प्रवासवर्णन: आयुत्थया, थायलंड

Part 2
थायलंडला जाण्याची तिकिटं व आयुत्थया येथील हॉटेल बुकिंग इंटरनेटवरून केलं होतं. बँकॉकच्या हॉटेलचं बुकिंग व थायलंडमध्ये काय पाहायचं, कुठून कुठे जायचं हे ठरवणं बाकी होतं. मग सिंगापूरमध्ये असतानाच थायलंडमधील जागा, त्यांच्याबाबत प्रवाशांचे अभिप्राय, प्रवेशमूल्य, तिथे पोचण्याकरता वाहतूक व्यवस्था/पर्याय यांचा अदमास घेऊनच आम्ही थायलंडला जायला निघालो. 'व्हिसा-ऑन-अरायवल'करता विशिष्ट रक्कम पर्यटकांकडे असणं जरुरी असतं (दरडोई १०,००० बाथ). आमच्याकडे कमी रक्कम होती. बरोबरच्या भारतीय नागरिकाने मदत केली व आम्हाला व्हिसा मिळून गेला. बँकॉकच्या 'सुवर्णभूमी' या विमानतळावरून शहरात जाण्यासाठी विशेष मेट्रो लाईन आहे, त्याने माकासान स्टेशनला उतरून हुआ-लामफौंग या रेल्वे स्टेशनकडे वेगळ्या मेट्रो लाईनने गेलो.

माकासान स्टेशनवरून जाणारे रस्ते चार चाकी वाहनांनी गच्च भरले होते. त्याच्या मागे उंच उंच बिल्डिंगचा समूह दिसत होता. हवा कलकत्त्यासारखी गरम होती. हुआ-लामफौंग रेल्वे स्टेशनचा अंतर्भाग चेन्नईच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनसारखा वाटत होता. रेल्वे स्टेशनबाहेर गरीब-भिकारी-बेघर लोकही होते. आपण ज्याला डुक्कर-रिक्षा म्हणतो तशा 'टुक-टुक' होत्या. फ्लोरोसेंट जाकीट घालून व व्हेस्ट-पाऊच लावलेले बाईक-टॅक्सी ड्रायव्हर गिऱ्हाईक शोधत होते. या शहरात मेट्रोची एक वेगळी स्कायलाईन पण आहे व BRT बसेस पण उपलब्ध आहेत. शहराच्या जुन्या भागात कॅनॉलमधून वॉटर-टॅक्सी पण चालतात असं ऐकलं होतं. एवढे सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध असतानाही रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होतात हे दिसलं. या सर्व वाहतूक व्यवस्था वापरून बघायचं असं मनाशी ठरवलं.

हुआ-लामफौंग रेल्वे स्टेशनवर परदेशी प्रवाशांकरिता वेगळं वातानुकूलित तिकीट काउंटर होतं. तिथे लगेचच आयुत्थयाकडे जाण्यासाठी (२० बाथ इतक्या स्वस्त किमतीचं) रेल्वे तिकीट घेतलं व लवकरच आपल्या मुंबई लोकलसारखी रचना असलेल्या रेल्वेने आम्ही आयुत्थयाकडे निघालो. शहरातून बाहेर पडायलाच पाऊण तास लागला, त्या दरम्यान आधी दुतर्फा व नंतर एकातरी बाजूस उड्डाणपूल व मेट्रोचे ट्रॅक ब्रिजेस दिसत राहिले. मुंबईच्या लोकलमधून जाताना जशी गोरगरिबांची वस्ती रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूस दिसत राहते तशीच इथेही पाहायला मिळाली.

