसलो. साधारण ३०/३५ जण बसू शकतील अश्या ८ बोटी होत्या. जर त्यांत नंबर नाही लागला तर तुम्हाला  दुसऱ्या दिवशी पुढच्या भरती व बोटींची वाट बघत थांबावे लागणार. आम्हाला आता समुद्रातून साठ कि.मी.चा प्रवास करायचा होता. लाटा उंच उसळत होत्या. बोट खूपच हेलकावे घेत होती. आम्ही कधीकधी लाटांमुळे भिजत पण होतो. मैय्याचे नाव घ्यायचे व प्रवासाचा आनंद लुटायचा. खूप थरारक अनुभव होता.
  
 बोटीचा थरारक प्रवास
                       
     जिथे नर्मदामाई सागरात मिळते त्या ठिकाणी पोहचल्यावर तिला ओटी व समुद्राला नारळ-दक्षिणा अर्पण केली व समुद्राला शांत होण्याची प्रार्थना केली. वरचे चांदणे बघत, लाटांचा अनुभव घेत हा ३ तासांचा समुद्रप्रवास सहज पार झाला व सकाळी ६ वाजता आम्ही मिठीतलाईला किनाऱ्यावर पोहचलो. आकाशात खूप सुंदर उषेची लाली बघितली. आणि मैय्याला, समुद्राला मनापासून धन्यवाद देत खाली उतरलो तेव्हा सर्वांचे चेहरे आनंदाने फुलले होते. आता माती-वाळू यांचा चिखल तुडवत अर्धा-पाऊण कि.मी. चालायचे होते. पावले ओल्या वाळूत रुतत होती. पण चेहऱ्यावर खूप समाधान व आनंद होता. आता बसमध्ये बसून नारेश्वरला जायचे होते.
   
मिठीतलाई उषेची लाली
                    
मिठीतलाई, बोटीतून उतरल्यावरचे विलोभनीय दृष्य

वर्षा संगमनेरकर 

     
            

No comments:

Post a Comment