मोझाईक एक कला


'कला' ह्या शब्दाचा अचूक अर्थ देणे जरा अवघड आहे. एखाद्याला चित्रकलेची आवड असते तर एखाद्याला शिल्पकलेची. अशा अनेक प्रकारच्या कला आहेत. जे काही आपण मनोभावे करतो किंवा ज्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करतो, त्यातूनच कला निर्माण होते. कागदाचे तुकडे जोडून कोलाज  केले जाते, दगड तोडून किंवा तासून शिल्प तयार होते तसेच टाईल्सचे किंवा दगडांचे तुकडे करून ते पुन्हा आकर्षक रीत्या जोडून mosaic तयार होते.


मोझाईक कलेची सुरुवात मेसोपोटामिया इथे झाली आणि पुढे ग्रीक आणि रोमन राज्यात पसरली. ह्या कलेशी माझा संबंध शांघायमधे आला. तिथे माझ्या धाकट्या मुलीच्या शाळेत, आंतरराष्ट्रीय पालकांसाठी अनेक छंदवर्ग असत. कधी मांडरीन भाषा शिकायचे, कधी गाण्याचे, तर कधी पाककलेचे. त्याबद्दलची माहिती पालकांना वरचेवर दिली जात असे. २००८ साल होते. अशाच एका सर्क्युलरमधे मोझाईक क्लासची बातमी वाचली आणि माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. लहानपणी घरात मोझाईक टाईल्सची फरशी होती. त्यातून कला निर्माण करू शकतो ह्याचे कुतूहल वाटू लागले. झाले तर, ह्या क्लासला माझे नाव नोंदवून आले.

 आमच्या मोझाईक क्लासच्या शिक्षिका, लिओनी ब्राउन, एक पालकच होत्या. आॅस्ट्रेलियात ही कला शिकून त्यांनी खूप काही वस्तू बनविल्या होत्या.  त्या वस्तू बघून खूप उत्साह आला. त्यांनी आम्हाला एक गोल, लाकडी लेझी सुझन दिले. लेझी सुझन डायनिंग टेबलावर ठेवता येते. साधारण १५ इंच डायमीटरचे. जे अशा वस्तू करायला खूपच उपयुक्त साधन ठरते. आपण कसले डिझाईन करावे हा विचार मनात आला. माझे भारतीय मन जागृत झाले आणि मी वारली डिझाईन तयार करायचे ठरविले. लिओनीने काचेच्या टाईल्स कापायला शिकविले आणि टाईल्सचे रंग निवडून हळू हळू लेझी सुझनवर त्या टाईल्स चिकटवून डिझाईन तयार केले. क्लासला आलेल्या इतर पालकांच्या ओळखी झाल्या. कोणी आयरिश, कोणी ब्राझिलियन, कोणी फ्रेंच तर कोणी मलेशियन अशा मैत्रिणी झाल्या.

शेवटच्या दिवशी त्या टाईल्सवर ग्राउटींग केले. ग्राउटींगची पावडर तयार मिळते. त्यात पाणी मिसळून त्याचा टाईल्सवर थर लावायचा आणि नंतर ते मऊ फडक्याने,अलगद पुसून घ्याय्चे. बघता बघता टाईल्समधली रिकामी जागा ग्राऊटने भरली जाते आणि आपले डिझाईन सुंदर दिसू लागते. टाईल्स काचेच्या असल्याने त्या चमकतात. असे तयार होते मोझाईक .


 त्या नंतर मी मोझाईकच्या बर्याच वस्तू बनविल्या. लिओनीकडून खूप काही शिकायला मिळाले. मग २०११ साली मी मोझाईक कला शिकवायला सुरुवात केली. मी आता पर्यंत १२५ जणींना मोझाईक शिकविले. शांघायमधे मोझाईक तयार करायला लागणार्या सगळ्या वस्तू सहज मिळतात त्यामुळे काम खूप सोईस्कर होते.

माझ्या मोझाईक क्लासच्या शिक्षिकेचे ब्रीदवाक्य असे की जर घरात एखादी काचेची किंवा सिरॅमिकची वस्तू तुटली तर वाईट वाटून घ्यायच्या ऐवजी त्याचा उपयोग मोझाईक करता करावा.

-- सौ. वंदना ढेकणे



No comments:

Post a Comment