थायलंड हा देश त्याच्या सागवान लाकडासाठी प्रसिद्ध आहे. बँकॉक ते आयुत्थया या भागात मोठ्या प्रमाणात सागवानाची लागवड-जंगलं होती हे सांगूनही पटणार नाही, इतका हा भाग आता वृक्षविरहित दिसतो- अगदी दूरपर्यंत! आयुत्थयाला पोचलो तेव्हा संध्याकाळचे ८:३० झाले असावेत. पण रस्त्याला पूर्ण सामसूम होती. बहुतेक दुकानं पण बंद झाली होती. पुढच्या वास्तव्यात आम्हाला कळलं की हा लवकर झोपून लवकर उठणारा समाज आहे. येथील उष्ण हवामानाच्या दृष्टीने ते सयुक्तिक असल्याचं समजलं. जर ८ नंतर खरेदी करायची असेल तर येथे 'सेव्हन-ईलेव्हन' नावाची डिपार्टमेंटल स्टोअर्स सर्वत्र उपलब्ध आहेत.
थायलंड येथील धार्मिक-आधुनिक-सांस्कृतिक वैभव  
दुसऱ्या दिवशी सकाळी चालतच आजूबाजूला काय काय मिळतं असं पाहावं म्हणून नाश्ता करण्यास बाहेर पडलो. आम्ही ज्या नूडल्स पार्लरमध्ये बसलो तिथे समोरच एक भव्य प्रांगण व त्यात एक पुरातन भव्य मंदिर दिसत होतं. नाश्ता झाल्यावर रस्ता क्रॉस करून माहिती घेण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गेलो तर लॉटरीच लागली! हे मंदिर म्हणजे वर्ल्ड हेरिटेज झोनमधील एक मूल्यवान ठेवा होता व या ठिकाणापासून ५ ते १० मिनिटांच्या अंतरात अशीच महत्त्वपूर्ण ४ ठिकाणं असल्याचं कळलं. जाणीव झाली की आपण ज्या शहरात विशिष्ट पुरातन मंदिर अथवा राजवाडे यांच्या खाणाखुणा शोधतो आहोत, ते अख्खं शहरच एक म्युझियम आहे... ४१५ वर्षं जुन्या सयामची (थायलंडचं जुनं नाव) राजधानी असलेलं हे शहर १५ व १६ व्या शतकातील एक भव्य वसाहत होतं. येथीलच 'मोन' समाजाच्या लढवय्यांनी सत्ता काबीज करून 'चक्री' या राजवटीच्या नावानी राज्य करण्यास सुरुवात केली. १७६०च्या दरम्यान राजधानी बँकॉकला हलवली, तेव्हापासून इतर कोणतंही आक्रमण झालं नाही व आयुत्थयातील बहुतांश रचना, ठिकाणं, शहराचा आराखडा शाबूत राहिला व अजूनही पाहावयास मिळतो. याच चक्री राजवटीतील राजे आजतागायत अख्ख्या थायलंडवर राज्य करत आहेत. २०व्या शतकाच्या मध्यात गादीवर आलेला ९वा राजा म्हणजे राजा  भूमिबोल यांचे एकच महिना अगोदर देहावसान झाल्याने त्या राजाला श्रद्धांजली म्हणून सर्व लोकांकरिता अनेक म्युझियम्स आणि तत्सम ठिकाणी मोफत प्रवेश जाहीर करण्यात आला होता.


आम्ही सायकली भाड्याने घेऊन भटकंती करायचं ठरवलं. प्रथम 'व्हिजिटर सेंटर'ला गेलो. इथे एका मोठ्या दालनात एक कायमस्वरूपी प्रदर्शन मांडलं आहे. आयुत्थयाचा इतिहास, भूगोल, संस्कृती व येथील वैशिष्ट्य समजावून देणारं सचित्र प्रदर्शनयाशिवाय त्याच दालनात दृक्-श्राव्य माध्यमातून एक फिल्म बघण्याची पण उत्तम व्यवस्था होती. आम्हाला काय, कसं व का पाहायचं हे या प्रदर्शनात छान समजलं.

