मुलाखत: शशांक शिरीष केतकर


टीआरपी चा उच्चांक गाठलेली ' होणार सून ...' ह्या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळालेला 'श्री' घराघरात पोहोचला. त्यानंतर 'गोष्ट तशी गमतीची' ह्या नाटकातून सहज सुंदर अभिनय करून त्याने वाहवा मिळविली. ह्या नाटकाने २० हून अधिक पुरस्कार पटकावले. काही महिन्यापूर्वी प्रदर्शित झालेला One way Ticket ह्या भव्य सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत जोरदार प्रवेश केला.

मालिका नाटक आणि चित्रपट ह्या तिन्ही माध्यमात आपला ठसा उमटवणारा शशांक शिरीष केतकर. अभिनयाबरोबर कविता, फोटोग्राफी, स्विमिंग, ट्रेकिंग असे वेगवेगळे छंदही त्याने जोपासले आहेत. नुकताच त्याचा गाण्याचा अल्बमही प्रसिध्द झाला. शशांकने पदव्युत्तर शिक्षण इंजिनियरींग मॅनेजमेंट मध्ये घेतले आहे. मी शशांकच्या बाबतीत असे म्हणेन की He is wearing many hats.
अशा बहुआयामी आणि हरहुन्नरी शशांकशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा.......

शशांक, आम्ही सर्वांनी तुझा सीरिअल,नाटक आणि चित्रपट हा प्रवास पाहिला. आम्हाला celebrity होण्याच्या आधीच्या शशांकबद्दल सांग.
मी आई-वडिलांवर आणि देशावर आणि घरावर अत्यंत प्रेम करणारा असा साधा मुलगा आहे. थोडा अबोल आणि सतत आपल्याला बरेच काही करायचे आहे असे वाटणारा मुलगा. फक्त अभ्यास एके अभ्यास असे मी कधीही केले नाही व माझ्या आई-वडिलांनीही ह्यावर आक्षेप घेतला नाही. कायमच त्यांनी मला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी , भरपूर activities मध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. अभ्यासाबरोबर  इतर activities करण्याचे महत्व ते माझ्या मनावर सतत बिंबवत राहिले. त्यामुळेच वेगळा शशांक म्हणून मी तेंव्हाही व त्ताही डेवलप होऊ शकलो. मला आठवतेय, शाळेत मला मासा म्हणून चिडवायचे. नेहमी मासा आला नाही किंवा मासा चालला असे म्हणायचे कारण मी शाळेतर्फे अनेक स्विमिंग स्पर्धांत भाग घेत असे.  शाळेत मी National level swimmer होतो. मी लहानपणी खूप ट्रेक केले. त्यामुळे लहानपणापासून मला स्वतःला प्रत्येक गोष्ट करायची सवय झाली. जबाबदारी घेऊन बुकिंग करणे, हॉटेल शोधणे, जेवणाची व्यवस्था करणे हे सगळे मी नववी मध्ये केले. आई-वडिलानीसुद्धा मला ते त्या वयात करू दिले. आई-वडिलांनी आम्हालाही नियमावली घालून दिली होती. त्या चौकटीत कसे करायचे याचे मात्र आम्हाला स्वातंत्र्य होते. पण माझ्या मित्रांच्या घरी मात्र ह्याच वेळेला उठायचे, जेवायचे आणि झोपायचे वगैरे असे निर्बंध होते.

ह्या सगळ्या गोष्टीचा मला आयुष्यात खूप फायदा झाला. स्विमिंग चा फायदा मी जेंव्हा ऑस्ट्रेलियाला उच्च शिक्षणासाठी गेलो होतो तेंव्हा झाला. तिकडे  मी इयान थोर्पच्या अकॅडेमी मध्ये शिकवायचो. मला सांगायला अभिमान वाटतो की माझा मास्टर्स चा संपूर्ण खर्च मी स्वतः करू शकलो, आई-बाबांना कधीही करावा लागला नाही. आई-बाबांनी Peer pressure  कधीही जाणवू दिले नाही, कधीही ह्याने असे केले, त्यांनी तसे केले हे ऐकवले नाही. माझी आई  डॅशिंग! माझ्या डोक्यात आयडीया पेरायचे काम तिचे. निर्णय नेहमी ती घ्यायची आणि बाबा बाकीचा सपोर्ट द्यायचे.

अभिनयाची आवड पहिल्यापासून होती का?
अभिनयाची आवड म्हणाल तर मी शाळेमध्ये फारशी आवड नव्हती. पण मी व माझा मित्र खूप गोष्टी लिहायचो, चित्रे काढायचो, storybook करायचो. कविता लिहायचो. लिखाणातून मी व्यक्त होत होतो. मी जसा घडत गेलो तशा माझ्या कविताही प्रगल्भ होत गेल्या. पण अजूनही माझ्या मनात द्वंद्व चालू होते. मी दहावीनंतर डिप्लोमा केला त्यानंतर पुणे विद्यापीठातून Instrumentation मध्ये पदवी घेतली. नंतर मास्टर्स इंजिनियरींग मॅनेजमेंट मध्ये केले. माझा विषय होता- Engineering Policy. ऑस्ट्रेलियाला गेल्यावर मी एकटा होतो, तिकडे गेल्यावर मला स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळाला. मला पडलेल्या प्रश्नांची उकल तिकडे गेल्यावर झाली. तिथले महाराष्ट्र मंडळ, मराठी शाळा, मराठी नाटक, मराठी रेडिओ ह्या सगळ्यामध्ये सहभागी होता आले. तिथल्या लोकांकडून प्रतिक्रिया मिळायला लागली की, अरे तुला हे सूट होतेय तू हेच करिअर म्हणून का करत नाहीस?

पण तू मग तिकडे जॉब केला नाहीस का?
नाही, मी आयुष्यात एकही दिवस जॉब केला नाही. मास्टर्स झाल्यावर मग मी परत आलो. आई-बाबांना मी मला सहा महिने द्या म्हणून सांगितले. माझा स्ट्रगल चालू झाला. माझे लिखाण चालू होतेच पण लिखाणातून पोट भरणार नाही हे कळले. आपण स्वच्छ बोलतो, चांगले दिसतो, आपण अभिनय केला नसला तरी तो नक्की करू शकू अशी खात्री होती. मग ऑडिशन द्यायला चालू केले. 'होणार सून मी ह्या घरची ' माझी खरतर सहावी मालिका. बाकी मालिका लोकप्रिय झाल्या नाहीमी ' इथेच टाका तंबू',  'होणार सून मी ह्या घरची',   'स्वप्नांच्या पलीकडले', 'रंग माझा वेगळा',  'फिरुनी नवी जन्मेन मी'  आणि ' कालाय तस्मे नम:' ह्या मालिका केल्या.  'होणार सून' झी वरची पहिली मालिका. मंदार देवस्थळी(दिग्दर्शक) आणि मधुगंधा कुलकर्णीचे(लेखिका) आणि सहकलाकारांचे खूप आभार आहेत. त्यांच्यामुळे मला इतकी मोठी मालिका करता आली. मी सीरिअल करायला लागलो तेंव्हा मला कळायला लागले की अभिनय म्हणजे नक्की काय? इतक्या भावभावनांच्या शेड तुम्हाला तुमच्या भूमिकेतून मांडायच्या आहेत त्यामुळे मी लोकांचे तासनतास निरीक्षण करायला लागलो, मी खूप ऐकायला लागलो. त्यामुळे मला माझ्या भूमिका कशा विकसित करायच्या ते समजले. मालिका माझे पहिले प्रेम. 

मग नाटक कसे चालू झाले?
'गोष्ट तशी गमतीची' हे माझे पहिले नाटक. मंगेश कदम आणि लीना भागवत हे दोघेही मातब्बर कलाकार. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, की मला त्यांच्याबरोबर माझ्याच वयाच्या मुलाची भूमिका करायला मिळाली. आजच्या घडीला त्याचे ३३५ प्रयोग झालेत आणि २० पुरस्कार मिळालेत, १० परदेश दौरे झाले. ते नाटक जगभर गाजतेय. आजच्या घडीला बुकिंग घेणारे व हाउसफुल असणारे असे नाटक क़्वचितच पाहायला मिळते.

तू येवढ्या कमी कालावधीत  दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपट ह्या तीनही माध्यमातून काम केलेस. तुला स्वतःला कशात जास्त समाधान मिळाले किंवा मिळते?
वन वे टिकेट हा भव्य चित्रपट, ज्याचे चित्रीकरण क्रूज़वर झालेय. युरोप मध्ये शूटिंग केलेय. देखणी स्टारकास्ट आहे, मी ह्याचा भाग होतो ह्याचा मला अभिमान वाटतो. तीनही क्षेत्रे आव्हानात्मक आणि मजेशीर आहेत. पण नाटकाचे थ्रिल वेगळे असते, लाईव्हची मजाच वेगळी. प्रतिसाद त्याक्षणी मिळतो ती गम्मत वेगळीच असते. नाटक सदैव अॅलर्ट राहायला शिकवते. वेगळं काही सतत करायला  खूप वाव असतो. प्रत्येक माध्यमाचे फायदे आणि तोटे वेगवेगळे असतात. मजाही वेगवेगळी असते.

नाटकात रिटेक होत नाही. असा कुठला प्रसंग आठवतोय का, की तुमच्या प्रसंगावधानामुळे तुम्ही वेळ निभावून नेलीत?
हो. आम्ही बरेचदा एकमेकांसाठी असे करतो. असे होते की कोणी एखादा वाक्य विसरला तर डोळ्यांनी खुणावतो किंवा खोकतो आणि त्याला सांगतो...tricks वापरतो. मला आठवतेय आमच्या नाटकामध्ये एक सीन आहे की बीचच्या प्रसंगानंतर टीपॉय खाली ठेवायचा असतो. पण तो एकदा ठेवायचा विसरला. lights आले. आईचे वाक्य आहे की कुणाल काय चाललेय? तेंव्हा मग मी addition घेतली की अग मी व्यायाम करत होतो म्हणून टीपॉय इकडे ठेवला. मग मी तो खाली ठेवला. जोर काढल्याच्या आवेशात तिच्याशी बोललो मग पुढचा सीन चालू केला. तर अशा गमतीजमती होत असतात म्हणून नाटक मला जास्त आवडते. मला सांगायला खूप छान वाटतेय की ,'गोष्ट तशी गमतीची-२' आता लिहून पूर्ण होतोय. सगळी तीच टीम आहे. मजा म्हणजे आता आमची वय वाढली असणार. त्या फेजच्या गमतीजमती तुम्हाला पाहायला मिळणार.
आम्ही अगदी उत्सुकतेने वाट पाहतोय त्या नाटकाची

आम्ही ऐकलेय की खूप छान स्वयंपाक करतोस. तुझ्या हाताला चव आहे. हेही ऐकले की तू आईच्या गावात' हे हॉटेल/रेस्टॉरंट चालू केलेस. हा आधीपासून डोक्यात प्लान होता का?  हे नाव कसे सुचले?
हो. मी रेस्टॉरंट पुण्यात चालू केलेय. मला पहिल्यापासून कुकिंगची आवड होतीच. मी आणि माझ्या भावानी २५ जणांसाठी स्वयंपाकही केला होता. माझे पदार्थ माझ्या घरच्यांना आवडतात. अजून एक म्हणजे बिझिनेसची भयंकर आवड. त्यामुळे हॉटेल हे स्वप्न आधीपासून होते. पण तेव्हा पैसे नव्हते. आता पैसे आले त्यामुळे ते पूर्ण करता आले. 'आईच्या गावात' हे नाव मला सात्विक वाटते. काही जणांना तो अपशब्द वाटतो. पण मला वाटते, आईच्या हातचे जेवण मिळते ते आईच्या गावात. मला वाटते, हा आजच्या तरुण पिढीचा शब्द आहे. आपल्याला खूप आवडले, की आपण म्हणतो ना आईच्या गावात. जेंव्हा मी हॉटेल काढायचे ठरवले तेव्हांच मी हेच नाव ठेवायचे हेही ठरवले होते, हेच नाव पाहिजे.
पण तू हे सगळे कसे जमवतोस? How do you manage everything so well?
आता हॉटेल आई-बाबा पाहतात. स्टाफ आहे हे सगळे करायला. जेंव्हा तुमच्या डोक्यात गोष्टी सुस्पष्ट (sorted)  असतात, की आपल्याला काय करायचेय, तेंव्हा त्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेता व गोष्टी त्याप्रमाणे घडत जातात. कशाला हो आणि कशाला नाही म्हणायचे हे पक्के ठरले की काही गोंधळ होत नाही. जेवढ्या गोष्टी तुम्हाला छान करता येतील तेवढ्या छान करायचा हा माझा कानमंत्र आहे. प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी मी करतो. माझा फार देवावर विश्वास नाही. माझ्या यशाचे श्रेय माझेच आणि माझ्या अपयशाचाही दोष माझाच असे मी मानतो. पूर्ण जबाबदारी माझी असे मला वाटते.

