सौ. सुकन्या कुलकर्णी-मोने या एक प्रथितयश अभिनेत्री म्हणून सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. नाटक, सिनेमा आणि मालिका या तीनही माध्यमांमध्ये त्यांनी बरंच यश कमावलं आहे. मराठी, हिंदी, कन्नड या तीनही भाषांमध्ये काम केलं आहे. ‘शांती’ या भारतातल्या पहिल्या डेली सोप सिरिअलमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळली. बऱ्याच पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे दाखले दिले जातात. आपल्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध करून त्या घराघरात पोहोचल्या आहेत. बंगलोरला, येत्या १५ जानेवारीला त्या ‘सेल्फी’ या नाटकाद्वारे आपल्या भेटीला येत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा.
सुकन्याताई, शाळेपासूनच तुमचा अभिनयाचा प्रवास चालू झाला. ‘दुर्गा झाली गौरी’ पासून ते अगदी आता ‘व्हेंटिलेटर’पर्यंत. नाटक, सिनेमा, मालिका या तीनही माध्यमांत गेली ३५-४० वर्षं तुम्ही वावरता आहात. या सर्व प्रवासात तुम्ही कोणाला गुरुस्थानी मानता?
सुरुवातीला शाळेमध्ये विद्याताई पटवर्धन, सुलभाताई देशपांडे असं करता करता विजयाबाई मेहता, डॉ. लागू, वामन केंद्रे या सर्वांबरोबर काम केलं. हे सगळे माझे गुरू आहेत. त्यांच्याकडून जे काही शिकले ते आजही माझ्याबरोबर प्रवास करतंय. शिस्त, प्रामाणिकपणा, switch on and off करणं, अभिनय करताना खोटं खोटं करायचं असतं ते खरं भासवावं लागतं; त्याच्याशी एकरूप होता होता त्यातून बाहेर पडणं हे मी या लोकांकडून शिकले. डॉ. लागू यांच्याकडून शुद्ध भाषा, शिस्त शिकले. सगळ्यात महत्त्वाची माझी मोठी गुरू म्हणजे माझी आई. जीवनाकडे बघायची दृष्टी तिच्याकडून आली. कुठलंही काम करताना ते चांगलंच झालं पाहिजे हे तिच्याकडून शिकले. माझ्या आणखीन एक गुरू म्हणजे सुचेता भिडे-चाफेकर. त्यांच्याकडे मी १३ वर्षं भरतनाट्यम
शिकले.
तुमच्या चाहत्यांना तुमचे बोलके डोळे आवडतात, तुमच्या अभिनयाची ताकद तुमच्या बोलक्या डोळ्यांत आहे असं म्हणतात. परंतु या क्षेत्रातील मान्यवरांकडून तुमच्या अभिनयाला जी दाद मिळते, त्याविषयीच्या आठवणी शेअर कराल का?
बोलके डोळे कदाचित देवाची देणगी असावी किंवा माझ्या नृत्यामुळे आले असतील.मी ‘पतित पावनी‘ नावाची bilingual (कानडी-मराठी) फिल्म केली होती. एक असा सीन होता कि दुसऱ्या मुलीवर बलात्कार होत असताना मी तो फ़ुटक्या काचेतून बघते. माझ्या डोळ्यांवरून, माझ्या एक्स्प्रेशनवरून प्रेक्षकांना कळणार होतं की आतमध्ये काय चाललंय. अरुणा राजे यांनी सांगितलं की फक्त माझ्या डोळ्यांचाच क्लोजप घ्यायचाय. त्या छोट्याश्या रोलमधल्या अभिनयाची पावती म्हणून असेल कदाचित, मला कर्नाटक राज्य सरकारचा सह-अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तसंच ‘सरकारनामा’ फिल्ममधले दोन सीन एक्स्प्रेशनवर आधरित होते, त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. मला वाटतं बोलक्या डोळ्यांची ती पावती होती.‘लेकुरे उदंड झाली’ या नाटकात मी चक्क चार गाणी गायले आहे; मी गाणे शिकलेली नाही, पण माझ्या अपघातानंतर मी गाण्याचं धाडस केलं. ती चार गाणी अशोक पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली गायले. पु. ल. देशपांडे आलेले नाटक बघायला, त्यांनी माझ्या गाण्याचं कौतुक केलं. म्हणाले, “जे तुम्ही गाता त्या भावना आमच्यापर्यंत पोचतात, म्हणजे छान गाता.” माझ्यासाठी ही एक मोठी कॉम्प्लिमेंट होती.
मगाशी म्हटल्याप्रमाणे डॉ. लागू यांच्याकडून भाषा आणि शिस्त शिकल्यामुळे ‘ती फुलराणी’ करण्याची संधी मिळाली. पावती मिळत गेली. पु. लं.ना जर माझं ‘ती फुलराणी’ बघता आलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं. नवीन मुला-मुलींसाठी या नाटकात काम करणं हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे. विजयाबाई मेहता त्यांच्या शिबिरांमध्ये माझ्या ‘नागमंडल’ या नाटकातील अभिनयाचा, नृत्याचा अजूनही दाखला देतात, हेच माझं मोठं बक्षीस. या नाटकात नाग माझ्या अंगावर चढतो, फिरतो पण डसत नाही. हे सर्व मी माझ्या हाताने, अभिनयाने दाखविलं होतं, याचं कौतुक बाई अजूनही करतात; यापेक्षा अजून काय मोठं पारितोषिक हवं? माझं ‘सेल्फी’ नाटक जेव्हा त्या बघायला आल्या तेव्हा माझ्या आवाजाचं, प्रोजेक्शनचं कौतुक केलं. खूप समाधान वाटलं मला. एकदा ‘झुलवा’ नाटक संपल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे मला आतमध्ये भेटायला आल्या. शेवटच्या सीनमधल्या एक किलो हळदीच्या भंडाऱ्याने मी पूर्ण माखले होते. पण तरीही त्या म्हणाल्या, “बाळा, मला तुला घट्ट मिठी मारायची आहे, तुझ्या हळदीत मला माखून जाऊ दे.” त्या वेळी त्यांनी बक्षीस म्हणून दिलेली १०० रुपयांची नोट मी अजूनही माझ्याजवळ जपून ठेवली आहे.
खर सांगू का, मला खरं तर अभिनेत्री व्हायचंच नव्हतं, नृत्यांगना व्हायचं होतं. कारण भरतनाट्यमवर माझं अतिशय प्रेम. मला शिक्षिका व्हायचं होतं किंवा बँकेत नोकरी करायची होती. ही दोन्ही प्रोफ़ेशन्स अशी आहेत की मला माझं नृत्य सांभाळता आलं असतं. नृत्य अकादमी काढायची होती. पण मला झालेल्या अपघातामुळे मी नृत्य करू शकत नाही. म्हणून मी नाइलाजास्तव या क्षेत्रात उतरले. हे क्षेत्र मला स्वीकारावं लागलं. पण ५०% असं मला वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. या निमित्ताने मला अनेक माणसं भेटली. त्यांचा प्रभाव माझ्या आयुष्यावर नक्कीच आहे. खरं आहे.
त्या अपघातानंतर तुम्ही फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतलीत. एवढी पॉझिटिव्हिटी, बळ कसं मिळालं?
माझ्या आई-वडिलांची जिद्द. त्या अपघातानंतर माझी वाचा गेली होती, उजवी बाजू paralyse झाली होती, कंट्रोल गेले होते, वास येत नव्हता, चव नव्हती. माझी आई म्हणाली की तुला उभं राहायचं आहे. का माहीत नाही, पण तिला वाटायचं मी नाटक-सिनेमात काम करावं. मी आजारी असताना मला ती शिवाजी मंदिरला नेऊन आणायची. तिला वाटायचं की रंगमंचावर उभं राहण्याची जी शक्ती आहे ती तुम्हाला विलक्षण अनुभूती देऊन जाते. कदाचित ती पॉझिटिव्हिटी जी होती, तिने मला बरं केलं. माझ्या आईकडे भयंकर जिद्द आहे. तिने जिद्द दिली की, उठून उभं राहायचं आहे, जगात येऊन असंच मरायचं नाही. कुठेतरी आपलं नाव लिहिलं गेलं पाहिजे. माझ्या पैशांवर माझं घर कधीच अवलंबून नव्हतं. पण माझ्याकडे जे आहे ते मी करावं असं तिला वाटत होतं.मला वाटतं, त्यांनी जास्त ओळखलं होतं की तुमची ताकद कशात आहे. असावं कदाचित. माझी आई आज ८३ वर्षांची हिंडतीफिरती आहे. सासूबाई गेल्यानंतर आज मला आईचाच
पाठिंबा आहे. आई म्हणाली, “मुलीला बाईच्या जिवावर ठेवायचं नाही, जोपर्यंत मी आणि तुझी वहिनी आहोत तोपर्यंत तुझी मुलगी आमच्याकडे राहणार.” त्यामुळे मी बिनधास्त त्यांच्या जिवावर दौरे, शुटींग करू शकते.
तुमच्या मनावर ठसा उमटविणारी एखादी भूमिका, म्हणून कोणती सांगाल?
ज्या भूमिका मला आवडल्या नं, त्याच माझ्याकडून केल्या गेल्या. कुठे तरी माझ्याच नशिबी होत्या म्हणून माझ्याकडे आल्या. ‘झुलवा’, ‘कुसुम मनोहर लेले’ यासारखी नाटकं असू देत किंवा ‘व्हेंटिलेटर’मधली सारिका असू दे, त्या भूमिका माझ्याच होत्या.
खरं तर ‘आभाळमाया’ मालिका ही तर दोन मुलींची कथा होती, पण ती कधी सुधा जोशी आणि तिच्या पतीची झाली ते आम्हालाच कळलं नाही. कर्तृत्व तर आहेच, पण नशिबाची जोडही लागते. नशिबाला मी मानते. जास्तीत जास्त चांगली माणूस आणि नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत असते. ‘व्हेंटिलेटर’मधला रोल मीच करावा असा मला आग्रह केला गेला म्हणून मी तो केला आणि लोकांना तो आवडला. कॉलेजच्या जीवनात असताना ‘झुलवा’ने माझ्या वर परिणाम केला होता. ‘कुसुम मनोहर लेले’ हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं नाटक होतं, कारण त्या नाटकाने मला माझा जोडीदार मिळाला. पॉझिटिव्हली म्हणून जर कोणी परिणाम केला माझ्यावर तर तो आभाळमाया’ मधली कणखर, practical, प्रेमळ सुधा जोशी आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’मधली प्रेमळ, क्षमाशील माई यांनी.
खरं तर ‘आभाळमाया’ मालिका ही तर दोन मुलींची कथा होती, पण ती कधी सुधा जोशी आणि तिच्या पतीची झाली ते आम्हालाच कळलं नाही. कर्तृत्व तर आहेच, पण नशिबाची जोडही लागते. नशिबाला मी मानते. जास्तीत जास्त चांगली माणूस आणि नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत असते. ‘व्हेंटिलेटर’मधला रोल मीच करावा असा मला आग्रह केला गेला म्हणून मी तो केला आणि लोकांना तो आवडला. कॉलेजच्या जीवनात असताना ‘झुलवा’ने माझ्या वर परिणाम केला होता. ‘कुसुम मनोहर लेले’ हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं नाटक होतं, कारण त्या नाटकाने मला माझा जोडीदार मिळाला. पॉझिटिव्हली म्हणून जर कोणी परिणाम केला माझ्यावर तर तो आभाळमाया’ मधली कणखर, practical, प्रेमळ सुधा जोशी आणि ‘जुळून येती रेशीमगाठी’मधली प्रेमळ, क्षमाशील माई यांनी.
आताच तुम्ही ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाचा उल्लेख केलात. अंगावर काटा आणणारा दाहक असा विषय होता. ते नाटक करताना मानसिक त्रास कितपत झाला?
हो, झाला ना.
हो, झाला ना.
