‘मेरे पिया गये रंगून, किया है वहांसे टेलीफून, तुम्हारी याद सताती है' ते ‘हॅल्लोsss मी बाबूराव बोलतोय’ - जवळ जवळ आपल्या स्वातंत्र्याइतकंच अंतर या दोन गाण्यांत आहे. अनेक पिढ्या या विविध माध्यमांच्या संक्रमणाच्या साक्षीदार आहेत. पूर्वी पोस्टात जाऊन तार करणारे किंवा फोन बुक करून तासनतास तिष्ठत बसणारे माझे पालक. त्यानंतर माझ्या काळात गावातल्या एकदोनच घरात असणारा टेलीफोन तसा सार्वजनिकच असायचा. मोठ्या मनाचा शेजारधर्म तिथपर्यंत जिवंत होता. यांचा नंबर जवळ जवळ गल्लीतल्या प्रत्येकाच्या डायरीत असायचा.
आमच्या घरामागे एक ऑईल मिल होती. मुंबईहून मला पुत्ररत्न झाल्याचा फोन या मिलमध्ये आला. मिलच्या आवाजामुळे त्यांनी खूप मोठ्या आवाजात हाका मारल्या आणि मी मागच्या पत्र्यावरून उडी ठोकून कबड्डीच्या पटात घुसावं तसा मिलमध्ये घुसलो. त्यांनी मारलेल्या हाका आणि माझे तारसप्तकात झालेले संभाषण साऱ्या गल्लीने ऐकले आणि आमचा खाजगी मामला एका क्षणात असा सर्वत्र पसरला.
हीच गोष्ट रेडिओची. अगदी ठरावीक घरात रेडिओ असायचा. रेडिओला तेव्हा परवाना लागायचा. खेडेगावांतून ग्रामपंचायतीत सार्वजनिक रेडिओ असायचा, तिथे जाऊन ग्रामस्थ रेडिओ ऐकायचे. त्या काळी आमच्याकडे रेडिओ होता. अनेक लोक बातम्या आणि कॉमेंट्री ऐकायला आमच्याकडे यायचे. हळूहळू या वॉल्व्हच्या रेडिओची जनरेशन जाऊन ट्रॅन्झिस्टर रेडिओ आले आणि मग अनेक घरांतून रेडिओचा आवाज येऊ लागला. बुधवारची बिनाका गीतमाला, तर रात्रीची दिवे मालवून ऐकलेली श्रुतिका संपूर्ण घराचा ताबा घ्यायची. रेडिओचा म्हणून एक संस्कार होत होता असा तो काळ...
आणि बघता बघता शहरातल्या एक दोन मातब्बर श्रीमंत घरांत कृष्ण-धवल दूरदर्शन संच आला. यांच्या घरी इतकी गर्दी की कित्येक दिवस या कुटुंबांना कौटुंबिक जीवन नव्हते. दिवसभर हा टीव्ही पहायला असंख्य लोक यायचे. दारेखिडक्या बंद करून त्यांच्या घरात दीडशे लोकांसोबत घामाघूम होऊन पाहिलेली क्रिकेटची मॅच मला आजही आठवते. पण या टीव्ही मालकांनी वैतागून कोणाला हाकलले किंवा मोठेपणाचा आव आणून कोणाचा अपमान केल्याचे मला आठवत नाही. जगण्याचा हा साधेपणा आणि जे आहे ते आपले आपणा सर्वांचे, ही भावना सर्वत्र जपली जात होती. प्रसार माध्यमे ही चैनीची वस्तू नसून ती आपल्याला सर्वदूर जोडणारी फक्त माध्यमे आहेत याच विशुद्ध हेतूने त्यांचा लाभ दिला-घेतला जात होता. कुटुंब आणि समाज यांची वेगळी व्याख्या करणारा तो काळ नव्हता. या दोन्ही संकल्पना एकमेकांत छान गुंतलेल्या होत्या. जेवताना कोणी उगवले तर त्याला जेवताय का वगैरे न विचारता हात धुवायला तांब्या देऊन पटकन जेवायला बसविणारी ही संस्कृती.
