संस्कृत भाषेत बडबडगाणी

भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या बावीस अधिकृत भाषा आणि त्यांच्या शेकडो उपभाषा यांच्या मुळाशी असणारी; भारतीय संस्कृतीची ओळख (identity) म्हणून सांगता येईल अशी कुठली एक भाषा आहे का हो? असा प्रश्न जर कोणी आपल्याला विचारला तर आपल्याला चटकन संस्कृत भाषाच आठवेल.

पूर्वीच्या काळी रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या भाषांना सुसंस्कृत (refine) करून संस्कृत भाषा बनवली गेली की रोजच्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या संस्कृत भाषेतच बदल होत होत हल्लीच्या भाषा बनल्या? हा वादाचा मुद्दा आपण बाजूला ठेवू. खरा प्रश्न असा आहे की एक व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीने आजच्या काळात जे महत्त्व मिळवलं आहे तितकंच महत्त्व जिला होतं ती सुंदर, समृद्ध संस्कृत भाषा आज शाळांमध्ये फक्त scoring आहे म्हणून शिकली-शिकवली जाते आणि व्यवहारामध्ये म्हणाल तर फक्त धार्मिक कार्यक्रमांपुरती वापरली जाते. असं का बरं झालं आहे?

खरं म्हणजे संस्कृत भाषेत कथा, काव्यं, नाटकं आणि तत्त्वज्ञानपर ग्रंथांचा मोठा खजिना आहे. शिवाय संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पशास्त्र यासारख्या कलांचा विचार करणारे; गणित, औषधविज्ञान, रसायनशास्त्र, धातुशास्त्र, खगोलशास्त्र अशा विज्ञानाच्या अनेक शाखांमधील संकल्पनांचा विचार करणारे हजारो ग्रंथ या भाषेत आहेत. संस्कृत मध्ये असणारी स्वर, व्यंजनं यांची शिस्तबद्ध मांडणी, वाक्यरचनेचे व्यवस्थित (well-structured) स्वरूप याचा संगणक शास्त्राला कसा उपयोग आहे हा एका स्वतंत्र लेखाचाच विषय होईल.

पण संस्कृत भाषा व्यवहारातून कमी कमी होत नाहीशीच झाली तर आपला हा मोठा वैचारिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक ठेवा आपल्या पुढच्या पिढ्यांना कसा मिळणार? पालक म्हणून आपण मुलांसाठी वेगवेगळ्या आर्थिक गुंतवणूका (investments) करतो, घरं बांधतो, जमिनी घेऊन ठेवतो, एकूणच त्यांचं आयुष्य अधिकाधिक सुखकर कसं होईल याची काळजी घेतो. पण आपल्या वाडवडिलांकडून वारसाहक्काने आपल्यापर्यंत आलेलं हे जे ज्ञानधन आहे ते आपल्या मुलांपर्यंत कसं पोचणार?

एक आई म्हणून मी जेव्हा या गोष्टीचा विचार करायला लागले तेव्हा एका आगळ्यावेगळ्या प्रकल्पाची कल्पना मला सुचली. मुलांसाठी संस्कृतमधे बडबडगाणी लिहिण्याचा एक छोटा प्रयत्न मी केला. मुलांना संस्कृत भाषेतील वर्णमाला, अंक, तसेच प्राण्यांची, पक्ष्यांची, रंगांची, वाहनांची नावं माहिती व्हावीत, ती नावं त्यांना पाठ करावी लागता सहजपणे गुणगुणत लक्षात राहावीत, या निमित्ताने संस्कृत भाषा त्यांच्या कानांवर पडावी आणि ओठांवर खेळावी हा उद्देशाने मी ही गाणी लिहिली.

या गाण्यांना जर सोप्या पण सुंदर चाली दिल्या आणि ती animate केली तर मुलांना जास्त आवडतील या विचाराने या गाण्यांचे animated videos बनवावेत आणि YouYube च्या माध्यमातून मुलांपर्यंत पोचवावेत असा माझा प्रयत्न आहे. या गाण्यांच्या चाली पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे शिष्य, युवा कलाकार श्री. अभिषेक काळे (सांगली) यांनी लावल्या आहेत. या गाण्यांचे संगीत संयोजन, ध्वनिमुद्रण, animation हे सर्वच काम सांगलीसारख्या छोट्या गावात चालू आहे हे विशेष.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १५ गाणी बनवायची ठरवली आहेत. आतापर्यंत गाणी www.youtube.com/c/vedika या YouTube channel वर प्रकाशित झाली असून पुढील काम चालू आहे

पुढील गाणी बनवण्यासाठी https://milaap.org/vedika या crowdfunding platform वरून निधीसंकलन चालू आहे. आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला तर आपणही या प्रकल्पाला जरूर साहाय्य करावे ही विनंती.

-प्रज्ञा जेरे-अंजळ


No comments:

Post a Comment