सुजलाम सुफलाम असा
आपला भारत देश. त्याचे जगाच्या नकाशातील स्थान लक्षात घेता, उत्तरेला उभी असलेली हिमालय पर्वताची भिंत त्याचे अति थंडीपासून संरक्षण करते. नैऋत्य मोसमी वारे हिमालय आणि भारतातील इतर पर्वतरांगांमुळे अडवले जातात आणि चार महिने या भूमीला पावसाचे भरभरून वरदान मिळते. हेच कारण आपली भारत भू 'सुजलाम सुफलाम' असण्याचे. पुरातन कालापासून अन्नधान्य, पिके, फळे, फुले अशा नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त अशा आपल्या देशात, हजारो वर्षांपासून अनेकानेक संस्कृती उदयाला आल्या, नांदल्या आणि नैसर्गिक आपत्तींमुळे विलयालाही गेल्या. या कैक
मानवसमूहांची स्थल, कालानुरूप आखीव रेखीव जीवनपद्धती
होती. योजनाबद्ध आराखडा होता.
भरपूर शुद्ध हवा, पाणी, सूर्यप्रकाश, नियमित अंतराने बदलणारे ऋतुचक्र, त्यानुसार पडणारा पाऊस, पॄथ्वीचे स्वतःच्या आसाभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरणे या आणि
अशा अनेक घटनांमागील कारणे त्या वेळच्या मानव समूहाला आज इतकी व्यवस्थित अवगत नसली
तरीही त्यांचे अन्योन्यसाधारण महत्त्व त्यांना ठाऊक होते. हे सारे आवश्यकतेनुसार
देणारी, सॄष्टीचे नियमन करणारी एक अज्ञात अशी
शक्ती आहे, जिच्या आधारेच आपले जीवन शक्य आहे या निष्कर्षापर्यंत मानव पोचला.
साहजिकच मग या शक्तीप्रती, निसर्गातील आपल्याला अनुकूल ठरलेल्या
घटकांप्रती कॄतज्ञता व्यक्त करण्याच्या त्याच्या भावनेतून पूजा-अर्चा, सण, उत्सव हे जन्मास आले.
प्रत्येक स्थानाला
लाभलेला भौगोलिक वारसा लक्षात घेता त्या-त्या स्थानी तशीच अन्नधान्ये, पिके निघू लागली. या शेतातून उगवणार्या
धान्यांत जसं वैविध्य तसंच वैविध्य मग प्रदेशानुरूप साजरे
करण्यात येत असलेल्या सणांत आले. मात्र त्यामागची भावना ही पिढ्यानुपिढ्या तीच
राहिली, कॄतज्ञतेचीच! अगदी उदाहरणच द्यायचं
झालं तर आता नुकत्याच येऊन गेलेल्या दिवाळीचेच देता येईल. शेतीत पिकलेले धान्य कापणी होऊन
घरात आले, ते विकून घरात पैसा खुळखुळू लागला की
त्या सुमारास येतो दिवाळीचा सण. हे सारे देणार्या
देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. तसंच त्यानंतर काही महिन्यांत येणारा संक्रांत
हा महाराष्ट्रातील आणि दक्षिणेकडील पोंगल हे सण देखील असेच कापणीनंतर येणारे; आणि म्हणून ते धान्य, कणसं हेच देवाला अर्पण केलं जातं मॄत्तिकेच्या घड्यातून. मृत्तिकाच का? तर ती माती, काळी आईच हे सारं शेत धारण करते, त्यामुळे तिलाही पूजाविधीत मानाचे स्थान दिले जाते.