मुंबईला जाणाऱ्या शेजाऱ्याजवळ आपल्या नातलगाला निरोप किंवा अगदी अर्धं पोतं जोंधळे दिलेलेही मी पहिले आहेत. आणि तोही आनंदाने हे पार्सल घेऊन जायचा. हे सामाजिक भान एका वेगळ्या कौटुंबिकतेने जपले जात होते. प्रसार माध्यमांना आणि सुविधांना तो तो काळ आपले पर्याय शोधत असतो. तार आली म्हणजे नक्की काहीतरी वाईट बातमी आहे हे तत्कालीन निखालस सत्य, पण पुढे पोस्टाने अभिनंदनाच्या व इतर उद्देशांप्रमाणे मजकुरांना विशिष्ट नंबर देऊन तारेचा वापर, आजच्या मोबाइल मेसेजसारखा लोकप्रिय केला. दूर गावी गेलेल्या मुलाची ‘रीच्ड् सेफली’ ही दोन शब्दांची तार कित्ती छान दिलासा द्यायची. आणि बघता बघता हा काळ रंगीत टीव्ही बरोबर सप्तरंगी झाला. चित्रपटांचा रुपेरी पडदा 'होम थिएटर' होऊन घराघरात अवतरला. व्हिडिओ चित्रफितींचा जमाना आला. लग्नाचे सोहळे सिनेमासारखे दिमाखात पडद्यावर आले. व्हिडिओ लायब्ररीतून देशी-विदेशी चित्रपट लोक घरबसल्या पाहू लागले. यावर कहर म्हणजे चकाकणारी सीडी आली. जुन्या ग्रामोफोनच्या तबकड्या इतिहासजमा झाल्या. मग व्हिडिओ सीडी आल्या आणि थिएटर्स ओस पडू लागली.
याच काळात मोठमोठ्या व्यापारी व डॉक्टर्स लोकांच्या कमरेला पेजर आला. आणि त्याच गतीनं एरीअल अॅन्टेनावाला मोबाइल आला. तिकडे टीव्हीवर खाजगी वाहिन्यांचे पेव फुटले आणि सातआठ चॅनेल्सवाले टीव्ही लोकांनी विकले. शंभराहून अधिक वाहिन्या दाखवणारे नवे टीव्ही घराघरात विराजमान झाले आणि खऱ्या अर्थाने घर ‘वसुधैव कुटुंबम्’ झाले.
'करलो दुनिया मुठ्ठीमे' करीत अंबानींनी भारत संचार निगमला ( BSNL) आव्हान दिले. अनेक कंपन्या हेच केंद्रीय स्पेक्ट्रम वापरून निगमच्या उरावर बसल्या. माहितीचे महाजाल (Internet) नामक मायाजाल अल्लाउद्दीनच्या दिव्याप्रमाणे मनात येईल ते दाखवू लागले. 'जो जे वांछील तो ते पाहो'चा जमाना सुरू झाला. गल्लोगल्ली हॉटेलसारखे सायबर कॅफे सुरू झाले आणि सुरू झाला सोशल मिडिया नावाचा अफाट खेळ. परब्रह्मच साक्षात गुरू झाले. परिणामी अनेक प्रकारची गुरुकुलं संपुष्टात आली. संगणक आपला महागुरू झाला. या मायाजालात सगळे अडकले आणि इथूनच माणूस अंतर्मुख म्हणण्यापेक्षा एकलकोंडा झाला. बुद्धिबळ, पत्ते आणि अनेक गेम्स तो या गुरूबरोबर खेळू लागला. सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू, भोवरे, लगोर खेळणारी मुले घरात ध्यानस्थ बसली. ज्ञानाचा स्फोट झाला खरा, पण इंटरनेट बिलाला घाबरून शेवटी खिशाला परवडणारे इनबिल्ट गेम्स लोकप्रिय झाले. तिकडे मोबाइल्स स्वस्त होऊ लागले आणि अनेक वर्षांच्या स्थावर लँडलाईन फोन्सला अवकळा आली. एक नवं युग अवतरलं. माहितीचाच काय, माहिती घेण्याचा नवा अधिकार सर्वांना प्राप्त झाला. बळी तो कान पिळी हाच या नव्या युगाचा न्याय. हे तंत्र आत्मसात करणारी लहान मुले मोठ्यांची गुरू झाली आणि इथंच परंपरेची खरी उचलबांगडी झाली. सत्य आणि तथ्यं तपासण्याचं युग आलं. फेकाफेकी करणारी गप्पाष्टके आणि त्यांचे मुक्तकट्टे थांबले. हातच्या कंकणालासुद्धा खरा आरसा दाखवणारी नवी पिढी मल्टीमिडियाचा स्मार्टफोन घेऊन मिरवू लागली.
टेबलवरची जवळ जवळ सगळी स्टेशनरी संक्षिप्त रूप घेऊन या फोनमध्ये घुसली. कॅलक्युलेटर, कॅलेंडर, राईटिंग पॅड, घड्याळ, कॅमेरा, रेडिओ, ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डर, अभिनव शब्दकोश आणि शेकडो प्रकारची बहुगुणी अॅप्लीकेशन्स एका तळहातापेक्षा लहान मोबाइलमध्ये स्थानापन्न झाली. सारं जग आपल्या हातात आलं. फेसबुक आणि व्हाट्सअॅप सारखी अॅप्स लोकप्रियतेच्या शिखरावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहेत. लाखों लोकांशी एकाच वेळी संपर्क साधणारी, शिवाय आपला नेमकेपणा व व्यक्तिगत गुप्तता जपणारी ही तंत्रे आज अप्रत्यक्ष केवढं काम करीत आहेत. लाखोंच्या संख्येने होणारे महामोर्चे ही याच सोशल मिडियाची परिणती आहे. पण दुसरी खंत अशी आहे कि असंख्य माणसे जोडणारा वर्तमानातला हा महत्त्वाचा दुवा त्याच गतीने माणसे तोडतोही आहे.
आपल्या आज्जीला गावी भेटायला गेलेले मुला-नातवंडांचे कुटुंब तिच्या सभोवती बसून खाली मान घालून मोबाइलवर मग्न आहे. आजी ओरडली, “अरे, शहरातून निदान फोन करून तरी बोलत होतात. हे तुम्हाला झालंय काय? अंगात देव आल्यासारखे सगळे हम् हम् करून स्वतःशीच घुमताय आणि हसताय. माझ्याशी जरा तरी बोला...” आणि आजीने सर्वांना गरम गरम जेवण वाढलं. म्हणाली, “बाळांनो, चला आता एक झकास श्लोक म्हणा आणि भोजन करा.” नातवंडं उठली. श्लोकाऐवजी प्रत्येकाने आपल्या ताटाचा फोटो काढला आणि मित्र-मैत्रिणींना सेंड केला. खाली लिहिलं ‘आज्जीच्या हातचं जेवण’ आणि मग सगळीकडून वॉव-वॉवची वॉव वॉव सुरु झाली. शेवटपर्यंत कोणालाही आपण काय खातोय हे कळालं नाही. आजी म्हणाली, “कसा झाला होता सांडगा?” मुलं म्हणाली, “तो सांडगा होता होय? ओह शिट! आम्हाला कळालंच नाही. थांब आजी, फोटो बघून सांगतो-” शेवटी आजीने लाडाने सर्वांना फटके दिले. “शिंच्यांनो, अजूनतरी घास नेमका तोंडात जातोय म्हणून बरं, एकदा ती जागा चुकली कि मराल रे या मोबाइलपायी...” एकच हशा पिकला आणि सर्वांनी हाही जोक फॉरवर्ड केला. खरंच, केव्हढी ही जनरेशन गॅप! पूर्वी नेहमीच गजबजणाऱ्या या वाड्यात ही स्मशानशांतता पाहून आजीला भरून आलं... तेवढ्यात एका नातवाने इलाही जमादारांची गझल लावली ‘वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे?’ आणि आजीला भडभडून आलं ती ओक्साबोक्शी रडायला लागली. सर्व जण तिच्या भोवती गोळा झाले. तिचे डोळे पुसून तिची पापी घेतली आणि अच्च्या-बच्च्याच्या चिऊताईसारखी आजी हसायला लागली. ही संधी साधून एका नातवाने खास आजीसाठी आणलेला नवा कोरा मोबाइल तिला भेट दिला. पण आजीने त्याच वेगात तो लांब भिरकावून दिला. म्हणाली, “मला माणसात राहू द्या रे... हा एकांतवास नको. हा मोबाइल माणसाला माणसातून उठवतो.”
