मी 2-3री मध्ये होते. एका लग्नाच्या रिसेप्शनला आम्ही गेलो होतो आणि
तिकडे जो वाद्यवृंद होता त्यातील सर्व कलाकार अंध होते. मला त्याचं खूप
अप्रूप वाटलं होतं. माझी ताई म्हणाली, “बघ, आपल्या
न्यूनत्वाचा बाऊ न करता ते स्वतःच्या पायावर उभे आहेत... कुणाकडूनही दया किंवा कीव याची अपेक्षा न करता.”
त्या लहान वयातही त्यांचं स्वावलंबन मनाला खूप
भावलं. ते वय, या क्षेत्रात मी काहीतरी करीन वगैरे वाटण्याइतकं मोठं नव्हतं, पण तो प्रसंग
जसा मनात कोरला गेला आणि मधून मधून आठवत राहायचा. पुढे जेव्हा संसाराच्या
जबाबदाऱ्या थोड्या कमी होऊन मध्यम वयातलं रिकामपण जाणवायला लागलं, तेव्हा मात्र मनाने उचल घेतली. काहीतरी विधायक करायचं, वेळ
सत्कारणी लावायचा आणि तेव्हा हा प्रसंग मला दिशा
देऊन गेला.
दृष्टिहीनांसाठी काम करायचं हे तर ठरवलं, पण म्हणजे नेमकं काय? ब्रेल लिपीमध्ये
ते वाचतात एवढंच माहिती, त्यामुळे ब्रेल शिकावी असं ठरवलं. पण ती शिकणार कशी? कोण शिकवणार? कोणाला विचारावं? अशा संभ्रमात असतानाच माझ्या सुदैवाने NAB (National Association
For The Blind) ची एक छोटीशी जाहिरात पेपरमध्ये वाचनात आली. स्वयंसेवक, अंध
मुलांचे पालक आणि विशेष शिक्षकांसाठी असणाऱ्या
महिन्याभराच्या प्रशिक्षणासंबंधीची ती जाहिरात होती. ही संधी मी
दवडली नाही. तिकडे प्रवेश मिळाला. आतापर्यंतचं आयुष्य म्हणजे घर,
नवऱ्याचे ऑफिस, डबे, मुलींच्या शाळा, अभ्यास, परीक्षा, मित्रमैत्रिणी,
नातेवाईक, सासर-माहेर, सण, लग्नकार्य या परिघातच गुंतलेलं. नाही म्हणायला ८ ते
१२वी पर्यंतच्या इयत्तांच्या १८ वर्षं शिकवण्या घेतल्या, पण ते
ही घरातच... घराबाहेर पडायचं म्हणजे 'अहों'च्या बाजूला बसून गाडीतून
जायचं. त्यामुळे पहिलं संकट रोज घराबाहेर
एकटीनं जायचं, बस, लोकल गाठायची... सगळंच कठीण! माझा
बावरलेला, गोंधळलेला चेहरा पाहून - ज्या लेकीला बोट
धरून शाळेत पोहोचवलं होतं - ती म्हणाली, ‘‘’आई, चल मी नेते तुला बोट धरून!’’
NAB मध्ये गेले आणि एका नव्या,
वेगळ्या विश्वात मी पाऊल टाकलं. पहिल्याच दिवशी ब्रेल शिकवायला सुरुवात
केल्यावर मला कोण आनंद झाला! पुढे लक्षातं आलं- ब्रेल हा एक भाग झाला, अनेक गोष्टी
शिकण्यासारख्या आणि करण्यासारख्या आहेत. पहिला धडा आम्हाला दिला गेला तो म्हणजे, अंध म्हणजे आपल्यासारखाच एक माणूस आहे. आपल्यासारखेच त्यांच्यात गुण-दोष असतात,
चांगुलपणा, हेवेदावे, फसवणं, गैरफायदा घेणं सगळं सगळं आपल्यासारखंच! तेव्हा दयेपोटी कुठलीही मदत करायची नाही. दुसरा धडा म्हणजे डोळे नाही
म्हणून compensate करण्यासाठी देवाने कुठलीही दैवी शक्ती त्यांना दिलेली
नाही... आपण ८५% गोष्टी डोळ्यांचा वापर करून करतो, त्यामुळे इतर ज्ञानेंद्रियांचा वापर करायची आपल्याला सवय नसते... दिसत नसल्यामुळे दृष्टिहिन व्यक्ती
सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करते आणि त्यासाठी पण प्रशिक्षण द्यावे लागते.
त्या प्रशिक्षणात अनेक विषय शिकवले जातात- उदा.
पांढरी काठी कशी वापरायची, रस्त्यावर चालताना कशा खुणा ठेवायच्या, म्हणजे पुन्हा जाताना सापडायला सोपं जाईल, गणित पाटी कशी
वापरायची, भूगोलातील नकाशे उठावदार कसे करायचे, नाणं जमिनीवर
पडलं तर कसं शोधायचं, दैनंदिन जीवनातील व्यवहार म्हणजे चहा
कपातून बशीत ओतून पिणं, ताटातील पदार्थ कसे ओळखायचे... अनेक छोट्या छोट्या गोष्टी
ज्या आपण अभावितपणे करत असतो त्या त्यांना शिकवाव्या लागतात हे
लक्षात आलं.
त्या वेळचा प्रसंग... ट्रेनिंगचा एक भाग म्हणून आम्हाला
इमारतीच्या बाहेर नेलं, माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि वर्गातल्या माझ्या
जागेवर जाऊन बसायला सांगितलं. मी पूर्णपणे हरवल्यासारखी झाले. मग त्या टिचर मला
म्हणाल्या , ‘‘ट्रेनचा आवाज कुठून येतो आहे ते ऐक, ऊन कुठल्या
बाजूने अंगावर येतं आहे त्याकडे लक्ष दे, (NAB च्या गेटवर एक बीप
आवाज करणारं यंत्र असतं) बीपच्या आवाजावरून गेट
कुठे आहे त्याचा अंदाज घे.’’ हळूहळू मी पण सरावले
आणि तेव्हा गेटपाशी उतार आहे, २० पावलं चाललं की २
पायऱ्या आहेत अशा अनेक गोष्टी, गेले १५ दिवस येत असूनही
लक्षात न आलेल्या, गोष्टी लक्षात आल्या. नशिबाने वर्ग तळमजल्यावरच
होता, कशीबशी जागेवर जाऊन बसले आणि हुश्श केलं. जेमतेम ५ मिनिटं दिसत
नव्हतं, ओळखीची जागा, पुन्हा
दिसणारं हे माहीत असूनही जीव इतका
घाबराघुबरा झाला. आयुष्यभर प्रकाश पाहू न शकणाऱ्या, तरीही हसत आव्हानांना सामोरं जाणाऱ्या त्या भावंडांच्या पायावर डोकं ठेवावं असं वाटलं... वाटलं, कुठून आणतात एवढी सकारात्मकता?
बघता बघता महिन्याभराचे प्रशिक्षण पूर्ण झाले... आधी मी ठरवलं होतं की ज्यांना कोणाला काही काम असेल ते घरी येतील आणि मग त्यांना
काय रेकॉर्डिंग किंवा रीडिंग (वाचून) हवे असेल ती मदत मी करेन. पण
या महिन्याभरात आधी ज्या घराबाहेर पडण्याचा बाऊ वाटत होता ते सवयीचं झालं होतं
आणि NABचं ते eductation सेंटर, तिथली माणसं, शिक्षक या सगळ्यांना सोडावंसं वाटेना. त्यामुळे तिकडेच रोज जायचं आणि पडेल ते काम
करायचं असं ठरवलं. सुरुवातीला २ तास जायचे, मग २ चे ४ तास झाले आणि बघता बघता ९ ते ५ ऑफिस असल्याप्रमाणे, डबा
घेऊन जायला लागले.
महिन्याभरात जे जे शिकले त्याचा प्रत्यक्ष वापर करायची संधीच मला मिळाली. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सगळे शिक्षक, मुलं यांच्याबरॊबर काम करण्याची संधी मिळाली. जगदीश, योगेश, आठलेकर सर या सर्वांकडून मला खूप शिकायला मिळालं. त्यांच्यासाठी एक स्वयंसेवक रोज येतो आहे हीच खूप मौल्यवान बाब होती. त्यामुळे माझी ५ मिनिटंसुद्धा वाया जाणार नाहीत याची ते दक्षता घ्यायचे. चुकून एखादेवेळी मला रिकामं बसावं लागलं तर त्यांना तो गुन्हा वाटायचा. एकदा मी त्यांना म्हणाले, "मी इकडे येण्यात माझा स्वार्थ आहे, मला इकडे काम करायला आवडतं, माझा वेळ खूप छान जातो, आणि म्हणून मी रोज इकडे येते. तुम्ही असे Tesnsed up होत जाऊ नका.” तेंव्हा जगदीशने एक किस्सा सांगितला आणि मला त्यामागचं कारण कळलं. तो कॉलेजमध्ये असताना एक गृहस्थ रोज त्याला वाचून दाखवावयाला यायचे. त्यांनी सक्त ताकीद दिली होती की एक शब्दसुद्धा इकडचा तिकडचा बोलायचा नाही आणि एक दिवस निवडणुकांच्या काळात त्यांनी स्वतःच काहीतरी विषय काढला आणि म्हणून जरा अवांतर बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी त्यांनी जगदीशला फोन करून सांगितलं की तू मी सांगितलेली अट पाळली नाहीस म्हणून मी आजपासून येणार नाही. हे सांगताना जगदीशचा सूर तक्रारीचा नव्हता याचं मला नवल वाटलं होतं.