या आणि अशाच परंपरेने चालत आलेल्या भारतीय सणांमागे अशी नतमस्तक होण्याची
भावना आहे. तसंच निसर्गाने जे भरभरुन दिलंय त्याची जाणीव ठेवून पूजा करणे म्हणजेच
ते अबाधित राखण्यासाठी हातभार लावणे, हाही हेतू या सणांमागे असावा. जे मिळतंय ते म्हणजे आपला हक्क समजून
केवळ ओरबाडून घ्यायचं नाही, तर त्याची, त्याच स्थितीत जोपासना करून हा ठेवा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचे योगदान देणे हे देखील
यात अंतर्भूत आहेच. इथेच मानवाला पूर्वापार असलेली पर्यावरणाची जाण, त्याचे महत्त्व अधोरेखित होते.
मात्र हे सारे सण, उत्सव यांमागची मूळ भावना कितीही उदात्त असली, नम्रतेची असली तरी हे सारे ज्ञान लिखित स्वरूपात संग्राह्य नव्हते, किंबहुना लेखन कला उदयास येण्याच्याही कित्येक वर्षे आधीपासून हे
सारे सण साजरे होत असावेत. हा वारसा मग मौखिक परंपरेतूनच पुढच्या पिढीला दिला
गेला. काळपरत्वे मग यांतील काही भाग अनवधानाने तर क्वचित मुद्दाम हातचं राखून ठेवण्याच्या
भावनेतून गाळला गेला. कधी सोय बघण्यासाठी तर कधी स्वार्थ जपण्यासाठी काही मुळात
नसलेल्या, चुकीच्या गोष्टी, कर्मकांडे यांत घुसडली गेली. या सर्वांची पिढी दर पिढी घुसळण होत
काही विचित्र प्रघात पडत गेले आणि ते 'शास्त्र' या नावाखाली पुरुषप्रधान संस्कॄतीकडून
जपले/वाढवले गेले. हे सारे होत असतानाच जातिधर्म, उच्चनीच असा भेद, स्त्रियांना दुय्यम वागणूक हे येत गेलं.
उदाहरण म्हणून
सांगायचं तर अग्निपूजक असलेले आर्य भारतात आले ते आपल्यासोबत अग्नी घेऊन. ते सूर्योपासक होते. यज्ञविधीद्वारे आपली प्रार्थना आकाशस्थ देवतांना
पोहोचते या भावनेतून त्यांनी यज्ञ परंपरा जोपासली. परंतु अनेक वर्षांनी यज्ञात
अजाण अशा प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा रूढ झाली. खरे तर सारीच देवाची लेकरे, मग
त्या मुक्या जीवाचा बळी देव स्वीकारेल का? असा सूज्ञ विचार केला गेला नाही.
पूर्वापार चालत
आलेला वटसावित्रीचा सण/व्रत. सावित्रीची कथा खरी होती की नाही हा मुद्दा बाजूला ठेवू.
पण वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे अचेतन शरीर ठेवले होते; सावित्री यमाच्या मागोमाग जाऊन त्याला प्रसन्न करून पतीचे प्राण परत घेऊन आली, या कथेत दडलेले शास्त्रोक्त सत्य हे आहे
की वडाच्या झाडाची प्राणवायू उत्सर्जनाची क्षमता इतर
झाडांच्या तुलनेत खूप जास्त असते. कदाचित जीव गुदमरत असताना सत्यवानाला हा नैसर्गिक प्राणवायूच तारून गेला असावा का? वटवॄक्षाची माती आणि त्यायोगे जमिनीतील पाणी धरून ठेवण्याची क्षमता
अधिक असल्यामुळे त्याच्या आडोशात अनेक लहान झाडेझुडपे पाण्याशिवाय वाढू शकतात. हे वटवृक्षाचे गुण हेरूनच आपल्या पूर्वजांनी त्याला 'सुपूज्य' बनवला असावा का? याच पूर्वजांनी सावित्रीच्या कथेची आठवण म्हणून वटवॄक्षाची पूजा करण्यास
सांगितले. आदल्या दिवशी वडाची एक फांदी तोडून घरी पूजा करून दुसर्या दिवशी ती
फांदी कचर्यात फेकण्यास नव्हते सांगितले. ही नंतरच्या पिढ्यांनी स्वतःची सोय बघून
काढलेली युक्ती आहे. विशेषतः स्त्रिया जेव्हा नोकरी करू लागल्या, त्या पिढीत घाईघाईत सारी व्रतवैकल्ये, सणवार उरकण्याकडे कल दिसू लागला आणि ही पळवाट सापडली. आज मात्र हीच
प्रथा झाली आहे. शहरात कोण आणि कशाला वडाचे झाड शोधतोय? बाजारात येतात की रासभर फांद्या विकायला, पण त्यामुळे या सणामागचा मूळ उद्देश ‘वटवॄक्षाप्रती कॄतज्ञता’ हाच र्हास
पावतोय याची जाणीव व्हायला त्यानंतरही अनेक वर्षे जावी लागली.