आजीची ही खदखद अगदी खरी आहे मित्रांनो. नात्यांपेक्षा औटघटकेचं ‘रिलेशन’ महत्त्वाचं झालंय. आजोबांची पँट पोटाच्या वर सस्पेंडर लावलेली असायची, आता नातवाची पँट माकडहाडाच्या पण खाली असते. या दोन पँट्स बांधण्यामधलं जे अंतर आहे ना ती जनरेशन गॅप. हे अंतर आता अजून खाली खालीच सरकतं आहे. उघड्या डोळ्यांनी पाश्चात्त्य संस्कृतीचं नवं पारतंत्र्य आता आम्ही स्वीकारतो आहोत. जगाची जगण्या-वागण्याची भाषा एक होते आहे. विविध शब्दांची भरती झपाट्याने आपल्या शब्दकोषात होतो आहे. देशोदेशीची संस्कृती आणि वस्तू अमेझॉनमुळे उंबरठ्यावर येत आहेत. अल्लाउद्दीनच्या या जादूच्या दिव्याने आता खरा चमत्कार दाखवायला सुरुवात केली आहे.
लहानपणी ऐकलेली बाळूच्या जादूच्या घेवड्याची गोष्ट आत्ता खरी होऊ लागली आहे. घेवड्याची झाडे स्वर्गापर्यंत जातात आणि बाळू तिकडे जाउन सारं ऐश्वर्य घरी घेऊन येतो; त्याच झाडावरून राक्षस खाली येऊ लागतो तेव्हा बाळू ही झाडे तोडतो. पण भावांनो, ( व्हाट्सअॅपचा शब्द ) आता खूप उशीर झालाय. तो राक्षस आपल्या परसात हातात भोगवादाचा आणि चंगळवादाचा सुरा घेऊन उतरलाय. आता पर्याय नाही. त्याच्याशी दोन हात करा नाहीतर तो आपल्या आजीला, परंपरेला, संस्कारांना मारल्या शिवाय परतणार नाही. कारण तो परसात आलाय तरी तुम्ही तिकडे न पाहता चॅटिंग करत आहात. कुमार आणि तरुण गट अंगावर पांघरूण घेऊन फ्रेंड्सशी बोलतो आहे आणि पन्नाशीतला माणूस जुनी मैत्रीण शोधून पुन्हा तरुण होतो आहे. अभिव्यक्तीला उधाण आलंय भावांनो, पण हा राक्षस पुढ्यात आलाय त्याचं काय? मैत्रीची मजा छान आहे, पण त्याचे परिणाम? मामला गंभीर आहे.