पण पहिल्या दहा प्रयोगांत फारसं जाणवलं नाही. नवीन नाटक होतं. या नाटकामध्ये गिरीश ओक आणि संजय मोने यांनी एक वेगळा प्रयोग केला होता – एकमेकांची भूमिका आलटून पालटून करण्याचा. त्यामुळे प्रत्येक प्रयोगात माझी सुजाता वेगळी व्हायची. या एक्स्परिमेंटमध्ये पहिले प्रयोग होत गेले. पण नंतर खरोखर अशा सुजाता आम्हाला भेटत गेल्या. त्या विषयामधली दाहकता आम्हाला कळायला लागली. हे नुसतं नाटक नाहीये, तर आपल्या आजूबाजूला हे घडतंय. मग असं वाटलं, आपण चांगलं काम करतोय की त्यांच्याच दु:खांना उजाळा देतोय? लक्षात आलं की नाही, मुली शहाण्या होत आहेत, त्यांना वाट मिळत्येय मोकळं व्हायची. परिसंवादातून अनेक जण भेटत गेले, गोष्टी उलगडत गेल्या. या नाटकात मनोहरच्या तोंडी एक वाक्य आहे, “एक रुमाल घेतानासुद्धा तुम्ही १० रुमाल बघता आणि त्यातून एक निवडता. तर आपला जोडीदार निवडताना कसं आंधळेपणे प्रेम करता?” हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. असं म्हणतात की प्रेम आंधळं असतं, पण आज तुम्ही डोळसपणेच प्रेम केलं पाहिजे. मुलींनी आजच्या जगात practical विचार केलाच पाहिजे.
प्र. के. अत्रे यांच्या ‘घराबाहेर’मधली बंडखोर स्त्री, ‘चारचौघी’मधल्या चार जणी आणि आता ‘सेल्फी’ मधल्या पाच जणी. या बदलत्या नायिकाप्रधान व्यक्तिरेखांकडे बघताना काय सांगाल?
मला वाटतं की हे एक दुष्टचक्र आहे. जे समाजात घडतं ते नाटककार दाखवतो किंवा नाटककाराला वाटतं की समाजाने असं वागावं ते तो दाखवत असतो. कुठे ना कुठे तरी हे खरं आहे. आजची स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वेगवेगळ्या स्तरांवर काम करतेय. तरीसुद्धा तिचं घर, चूल, मूल काही बदलत नाही. त्याच्यापासून ती दूर जाऊ शकत नाही. मला वाटतं, तिचा तो स्थायी भाव आहे. मी काय केलं म्हणजे घरातील लोक आनंदी राहतील याचा ती विचार करत असते. तरीही आजची स्त्री बदलत आहे, पण बदलताना तिने तिचा स्वभावधर्म बदलता कामा नये. स्वैराचार आणि स्वातंत्र्य यामध्ये एक बारीक लाईन आहे, ती तिने समजून घेतली पाहिजे. आपले संस्कार विसरून परदेशातल्या संस्कृतीला, चुकीच्या परंपरेला आहारी जातो. मुलांना फास्टफूड देतो. चौरस आहारापासून त्यांना दूर नेतो. आजची स्त्री बदलती आहे, नव्हे तिने बदलायलाच हवे. तिला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तिला कळतंय तिच्या काय मर्यादा आहेत, त्या तिने ओलांडलेल्या नाहीत. प्रत्येक मर्यादेची रेष फक्त स्त्रियांनाच का पुरुषांना का नाही? त्याने का बेबंद, बेधुंद वागायचे? जर स्त्री-पुरुष समानता मानता, स्त्रीने नोकरी करावी, पैसा आणावा, असा आग्रह धरता तर जे नियम पुरुषाला लागू आहेत ते स्त्रीला का नाही?
प्रत्येक माध्यमाची बलस्थानं वेगळी आहेत. नाटकामध्ये प्रोजेक्शनची गरज असते. जी मुलं मालिकांतून नाटकात काम करायला येतात त्यांना फार कठीण जातं. लाऊड अभिनय, लाऊड मेकअप, टोनिंग, चालण्याची पद्धत सर्वच वेगळं असतं. एक प्रवेश संपला की त्या अंधारात कपडे, हेअर स्टाइल, मूड सगळं चेंज करायचं असतं. नाटकाला महिना महिना तालीम करून उभं राहावं लागतं. सिनेमाचा कॅन्वस मोठा असतो. तिथे रिटेक झाले तरी डिटेलिंग खूप असतं. glamour असतं. सिनेमामध्ये कोट्यवधी रुपये लागलेले असतात.मालिकेमध्ये एका दिवसात एक भाग संपवायचा असतो. आयत्या वेळी सीन पाठ करावे लागतात. आकलनशक्ती चांगली असायला पाहिजे. चटकन समजलं की कमी गोंधळ उडतो. रोज एपिसोड द्यायचे असतात. लेखकांनासुद्धा फ़्रेश राहावं लागतं. सिनेमा आणि नाटकामध्ये तुम्हाला तीन तासांमध्ये अख्खी गोष्ट कळते, सुरुवात-मध्य-शेवट कळतो, पण मालिकेमध्ये प्रत्येक भागामध्ये हे द्यावं लागतं, त्यासाठी उद्या काय घडणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण करावी लागते, त्यामुळे हे गणित कठीण आहे, नाहीतर मालिका बंद पडायचा धोका असतो. ही इंडस्ट्री वेगळी आहे.
