I श्री
गणेशाय नमः I
मार्कंडेय
ऋषी नर्मदेच्या काठावरील तीर्थांची महती युधिष्ठीर राजाला सांगताना म्हणतात,
"हे राजन, नर्मदा-सागर संगमापासून अमरकंटक पर्वतापर्यंत दोन्ही तीरांवर दहा
करोड तीर्थे आहेत. एवढेच नाही तर एका तीर्थापासून दुसऱ्या तीर्थापर्यंत जाताना,
दोन तीर्थांमध्ये करोडो ऋषिगण अनेक वर्षांपासून निवास व तप करीत आहेत. हे सर्व ध्यानपरायण
व अग्निहोत्री विद्वान आहेत. जो मनुष्य नर्मदा नदीचे हे महात्म्य पठण करतो त्यावर
नर्मदामैय्या सदैव प्रसन्न राहते."
तर महेश्वरला
दुसऱ्या दिवशी, २१ डिसेम्बरला सकाळी उठून नेहमी प्रमाणे आन्हिक उरकून नदीवर आलो.
सकाळचा सूर्योदय आणि नर्मदामाईच्या पात्रात पडलेले विहंगम दृश्य. नर्मदामाईचा
सुंदर घाट पाहून मन भरून आले. हा घाट व आसपासचा परिसर म्हणजे वास्तुशास्त्राचा एक
सुंदर नमुना आहे. या ठिकाणी देवी अहिल्याबाई होळकरांनी साधारणपणे ३० वर्षं राज्य
केले. त्या एक उत्तम राज्यकर्त्या होत्या. 'प्रजा ही आपली संतती आहे' असे समजणारी
एक राणी. प्रजेच्या हिताकरता, सर्व सुखसोई करणारी, दातृत्वाचा अगदी आदर्श असणारी
राणी. आजच्या राज्यकर्त्यांनी पण जिचे अनुकरण करावे अशी राणी. मुसलमान शासन कर्त्यांनी
विध्वंस केलेल्या अनेक देवळांचा अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला. अगदी वाराणसीच्या
काशीविश्वेश्वराच्या मंदिरापासून... त्यांनी
अनेक मंदिरे, तलाव, निरनिराळ्या नद्यांवर सुंदर घाट बांधले. हे सर्व करत असताना त्यांनी
स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन व त्यांच्या कलेला वाव दिला.
|
नर्मदामाईच्या पात्रात सकाळी दिसणारे एक विलोभनीय दृष्य |
|
देवी अहिल्याबाई होळकर |
|
महेश्वर घाट |
|
नर्मदा पूजा |
|
मंदिरातल्या भिंतीवरची अप्रतिम कलाकुसर |
हे सर्व आपण महेश्वरला बघू शकतो. नर्मदेच्या याच
तीरावर देवी अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा आहे. अहिल्याबाई स्वतः धर्मपरायण
होत्या. त्यामुळे त्यांनी या राजवाड्यातच शिवाचे एक सुंदर मंदिर बांधले. त्यावरील
अप्रतिम नक्षीकाम पाहून आपण थक्क होतो. तिथेच त्यांचे एक पूजाघर पण आहे. तिथे १०१
शिवलिंगे स्थापन केलेली आहेत. व श्रीकृष्णासाठी एक सोन्याचा पाळणापण आहे. तसेच तिथे राजराजेश्वराचे एक मंदिर आहे. या
मंदिरात गेल्या अनेक शतकांपासून (५०० वर्षांपेक्षा जास्त) ११ नंदादीप अखंड जळत
असतात.
|
शिवाचे मंदिर |
अहिल्याबाईंचा मृत्यू याच राजवाड्यात झाला व
त्यांचा अग्निसंस्कार याच घाटावर झाला. त्यांच्या मुलाच्या व सुनेच्या छत्र्या पण
या घाटावर आहेत.
|
देवी अहिल्याबाई होळकरांचा राजवाडा |
नर्मदामाईच्या अथांग पात्रापलीकडे दुसऱ्या
किनाऱ्यावर शालिवाहन मंदिर दिसते.
आता
आम्ही इथून दुपारचे जेवण करून पुढे निघालो. इथून साधारणपणे परिक्रमावासी मंडलेश्वरला
जातात. पण आमच्या ग्रुपमधील काही लोकांनी मंडलेश्वरला न जाता उज्जैनला
जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. कारण १२ ज्योतिर्लिंगामधील एक ज्योतिर्लिंग श्री
महांकालेश्वर तिथे आहे. त्यामुळे आम्ही उज्जैनला गेलो. श्री महांकालेश्वराचे
दर्शन त्या रात्री व दुसऱ्या दिवशी सकाळी पण झाले. आम्ही जिथे मुक्कामाला होतो
तिथेच मागे क्षिप्रा नदी होती. परंतु नर्मदामैय्या नसल्यामुळे अस्वस्थ वाटत होते.
