lश्री गणेशाय नमःl
विश्वातील सरस्वती, गंगा, नर्मदा
ह्या सर्वच नद्या जीवांना शुद्ध करतात परंतु त्यांच्यामध्येही नर्मदा ही परमशक्तीरूप
आहे. कारण नर्मदेच्या जलामधील पाषाणसुद्धा पूजिलेअसता ते जीवांना वांछित फळ प्रदान
करतात. नर्मदेच्या जलाच्या आश्रयाने शिळेमध्ये
महान शिवत्व स्फुरण पावत अशी ही विशेष गोष्ट अन्य नद्याच्यापेक्षा नर्मदेतच आहे.
२३ डिसेंबर सकाळी नेमावारला दर्शन
झाल्यावर उदापुरकडे प्रस्थान केले. जातांना सकलनपुर इथे पहाडावर
श्रीविजयादेवीचे मंदिर आहे. रोपवे ने वर गेलो. जातांना खालचे विहंगम दृष्य दिसत
होते. इथे राजगिरा खूप पिकतो म्हणून देवीला राजगिऱ्याचे लाडू प्रसाद देण्याची
प्रथा आहे.
सकलनपुर श्रीविजयादेवीचे मंदिर |
नर्मदामाई |
२४ डिसेंबर. आज बर्मन (ब्राह्मण) घाटावर थांबलो. दुसऱ्या तीरावर महाराजपुर
दिसत होते. इथे पण छान घाट घाट बांधला आहे. वरती रामाचे, कृष्णाचे व इतर अनेक
मंदिरे आहेत.
नर्मदामैय्या |
इथुन पुढे गेल्यावर रस्त्यात एक शेत लागले. छान हरबरा लागला होता. मग काय
तिथेच वनभोजनाकरता थांबलो. आपल्या सारख्या शहरी माणसांना हा अनुभव नविन होता. खूप
छान वाटले
वनभोजन |
गौरी घाट |
पुढे आम्ही जबलपुर करता निघालो. साधारण ५ वाजता भेडाघाटला होतो. नर्मदामाई
इथे सहस्त्र धारांनी वरून खाली धबधब्याच्या रूपांत वाहते. असं म्हणतात की हे दृष्य
चंद्राच्या प्रकाशांत खूपच सुंदर दिसते. आम्ही मात्र परिक्रमावासी असल्यामुळे ते
बघायला जाऊ शकत नव्हतो. आम्ही आता जबलपुरला पोहचलो. नाताळाची गर्दी असल्यामुळे
मुक्कामासाठी जागा मिळत नव्हती. शेवटी २ तास जबलपुरमध्ये बरेच फिरल्यावर गौरी
घाटाजवळ एका कार्यालयांत आमची सोय झाली. खूप दमलो होतो. थंडी पण खूप होती. गरमागरम
जेवण करून मस्त ताणून दिली. सकाळी (२५ डिसेंबरला) उठून स्नानाला गौरी घाटावर गेलो.
इथे नर्मदेचे पात्र खूप मोठे आहे व दोन्ही किनाऱ्यावर मिळून साडीला साडी जोडून
नर्मदामैय्याला बांधली होती.
इथे पण विविध पक्षी दिसले. नर्मदा कधीही कोणत्याही काळी दूषित होत नाही.
मनुष्यांना अभय देणारी व कृपा करणारी, महापुण्यतमा नदी आहे ही. तिच्या दोन्ही बाजू
मंदार, कल्पवृक्ष व कमलपुष्पांनी वेष्टित
आहे. म्हणूनच तिला मंदाकिनी पण संबोधले आहे. आता अमरकंटक जवळ होत गेल्याने
मैय्याचे पात्र छोटे होत जाते. आता उगमाकडे जायचे होते. ओढ व उत्सुकता तर होतीच.
आम्ही तर सर्वजण नर्मदामाईच्या प्रेमातच पडलो होतो.
सूर्योदय |
जोगी टिकीयाला दुपारचे जेवण करून अनुपनगर मार्गे आम्ही साधारपणे संध्याकाळी अमरकंटकला
पोहचलो. थंडी बरीच होती (८० C). तरीपण जेवायला वेळ असल्यामुळे तिथे जवळच असलेले
कल्याण आश्रमाचे मंदिर पाहयला गेलो. कल्याणस्वामीनी इथे नर्मदेच्या किनाऱ्यावरील
एका झाडाखाली ध्यान करीत असत. तिथेच हा आश्रम बांधला आहे. साधारणपणे ९ वर्षांपासुन
ते १२ वर्षांपर्यंतचे आदिवासी मुले इथे वेद शिकायला येतात. त्यांची शिक्षण, भोजन व
राहण्याची इथे मोफत सोय पण केलेली आहे. मंदिर सुरेख, स्वच्छ आणि शांत होते.