थोडक्यात, कुठलंच माध्यम सोपं नाही. प्रत्येक माध्यमात अनेकांचे परिश्रम त्यामागे
असतात.
या क्षेत्रातल्या तुम्हाला खटकणाऱ्या किंवा तुम्हाला बदल कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी कुठल्या? कुठल्या गोष्टी आवडतात ते पण सांगा.
आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे आम्ही कॉम्प्रमाईज करू शकतो. ती सवय लागलेली असते. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन राहू शकतो. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची आमची क्षमता जास्त असते. एका आयुष्यात खूप वेगवेगळी कॅरेक्टर्स बघितलेली असतात. या क्षेत्रातली माणसंही विभिन्न प्रकारची असतात. अगदी स्पॉटबॉय, स्वीपर, लाईटमनपासून ते ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री यांच्यापर्यंत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय कमावलंय आणि गमावलंय ते ऐकायला मिळतं. दोन वेळचा चहा आणि दोन वेळेचं जेवण स्पॉटबॉयसाठी किती महत्त्वाचं असतं आणि त्यात तो किती आनंदी असतो ते शिकायला मिळतं. छान छान कपडे, दागिने घालायला मिळतात. वेगळ्या प्रकारचे मेकअप करायला मिळतात. एक प्रकारचा कॉन्फ़िडन्स मिळतो. भूमिकेच्या अभ्यासामुळे चांगल्या गोष्टी वाचायला मिळतात, वाचनाची गोडी निर्माण होते. प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला बोलावलं जातं, त्यामुळे त्या निमित्ताने सिंधुताई सपकाळ, डॉ. विकास आमटे, डॉ. प्रकाश आमटे यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या व्यक्तींची भेट होते. ध्यानीमनीसुद्धा नसतं आणि ती व्यक्ती समोर असते. ओळखी वाढतात. चार लोकांमध्ये जाऊन आपला मुद्दा ठामपणे मांडण्याचा कॉन्फ़िडन्स मिळतो. हे सर्व या क्षेत्रामुळे मला मिळालं आहे असं मला वाटतं.आता दोष म्हणशील तर या इंडस्ट्रीमध्ये शिस्त नाहीये. पैसे कधी वेळेवर येतात, कधी नाही. कधी कधी येतही नाहीत. आम्हाला सोडून द्यावे लागतात. आजकाल मराठी कलाकार संघाने, अखिल भारतीय नाट्य परिषदेने यात काम करायला सुरुवात केली आहे.
कलाकारांचा विमा नसतो, म्हातारपणी त्यांच्याकडे बघणारं कोणी नसतं. ते कधी जातात तेही कधी कधी कळत नाही. आताशा विमा काढला जातो. पण हॉस्पिटल्सशी संलग्नता असेल तर बरं पडतं. एखाद्या कलाकाराला कॅन्सर झाला आहे, वयामुळे आजारपण आलं आहे, अशा वेळी शुश्रूषा करण्यासाठी पैसे गोळा करायला लागतात, असं होता कामा नये. थिएटरची अवस्था, मेकअपरूम, toilets चांगली नसतात. थिएटरमध्ये शिस्त नाही. मोबाइल बंद करा सांगूनसुद्धा चालू असतात, लहान मुलं खेळत असतात. नाटक सुरू झाल्यावर प्रेक्षक येतात. अरे, ट्राफ़िक सगळीकडे असतो. तेवढा वेळ हातात ठेवून बाहेर पडा. हिंदी चित्रपट, हिंदी सिरीयलसाठी 'CIINTA' नावाचं कार्ड असतं. नाटकामधल्या कलाकारांसाठी असं कार्ड हवं. याचे जर मेंबर असाल तर सुविधांचा लाभ घेता येतो या कार्डावर. याचे जर तुम्ही मेंबर नसाल तर तुम्हाला काम करता येणार नाही. मराठी भाषेत काम करायचं असेल तर नवीन मुलं भाषेवर कामच करत नाहीत. आणखीन म्हणजे मुळात ‘वेळेचं बंधन’ कलाकाराला घातलं पाहिजे. जर आयुष्यभर काम करायचं असेल तर तब्येत चांगली हवी, मानसिक संतुलन गरजेचं आहे. आयुष्यात स्थैर्य आलं पाहिजे. स्थैर्यासाठी सगळी दिवस-रात्र काम करतात आणि आयुष्य कमी होतं. या सर्व गोष्टी खटकतात.
पॉवर nap. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा डोळे मिटून शांत बसते. मेडिटेशन करते. माझे गुरू ‘संजय गोडबोले’ यांनी मला दीक्षा दिली आहे. हल्लीची मुलं जरा वेळ मिळाला की मोबाइल हातात घेतात आणि facebook, whatsapp वर असतात. त्यांनी जर शांत बसण्याचा एक्सरसाईज केला तर त्यांना पुढच्या आयुष्यात जास्त उपयोग होईल. एनर्जी रिगेन करायला मी आनंदी राहते. व्याधी असतातच; हात दुखतात, कंबर दुखते, तरीसुद्धा मी आलेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेते, त्यामुळे व्याधी विसरते.
मोकळ्या वेळी काय करायला आवडतं? Relax होण्यासाठी?
माझ्या मुलीबरोबर गप्पा मारणं. जास्तीत जास्त वेळ मी माझ्या आईबरोबर, मुलीबरोबर असते. उठसूठ शॉपिंग करायला आवडत नाही, mall मध्ये फिरत बसत नाही. माझ्या घरात रहायला मला आवडतं. उलट घरात राहून इतर वेळी कोंबलेलं कपाट साफ करायला आवडतं. वेगवेगळे पदार्थ करून सगळ्यांना खायला घालायला आवडतात.माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला काहीही करता येत नव्हतं. माझ्या नवऱ्याने व सासूबाईंनी शिकवलं सगळं. माझ्या लेकीमुळे मला याच्यात जास्त आवड निर्माण झाली. उगाचच कोणाच्या तरी घरी जाऊन गप्पाच मारत बसले किंवा किटी पार्टीज मला नाही आवडत. मित्र-मैत्रिणींबरोबर लंच पार्टीज करायला आवडतात. लेकीसाठी माझा जास्तीत जास्त वेळ राखीव असतो. ती कधीहि भुर्रकन दुसऱ्या देशात उडून जाईल शिक्षणासाठी. तेव्हा तिच्याबरोबर, नवऱ्याबरोबर, आईबरोबर, माझ्या लोकांबरोबर वेळ घालवायला आवडतो.
माझ्या मुलीबरोबर गप्पा मारणं. जास्तीत जास्त वेळ मी माझ्या आईबरोबर, मुलीबरोबर असते. उठसूठ शॉपिंग करायला आवडत नाही, mall मध्ये फिरत बसत नाही. माझ्या घरात रहायला मला आवडतं. उलट घरात राहून इतर वेळी कोंबलेलं कपाट साफ करायला आवडतं. वेगवेगळे पदार्थ करून सगळ्यांना खायला घालायला आवडतात.माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला काहीही करता येत नव्हतं. माझ्या नवऱ्याने व सासूबाईंनी शिकवलं सगळं. माझ्या लेकीमुळे मला याच्यात जास्त आवड निर्माण झाली. उगाचच कोणाच्या तरी घरी जाऊन गप्पाच मारत बसले किंवा किटी पार्टीज मला नाही आवडत. मित्र-मैत्रिणींबरोबर लंच पार्टीज करायला आवडतात. लेकीसाठी माझा जास्तीत जास्त वेळ राखीव असतो. ती कधीहि भुर्रकन दुसऱ्या देशात उडून जाईल शिक्षणासाठी. तेव्हा तिच्याबरोबर, नवऱ्याबरोबर, आईबरोबर, माझ्या लोकांबरोबर वेळ घालवायला आवडतो.