आयुत्थयाला एके काळी 'व्हेनिस ऑफ ईस्ट' मानलं जायचं. 'पा-साक' नदीच्या बेटावर वसलेलं हे ठिकाण अनेक कॅनाल्सनी जोडलेलं आहे. (सागाचे ओंडके वाहून आणणारी म्हणून तिचं नाव 'पा-साक'). आयुत्थया एकेकाळी नाव-होड्या व लांब पल्ल्याच्या व युद्धात वापरल्या जाणाऱ्या जहाजांच्या बांधणीसाठीपण प्रसिद्ध होतं. मोठे रुंद रस्ते, सुशोभित केलेले मीडिअन्स व त्यावर उभारलेले उंच-नक्षीदार दिव्यांचे खांब, चौकाचौकात रात्री विशेष प्रकाशयोजनेने उजळून जाणारे स्तूप व मंदिरं असं हे शहर दिमाखदार आहे. बहुतांश समाज हा बुद्धिस्ट आहे. बौद्ध धर्माचा प्रसार वेगवेगळ्या पंथांनी व मार्गांनी झाला. थायलंडमध्ये 'थिरुवाद' पंथी बौद्ध धर्म आला तो श्रीलंकेतून. म्हणून इथे स्तूपांची उपासना केली जाते. हे भव्य स्तूप वीटकामात बांधलेले आहेत व त्यावर माती-चुन्याचं लिंपण करून मग उत्तम कोरीव काम केलं आहे (याला स्थापत्यशास्त्रात/मूर्तिकलेत 'स्टुको वर्क' म्हणतात.) या स्टुको वर्कमध्ये रंगीत काचा व सिरॅमिकच्या टाईल्स लावून सुंदर नक्षीकाम केलेलं पाहायला मिळालं. आपल्याकडे जे दगडात कोरून नक्षीकाम केलं जातं त्याच तोडीचं काम स्टुको वर्कमध्ये पाहायला मिळतं; पण अर्थातच दगडाचे चिरे रचून उभारलेली मंदिरं जास्त टिकाऊ असतात. मुख्यत्वे विटांमध्ये बांधलेली असल्याने इथल्या रचना आता भग्न आहेत. मात्र ऐतिहासिक संशोधन विभागाने प्रत्येक ऐतिहासिक स्थळाच्या प्रवेशद्वारापाशी या वास्तूंच्या पुरातन काळात असतील अशा प्रमाणबद्ध प्रतिकृती काचेच्या पेट्यांमधून सर्वांना पाहण्यास ठेवल्या आहेत.

प्रत्यक्ष भग्नावशेष पाहून मग आम्ही एका राजवाड्याला भेट दिली. या राजवाड्यातील पुरातन वस्तू आता तिथेच संग्रहालय बनवून जतन करण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या काळातील व ठिकाणच्या बुद्धाच्या मूर्त्या येथे पाहायला मिळतात. बौद्ध धर्माच्या उपासनांमध्ये होत गेलेला बदल पहाता येतो. हिंदू संस्कृतीचा प्रभाव असलेल्या बौद्ध मूर्त्या पाहायला मिळाल्या. मागे शेषनाग असणारा बुद्ध, ऐरावतावर बसलेला बुद्ध, अनेक हातवाला 'अमिताभ बुद्ध' अशा मूर्त्या होत्या. बसलेल्या, उभ्या, अलंकारीत, ध्यानस्थ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या वेगवेगळ्या काळात इथे पुजल्या गेल्या. चक्री राजवटीच्या काळात, म्हणजे गेल्या २२५ वर्षांच्या काळात प्रामुख्याने उभ्या बुद्धाची एक मूर्ती विशेष प्रसिद्ध झाली. या मूर्तीला 'अभय देणारी' (fear dispelling) मुद्रा म्हटलं जातं. चेहऱ्यावर किंचित स्मित, अर्धोन्मीलित नेत्र, एक हात उचलून धीर देणारा, अभय देणारा हा बुद्ध नीट पाहिल्यास जाणवतं की जणू तो वादळात उभा ठाकलेला असून त्याची कफनी वाऱ्यावर लहरते आहे,  त्याने एक पाऊल उचललेलं असून तो आपल्या रक्षणार्थ येणारच आहे. मला ही मूर्ती विशेष आवडली.