पुष्कर तीर्थ उत्तर तट |
सकाळीच (२६ डिसेंबर) उठून पुष्कर तीर्थावर जावून आंघोळ व पूजा केली. आज
आम्हाला मैय्याची ओटी भरायची होती. त्याचप्रमाणे उत्तर तटावरून दक्षिण तटावर जायचे
होते. तेही नर्मदामैय्याला न ओलांडता. नर्मदामाई इथे उगम पावते. पण मध्येच ती
गुप्त होऊन जमिनीखालून वाहते.
नर्मदामाईचे उगमस्थान |
अशी आख्यायिका आहे की मैय्या तिच्या मैत्रिणीबरोबर (गुलबकावली) लपून माईच्या
बगिच्यांत खेळायला जायची. मध्ये जमीन दिसत असली तरी खालून नर्मदा वाहते म्हणून
आम्हाला माईच्या बगिच्यांत जाण्यासाठी गोल फिरून जावे लागले. इथे आंबा, पेरू, अशोक
असे अनेक मोठेमोठे वृक्ष दिसले. मुख्य म्हणजे
गुलबकावलीचे बगीचे आहेत. आधी ही औषधी वनस्पती फक्त इथेच उगवायची. हिच्या फुलांचा अर्क डोळ्यांत टाकला तर
डोळ्यांचे सर्व आजार नाहीशे होतात. अगदी मोतीबिंदू सुद्धा. या शिवाय या जंगलांत अनेक औषधी वनस्पती आहेत.
त्या विकायलापण असतात.
माईचा बगीचा |
इथे एक आमकुंड आहे. त्यात आंघोळ करतात. दुसरे नर्मदा कुंड. इथेच पूजा व संकल्प
केला जातो. आम्ही पण पूजा, संकल्प व कढईचा नैवेद्य (शिरा) केला. कुमारिकांना दान,
दक्षिणा दिली. इथून आता आम्ही दक्षिण तटावर आलो. इथे नर्मदा मातेचे उद्गम स्थान आहे.
मंदिरातच सीमारेषा आखली आहे. उत्तर तट व दक्षिण तट. परीक्रमावासियांनी परत दुसऱ्या
बाजूला जाऊ नये म्हणून.
नर्मदा कुंड |
इथे समोरच अत्यंत प्राचीन असे शिव मंदिर पण आहे. यज्ञशाळा पण आहे. अशी ही जीवनदायिनी
नर्मदामाई पृथ्वीवर आली व आपले जीवन सुजलाम सुफलाम केले म्हणून तिला मनापासून
धन्यवाद दिले. या परिसरातच मार्कंडे ऋषींनी युधिष्ठीर राजाला नर्मदा महात्म्य
सांगितले. आम्ही हे उद्गमकुंड, भद्रकुंड बघून सोनमुढी मंदिरांत आलो. इथे सोन आणि
भद्रा यांचा संगम होतो. आणि ही नदी पुढे २०० मीटरवर साधारणपणे ३०० फुट खोल सोनभद्रा
प्रपात नावांनी खाली कोसळते. व तिचे नांव सोनभद्रा होते. अशी आख्यायिका आहे की
नर्मदा आणि शोण यांचा विवाह ठरला होता. नर्मदेच्या एका दासीनी कपट करून शोणशी
विवाह केला. ही गोष्ट नर्मदेला समजल्यावर ती निस्संग राहिली व सदैव कुमारिकाच राहिली.
पुढे ती पुष्कर या स्थानी प्रगट झाली. ३३ कोटी तीर्थे तिथे नर्मदेचे दर्शनासाठी
आले व तिचे पवित्र मनोहारी रुप पाहून परत न जाता इथेच राहीले. त्यामुळे हे स्थान,
पुष्कर तीर्थ अतिशय पवित्र मानल्या जाते. इथे सर्व धार्मिक कार्य करता येतात. दाट
वनश्री असल्यामुळे इथे खूप शांत व पवित्र वाटते. इथे यंदा चितळे दाम्पत्य वास्तव्याला
होते. ते इथे पायी येणाऱ्या सर्व
श्री व सौ चितळेंच्या समवेत |
परिक्रमावासीयांची काळजी घेतात. त्या उभयतांनी स्वतः पायी परिक्रमा केली असल्यामुळे परिक्रमावासीयांच्या सर्व अडचणी
त्यांना माहिती आहेत. ते साधारण पाने ८ महिने तन, मन, धनानी सेवा देतात. त्यांचाशी
आमची मुलाखात झाली. उभयतां आता साठीच्या पुढे असून आजच्या काळांत ते आम्हाला
ऋषितुल्यच भासले. आता इथून पाय निघत नव्हता. पण मनाचा निश्चय केला की परत इथे
वास्तव्याला यायचेच. भोजन करून आपले समान
घेऊन परिक्रमेच्या शेवटाला मार्गस्थ झालो.
पुष्करतीर्थ दक्षिण तट |
-वर्षा संगमनेरकर
No comments:
Post a Comment