दिग्दर्शिका / निर्माती / उद्योजिका किंवा तत्सम काही... असं कुठलं क्षेत्र तुम्हाला खुणावतंय? तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचा काय मानस आहे?
या सगळ्या गोष्टी आहेत, नाही असं नाही. पण मला वाटतं की जोपर्यंत माझ्या लेकीला, ज्युलियाला माझी गरज आहे तोपर्यंत मी काम करत राहीन. उद्या ती जेव्हा स्वावलंबी होईल त्या वेळी मी आणि संजय वेगवेगळ्या क्षेत्रांत जाऊ. मला अध्यात्माची ओढ आहे त्यामुळे मी कदाचित माझ्या गुरूंकडे जाईन किंवा NGO join करेन. ‘Cancer Patients Aid Association’ किंवा ‘आव्हान पालक संघ’, जिथे मेण्टली challenged मुली आहेत, या संस्थांशी मी संलग्न आहे. या संस्थांमध्ये मी नेहमी जात असते, तिथे जाईन. त्यांना माझा वेळ देईन. एक निश्चितच आहे की एक फिल्म प्रोड्युस करायची आहे, जी माझ्यासाठी संजयनी लिहिलेली असेल. ते नक्कीच आवडेल. मानसिक स्थैर्य, शांतता मिळेल अशा ठिकाणी मी जाईन. मला माहिती नाही आत्ता. किंवा आमची ज्युलिया सेटल होईल तिथे जाऊ आम्ही दोघं.
संजय सर, ज्युलिया आणि तुम्ही, तुमच्या तिघांच्या जीवनातला एक अविस्मरणीय प्रसंग आमच्याशी शेअर करायला आवडेल का?
निश्चितच. दोन वर्षांपूर्वी ज्युलियानी सांगितलं, “मला माझा वाढदिवस साजरा करायचा नाहीये माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर. आपण बाहेरही जेवायला जायचं नाही. मनात आलं की आपण बाहेर जेवायला जातो, खरेदी करतो, मग वाढदिवसाचं विशेष असं काय?” सुरुवातीला मला ते शाळेतल्या मुलांचं fad वाटलं. पण नंतर म्हणाली की मला ‘आव्हान पालक संघ’ (mentally challenged मुलींच्या पालकांचा) संस्थेमधल्या मैत्रिणींबरोबर साजरा करायचा आहे. मग तिथल्या मावशीला विचारून आव्हानमधल्या मुलींना आवडणारा खाऊ घेऊन आम्ही तिथे गेलो. पूर्ण दिवस आम्ही त्यांच्याबरोबर मज्जा केली. तिने गाणी म्हटलीन त्यांच्याबरोबर. त्या मुली तिथे जे काम करतात ते काम त्यांच्याबरोबर तिने केलंन. वाढदिवसाला स्वतःसाठी तिने काहीही खरेदी केली नाही. उलट दरवर्षी मित्रमैत्रिणी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याबरोबरच्या लंच पार्टीला जितका खर्च येतो तितकी देणगी दोन संस्थांना तिने द्यायला लावलीन. तिचं आत्तापासूनच ठरलं आहे की animal psychology जर भारतात शिकायची सोय नसेल तर ती परदेशात शिकणार, पण नंतर भारतात परत येणार आणि हेमलकसा किंवा अजून कुठल्या संस्थेला join होणार. ही गोष्ट आयुष्यभर आमच्या लक्षात राहणारी आहे. इतक्या लहान वयात आमच्या मुलीच्या मनात हा विचार आला म्हणून लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे.
आठवीतल्या मुलीला असं वाटणं ही खरोखर आई-वडिलांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. घरातील वातावरण, अपब्रिंगिंग याचा मोठा वाटा असतो.
आम्ही ज्युलियाला नेहमी सांगत आलो की आपण lavish घरात राहत नसू, खूप श्रीमंत नसू, पण एवढं मात्र नक्की आहे की तू जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलीस तरी झोपायला बेड आणि जेवायला दोन वेळचं नक्कीच मिळेल, एवढी माणसं आम्ही दोघांनीही गोळा केली आहेत. हीच आमची कमाई आहे.
सुकन्याताई, या क्षेत्रात अभिनयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्था/कार्यशाळा
अस्तित्वात असताना फारच कमी जण यातून पुढे येताना दिसतात. काय कारण असावं असं वाटतं?