सुरुवातीला मूर्तिपूजा नसणाऱ्या बौद्ध धर्मात खूप मोठ्या प्रमाणात मूर्तिपूजेचं स्तोम माजलेलं पाहून खरं तर वैषम्य वाटतं, परंतु सामान्य लोकांना एक श्रद्धास्थान किंवा प्रतिमा यांची गरज पडतेच असं इथे जाणवतं. येथील लोक एक छोटी बुद्धाची मूर्ती गळ्यात ताईत बनवून किंवा नुसती जवळ बाळगतात. हे ताईत एक पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा स्वरूपात दिले जातात. येथील कापडावरच्या, लाकडावरच्या, भित्तिचित्रांमधून, नक्षीकामात एक लवलवत्या ज्वाळांसारखं दिसणारं मोटिफ सर्वत्र वापरलेलं आढळतं. या मोटिफला क्रॅनोक (kranok) म्हटलं जातं. इथे थाई पेंटिंग्ज व भित्तिचित्रांची एक खास शैली दिसते. ज्यांनी केरळ अथवा तिबेटमधील भित्तिचित्रं पाहिली आहेत त्यांना या शैलीचं वेगळेपण जाणवू शकेल.


थायलंड - 'स्टुको वर्क' व 'क्रॅनॉक' नक्षीकाम

आयुत्थयाच्या सामान्य लोकांचा दैनंदिन व्यवहार व गरजेच्या वस्तू पाहण्यासाठी इथल्या मंडईला भेट दिली. ताज्या भाज्या, फुले यांचे स्थानिक प्रकार, ताजे व वाळवलेले नॉन-व्हेज पदार्थ हे बघत असताना एक तळलेल्या खमंग पण गोडसर भज्यांचा चिंच-शेंगदाण्याच्या चटणीबरोबर आस्वाद घेतला. छान कॉफी प्यायला मिळाली. कॉफीबरोबर नंतर पिण्यास म्हणून चहापत्तीचा हलका स्वाद लावलेलं गरम पाणी देतात. स्थानिक लोकं, त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धती न्याहाळायला मजा आली. धार्मिक वस्तूंच्या दुकानात अनेक हिंदू देवदेवतांच्या सुंदर रंगवलेल्या प्लास्टिक व प्लास्टर-ऑफ-पॅरिसच्या बाहुल्या दिसल्या. आपल्याकडे सर्रास दिसणारी बाळकृष्णासारखी बुद्धाची मूर्ती पण पाहायला मिळाली. असा २ दिवस स्थानिक आयुत्थयाचा पाहुणचार घेऊन आम्ही पुन्हा बँकॉककडे रेल्वेने रवाना झालो.

चांभाराला चपलाच दिसतात, त्याप्रमाणे बँकॉकला गेल्यावर माझी नजर मुख्यत्वे सार्वजनिक सोयीसुविधा व प्रशासनाच्या लक्षणांकडे जात होती. सार्वजनिक वाहतुकीच्या सरकारी व निमसरकारी ६ व्यवस्था असूनही बँकॉकमध्ये जागोजागी ट्राफिक जॅमची मोठी समस्या आहे. सिंगापूरसारख्या अत्यंत छोट्या राष्ट्रात लोकसंख्या भरपूर असूनही तेथे ट्राफिक जॅम नाहीत. वैयक्तिक वाहनांच्या संख्येवर जोपर्यंत कडक नियंत्रण नसते तोपर्यंत ट्राफिक जॅम व प्रदूषणाची समस्या कमी होणार नाही याची कल्पना आली. इथे सार्वजनिक सोयी आपल्याकडच्या उत्तम शहरांपेक्षा नक्कीच चांगल्या आहेत. जागोजागी टेलेफोन-बूथ कार्यरत आहेत. बसेसचं उत्तम जाळं विणलेलं आहे. कुठूनही कुठेही जाण्यास उत्तम मार्गदर्शन मिळेल असे सुंदर नकाशे येथे प्रत्येक बस-स्टॉपवर लावले आहेत. बँकॉकसारख्या उष्ण ठिकाणी प्रसाधनगृहात स्नानगृहांची व्यवस्था पण आहे व ती मोफत आहे. प्रसाधन गृहांमधून रेल्वेच्या डब्ब्यांसारखे पंखे पण बसवले आहेत. जागोजागी कचरापेट्या आहेत. पादचारी मार्गावर असलेल्या वृक्षांच्या पायथ्याशी लोखंडी जाळ्या लावल्या आहेत, जेणेकरून मुळाला पाणी मिळेल व ओबडधोबड उघड्या जमिनीवर साचणारी घाण येथे होणार नाही.

