"चूल आणि मूल is so happening"


“कमला काकी, किती हा उशीर? तुम्हाला सांगितले होते ना, आज लवकर या, आज मला लवकर ऑफिसला जायचे आहे...". कमला काकी घरात शिरताच मी त्यांना बोलत सुटले. त्यांच्यासाठी हा नेहेमीचाच एक डायलॉग होता. त्या काहीही न बोलताच सिंकजवळ गेल्या आणि हात धुवत म्हणाल्या, "मलाबी दहा घरची कामं असत्यात, तुमची लगीनघाई नेहेमीचीच असतीकरते कि चटचट." पोहे भिजवलेलेच होते. त्यांनी अर्ध्यापाऊण तासात सगळे तयार केले आणि पुढच्या कामाला गेल्या. मी ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले. टेबलवर बसून कसेबसे पोह्याचे चार बोकणे भरले. टेबलवरचा डबा उचलला आणि घराबाहेर पडले.

दोनचार ट्रॅफिक सिग्नल पार करत ऑफिसला पोहचले. काही मिनिटांतच मीटिंग सुरू झाली. माझे कामाचे स्टेटस प्रेझेंट केले. त्यानंतर कोण काय बोलत होते ह्याकडे माझे लक्ष लागत नव्हते. नुसताच बोलण्याचा गोंगाट होत आहे असे वाटत होते. मीटिंग झाल्यावर मला माझ्या चिमुकलीची  फी भरण्यासाठी तिच्या शाळेत जायचे होते. गेल्या आठवडयापासून मी ते काम कळत-नकळतपणे टाळत होते. मीटिंग झाल्यावर माझी कार शाळेच्या दिशेने भरधाव सुटली. तिथे गेल्यावर लक्षात आले की आपण शाळेचे आयकार्ड आणलेलेच नाही. खूप विनंती करूनही गार्ड आत जाऊ देत नव्हता. स्वतःचा खूप राग आला आणि चीडसुद्धा. तशाच हिरमुसल्या पावलांनी ऑफिसला परतले. मन खट्टू झाले. आपण कशासाठी काय करतो आहे हेच कळेनासे झाले. रक्ताचं पाणी करून जी नोकरी मिळवली होती तीच नोकरी आता मला जाच वाटत होती. शांत बसून एक कप चहा पिणेसुद्धा माझ्यासाठी एक दुर्मिळ आनंद झाला होता. मनात काहीतरी कालवाकालव सुरू होती आणि तशीच घरात शिरले. चिमुकलीला बघून एकदम सगळा थकवा निघून गेला. दहा मिनिटे तिच्याशी गप्पागोष्टी केल्यावर तिची खेळण्याची वेळ झाली म्हणून ती अपार्टमेंटच्या पार्कमधे खेळायला गेली आणि जाताना आमटी भात कर म्हणून सांगून गेली. तोच बेल वाजली. कमला काकी पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायला आल्या होत्या. त्यांना आमटी भात करायला सांगितला तेव्हा त्या म्हणाल्या, “तांदूळ संपले आहेत.” दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मला तांदूळ आणायला सांगितले होते जे मी विसरलेले होते. त्यानंतर त्यांना काय बनवायला सांगावे हे विचार करण्याचीसुद्धा शक्ती माझ्याजवळ उरली नव्हती. काहीही बनवायला सांगत नाही हे बघून कमला काकींनी फ्रीज उघडले आणि त्यांना सोपे वाटेल ते करून त्या निघून गेल्या. मला खुर्चीतच झोप लागली. जाग आली त्या वेळी कमला काकी निघून गेलेल्या होत्या.

चिमुकली खेळून आलेली होती. दिवा लावण्याची वेळ केव्हाच निघून गेली होती. आमटी-भात खाण्यासाठी म्हणून माझी चिमुकली टेबलवर जाऊन बसली. पण आमटी-भात केलेला नाही हे सांगताना माझ्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्या दिवशी रात्री मला नीट झोप लागली नाही. जीवन असेच कित्येक दिवस, वर्षं सुरू होते. नोकरी सोडून द्यावी का असा एक विचार मनात डोकावून गेला. पण इंजिनीयर होऊन घरात बसायचे का? सगळे काय म्हणतील? ह्या विचारांच्या काहूरने तो प्रश्न मागे पडला.

पुन्हा काही दिवस गेल्यावर ह्या प्रश्नाने डोके वर काढले. हळूहळू माझ्या मनाचा कल नोकरी सोडण्याकडे होत होता. जीवनात ज्या गोष्टींमधे आपण जीव गुंतवतो ती गोष्ट त्रासदायक झाली तरी माणूस तिला सोडत नाही. पण माझ्या बाबतीत ह्या वेळी काहीतरी वेगळे आणि छान घडले होते. ते म्हणजे "नोकरी सोडावी की नाही" ही द्विधा मनःस्थिती संपलेली होती. एक दिवस त्याचे रूपांतर निर्णयात झाले. रेझिगनेशन लेटर तयार झाले. ते वाचता वाचता खरे तर मला दुःख व्हायला हवे, पण मी मात्र एका वेगळ्याच आनंदात होती. ऑफिसमधील मैत्रिणींना कळल्यावर त्या म्हणाल्या, घरी बसून तू करणार तरी काय? त्यांच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. कारण माझ्या मनाची अवस्था त्यांना कळेलच असे नव्हते. मनात म्हटले, चार पैसे कमी मिळतील, ब्रँडेड चपला-जोडे, कपडे खरेदी करू शकणार नाही, वाटेल तसा पैसा उधळू शकणार नाही. पण मला माझे जीवन घडवण्यासाठी ही किंमत फार क्षुल्लक वाटत होती.
ऑफिसचा शेवटचा दिवस उजाडला. आनंदाने सगळ्यांचा निरोप घेतला. पार्किंग मधून कार बाहेर काढली आणि ऑफिसच्या पार्किंगला कायमचा रामराम ठोकला. कित्येक दिवसांत मला इतका आनंद झाला नव्हता. डोक्यावरचे खूप मोठ्ठे ओझे खाली उतरले असे वाटत होते. जे ट्रॅफिक मला रोज त्रासदायक वाटत होते ते कधी पार केले कळलेसुद्धा नाही. आज लवकर घरी आल्यामुळे चिमुकलीशी मानसोक्त खेळता आले. तिच्या खेळण्याची वेळ झाली म्हणून ती खाली निघून गेली. कमला काकी आत शिरत होत्या तितक्यात त्यांना दाराजवळच थांबवले आणि आज मी स्वयंपाक करणार म्हणून त्यांना आल्या पावली परत पाठवले. अचानक सुट्टी मिळाल्याने त्या खुश होऊन गेल्या. मी हातपाय धुवून दिवा-उदबत्ती लावली. सर्व घरात मंद दिवे लावले. चंदनाच्या उदबत्तीचा सुगंध सर्व घरभर पसरला. मी किचन मधे शिरले. "किती आनंदी आनंद ह्या झोपडीत माझ्या" हे भक्तिगीत ऐकत मी आमटी-भात शिजवला. खूप आनंद वाटला. 

माझ्या किचनमधेच इतका आनंद भरलेला होता हे मला त्या दिवशी अनुभवायला मिळाले. सर्व स्त्रियांना चूल आणि मूल ह्या गोष्टीचा जाच का वाटतो हे मला कळलेच नाही. Actually it is so happening. गरज आहे ती फक्त डोळे उघडे ठेऊन बघण्याची. 


धनश्री कुलकर्णी 


No comments:

Post a Comment