मुलं प्रथम आकर्षण म्हणून जातात. शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन बाहेर येतात तेव्हा वास्तव जग आणि शिकलेली थिअरी याचा कुठेतरी मेळ बसत नाही असं वाटतं. दोन्हीचा मेळ घालता आला पाहिजे. कॅालेजमध्ये आपण जे शिक्षण घेतलं ते किती वेळा आपल्याला उपयोगी पडतं? खूपच कमी. मुलांना पाहिजे ते शिकण्यासाठी जे पोषक विषय आहेत त्याचंच शिक्षण दिलं गेलं पाहिजे. शान्तिवनसारख्या शाळांची आज गरज आहे. जेव्हा या क्षेत्रात काम करायला मुलं येतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा मोठ्या असतात. फक्त glamour त्यांना दिसतं. प्रत्यक्षात इथे जे घडतं त्यामुळे त्यांचा गोंधळ उडतो. प्रत्यक्षात जाऊन तुम्हाला काय करायचं आहे त्याची त्यांना कल्पनाच दिलेली नसते. खरं स्वरूप मग कळतं. कष्टांची कल्पनाच नसते. आम्ही जरी या क्षेत्रात असलो तरी आम्ही स्वतःला सर्वसामान्यच समजतो. आमचं रहाणीमान आम्ही असं ठेवलं आहे की जे
आम्हाला आयुष्यभर कंटिन्यू करता येईल.
१५ जानेवारीला, तुम्ही 'सेल्फी' नाटकाद्वारे बंगलोरच्या प्रेक्षकांना भेट द्यायला
अरे, खूपच छान. मुळात मला बंगलोर शहर खूप आवडतं. मागच्या वेळी Family Drama नाटकाच्या वेळी आले होते, तेव्हा वेळेअभावी फिरायला मिळालं नाही. या वेळीही मिळेल असं वाटत नाही. मला खरंच कमाल वाटते की तिथे राहूनसुद्धा तुम्ही मराठीपण जपताय. तुम्हाला असं वाटतं की मराठी नाटकं तिथे यायला हवीत. तुम्ही खूप कष्ट घेताय नाटक तिथे होण्यासाठी. खरंच कौतुकास्पद आहे. असंच मराठीपण जपत रहा. 'Family Drama' नाटकाच्या वेळी तर माझी नाटकातल्या costumeची bagच मुंबई-बंगलोर प्रवासात हरवली होती. तुमच्याच मित्रमंडळातल्या बायकांनी मला साड्या-ड्रेस दिले होते. खूपच सहकार्य केलं होतं मला. ही आठवण मला कायम लक्षात राहिली आहे.
आता नवीन कुठले प्रोजेक्टस येत आहेत?
‘ती सध्या करते काय?’ हा माझा सिनेमा ६ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. सतीश राजवाडे
यांनी दिग्दर्शन केलं आहे. मी आणि संजय एकत्र दिसणार आहोत यात. आम्ही नाटकात एकत्र काम केलंय या आधी. पण सिनेमात पहिल्यांदाच एकत्र येतोय.
सुकन्याताई, तुम्ही वेळात वेळ काढून खूप मोकळेपणाने मस्त गप्पा मारल्यात.
बोलता बोलता बरंच काही शिकवून गेलात. त्याबद्दल मनापासून आभार! तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आणि रसिकांचं तुमच्यावरील प्रेम असंच उत्तरोत्तर वाढत जावो ही सदिच्छा!
-- रुपाली गोखले
-- रुपाली गोखले
नाटक पाहायला सर्वजण जरूर या
रूपाली, खूप छान लिहिलंयस,सुकन्या
ReplyDeleteRupali
ReplyDeleteKhup chaan interview
--manjiri
वैज्ञानिक जसे की जयंत नारळीकर, रघुनाथ माशेलकर; सैन्य क्षेत्रातील; खेळाडू; व्यंग चित्रकार जसे शी. द. फडणीस इत्यादी इतर क्षेत्रातील मराठी मान्यवरांच्या सुद्धा मुलाखती घेऊन त्या इथे प्रसिद्ध कराव्यात अशी नम्र विनंती ��
DeleteMavshi Chan questions vicharles tu. :)
ReplyDelete