आठलेकर सर त्या विभागाचे Hon. Director होते. त्यांनी तर माझा ताबाच
घेतला. त्यांच्या केबिनमध्ये माझा मुक्काम असायचा. आलेली पत्रं वाचून दाखवणं, उत्तरं लिहिणं, ते लिहीत असलेल्या पुस्तकाचं लेखन, प्रश्नपत्रिका
तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणं, अशी अनेक कामं करताना खूप मजा
यायची. अंध आहे म्हणून उगीचच उठसूठ मदत करायची नाही
यावर त्यांचा कटाक्ष असायचा. आणि तिकडच्या अंध मुलांना मी मदत केलीच तर ते मला
रागवायचे. उत्तरपत्रिका पण इतक्या कठीण तपासायचे. मी कधी रदबदली केली, जास्त
मार्क द्या म्हटले की म्हणायचे, "वर्गात सर्व शिकवलय, त्यांना आलं
पाहिजे."
त्यांच्याबरोबरचा एक प्रसंग तर मी आयुष्यात विसरणार नाही. मुलांना रेकॉर्डींग करून देण्याचं काम एकीकडे चालू होतंच म्हणून विचार केला की थोडं ह्याबद्दल शिकून घ्यावं, म्हणजे योग्य पद्धतीने वाचू शकू. दादरला (मुंबई) एक voice modulation चा कोर्स होता त्याला मी जायला लागले. क्लास संध्याकाळचा होता त्यामुळे NAB मधून परस्पर तिकडे जायचे, घरी पोहचायला रात्रीचे १० वाजायचे. एक दिवस सरांनी मला म्हटले, “एवढी दगदग करतेस, थकून जात असशील, गाढ झोप लागत असेल तुला.” मी कुरकुरले, "नाही हो सर, मला इतकी स्वप्नं पडतात की कधीही गाढ झोप लागत नाही. कंटाळले आहे मी, कधीही उठल्या बरोबर फ्रेश वाटत नाही. काय करावं या स्वप्नांचं तेच कळत नाही." माझा हा तक्रारींचा पाढा सरांनी शांतपणे ऐकून घेतला आणि मग म्हणाले (सरांना वयाच्या २७ व्या वर्षी अंधत्व आलं) "मला स्वप्नं पडलेली खूप आवडतात कारण तेव्हा मला दिसतं." सणसणीत चपराक बसावी तसं मला झालं. लाज वाटली स्वतःची. जे आहे त्याची किंमत नाही आपल्याला आणि क्षुल्लक बाबींचा बाऊ करतो.
सेंटरमध्ये जर एखादा नवखा माणूस गेला तर सर्वांच्या वावरण्यावरून ही मंडळी
अंध आहेत हे कळणारसुद्धा नाही इतक्या सराईतपणे सगळे फिरत असतात. एकदा
जेवणाच्या सुट्टीत कॉरिडॉरमध्ये मुलांची ही गर्दी, कलकलाट चालू होता. एक मुलगी
धावत येत होती आणि जगदीश समोरून येत होता - मला वाटलं हे दोघं आता आदळणार
एकमेकांवर! पण एकमेकांपासून अक्षरश: अर्ध्या फुटावर दोघंही
थांबले आणि जगदीश तिला म्हणाला, “अनिता, तुझ्या उजवीकडून
जा.” मी थक्क! एकमेकांवर आदळणं तर सोडा, त्यांनी त्या विद्यार्थिनीला ओळखलं पण होतं. जगदीशचे कान तर इतके तीक्ष्ण होते, सरांच्या केबिनच्या दारावर
टकटक व्हायच्या आधीच तो बाहेर कोण आलं आहे सांगायचा.
असे असंख्य अनुभव, प्रसंग... मी ह्या विश्वात रमून गेले, पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला शेवट असतोच त्याप्रमाणे ह्यांची पुण्याला बदली झाली आणि जड अंतःकरणानी ह्या सगळ्यांचा निरोप घ्यावा लागला. अर्थात, मिळालेला अनुभव इतका प्रेरणादायक होता की त्यामुळेच पुण्याला आल्यावर रेकॉर्डिंगचं काम सुरूच ठेवलं आणि वाढवलं. आज ‘यशोवाणी’ या मी सुरू केलेल्या ग्रुपमध्ये सुमारे ६०-६५ स्वयंसेवक खूप मनापासून रेकॉर्डींगचं काम करत आहेत. आज आमच्या लायब्ररीमध्ये सुमारे २००० च्या वर ऑडिओ पुस्तकं तयार आहेत आणि दर महिन्याला जवळ जवळ ३०-३५ नवीन पुस्तकं तयार होतात. ही पुस्तकं विनामूल्य दिली जातात व त्यांचा अनेक अंध बांधवांना खूप फायदा होतो आहे.
NABमधल्या या काळाने मला काय शिकवलं, तर अंतर्मुख
व्हायला... एखादी गोष्ट नाही मनाप्रमाणे घडली तर कुरकुर करायचा आपल्याला अधिकार
नाही अशी खूणगाठ मनाशी बांधायला... जे मिळालं आहे आणि
मिळतं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला... थोडक्यात सांगायचं तर मी 'डोळस' झाले!
--- प्राची गुर्जर
Great achievement mam! All the best for all your future endeavors!
ReplyDelete