वर्षातून एकदा घेतात
लुकलुकणाऱ्या दिव्याची जागा
असंख्य दीपाच्या ओळी
आणि लपायला जागा शोधताना अंधाराच्या नाकीनऊ येतात !
वर्षातून एकदा घेतात
आकाशातील क्षीण ताऱ्यांची जागा
भव्य दिव्य तेजाळ आकाशकंदील
आणि खेडयातील एकाकी कंदिलानाही आनंदाचे धुमारे फुटतात !
वर्षातून एकदा येतात
नरकासुर आणि सोळा सहस्त्रजणींच्या साऱ्यांना आठवणी
गोलपिठातील काही क्षीण नजरा मात्र
आशेने नेहमी आकाशाकडे तिक्षत
सुदर्शन चक्राची प्रतीक्षा करत असतात !
वर्षातून एकदा पेटतात
खुज्या निराश झोपडयामध्ये आशेच्या पणत्या
एरवी त्यांच्यात तेवणाऱ्या इवल्याश्या चिमणीमुळे
प्रकाश अंधाराचे श्रावण वर्षभर बरसत असतात !
वर्षातून एकदा
ओवाळतात
        बहिणी भावाला आणि पत्नी पतीला
        पण मानवी संबंधाच्या क्रूर ज्वाला आणि
        हुंडाबळींचे वणवे पाहून दिवेही ओशाळतात
        आणि शरमेने वर्षभर तोंड लपवतात!
- - डॉ. सुनील देशपांडे 


 
वा!!
ReplyDeleteवा!!
ReplyDelete