आम्हाला तू सगळे यशाबद्दल सांगितलेस हे सगळ सहजच झाले का? ( struggle?)
मी यश आणि अपयश सगळेच खूप एन्जॉय केले. सगळ्यानाच स्ट्रगल करायला लागतो तसा. मी पहिले दोन वर्षे सकाळी ६ वाजताची ट्रेन पकडून जनरल डब्ब्यात उभा राहून प्रवास केलाय. मुंबई - पुणे जाणे-येणे केलेय. आजकालच्या मुलांकडे गाडी असते, पैसा असतो, सगळेच असते पण स्ट्रगल पिरिअड नसतो त्यामुळे यशही क्षणभंगुर असते.

नवीन प्रोजेक्ट ? अजून कुठले क्षेत्र खुणावतेय?
मी खरतर बऱ्याच गोष्टी केल्या आयुष्यात. मी स्विमिंग, ट्रेकिंग, कविता, फोटोग्राफी, मास्टर्स, हॉटेल, अभिनय सगळेच केले. गाणे शिकायची इच्छा होती, जे शिकता नाही आले पण मी नुकतेच 'यारा' नावाचे गाणे म्हटले. तीही हौस पूर्ण झाली. तुम्ही तो व्हिडीओ जरूर पहा. ह्यापुढे काय करणार हे खरच माहित नाही. I may do production or direction.
पण नक्की काहीतरी surprise घेऊन येईन. मी महेश मांजरेकरांची एक फिल्म केली. त्याचे आत्ता नाव 'वाडा' असे आहे. Its suspense thriller. अतिशय वेगळ्या पद्धतीने ती फिल्म शूट झालीय आणि मराठीत बरेच दिवसांनी हा genre handle केलाय. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी ३ M बरोबर काम केलीत, सगळेच मात्तब्बर. महेश मांजरेकर- फिल्म, मंगेश कदम- नाटक आणि मंदार देवस्थळी- सीरिअल.

शशांक तू आम्हाला वेळ दिलास आणि खूप भरभरून आणि मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आम्ही तुझ्या अजून एका surprise ची वाट पाहतोय. तुझ्या सगळ्या भावी घौददौडीसाठी अनेक शुभेच्छा मनःपूर्वक आभार.

तुझी एखादी आवडती कविता आमच्यासाठी.....


A romantic duet by Deepika Jog and Shashank Ketkar 
Music : Hrishikesh, Saurabh, Jasrajlyrics : Vaibhav Joshi
Album: Yaara
मुलाखत आणि शब्दांकन
मंजिरी विवेक सबनीस

4 comments:

  1. छान जमून आलीये मुलाखत!! अशाच अजून खूप खूप मुलाखती वाचायला मिळुदेत...

    ReplyDelete
  2. मुलाखत मस्तच.बरेच पैैलु वाचायला मिळाले

    ReplyDelete
  3. आवर्जून कळविल्याबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete