आणि तो दिवस उजाडला! 1 सप्टेंबर 2018.
माझा साताऱ्याला जायचा दिवस.
प्रसंग होता "सातारा हिल मॅरेथॉन" जी, 2 सप्टेंबर 2018 ला होणार होती. माझं साताऱ्याला जायचं कारण म्हणजे, माझा मेहुणा श्री. सारंग गाडगीळ, राहणार बंगलोर, ह्याने ह्या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. त्याला चिअर करण्यासाठी मी चाललो होतो.
एक तारखेचा दिवस उजेडला.
मी सॅक भरायच्या तयारीत होतो. साधारण 11 वाजता घर सोडेन असं सांगितलं होतं. त्या आधी
आमच्या गृप मधल्या दोघी जणी ब्रेकफास्टला येणार होत्या.
त्या 9 वाजता ठरल्या प्रमाणे आल्या. आमच्या गप्पा रंगत चालल्या होत्या, कारण
पहिल्यांदाच आम्ही भेटत होतो.
साधारण 11 पर्यंत निघू असं ठरवलं होतं. पण गप्पा वाढत गेल्या आणि
12 कधी वाजले समजलंच नाही. शेवटी
12:15 वाजता निघालो.
कधी एकदा मेहुण्याला फोन करून सांगतोय की, "निघालो रे" असं झालं होतं आणि
ड्राईव्ह करायला सुरुवात केली आणि फोन लावून कळवलं निघालो ते.
पुण्याच्या जस्ट बाहेर पडून highway ला लागलो होतो. एखादा बॉयफ्रेंड
आपल्या गर्लफ्रेंड ला भेटायला निघाला आहे तेव्हा तो कसा आनंदात असतो तसं, अगदी तसंच
वाटत होतं. ह्याला वातावरण पण कारणीभूत होतं म्हणा. पावसाच्या सरी येत होत्या, ढग जवळ येऊन दूर जात होते, वा! आणि मुख्य म्हणजे रोजच्या जीवनातून मिळणारा change, जो आज मिळाला होता.
बाहेरगावी एकटं जाण्याचा माझा हा पहिलाच अनुभव
होता. निसर्गाचा सुरेख अनुभव घेत मी 12:20 ला निघून 2:30 ला साताऱ्यात पोचलो.
आल्यावर पहिल्यांदा जेवलो, कारण वाटेत चहा
व्यतेरीक्त काही घेतलं नव्हतं. तोपर्यंत मेहुणा त्याच्या मित्राकडे गेला होता.
साताऱ्यात जी मॅरेथॉन होणार होती ती "कास पठार" वर जायच्या रस्त्यावर होणार होती.
त्याच रस्त्यावर यवतेश्वरचं मंदिर होतं. सातारा म्हणजे माझ्या सासूबाईंचं माहेर.
"25, शनिवार सातारा" नावाचा आमचा एक व्हाट्सअप्प ग्रुप पण आहे.
नुकतंच म्हणजे 9-10 जूनला आमचं साताऱ्यात गेट together झालं होतं. त्या वेळी मी संध्याकाळी पोचलो होतो, म्हणून मला इतर लोकांबरोबर कास पठारच्या बाजूला
जायला मिळालं नव्हतं. पण आज योग आला होता. मी मेहुणा आणि ज्याच्याकडे आम्ही उतरलं
होतो, म्हणजे सासूबाईंच्या मोठ्या भावाकडे, त्यांचा मोठा मुलगा (श्री. अभय
गोडबोले) ह्यांना विचारलं की आपल्याला जाता येईल का कास पठारापर्यंत? दुसरं कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मॅरेथॉनचा रस्ता तोच होता.
त्यामुळे तो कसा आहे, किती, कुठे कुठे चढण आहे, कुठे किती उतार आहे ह्याचा सगळा अभ्यास करायला मिळणार होता.
कास पठार 20-22 km होतं घरापासून त्यामुळे तासाभरात जाऊन येणं शक्य
नव्हतं.
आणि आम्ही निघालो. पावसाची संततधार चालूच होती. जस
जसा वर चढायला सुरुवात केली तस तसा सुरुवातीला गाडीतला ac बंद झाला, मग अजून पुढे चढल्यावर गाडीच्या काचा खाली आल्या. का? कारण शब्दात
सांगणं कठीण आहे, हे ज्याने त्याने तिथं जाऊनच अनुभवायला हवं. प्रचंड वारं, थंडी, मधूनच एक पावसाची सर, मग थोडं ऊन असं सगळं अनुभवायला मिळत होतं
कास पठारावरची छोटी सहल उरकून आम्ही संध्याकाळी
घरी परतलो. दुसऱ्या दिवशी पहाटे उठायचं असल्याने लवकर झोपलो, कारण रिपोर्टिंगची
वेळ पहाटे 5:30 दिली होती.