जागतिक तापमानवाढीचे भयावह परिणाम समोर दिसत असतांना हे असे वडाच्या फांद्या कापणे कितपत सयुक्तिक आहे? एका मुंबई शहरातील बाजारपेठांमध्ये या फांद्या विकण्यास पाठवताना किती वटवॄक्षांची कत्तल झाली असावी? याचा विचार गंभीरपणे करायची वेळ आली आहे. आज अनेक संस्था एकत्र येऊन या दिवशी वटवॄक्षाचे रोपण करतात. हीच खरी वटपौर्णिमा नाही का? मी कागदावर वडाच्या फांदीचे चित्र काढून, रंगवून त्याचीच पूजा करते.
हीच गोष्ट दसर्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांची. माझ्या सासूबाई सरळ हिरव्या कार्डपेपरवर आपट्याच्या पानाचा आकार काढून, कापून त्यावर स्वहस्ते शुभेच्छा लिहून ते आप्तजनांना सोने म्हणून देतात. अशा स्वनिर्मित आणि पर्यावरणपूरक सोन्याची बातच खास.
दिवाळी हा सण वर लिहिल्याप्रमाणे घर धनधान्याने भरून गेल्यानंतर आनंद साजरा करण्याचा. मात्र त्या आनंदाचे नाते आजकाल दणदणीत आवाज करणार्या रंगीबेरंगी आतषबाजीशी जोडले आहे. जोडीला चीनसारख्या देशाला स्वतःचा माल खपवण्यासाठी भारतातील मोठी बाजारपेठ सहज उपलब्ध होत आहे आणि त्यांचा माल हातोहात खपतोही आहे. स्पर्धा म्हणून, हव्यास म्हणून हे फटाके वाजवून ध्वनी प्रदूषण वाढवणे, श्वसनाच्या रोगांना आमंत्रण देणे हाच राहिला आहे का दिवाळीचा आनंद? कधी सर्वांनी एकत्र येऊन, झाडे लावून, किंवा फक्त गप्पागोष्टी करीत, भटकंती करीत या सणाचा आनंद लुटून बघायला काय हरकत आहे? नक्कीच अशी आगळीवेगळी दिवाळी सर्वांना हवीशी वाटेल.
आज या लेखाच्या निमित्ताने आपणा सर्वांस कळकळीची विनंती आहे की आपले सणवार आवडीनुसार जरूर साजरे करा. तुमच्या श्रद्धा, भावना दुखावायचा मुळीच हेतू नाही. पण जे आपण करत आलोय त्यामागचा मूळ उद्देश ध्यानात घेऊन आपल्या कृतीने, वर्तणुकीने त्या मूळ उद्देशाला आणि आपल्या पर्यावरणाला धोका पोहोचत नाहीये ना याची चाचपणीही जरूर करा. यदाकदाचित अशा तॄटी आढळल्या तर शांतपणे यावर उपाय म्हणून पर्यावरणाला अनुकूल असा मध्यममार्ग नक्कीच काढायचा प्रयत्न करा. शेवटी हा पर्यावरणाचा होणारा र्हास थांबवला तरच सण साजरे करायला आपली पुढील पिढी जिवंत राहील, नाही का?
खूप महत्वाची माहिती दिलीत
ReplyDelete