असेच फिरत फिरत, आम्ही चाटुचाक पार्क व मार्केट परिसरात पोहोचलो. आर्ट्स, क्राफ्ट्स व लाईफस्टाईल वस्तूंचे हे इतके मोठे मार्केट आहे की अख्खा दिवसदेखील हे मार्केट पाहायला पुरला नाही. भरपूर बर्फ घातलेली कोल्ड कॉफी इथे मिळते, त्याचा आस्वाद घेत आम्ही हे मार्केट फिरलो. या मार्केट शेजारीच Pet Market आहे. मासे-ससे-सरडे इथपासून समुद्री जीवांपासून, बंगाल कॅट, काकाकुवा व मगरीपर्यंत अनेक प्राणीपक्षी येथे  दिसतात.

आपल्याकडे जसं अंगणात तुळशी-वृंदावन असतं तसंच ठिकठिकाणी छोटेखानी पवित्रस्थळ असतं. या pet market च्या परिसरात असंच छान सजवलेलं मंदिर होतं. आम्ही राजवाडा पाहण्यासाठी गेलो. थायलंडच्या राजाचं नुकतंच देहावसान झाल्याने राजवाडा परिसरात काही विधी चालू असावेत. मोठी गर्दी लोटली होती. थायलंडचे नागरिक राजाला खूप मानतात. दुकानांतून-घरांमधून त्याचे व राजघराण्यातील लोकांचे फोटो लावलेले असतात. अगदी मंदिरातही बुद्धाच्या मूर्तीशेजारी पण राजाची मूर्ती पहायला मिळालीच, पण खरोखर संपूर्ण देश राजाच्या दुखवट्यात सामील होण्याकरता काळे कपडे घालून हिंडत होता. दुकानांमध्येही फॅशनचे पण काळेच कपडे प्रामुख्याने मिळत होते. सध्याच्या मिलिटरी गव्हर्नमेंटनी १ वर्षभराचा दुखवटा जाहीर केला आहे. अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. हा देश राजाचा दुखावटा श्रद्धेने पाळत असताना आम्हाला पाहायला मिळाला, असा माहौल अनुभवू शकलो ही आठवण कायम कोरलेली राहील. प्रत्येक नागरिकाच्या छातीवर लावलेल्या क्लिपमधला  थाई भाषेतला आकडा ९ लक्षात राहील; हा नऊ आकडा आहे चक्री राजवटीतल्या ९व्या राजाचा.


थायलंड - भारतीय संस्कृतीची छाप - अंगणातले 'थाई-वृंदावन' व मूर्त्या

जर दक्षिण आशियाई देशांमध्ये जाण्याचा विचार असेल तर थायलंड-सिंगापूर चुकवू नका. कष्टाळू लोकांनी स्वबळावर अवघ्या ३५-४० वर्षांत एक आदर्श राष्ट्र निर्माण केलं आहे- सिंगापूर! आणि पाश्चात्त्य राष्ट्रांना कधीही काबीज न करता आलेला स्वाभिमानी-समृद्ध संस्कृती असलेला असा आहेथायलंड. 

-- अनिरुद्ध अभ्यंकर

No comments:

Post a Comment