2 सप्टेंबर, मॅरेथॉनच्या दिवशी मेहुणा सकाळी लवकर बाहेर पडला कारण
रिपोर्ट करायचं होतं. जाताना सांगून गेला की साताऱ्यात खिंडीतला जो गणपती आहे तिथं
जाताना जो बोगदा लागतो तिथं येऊन थांबा.
साधारण 6:45 च्या सुमारास आम्ही बोगद्याजवळ जाऊन थांबलो. माझ्या बरोबर अभय गोडबोले ह्यांचा मुलगा अनिष सोबती कम गाईड म्हणून होता. साताऱ्यात जरी खूप वेळा आलो असलो तरी एवढी माहिती नव्हती.
टोटल 21 km ची रन होती. आमच्या अंदाजाप्रमाणे साधारण पहिला स्पर्धक 8 च्या सुमारास बोगद्याजवळ येईल असं वाटलं पण... विश्वास बसणार नाही असं घडलं. केनियाचा एक स्पर्धक 7 वाजता आम्हाला बोगद्या जवळ पास होऊन गेला. कारण जिथं आम्ही थांबलो होतो तिथून फिनिश लाईन 1.5 km होती. म्हणजे 21 km जाऊन येऊन त्याला 1 तास 10 मिनिटं लागली. काय हा वेग!! त्याचा फोटोसुद्धा काढणं मुश्किल होतं एवढा त्याचा वेग होता.
कसाबसा निघाला पुसट फोटो.
त्यानंतरचे साधारण 6-7 जण, दुसऱ्या देशातले, 15 ते 20 मिनिटांच्या गॅप नंतर पास झाले. मग भारतातले इतर शहरातून आलेले पास
होऊ लागले. साधारण 6000 स्पर्धक होते.
माझा मेहुणा कधी पास होणार ह्याची वाट बघत होतो.
पण आठवलं की त्याने मागे सराव करताना सांगितलं होतं की साधारण अडीच ते पावणे तीन
तास लागतात त्याला. त्या हिशोबाने आम्ही त्याची वाट बघत होतो.
ज्याच्या करता मी गेलो होतो, "चिअर" करण्यासाठी, तो क्षण जवळ आला होता कारण 8:45 वाजले होते. निघून पावणेतीन
तास झाले होते. कुठल्याही क्षणी तो येणार होता.
आणि इतर स्पर्धकांच्याकडे बघता बघता कधी हा समोर
आला ते कळलंच नाही. ठरवलेले शब्द तोंडातून फुटण्याऐवजी तिथेच राहिले, कारण काय
बोलावं हे सुचलंच नाही. उलट त्याने विचारलेल्या प्रश्नाचे कसेबसे उत्तर दिले आणि
तो पुढे गेला. त्याला रन करायला 2तास 58 मिनिटं लागली.
मॅरेथॉनमध्ये दिलेल्या वेळात जर तुम्ही ती पूर्ण
केली तर अनुक्रमे तुम्हाला गोल्ड, सिल्वर व ब्राँझ मेडल दिलं जातं. त्याप्रमाणे त्याला ब्राँझ मेडल
मिळालं. छान!! 21 km पळणं काही सोपं नाही, तेसुद्धा घाट रस्त्यावर!
मेहुणा घरी आल्यावर ब्रेकफास्ट, आराम सगळं झालं. दुपारी तो त्याच्या शाळेतल्या मित्रांना भेटायला
गेला, सारंगचं सुरुवातीचं शालेय शिक्षण हे साताऱ्यात झालं असल्यामुळे तिथं
त्याचे मित्र होते. मॅरेथॉनच्या निमित्ताने त्यांची भेट होणार होती.
मी पण माझी एक-दोन कामं करायला बाहेर पडलो.
संध्याकाळी 6 वाजता परतीच्या प्रवासाला निघायचं असं ठरवून दुपारी जेवण करून ताणून
दिली. सगळेच लवकर उठले होते पहाटे आणि सारंगला तर विश्रांतीची तर जरुरी होती, त्यामुळे झोप आवश्यक होती.
शेवटी संध्याकाळ उजाडली आणि चहा घेऊन जड पावलाने
गाडीकडे जायला निघालो.
परत पुण्याला जाऊन रोजच्या चक्रात अडकवून घ्यायचं
होतं ना!
बक्कप !! आणि all the best !!
ReplyDelete