वारीचे तसं माझं हे पहिलेच वर्ष. आई
बाबा खूप वर्षे जात आहेत.
"सानू, या
वर्षी वारीला येणार का?", मला बाबांनी विचारले. आधी
कधीही नव्हते गेले मी. माझे विचार डळमळीतच होते...सुट्टी असल्याने, तसं माझ्याकडे नाही म्हणायला कोणतेही कारण नव्हते. पण २५-२६ किमी मी चालू
शकेन ह्यावर माझा विश्वास नव्हता. खूप वेळा मागे लागून मग बाबांनी माझा होकार
पटकवला.
अखेर तो दिवस उजाडला. सूर्यकिरण
दिसण्या आधीच आमची बस आळंदीच्या दिशेने निघाली. आळंदी ते पुणे असा हा आमचा २५ किमी
चा पालखीबरोबरचा प्रवास. आम्ही IT दिंडीसोबत गेलो होतो.
आळंदीला पोहचल्यावर बरीच मंडळी नाष्टा, चहा-पाणी घेण्यात मग्न होती. मला मधेच वाटून गेले, " अरेच्चा, इथे कोठे आलो आपण?, संपलं,
आजचा दिवस बोअर जाणार......."
पण, मग बाहेर टाळ मृदूंगाचा गजर ऐकू आला आणि हे सारे विचार माझ्या मनातून जे
पळाले, ते परत कधी आलेच नाहीत. सर्व वातावरण भारावून गेले.
अशा रीतीने सुरु झाला आमचा प्रवास.
वाटेत आमचे दोन ठिकाणी स्टॉप
होते.पहिला टप्पा गाठता गाठता, मी संपलेच होते.
पायाचे ठोकळे झाले होते. हुश्श, बस्स.... आता इथेच थांबायचे.
पण तिकडे एक वेगळेच दृश्य आमची वाट पहात होते. अगदी ८ वर्षाच्या मुलापासून ८०
वर्षाच्या आजी-आजोबा पर्यँत एकाच चालीवर, एकाच ठेक्यावर,
एकाच विश्वात रमून कोणी मृदूंग,कोणी टाळ,
तर कोणी हातांनी टाळी देत देहभान हरपून नाचत होते. जप करत होते.
अखंड उत्साह, आनंद भरभरून वहात होता. आम्हीही त्यांच्यात
मिसळलो. तहान भूक विसरून गेलो होतो कधीच. पाठीवरच्या सॅकचा आता existence नव्हता. आपण 'वेगळे' थांबूया,
वगैरे असे काही नाही. 'तू' ही नाही आणि 'मी' ही नाही.
सगळेच माऊली होते.
बाबा तर पूर्ण गुंगून गेले होते.
आता पुढचा प्रवास. निघताना माझ्या
लक्षात आले की, नाष्टा घेण्यासाठी
थांब्यावर थांबून सुद्धा, मी नाष्टा केलाच नव्हता. जोपर्यंत विठूनामाचा गजर चालू होता, हे माझ्या लक्षातच आले नव्हते.
आमच्या जवळ एक माईक व एक छोटा स्पीकर
होता. पहिली ओळ कोणी गात असत व त्यांच्या मागोमाग बाकी सर्व जण ,टाळ मृदूंग तर होतेच सोबतीस.
मागे पुढे, जिथे बघू तिथे माऊलीच माऊली. आमच्या समोर काही दिंडया होत्या. आम्ही
विखुरले गेलो, पण दिंडयाची शिस्त मात्र कधीच मोडत नसे.
सर्वात पुढं झेंडेकरी. ह्या भक्तीच्या महासागरात ना भांडण होती, ना तंटे,ना क्रोध, मत्सर,
ना लोभ. प्रत्येक डोळ्यात एकच आस दिसत होती. सगळे एकमेकांना सहाय्य
करत होते.
जेवण करताना इतकी मज्जा कधीच आली
नव्हती. बाबांचे कॉलेजचे मित्र(म्हणजे काका मंडळी) सच्या (सचिन), राज्या (राजेश), व्यंक्या (व्यंकटेश), मगद्या (मगदूम), शहा आणि स्वतः बाबा म्हणजे तुटक्या (ताटके)..
लय अवली होती ही गँग! खूप धमाल केली.
जेवणानंतर आरती होती, त्यानंतर मी विचारले, " मी एक अभंग म्हणला तर
चालेल का?"
" जरूर माऊली", ते म्हणाले.
मी संत तुकाराम महाराजांचा ' आली कुठूनशी कानी, टाळ मृदूंगाची धून' हा अभंग गायला. गाण्यामधले ' जय हरी विठ्ठल जय जय
विठ्ठल' हे साऱ्या लोकांनी गायले. सगळे वातावरण यासाठी
अनुरूप होते. ' मन झाले ओले चिंब, जैसे
भिजले अभंग' असेच साऱ्यांचे झाले होते.
आता परतीची वाट. पालखी, दिंडीपासून आम्ही वेगळे झालो. ... मनात दुःख नव्हतं... एक वेगळंच समाधान
होतं. दिवसभर जवळपास २२ किमी चालून सुद्धा काहीच वाटले नाही, कारण माझी माऊली होती माझ्यासोबत. पण दिंडीपासून वेगळे झाल्यानंतरचे ते
शेवटचे २ किमी त्रासदायक होते, कारण आता सोबत वारी नव्हती,
पालखी नव्हती, दिंडी नव्हती नि माझी माऊली
नव्हती!!
कु. सानिका ताटके
मी म्हंटलेला अभंग ऐकण्यासाठी इथे
क्लिक करा - "अभंग" .
Very nice Sanika
ReplyDeleteKeep writing.