उज्जैनला आम्हाला बाटलीत भरून आणलेल्या नर्मदामाईचीच पूजा करावी लागली.
दुपारी
जेवण करून आम्ही पुढच्या मुक्कामी, म्हणजे नेमावरला (२२ डिसेंबर) निघालो.
इथे मैय्याचे नाभिस्थान आहे. दिवसभराचा प्रवास करून जाट धर्मशाळेत उतरलो.
रात्री जेवण झाल्यावर तेथील व्यवस्थापक श्री. महेंद्रमहाराज यांनी सत्संग घेतला.
त्यांनी आम्हाला नर्मदा परिक्रमेबद्दल माहिती सांगितली. मार्कंडेय ऋषींनी २७
वर्षांत परिक्रमा कशी पूर्ण केली? त्यांनी नर्मदेला मिळणाऱ्या सर्व उपनद्या पण न
ओलांडता, परिक्रमा करीतच आपली नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. या काळात त्यांनी नर्मदातीरावरील
असंख्य तीर्थक्षेत्रे शोधून काढली व त्यांची महती पण गोळा केली. पुढे त्यांनी युधिष्ठिराला
नर्मदा महात्म्य सांगताना याबद्दल सर्व सांगितले. महाराजांनी महती सांगताना हेही
सांगितले की, "अमरकंटकहून पण परिक्रमा दक्षिण तटावरून सुरु करतात. पण शिवलिंगाला
आपण जशी प्रदक्षिणा करतो तशीच समुद्र पार न करता परत मागे अमरकंटकला येवून
उत्तरतटाहून समुद्रापर्यंत जायचे. नंतर मागे फिरून पुन्हा अमरकंटकला यायचे. अशीपण
नर्मदेची परिक्रमा करता येते. नर्मदा नदीत स्नान, दान, तर्पण, श्राद्ध केल्याने
पितर तृप्त तर होतातच पण सर्व पापांतूनपण मुक्त होतात. आणि हजारो वर्षे शिवलोकात निवास
करतात. "
आम्हालापण
मैय्याचा वियोग झाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी, २३ डिसेंबरला सकाळी लवकर उठून मैय्याला भेटायला निघालो. इथे नाभिस्थान'
असल्यामुळे मैय्याकरता ओटीचे सामान, कढईचा प्रसाद व पूजा समान घेऊन आम्ही गेलो.
स्वच्छ, पवित्र, खळखळणाऱ्या नर्मादामाईला बघून मन प्रसन्न झाले.
|
नेमावर मैय्याचे नाभिस्थान |
बोटीने
पात्रात मध्यापर्यंत जाता येत होते. तिथे नर्मदामातेचेमंदिर आहे. पण आम्ही
परिक्रमेत असल्यामुळे तिथे नाही जाऊ शकलो. काठावरच नेहमी प्रमाणे स्नान करून पूजा केली. नर्मदाष्टक म्हटले व आरती केली. ध्यान
केल्यावर मला असा साक्षात्कार झाला की मैय्याच स्त्रीच्या रूपात पाण्यातून बाहेर
येत आहे. आम्ही तिला बसवून पाद्यपूजा केली, ओटी भरली व कढईचा(शिऱ्याचा) नैवेद्य,
दक्षिणा दिली. इतर कुमारिकांना पण प्रसाद व दक्षिणा दिली. खूप छान अनुभूती होती ती.
|
नेमावर घाट |
"दोन्ही
तटावरील लोकांची पापे नष्ट करणारी, देवताना, ऋषिमुनींना, आणि मानवांना वंदनीय
असणारी हे माते, आमची पापकर्मे नष्ट करो. संपूर्ण
वसुंधरेला आपल्या पवित्र जलानी पावन करणारी रेवा सर्व मनुषांनातू वंदनीय आहेस." अशी
प्रार्थना करून आम्ही श्री सिद्धेश्वराच्या मंदिराकडे निघालो.
|
श्री सिद्धेश्वर मंदिर |
हे मंदिर नर्मदेच्या काठावरच एका उंच डोंगरावर
आहे. खूप पुरातन असे शिवाचे हे मंदिर
कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.
|
नर्मदेच्या तटावरील डोंगर |
शिवाचे दर्शन घेऊन व परिसराचा आनंद घेतला. वरून
मैय्याचे विलोभनीय असे दृष्य तिच्या परत परत प्रेमात पाडत होते.
|
मंदिराकडे जाण्याचा मार्ग |
पण आम्हाला पुढच्या प्रवासाला निघायचे होते. त्यामुळे परत मुक्कामाला
धर्मशाळेत परतलो. जेवण करून पुढील प्रवासाला निघालो.
No comments:
Post a Comment