कौटुंबिक कलह विकोपाला जातील. जातीवाद, धर्मवाद तर आधीच विकोपाला गेलेत. इतिहासाला रोज नवा रंग देऊन जुन्या खुनी विकृत माणसांचे नव्याने नवे पूजक निर्माण झालेत. प्रत्येक जातीने आपल्या महापुरुषावर हक्क सांगून त्यांना आपआपल्या बिरादरीत बंद करून टाकलंय. पूर्वी प्रत्येक ओटीवरच्या भिंतीवर सगळे महापुरुष तसबिरीतून तुमचं स्वागत करायचे. पण आता तो परसातला राक्षस या फ्रेम घेऊन गेलाय. हा देश सर्व धर्मांचा आहे. इथले सर्व प्रांत, भाषा एकमेकांच्या प्रांतात मुक्त संचार करू शकतात ही प्रतिज्ञा पुस्तकातच राहतेय. कुठल्याही कोपऱ्यातली घटना सारे राष्ट्र ढवळून काढते कारण आता बातमी वाऱ्यापेक्षा वेगाने फिरते. हा वणवा गंभीर आहे कारण ज्ञान वाटणारा हा माहितीचा राक्षस अल्लाउद्दिनच्या राक्षसासारखा नम्र नाही. तो तुमच्याआमच्या आत शिरलाय. चांगलं वाईट कळण्यापूर्वी जर मुलाच्या हातात शस्त्र दिलं तर ते मूल दुसऱ्याला नाहीतर स्वतःला मारून घेईल. आपल्या हाती हे मीडियाचं कोलीत देऊन त्या महासत्ता त्यांच्या सुबत्तेत लोळत आहेत. व्हिस्की-ब्रँडीचे फायदे सांगणारे जाहिरातदार शेवटी आम्हाला बेवडे करतात आणि राजकीय बाबूंना हे बेवडे छान नाचवायला मिळतात. कोणालाच काही पडलेलं नाही. ‘स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य... स्वतःचं घर भरावं बाकी सारं त्याज्य’ हा आमचा सत्ता मंत्र. या मीडियाचा वापर एकमेकांचा पर्दाफाश करणं, सहज बोललेलं वाक्य भडक करून सारखं तुमच्या डोक्यावर आपटणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, जाहीर शिव्या देणं आणि आपलं पद राखण्यासाठी आपलं नेटवर्क सांभाळत राहणं. मला सांगा, खराटा तीस रुपयाला मिळतो. ज्याला खरंच देशाची सेवा करायचीय तो यासाठी तीस कोटी का खर्च करतो? साबरमतीच्या संताला आपण आज रोज मारतोय. तेही विलायतेतून शिकून आले होते. स्वातंत्र्यानंतर आम्ही लघुउद्योगांना प्रेरणा देणारा चरखा विसरलो, एकदम मोठे व्हायला निघालो, पण आज या सोशल मीडियाने सारी विलायती बाजारपेठ पुन्हा तुमच्या दारात उभी केली आहे. शेकडो परदेशी कंपन्या ईस्ट इंडियासारख्या तुमच्या घरात घुसल्या आहेत. चीनच्या वस्तू घेऊ नका असं नुसतं सांगून आता भागणार नाही, कारण हा राक्षस आता त्या घेवड्याच्या वेलावरून तुमच्या परसात उतरलाय. त्यानं माहिती आणलीय, तंत्र आणलंय. जागतिक चीजवस्तूंचा तो दलाल आहे. रोज नवा फंडा घेऊन तो तुमच्या भोवती फिरतोय. 'मेक इन इंडिया'चा आव आणत त्यानंच इथं पाय पसरलेत. आपण नवे रोजगार मिळतील म्हणून त्याला खाऊपिऊ घालतोय. घराघरात दिसणारे भारतीय कंपन्यांचे फ्रीज, टीव्ही गुडूप झालेत. सबकुछ इम्पोर्टेड किंवा असेंबल्ड् इन इंडिया अशा नव्याचे नऊ दिवस टिकणाऱ्या या बेगडी वस्तू अल्पायुषी ठरतायत. गुगल मॅपवर तुम्हाला नेमका रस्ता दाखविणारा हा राक्षस सभोवतीची माणसं मात्र दाखवत नाही आणि टिंटेड काचा लावलेल्या आपल्याला आजी जाउ द्या, पण आईबापही दिसत नाही. हे विजयाचं दृष्य बघून तो राक्षस विकट हसतोय आणि माहितीच्या स्फोटाचा आव आणत आपल्याच फॉन्ट (भाषेत) झकास गाणं म्हणतोय...
‘हॅल्लोsss मी बाबूराव बोलतोय.
No comments:
Post a Comment