'गोड' सदा बोलावे

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात,
'गोड सदा बोलावे । नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे। 
हाचि सुबोध श्रीगुरुंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे॥'
महाराज म्हणतात भक्ताने सदासर्वदा, त्रिकाळ आपलं बोलणं, आपली वाचा नम्र व मृदू ठेवायला हवी तरच तो लोकप्रिय होतो त्यासाठी प्रथम द्वेषबुद्धीला मूठमाती देऊन आपल्या बोलण्याने चुकूनसुद्धा कोणाचे मन दुखावणार नाही अशी दक्षता घेणे जरुरीचं आहे. प्रत्येकाच्या हृदयात परमेश्वर आहे, मन दुखविणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखविण्यासारखे आहे; सर्वांशी जो नेहमी मार्दवाने, नम्रपणे आणि चांगल्या शब्दात मधुर संभाषण करतो, ज्याची वर्तणूक नम्रतेची असते, बोलणे नेहमी नम्रपणाचे, समोरच्याला आनंदित करणारे असते, जो क्रोध करून समोरच्याला अपशब्द बोलणे करत नाही. अशा माणसाला परमेश्वर हा आपला भक्त, दास म्हणून आनंदाने स्वीकारतो.

सदाचरण हा परमार्थाचा पायाच. तेव्हा 'आधी माणुस व्हा आणि मग परमार्थी व्हा' हाच संदेश श्रीसमर्थांनीही दासबोधामध्ये दिला आहे. 
'आपणास चिमोटा घेतला। तेणे कासावीस जाला।
आपणावरुन  दुसऱ्याला। राखीत जावे॥'
आपण मात्र जाता येता उगीच इतरांना शाब्दिक चिमटे काढत असतो.
'बरे बोलता सुख वाटते। हे तो प्रत्यक्ष कळते।
आत्मवत् परावे ते। मानीत जावे॥
किती सरळ आहे ना ? मला जर इतरांनी माझ्याशी गोड बोललेलं आवडतं तर मीहि तसंच बोलायला नको का?   
श्रीसमर्थांचीच एक प्रार्थना फार प्रसिद्ध आहे, 'कोमल वाचा दे रे राम!' अगदी ब्रह्मानुभवापर्यंत सर्व श्रीसमर्थ रामाकडे मागतात पण सुरुवात कोमल वाचेने करतात.यावरुन गोड बोलण्याचं महत्व स्पष्ट व्हावं. वाणीनं माणसाचं जेवढं नुकसान केलंय तेवढं दुसरया कशानंही केलं नसेल असं म्हंटलं जातं. 'जे दुसऱ्यास दु:ख करी ते अपवित्र वैखरी'  असं समर्थ उगीच नाही म्हणत! 

'सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात्'  हे शास्त्रांनी म्हणूनच सांगून ठेवलंय. गीता याला वाणीचं तप म्हणते.
माऊली म्हणते, 
'तैसें साच आणि मवाळ। मितलें परि सरळ।
बोल जैसे कल्लोळ। अमृताचे॥'
सत्य तरी मृदु, मोजके पण सरळ असे अमृताच्या लहरींसारखे बोल असावेत. संतांनी हे स्वतः आचरून दाखवले. 
संतांचे बोलणे कसे ? 
'पुढा स्नेह पाझरे। मागां चालती अक्षरें। 
शब्द पाठी अवतरे। कृपा आधी॥'
स्नेहभावना आधीच ओसंडतेय, अक्षरं मागून येतात. त्यांची कृपा आधीच प्रगट होते आणि शब्द नंतर. बोलणं तोंड देखलं नाही. 
खरंच किती घेण्यासारखं आहे ना आपल्यासारख्या प्रापंचिकांना? आपली बहुतेक दुःखं ही विसंवादातून उद्भवलेली असतात. अशा वेळी आपल्या बोलण्यासंदर्भात ही काळजी/दक्षता आपण घेतली तर जीवन खरंच मधुर होऊन जाईल यात शंका नाही. मग आपण म्हणू शकू,
'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!' 
-- श्री. अनिल पानसे 

3 comments: