

गणपती गेले, आता थोड्याच दिवसांत
नवरात्र सुरू होईल आणि सोशल मीडियावर देवीच्या विविध रूपांचे गुणगान सुरू होईल; सीता, सावित्री, द्रौपदी झालंच तर पद्मिनी, झाशीची राणी या देवीसमान सुपूज्य ठरलेल्या स्त्रियांचे कर्तृत्व आठवलं
जाईल. त्यात वावगं काहीच नाही. पण कुठेतरी खटकतं. या स्त्रियांना देव्हाऱ्यात बसवून त्यांना आसामान्यत्व देताना कुठेतरी
त्यांचं सामान्यत्व हिरावून तर नाही ना घेतलं? म्हणजे सीता काय देवी होती म्हणून तिला शक्य झालं, अशी टीप्पणी करायला
आपण मोकळे, नाही का? पण आपण हे सोयीस्कररित्या विसरतो की सीता देवी असली तरी रामावतारात रामाला
सामान्य मानव या मर्यादेतच राहून कार्य करायचे होते आणि म्हणून सीतेलाही तोच नियम लागू
होता. मानवी मर्यादांच्या सीमेत राहून तिने सामान्य मानवासारख्या हालअपेष्टा भोगल्या. राजकन्या असूनही दुहेरी वनवास भोगला. त्यामुळे तिचं असामान्यत्व
झळाळून उठलं हा महत्त्वाचा मुद्दा झाकोळला जातो.
हाच मुद्दा पुढे नेऊन मी असं म्हणेन की हा ‘स्त्री शक्तीचा’ उत्सव म्हणजे केवळ देव्हाऱ्यातील देवी मूर्तीची पूजा बांधणे असे नसून सामान्य परिस्थितीत स्वकर्तृत्वाने असामान्यत्व
मिळवलेल्या स्त्रियांची आठवण काढून त्यांचा गौरव करण्याचा सोहळा आहे. या सर्व पौराणिक, ऐतिहासिक कालखंडातील स्त्रियांचा आदर्श तर डोळ्यांसमोर ठेवायलाच हवा,
पण त्या बरोबरच आजच्या काळात आपल्याला अवतीभवती अशा कित्येक स्त्रिया दिसतात, धडपडत स्वतःची लढाई स्वबळावर लढत असलेल्या; भले त्या
राजकन्या नसतील, क्रांतिकारक, स्वातंत्र्ययोद्ध्या नसतील पण त्यांच्यासाठी, त्यांच्या घर संसारासाठी त्यांचा संघर्ष मोलाचाच आहे ना? देव कुणी पाहिला आहे हो? पण मी ठामपणे असं सांगू इच्छिते की मला माझ्या अवतीभवतीच रोजच्या दैनंदिन
जीवनात अशी कित्येक देवीची रूपं पहायला मिळाली आहेत, अजूनही बघायला मिळतात. आज तुम्हा सर्वांना त्या देवी रूपांचं दर्शन घडवण्याचा मोह आवरत नाहीये.
चला तर मग माझ्यासह दर्शनाला...
तीन मुलींच्यानंतर आता या खेपेला घराण्याला वारस
दिलास तरच तुला घरात घेईन, या सासरच्यांच्या, नवऱ्याच्या धमकीला न जुमानता, मुलगा वा मुलगी होणे हा तिचा दोष नाही हे कळण्याइतकी समज नसलेली, अडाणी, १०-१२ तासांच्या प्रसववेदनेला नुकतीच सामोरी गेलेली, आपल्या नवजात बालिकेला जपणं हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर
ठेवून आधीच्या तिघींसह घरदार सोडून जिद्दीने स्वतःची लढाई लढणारी ती माऊली - तिच्यातील आदिमातेचं
सृजनशक्तीचं हे रूप.


समोर असलेल्या चाळीसेक विद्यार्थ्यांना जीव
तोडून मेहनत घेऊन विद्येचं दान देऊन या जगात स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभं रहायला शिकवणारी शिक्षिका - सरस्वतीचंच साजिरं रूपच की!


आपल केवळ भलं व्हावं या उद्देशाने सल्ले देणारी, अभ्यासात मदत करणारी, शिकवणारी, प्रसंगी कान ओढून शिक्षा करणारी बहीण किंवा मैत्रीण – मंगला.

दिवसभर ऑफिसात घाण्याला जुंपलेल्या बैलागत
राबून, त्याहून थकवणारा लोकलचा प्रवास करून थकलीभागली घरी आलेली, लेकरांना त्यांच्या आवडीनिवडी जपत प्रेमानं खाऊ घालणारी
आणि लेकराने दोन घास जास्त खाल्ले तर समाधान पावणारी घराघरातील आई-आजी - म्हणजे शताक्षी अन्नपूर्णा.


वहिनी, तुम्हाला बरं नाही ना, आराम करा तुम्ही, मी करते.” म्हणत तिचं नसलेलं, आपल्या वाटचं काम स्वखुशीने अंगावर घेऊन करणारी, तेसुद्धा इतर अनेक घरांतील, स्वतःच्या घरचेही कामाचे घाणे उपसून अशी निरपेक्ष पाठिंबा देणारी घरकामातील मदतनीस - संकटातून तारून नेणारी - भद्रकाली.


स्वतः कितीही त्रास सोसून
लेकरांचं भलं इच्छिणारी, त्यांच्या काळजीपोटी रात्र जागून काढणारी, मुलांच्या चुका मोठ्या मनाने पदरात घालून माफ करणारी ही क्षमारूपिणी.




अन्याय, अत्याचार यांचा उद्रेक झाल्यावर रौद्र रूप धारण करून
प्रतिपक्षावर हल्ला करून त्याला नामोहरम करणारी - रणरागिणी दुर्गा - ती तर प्रत्येक स्तरावर लढाई करताना दिसतच असते आपल्याला.
ही वर उल्लेखलेली देवीची रूपं पाहिली आहेत ना तुम्हीही? खचितच पाहिली असतील, पण कदाचित ओळखता आली नसतील. आता झालीच आहे ओळख या प्रत्येक रूपाची, तर मग या प्रत्येक रूपाला सुपूज्य मानत आदराची वागणूक देऊयात ना? फक्त नवरात्रीत किंवा मदर्स डे ला नव्हे तर कायम. या रूपांकडे केवळ एक शक्तीरूप म्हणून न पाहता आईच्या मायेनं पाहिलंत तर ती सुद्धा वात्सल्यभावाने प्रतिपाळ करेल प्रत्येकाचा, कारण त्या आदिमातेचं वचन आहे, “माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत रहाते."
कांचन देशमुख
छान लिहीलंय. देव मुर्तीत नाही, तर माणसाच्या रुपात आपल्या आजुबाजुलाच वावरत असतो आणि निरनिराळ्या प्रसंगात आपल्या जवळचीच कुणी व्यक्ती होऊन साथ देत असतो, हे अगदी खरंय.
ReplyDelete