माझा अनुवादाचा प्रवास - लीना सोहोनी


मध्यंतरी प्रख्यात अनुवादिका श्रीमती लीना सोहोनी यांनी बंगलोरला भेट दिली.  त्यांच्या इथल्या वास्तव्याचा लाभ इथल्या रसिक वाचकांना, त्यांच्या चाहत्यांना घेता यावा या  दृष्टीने एक कार्यक्रम आयोजित करण्यत आला होता. त्यात श्रीमती सोहोनी यांनी 'माझा अनुवादाचा प्रवास' या विषयावर श्रोत्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. इच्छा असूनही बरेच रसिक या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते, त्यांच्यासाठी श्रीमती सोहोनी यांचा प्रवास शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.

तुम्ही अनुवादाचंच क्षेत्र का निवडलं?
मी गेली २८ वर्षं अनुवादाचं काम करत आहे. ‘तुम्ही स्वतंत्र लेखनाकडं कधी वळणार?’ किंवा ‘तुम्ही अनुवादाचंच क्षेत्र का निवडलं?’ असं मला बरेच वाचक विचारतात. काही जण तर (अनाहूत!) सल्ला देऊनही मोकळे होतात की ‘आता हे अनुवाद वगैरे बास करा आणि स्वतःचं असं स्वतंत्र लेखन करा बुवा!’ 'सगळे साहित्यप्रकार सोडून नेमका अनुवाद हाच प्रांत का निवडला', या प्रश्‍नाचं उत्तर देण्यापूर्वी एका मूलभूत प्रश्‍नाचा विचार करावा लागेल. 
तो प्रश्‍न म्हणजे- ‘कोणताही माणूस मुळात लेखणी हातात का धरतो?’
खरंतर प्रत्येक मनुष्यप्राण्याच्या अंगी निर्मितीची आंतरिक प्रेरणा ही जन्मतःच असते. कोणत्या ना कोणत्या तरी मार्गानं, वेगवेगळ्या क्रिया-प्रक्रियांच्या माध्यमातून ती प्रकट होत असते. मग तो मातीची भांडी घडवणारा कुंभार असो, नाहीतर भरतकाम करणारी कुणी स्त्री असो. काही व्यक्ती आपल्या अंगची ही प्रेरणा लेखनाद्वारे व्यक्त करत असतात. त्यातून त्यांना निखळ व उच्च दर्जाचा सृजनाचा आनंद मिळतो. पैसा, प्रसिद्धी, वाचक या गोष्टी नंतरच्या असतात. असाच प्रामाणिक, निर्मळ आनंद अनुवादकाला अनुवादाचं काम करून मिळत असतो. म्हणूनच तो अनुवादाचा प्रपंच मांडतो. 

काही वर्षांपूर्वी, मराठी साहित्यात अनुवादक ही जराशी उपेक्षित जमात होती. अनुवादकाला स्वतंत्र प्रज्ञेची गरज असते, याची सामान्य वाचकांना जराही कल्पना नव्हती. उलट प्रतिभावान साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्यकृतींच्या जिवावर पोसली जाणारी ही परोपजीवी जमात आहे, अशीच अनुवादकाकडं पाहण्याची लोकांची दृष्टी होती. सुदैवानं गेल्या १५-२० वर्षांत ही स्थिती सुधारली आहे. दृश्‍य पालटलंय. साहित्याच्या यात्रेमधलं अनुवादाचं अनन्यसाधारण स्थान आणि महत्त्व प्रकाशक आणि वाचक या दोघांनीही ओळखलंय...या २८ वर्षांत बरेच कडू-गोड अनुभव मी गाठीशी बांधले; पण सुरवातीच्या काळात स्वतःचा जम बसवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष, वाट्याला आलेली उपेक्षा किंवा प्रचंड परिश्रम करूनही त्या मानानं साहित्यिक-अनुवादकांच्या हाती येत असणारं अगदीच तुटपुंजं मानधन अशा काही गोष्टी बाजूला सारल्या, तर माझ्या आठवणींच्या गाठोड्यात गोड अनुभवच जास्त आहेत, असं आज मी निश्‍चितपणे म्हणू शकते. 

तुम्ही अनुवादाच्या क्षेत्रात कश्या काय आलात?
मी अनुवादाच्या क्षेत्रात कशी बरं आले, असा विचार करू लागले, की मला लहानपणी घडलेला एक प्रसंग आठवतो. एक दिवस मला माझ्या वडिलांची जुनी वही सापडली. तीत एक कादंबरी त्यांनी सुंदर अक्षरात लिहून काढली होती. तिचं नाव काही मला आता आठवत नाही; पण मी ती अधाशासारखी वाचून काढली होती. खूप उत्कंठावर्धक होती ती कादंबरी. मी पुरती गुंगून गेले; पण मला एक कोडं अजिबात उलगडत नव्हतं. ते हे की त्या मराठी कादंबरीमधील मराठी बोलणाऱ्या पात्रांची नावं मात्र परकीय होती. ती कशी काय? त्या कादंबरीत वर्णन केलेली ठिकाणंसुद्धा ओळखीची नव्हती. इतक्‍यात वडील तिथं आले. त्यांनी मला  सांगितलं, तो त्यांनी स्वतः केलेला अनुवाद होता, एका गाजलेल्या इंग्लिश कादंबरीचा! या साहित्यप्रकाराशी  माझी पहिलीवहिली ओळख अशी झाली! 

पुढं मी पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या कला शाखेत प्रवेश घेतला. तिथल्या पोषक वातावरणात नामवंत लेखकांच्या नामवंत साहित्यकृतींशी परिचय झाला. आपणसुद्धा ‘पांढऱ्यावर काळं’ करावं, असं वाटू लागलं. ललित लेख, लघुकथा, कविता... असं काहीबाही लिहिता लिहिता एक दिवस एका जर्मन कथेचा मराठी अनुवाद मी बसल्या बैठकीला लिहून काढला. तो हंस मासिकाच्या अनुवाद विशेषांकात छापूनही आला. आपल्याला इतर कोणत्याही लेखनापेक्षा अनुवाद लेखनात जास्त गोडी वाटते, हे त्या वेळी मला उमगलं. 

यानंतर दरम्यानच्या काळात अभ्यास, करिअर, संसार...यात काही वर्षं निघून गेली; पण अनुवादाचा विषय मनाच्या कोपऱ्यात घोळत होताच. तो मधून मधून उसळी मारून बाहेर येई.  माझा पहिलावहिला अनुवाद ‘विद्रोह’ हा यातूनच जन्माला आला. हेन्‍री डेंकर या अमेरिकी लेखकाची ‘आऊटरेज’ ही कादंबरी मी वाचली होती. तिनं मला झपाटून टाकलं होतं. न्यायव्यवस्थेनं केलेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी बंडाचा झेंडा उभारून उठलेला म्हातारा नायक डेनिस रिऑर्डन आणि त्याचं वकीलपत्र घेऊन अवघ्या न्याय संस्थेलाच न्यायालयात खेचणारा त्याचा तरुण वकील बेन गॉर्डन, अशा दोन नायकांनी दिलेल्या लढ्याची ही कहाणी आहे. अनुवाद करून तर झाला. आई, मावशी, भाऊ, नातेवाईक, मित्रमंडळींनी त्या माझ्या पहिल्यावहिल्या प्रयत्नाला कौतुकाची, पसंतीची पावती दिली. 

‘हे परिश्रम वाया जाता कामा नयेत, हे कुठंतरी छापून यायलाच हवं,’ असं सगळ्यांचंच मत पडलं; पण माझी या क्षेत्रात कुणाशीच ओळख नव्हती...त्यात आमचं घर मुंबईला, तेही अंधेरी स्टेशनपासून प्रचंड लांब. कॉस्मोपॉलिटन सोसायटीत. तिथं मराठी बोलणारी माणसं फारशी नव्हती. साधी मराठी लायब्ररीसुद्धा नव्हती; पण सासर आणि माहेर पुण्याला होतं. मग एकदा मुद्दाम पुण्याला आले आणि कादंबरीचं हस्तलिखित काखोटीला मारून प्रकाशकांच्या शोधात बाहेर पडले. किती प्रकाशकांचे उंबरे झिजवले असतील, याची काही गणतीच नाही. मुळात त्या वेळी माझं वय लहान, गाठीला  लेखनाचा अनुभव शून्य. नावावर प्रकाशित साहित्य तर काहीच नाही. मी कला शाखेची द्विपदवीधर होते, कला शाखेच्या सुवर्णपदकाची मानकरीही होते, पण त्यालाही इथं फारशी किंमत नव्हती. कारण माझा विषय जर्मन होता. म्हणजे पुन्हा मराठी साहित्यात लुडबूड करण्याचा काहीच अधिकार मला खरंतर नव्हता! हे सत्य मला लवकरच उमगलं आणि खूप हताश वाटू लागलं. मी थकूनभागून दुपारी बाराच्या उन्हात रिक्षाच्या शोधात उभी होते. रिक्षा मिळेना, म्हणून बाजूच्या पुस्तकांच्या दुकानात शिरले. दुकानदाराशी गप्पा मारता मारता मी प्रकाशकांच्या शोधात असल्याचं त्यांच्या हळूच कानावर घातलं. त्यांनी मला मेहता पब्लिशिंग हाउसचं नाव सुचवलं. त्या दुपारी मला रिक्षा मिळाली नाही; पण माझ्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी मिळाली! 

प्रकाशित झालेल्या पहिल्या पुस्तकाविषयी थोडं सांगा...
माझा हा पहिलावहिला अनुवादाचा प्रयत्न मेहता पब्लिशिंग हाउसनं ‘विद्रोह’ या नावानं प्रकाशित केला. त्याला वाचकांचा आणि समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तो काळ होता १९८७ चा. डेस्क टॉप पब्लिशिंगचा (डीटीपी) जमाना अजून आलेला नव्हता. त्या माझ्या पहिल्यावहिल्या पुस्तकाच्या अगदी मोजक्‍याच प्रती आज शिल्लक असतील; पण त्यानंतर  गेली २९ वर्षं अनुवादाचा हा माझा प्रवास मात्र सातत्यानं सुरू आहे. साहित्याचं क्षेत्र अजूनही गुणवत्तेवर चालतं; त्याचमुळं इथं शिरकाव करून घेण्यासाठी कोणत्याही गॉडफादरची गरज नसते. कुणाचीही शिफारस अथवा अनुभवाचं पाठबळ नसतानासुद्धा आपल्या लेखणीत जर सामर्थ्य असेल आणि यश, मान-सन्मान, प्रतिष्ठा वा धन या कशाचीही अपेक्षा न ठेवता खडतर मेहनत करण्याची तयारी असेल, तर संधी आपोआप आपल्यापर्यंत येऊन पोचते, असा माझा अनुभव आहे.

सुरवातीच्या काळात कोणत्या अडचणी आल्या?
अनुवाद करत असताना सुरवातीच्या काळात मला काही अडचणी आल्या. ‘लज्जा’ या तस्लिमा नसरीन लिखित बांगलादेशी लेखिकेच्या बहुचर्चित कादंबरीच्या अनुवादाचं काम मेहता प्रकाशनाच्या अनिल मेहता यांनी माझ्यावर सोपवलं, तेव्हा खरं तर या क्षेत्रात मी अगदीच नवीन होते. ‘पण तुमची परिश्रम करण्याची तयारी, वाचन आणि मुख्य म्हणजे तुमच्या अनुवादातला प्रामाणिकपणा, पारदर्शीपणा या सर्व गुणांमुळं आम्ही तुमच्यावर ‘लज्जा’च्या अनुवादाची अवघड जबाबदारी टाकली आहे’ असं ते म्हणाले. 

१९९३ मध्ये बांगलादेशात ‘लज्जा’ कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर लगेच तिथल्या कट्टरवादी सरकारनं त्यावर बंदी घातली, इतकंच नव्हे तर तिथल्या धर्मांध संघटनांनी फतवा काढून तस्लिमा हिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. तिला त्यानंतर रातोरात तिथून पळ काढावा लागला. आंतरराष्ट्रीय जगतात खळबळ माजवणाऱ्या सनसनाटी पुस्तकाचा अनुवाद करण्यासाठी खरं तर माझ्या हातात पुरेसा वेळच नव्हता. मग मी रात्रंदिवस अक्षरशः झपाटल्यासारखं काम केलं. त्यातच मेहता प्रकाशनानं या पुस्तकाचा अनुवाद लवकरच प्रकाशित होत असून, तो मी करत असल्याचंही जाहीर केलं होतं. त्यामुळे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तपत्रांचे प्रतिनिधी माझ्या घरी मुलाखतीसाठी येत होते. त्याने माझ्या मनावरचं दडपण वाढत होतं. पहाटे उठून दिवसभर अनुवादाचं काम करायचं आणि संध्याकाळी मेहता प्रकाशनच्या ऑफिसात जाऊन आदल्या दिवशी जमा केलेल्या मजकुरावर संपादकांशी चर्चा करायची, असा दिनक्रम होता. सुरुवातीच्या काळात तर माझ्या अनुवादित मजकुराच्या हस्तलिखितावर संपादकांनी अक्षरशः लाल शाईची रांगोळीच काढलेली असे. याच काळात मी अनुवादाच्या नियमांबद्दल बरंच काही शिकले. एकदा मी लिहिलं होतं- भात आणि मासळीचे रुचकर जेवण. संपादकांनी रुचकर या शब्दाभोवती वर्तुळ काढून समासात एक प्रश्‍नचिन्ह काढलं होतं. ते म्हणाले, हे रुचकर विशेषण कुठून आलं? मी म्हटलं, मासळीचं जेवण म्हणजे रुचकर असणार ना? त्यावर ते म्हणाले, अहो हे तुमचं मत झालं. मूळ पुस्तकात लेखिकेनं तसं काही म्हटलंय का? तेव्हा त्यानंतरच्या चर्चेत मला उमजलं, की अगदी एखादं विशेषणसुद्धा स्वतःच्या मनानं घालण्याचा अधिकार अनुवादकाला नाही. जसा मजकुरात काही भर घालण्याचा त्याला अधिकार नाही, तसाच काहीही मजकूर गाळण्याचाही त्याला अधिकार नाही. 

अनुवाद करू इच्छिणाऱ्या  नवीन लोकांना तुम्ही काय सांगाल?
इंग्रजी भाषेमध्ये अनुवाद आणि भाषांतर या दोन्ही अर्थांनी ‘ट्रान्सलेशन’ हा एकच शब्द वापरण्यात येतो. यातील ट्रान्स या मूळ लॅटिन शब्दाचा अर्थ पलीकडं आणि लेशन म्हणजे घेऊन जाणे. अनेक भाषाशास्त्रज्ञांनी अनुवादाच्या निरनिराळ्या व्याख्या केल्या आहेत. पण मला सर्वात भावलेली व्याख्या जे. सी. कॅटफोर्ड या भाषाशास्त्रज्ञानं आपल्या ‘थिअरी ऑफ ट्रान्सलेशन’ या ग्रंथात दिली आहे. तो म्हणतो : ‘एका भाषेतले विचार व भावभावनांचं दुसऱ्या भाषेतलं, हुबेहूब त्याच विचार व भावभावनांशी मिळतं जुळतं प्रकटीकरण म्हणजे अनुवाद.’  

मुळात या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की अनुवाद हे जरी एक शास्त्र असलं तरी ते संगणकशास्त्रासारखं १०० टक्के शास्त्र नव्हे. ती एक कलासुद्धा आहे. केवळ कोर्स करून अनुवादाचं कौशल्य आत्मसात करता येत नाही. त्यासाठी अंतःप्रेरणा, जिज्ञासा आणि अनुवादाची उपजत आवडही हवी. एका भाषेतल्या शब्दासाठी दुसऱ्या भाषेत अगदी हुबेहूब त्याच अर्थाचा प्रतिशब्द शोधणं आणि तो शब्द नवीन भाषेतल्या वाक्‍यरचनेला जराही धक्का लागू न देता त्यात चपखल बसवणं हे अतिशय अवघड काम आहे. खरं पाहिलं तर मूळ भाषेतला जो भाव आहे, तो भाव, तोही दुसऱ्या कुणाच्या तरी मनातील, केवळ भाषेचंच नव्हे तर संपूर्ण संस्कृतीचं अंतर पार करून पैलतीराला पोचवणं, म्हणजे उत्कृष्ट अनुवाद. थोडक्‍यात, मूळ साहित्यकृतीतील जीवनाशय आणि जीवनचैतन्य परभाषेत जिवंतपणे संक्रमित करणारी ती प्रक्रिया असते.  
 अनुवादाचं काम करण्याची इच्छा असलेले अनेक जण मला भेटायला येत असतात. त्यांची मेहनतीची तयारी पण असते. तरी पण नक्की सुरवात कुठून आणि कशी करायची ते माहिती नसतं. मला वाटतं, यासाठी पहिली पायरी म्हणजे आपलं भाषासामर्थ्य जाणीवपूर्वक वाढवणं. त्यासाठी वाचन, श्रवण, मनन याचा आधार घेणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा टप्पा म्हणजे अनुवादासाठी योग्य पुस्तकाची निवड. कलाकृती कशी हवी, तर आपल्या अंतःकरणाला स्पर्श करेल, एकमेवाद्वितीय असेल, अशी असावी. आपल्या भाषेत या आधी कधी अशा तऱ्हेचं वाचायला मिळालंच नसेल, असं ते लेखन असावं.  

'लज्जा'बद्दल अजून काही सांगा...
‘लज्जा’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाचं सर्वत्र अत्यंत उत्साहात स्वागत झालं. कारण या आधी ‘लज्जा’ कादंबरीचा केवळ इंग्रजी आणि राष्ट्रभाषा हिंदी इतक्‍याच भाषांमध्ये अनुवाद झाला होता. त्यामुळं एका प्रादेशिक भाषेत ही कादंबरी आणण्याचा मान मराठीनं पहिल्यांदा मिळवला. माझ्या या अनुवादाला उत्कृष्ट अनुवादाचा राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. एक अनुवादक म्हणून माझी जबाबदारी आता फार वाढली. यानंतर राजू भारतन यांनी लिहिलेल्या लता मंगेशकर यांच्या चरित्रग्रंथाचा अनुवाद करण्याचं असंच अत्यंत अवघड काम श्री. मेहता यांनी माझ्यावर सोपवलं. परत तेच, शब्दांचे कीस काढणं, परत तेच, लेखकाच्या मनात खोलवर शिरून त्याच्या अंतरंगात पुस्तक लिहिताना नेमकं काय चाललं होतं याचा ठाव घेणं असं सगळं सुरू झालं. भाषांतराचं काम हा जगातला सगळ्यात थॅंकलेस जॉब आहे, असंच मला त्या वेळी वाटत होतं खरं. प्रत्येक नवोदित अनुवादकाला सुरवातीच्या काळात नेहमी हाच अनुभव येतो, की एखादा अनुवाद जर उत्तम झाला असेल, तर त्याचं श्रेय मूळ लेखकाला जातं. तेही योग्यच आहे. पण त्याच वेळी तो अनुवाद तुमच्यापर्यंत ज्या अनुवादकानं पोचवला आहे, त्याच्या कष्टाची जाणीवही समीक्षकांना नसते.

समीक्षेबद्दल तुमचं काय मत आहे?
कित्येकदा अनुवादित पुस्तकाच्या समीक्षेतही अनुवादकाच्या नावाचा साधा उल्लेखही नसतो. परंतु अनुवाद जर विशेष उत्तम साधला नसेल तर मात्र यावरून अनुवादकावर टीकेची झोड निश्‍चितपणे उठवण्यात येते. ‘लता मंगेशकर : एका गयिकेचा प्रवास’ या चरित्रग्रंथाच्या अनुवादाच्या बाबतीतही एक किस्सा घडला. मुळात राजू भारतन यांची इंग्रजी भाषा अत्यंत समृद्ध आणि अलंकारांनी नटलेली. पण ती काहीशी मनमोकळी, गोष्टीवेल्हाळ आणि परंपरागत इंग्रजी लेखनाचे संकेत झुगारून थोड्या वेगळ्या वळणानं जाणारी अशी आहे. त्यात त्यांना शाब्दिक कसरती करण्याचा, स्वतःचे नवे शब्द निर्माण करण्याचा अतोनात सोस आहे. शिवाय एकेक वाक्‍य इतकं मोठं, की कधी कधी एका वाक्‍यानं एक पूर्ण परिच्छेद भरून जातो. शिवाय वाक्‍यरचनाशास्त्राचे नियम भाषेनुसार बदलतात. त्यामुळं आणि, पण, परंतु यांसारख्या अव्ययांनी जोडलेल्या वाक्‍यांचीसुद्धा उलटापालट करावी लागते. परंतु हे काहीही लक्षात न घेता जर एखादा समीक्षक अनुवाद तपासायला बसला आणि मूळ पुस्तकाच्या एखाद्या प्रकरणातील एखाद्या परिच्छेदातील पहिले वाक्‍य अनुवादित पुस्तकातील त्याच परिच्छेदाच्या पहिल्या वाक्‍याशी ताडून पाहू लागला, तर ते गणित कसं काय जुळणार? या पुस्तकाच्या बाबतीतही नेमकं तेच घडलं. मराठी अनुवाद प्रकाशित होताच पहिली आवृत्ती हातोहात खपली आणि कुणीतरी हौशी समीक्षकांनी अनुवादाची अशा तऱ्हेची परीक्षा घेऊन त्यावर समीक्षा लिहिली. त्यात दोन्ही पुस्तकांमधील एका विशिष्ट परिच्छेदातील पहिल्या वाक्‍याचं उदाहरण देऊन, अनुवादिकेला या साध्या शब्दाचा अर्थसुद्धा कळला नाही, असं धादांत चुकीचं विधान केलं. मी वयानं लहान होते. शिवाय याआधी अशा प्रकारचा अनुभव आलेला नसल्यामुळं फार अस्वस्थ झाले. परंतु मेहतांनी त्या वेळी माझी समजूत काढली. ते म्हणाले, तुमच्या वाचकांनी तुमच्या कामाची भरभरून पावती दिलेली आहे. तेव्हा अशा प्रकारच्या अनभिज्ञ टीकाकारांकडं दुर्लक्ष करावं, हेच उत्तम.
अनुवाद करत असताना मी स्वत:ला झोकून देते, घरकामात माझं लक्ष नसतं, मी अनेकदा भाजीत मीठ घालायला विसरते, अशा अनुभवांबरोबरच वाचकांच्या उदंड प्रेमाच्या वर्षावाचाही अनुभव येतो. सुधा मूर्तींची पुस्तकं मराठीतून वाचून माझ्या पाया पडायला वाचक येतात तेव्हा गहिवरून येतं. बेट्टी महमूदीची दुःखानं भरलेली सत्यकथा वाचून काळजाचं पाणी झाल्यावर रात्री ११ वाजता फोन करून रडणारे वाचक मला भेटले आहेत. कोल्हापूरच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा २३ वर्षांचा एक कैदी माझा वाचक आहे. तो मला नियमित पत्रं लिहितो, स्वतः बनवलेली भेटकार्डे पाठवतो. माझ्या मनाचा कप्पा अशा असंख्य आठवणींनी भरलेला आहे.

अनुवादासाठी पुस्तकाची निवड कशी करावी, निवड करताना नेमक्‍या कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनुवादासाठी स्वीकारणार असलेल्या त्या पुस्तकाचा आधीच दुसऱ्या कुणी अनुवाद प्रसिद्ध केला तर नाही ना, हे पाहणं आवश्‍यक. कारण, काही वेळा अनुवादाचे हक्क आधीच कुणीतरी विकत घेतलेले असतात. त्याचप्रमाणे आपण केलेला अनुवाद प्रसिद्ध करायला कुणी प्रकाशक तयार होईल ना, हेही पाहावं लागतं.

आपण निवडलेली साहित्यकृती आपल्याला पेलणारी असली पाहिजे... त्या विषयाचं मूलभूत ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. एखाद्या लेखकाचा शाब्दिक कसरतींवर भर असेल तर तशा साहित्याचा अनुवाद करणं नेहमीच जड जातं. भाषेच्या लालित्यापेक्षा आशयघनतेला अधिक प्राधान्य देणारी पुस्तकं मी अनुवादासाठी पसंत करते. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, ललित, गहन वैचारिक, सैद्धान्तिक, काव्य अशा असंख्य साहित्यप्रकारांमधून आपल्या स्वभावधर्माला, लेखणीला नक्की कोणता प्रकार रुचेल आणि मुख्य म्हणजे पेलेल, तेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.

तुम्हाला स्वतःला कुठल्या साहित्यकृती भावतात?
दोन प्रकारच्या साहित्यकृती मनाला भावतात. पहिला प्रकार म्हणजे, ज्यांच्यामधून भावनांच्या वैश्‍विकतेचा प्रत्यय येतो अशा साहित्यकृती. म्हणजे असं की ‘राजहंस माझा निजला,’ असं म्हणणाऱ्या मातेचं दुःख नक्कीच वैश्‍विक पातळीवरचं आहे, असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या प्रकारच्या साहित्यकृती मात्र आपल्या संस्कृतीपेक्षा सर्वार्थानं भिन्न असलेल्या संस्कृतीमधून निर्माण झालेल्या असतात. अशा साहित्यकृतीचा अनुवाद करताना अनुवादकानं आपला तोल सांभाळणं फार महत्त्वाचं असतं. पाश्‍चात्त्य संस्कृतीतला स्त्री-पुरुष संबंधामधला मोकळेपणा जसाच्या तसा मराठीत आणू म्हटलं, तर वाचकांना त्याविषयी कधी आपलेपणा वाटेल का?
अनुवादकाला नेहमी स्वतःचे विचार आणि मानसिक कल बाजूला ठेवून अनुवादाचं काम करावं लागतं आणि हेच नेमकं अती अवघड काम आहे. विशेषतः राजकीय पुस्तकांचा अनुवाद करताना तर हा तोल फारच सांभाळावा लागतो. मी स्वतः तशी जास्त सश्रद्ध नाही; तरीही शिर्डीच्या श्रीसाईबाबांच्या चरित्राचा अनुवाद मी तेवढ्याच समरसतेनं केला आणि साईभक्तांनी त्याचं उत्तम स्वागत केलं. कॅथरिन फ्रॅंक या परदेशी पत्रकार-महिलेनं लिहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या चरित्राचा अनुवाद, सोनिया गांधी यांच्या राणी सिंग यांनी लिहिलेल्या चरित्राचा अनुवाद, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर संजय बारू यांनी लिहिलेल्या ‘द ॲक्‍सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या खळबळजनक पुस्तकाचा अनुवाद, असे विविध अनुवाद केले. ‘लज्जा’सारख्या वादग्रस्त पुस्तकाचा अनुवाद तर मी माझ्या लेखनाच्या करिअरच्या अगदी सुरवातीलाच केला; परंतु या प्रत्येक पुस्तकाच्या वेळी मला माझी स्वतःची मतं, मानसिक कल इत्यादी बाजूला ठेवून अत्यंत अलिप्तपणे हे अनुवाद करावे लागले. कोणत्याही स्वतंत्र बुद्धीच्या, विचारक्षम अनुवादकाच्या दृष्टीनं ही अलिप्तता राखणं मुळीच सोपं नाही.

मध्यंतरी मला एका अनुवादलेखनाच्या पुरस्काराच्या निवड समितीवर परीक्षक म्हणून बोलावणं आलं होतं. परीक्षण करताना एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. बऱ्याचदा अनुवादकाचं शब्दभांडार समृद्ध असतं; परंतु स्रोतभाषेतली आणि लक्ष्यभाषेतली व्याकरणव्यवस्था, वाक्‍यरचनाशास्त्र, उच्चारशास्त्र याबाबतीत आपल्या इथले अनुवादक कमी पडतात. मला वाटतं, प्रशिक्षणाचा अभाव हेच त्याचं मुख्य कारण आहे. अनुवादलेखन करत असताना तो भाषांतरित मजकूर वाचकाला प्रवाही व प्रत्ययकारी वाटला पाहिजे; किंबहुना तो मजकूर भाषांतरित आहे, याची वाचकाला वाचत असताना कधीच जाणीव होता कामा नये, इतका तो सहज असला पाहिजे. मात्र, तसं होताना दिसत नाही. नुसत्या इंग्लिशमधून मराठीत अनुवाद करण्याविषयी बोलायचं झालं, तर इंग्लिश भाषेतले काळ, विभक्ती, शब्दयोगी अव्यय, उपपदं, एकवचन आणि अनेकवचन, लिंगव्यवस्था, वाक्‍यरचनेची व्यवस्था, कर्तरी-कर्मणी प्रयोग, डायरेक्‍ट-इनडायरेक्‍ट स्पीच असा सगळ्याच बाबतींत इंग्लिश व मराठी यांच्यात इतका फरक आहे, की अनुवादकाला याविषयीचं शास्त्रशुद्ध ज्ञान नसेल, तर मोठेच गोंधळ होऊ शकतात.

एखादे उदाहरण सांगा ना? 
एक अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं, तर I have been working on this manuscript for the last five years या वाक्‍याचं घेऊ या. या वाक्‍याचं शब्दशः भाषांतर असं आहे- ‘गेल्या पाच वर्षांपासून मी या हस्तलिखितावर संस्करणाचं काम करत आलो आहे/आले आहे.’ मात्र, ते ऐकायला किती विचित्र वाटेल? त्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो- ‘या हस्तलिखितावर संस्करण करण्याचं माझं काम गेली पाच वर्षं चाललंय.’

इंग्लिश भाषेत आदरवाचक सर्वनामच नसल्यामुळं एखाद्या देशाचा पंतप्रधान असो नाहीतर एखादा लहान मुलगा असो, त्याचा उल्लेख आपण He असाच करतो. मराठीत मग पंचाईत होते. या ठिकाणी तारतम्य बाळगावंच लागतं. तस्लिमा नसरीनलिखित ‘लज्जा’ या गाजलेल्या कादंबरीच्या अनुवादातला नायक सुरंजन याचा उल्लेख मी सगळीकडं सुरंजन असा जरी केला असला, तरी त्याच्या वडिलांना नुसतं सुधामय असं न म्हणता सुधामयबाबू असं म्हणून मी त्यांच्यासाठी आदरवाचक सर्वनाम वापरलं आहे.

इंग्लिशमधले किंवा Common Gender असणारे Friend, Agent हे शब्दसुद्धा फार त्रासदायक आहेत. फ्रेडरिक फोरसिथलिखित कादंबरीचा (मध्यस्थ) अनुवाद करताना एक अशीच गंमत झाली. विमानात नायकाच्या शेजारच्या आसनावर एक व्यक्ती येऊन बसते, असा उल्लेख पहिल्याच पानावर आला आहे. ही व्यक्ती म्हणजे स्पेशल एजंट सॅम सोमरव्हिल. वास्तविक, ही व्यक्ती म्हणजे एक सुंदर तरुणी असून तिचं नाव सामंथा आहे; परंतु ही गोष्ट वाचकाला इतक्‍यात कळू द्यायची नाही, असं लेखकाच्या मनात आहे. त्यामुळं लेखकानं मोठ्या चतुराईनं Agent Sam Sommerville sat next to him असं लिहून टाकलं. ती व्यक्ती - म्हणजेच एजंट सॅम - हा पुरुष नसून एक स्त्री आहे, ही गोष्ट वाचकांपाशी इतक्‍यातच उघड करायची नसली, तरीपण अनुवादकाला हे गुपित माहीत आहे ना? मग आता कठीण परिस्थिती. मराठी व्याकरणव्यवस्थेनुसार पुरुष असेल तर ‘बसला’ आणि स्त्री असेल तर ‘बसली’. तर अशा छोट्या छोट्या आव्हानांना अनुवादकाला वेळोवेळी सामोरं जावं लागतं.

असाच एक फसवा शब्द म्हणजे Million. याचा अर्थ आहे दशलक्ष. मात्र, ५० लाख म्हणण्याऐवजी आमचे अनुवादक ‘पाच दशलक्ष’ असं लिहून टाकतात आणि Fifty million याचं भाषांतर ५० दशलक्ष असे करून मोकळे होतात. असं करणं योग्य आहे का?

इंग्लिशमध्ये that या शब्दानं दोन वाक्‍यं जोडलेली दिसताच अनुवादक ताबडतोब ‘की’ या शब्दानं ती दोन वाक्‍यं जोडतो; पण अनेकदा मराठी वाक्‍यरचनाशास्त्रानुसार ते संपूर्ण वाक्‍य फिरवावं लागतं. कर्मणी प्रयोगाच्या भाषांतराच्या वेळीसुद्धा गंमत होते. ‘नाट्यप्रयोग केला गेला’, ‘स्पर्धा घेतली गेली’ अशी भाषांतरं आपण वाचतो; पण मराठीत मात्र ‘प्रयोग करण्यात आला’, ‘स्पर्धा घेण्यात आली’ असं आपण म्हणतो. मूळ साहित्यकृतीच्या लेखकाची शैली जर फार लालित्यपूर्ण असेल, शाब्दिक कसरतींवर त्याचा भर असेल, तर त्याचा अनुवाद करणं हे फार कठीण काम. सृजनशील लेखक हातात लेखणी धरून मनात उमटलेले विचार भराभरा कागदावर उतरवत असतो. तेव्हा पुढं-मागं आपल्या साहित्याचा जर कुणी अनुवाद केलाच, तर त्या बिचाऱ्या अनुवादाकाला त्रास पडू नये, असा विचार लिहिताना काही तो करत नाही. कुणाची शैली औपचारिक, तर कुणाची अगदीच मोकळीढाकळी, कधी नागर, तर कधी ग्रामीण, कधी सरळ-साधी, तर कधी अलंकारिक... प्रत्येक लेखकाची शैली वेगळी, मूड्‌स वेगळे... या सगळ्याचं तारतम्य अनुवादकाला ठेवावंच लागतं. 

स्वतःची भाषा, स्वतःच्या भाव-भावना, मानसिक कल हे सगळं बाजूला ठेवून अनुवाद करत असलेल्या साहित्यकृतीची हाताळणी त्याला करावी लागते... थोडक्‍यात, एक तटस्थता, स्थितप्रज्ञ वृत्ती त्याच्याकडं हवी. माझ्या नशिबानं मला माझ्या अनुवादाच्या कामात कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, सत्यकथा, कविकल्पना असे कितीतरी प्रकार हाताळता आले. अरविंद अडिगालिखित झोपडपट्टीत वाढलेल्या, वाक्‍यागणिक शिव्यांचा भडिमार करणाऱ्या इरसाल ‘व्हाईट टायगर’पासून तो थेट ‘टू सर विथ लव्ह’सारख्या १९५० च्या दशकातल्या कादंबरीपर्यंत आणि जेफ्री आर्चर या इंग्लिश लेखकाच्या खास ब्रिटिश, रेशमी चिमटे काढणाऱ्या खमंग-खुसखुशीत शैलीपासून ते थेट रॉबर्ट जेम्स वॉलर यांच्यासारख्या हळव्या, कविमनाच्या लेखकाच्या लेखणीतून उतरलेल्या ‘द ब्रिजेस ओफ़  द मॅडिसन कौंटी’सारख्या विलक्षण तरल, भावगर्भ प्रेमकहाणीपर्यंत अनेक आव्हानं माझ्यासमोर आली.

माझ्या बऱ्याच अनुवादांच्या दरवर्षी आवृत्त्या निघत आहेत, याचं सगळं श्रेय अर्थातच माझ्या एकटीचं नाही. यात ‘मेहता प्रकाशना’चा मोठा वाटा आहे. एखाद्या अनुवादकाचं नाव झालं, की अर्थातच अनेक प्रकाशकांचे कामासाठी फोन येऊ लागतात. ‘लज्जा’ कादंबरीच्या यशानंतर मलाही असाच अनुभव आला...

इंग्लिशमधून मराठीत अनुवाद करत असताना अनुवादकाला भाषाविषयक समस्यांचा, संस्कृती आणि परंपरा यांच्याशी निगडित असलेल्या समस्यांचा आणि संकल्पनांशी निगडित समस्यांचा सामना करावा लागतो.

अनुवाद करत असताना अनुवादकाचा काय दृष्टिकोन असतो?
एखाद्या पुस्तकाचा अनुवाद करत असताना अनुवादकाचे त्यामागं दोन हेतू असू शकतात. संबंधित अनुवाद संशोधनात्मक कामासाठी केलेला असेल, तर अशा वेळी अर्थातच थोडंसुद्धा स्वातंत्र्य घेऊन चालत नाही. जे काही आहे, ते जसंच्या तसं मांडावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं, तर ‘अरेबियन नाईट्‌स’ या अत्यंत गाजलेल्या साहित्यकृतीचे मराठीत एकाहून अधिक अनुवादकांनी अनुवाद केलेले आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेला अनुवाद मी अगदी लहान असताना वाचला होता. तो अत्यंत लालित्यपूर्ण तर होताच; पण त्यात अश्‍लीलता नावालाही नव्हती. त्यामागचा हेतू ‘बालांचं मनोरंजन’ एवढाच होता. त्यानंतर पुढं गौरी देशपांडे यांनीही केलेला ‘अरेबियन नाईट्‌स’चा अनुवाद माझ्या वाचनात आला. तो मात्र मूळ साहित्यकृतीशी शंभर टक्के इमान राखून केलेला होता; पण तो अर्थातच ‘लहान मुलांनी वाचण्यासारखा’ नव्हता हे ओघानंच आलं.

मात्र, याउलट कधी कधी हा अनुवाद केवळ सर्वसामान्य रसिक-वाचकांच्या मनोरंजनासाठी केलेला असतो. भारतीय संस्कृती आणि पाश्‍चात्त्य संस्कृती या दोहोंमध्ये जो मूलभूत फरक आहे, तो अशा वेळी अनुवादकानं नजरेआड करून चालत नाही.  लग्न न करता एकत्र राहणं ही बाब दैनंदिन जीवनातलं एक अविभाज्य अंग म्हणून आधुनिक इंग्लिश साहित्यात अगदी सहज-स्वाभाविकरीत्या स्वीकारण्यात आलेली आहे. समलिंगी संबंधांसारख्या गोष्टीकडं आज तिकडचा समाज विचित्र नजरेनं पाहत नाही. एकूणच या गोष्टीविषयी साहित्यात मोकळेपणानं (casually), सहजपणानं लिहिण्यात येतं. त्या गोष्टीचा उगाच बाऊ केला जात नाही. पण स्त्री-पुरुषांमधल्या लैंगिक संबंधांविषयी मराठीमध्ये तितक्‍या मोकळेपणानं लिहिणं आपण प्रशस्त समजत नाही. बेडरूममध्ये काय घडलं, हे तपशीलवार लिहीत बसण्यापेक्षा आपण त्याविषयी सूचकतेनं लिहिणं हे जास्त अभिरुचिपूर्ण मानतो. मग अशा वेळी आपण ज्या वाचकवर्गासाठी हे अनुवादलेखन करत आहोत, त्या वाचकांच्या संवेदनशीलतेला धक्का पोचणारं वर्णन जर अनुवादकानं पूर्णपणे गाळायचं ठरवलं अथवा थोडं सपक करून मांडायचं ठरवलं, तर तेवढा अधिकार त्याला आहे की नाही, हासुद्धा पुन्हा एक विचार करण्यासारखाच मुद्दा आहे. (परंतु असं करत असताना मूळ कथावस्तूला जराही धक्का पोचणार नाही, अशी काळजी घेणं हे अनुवादकाचं कर्तव्य आहे. जर गरज पडली तर मनोगतात आपण केलेल्या बदलांचा कारणांसहित उल्लेख करणं किंवा आपल्या अनुवादाला नुसता ‘अनुवाद’ न म्हणता ‘स्वैर अनुवाद’ म्हणणं हाही एक मार्ग आहे.) कारण, अनुवादक जर असं स्वातंत्र्य घेऊ इच्छित असेल, तर त्यापाठीमागं ज्या वाचकाच्या मनोरंजनासाठी हा अनुवाद केलेला असतो, त्या वाचकाला तो वाचत असताना अवघडल्यासारखं होऊ नये व त्या साहित्याचा आनंद घेता यावा, एवढाच त्यामागचा हेतू असतो. मला स्वतःला विचाराल, तर एक अनुवादक म्हणून मला असं स्वातंत्र्य घ्यायला आवडणार नाही; पण त्याचबरोबर माझ्या मध्यमवर्गीय संवेदनशील आणि परंपराप्रिय मनाला जर एखादी कलाकृती फार बोल्ड, धक्कादायक वाटली, तर मी तिच्या अनुवादाचं काम अंगावरच घेत नाही. हा मी माझ्यापुरता शोधून काढलेला मार्ग आहे.


संकल्पनाविषयक समस्या या तर खरं म्हणजे संस्कृती आणि परंपरा यांच्याशीच निगडित आहेत. प्रत्येक संस्कृतीमध्ये चांगलं-वाईट, बरोबर-चूक यांविषयी परंपरेनुसार चालत आलेल्या काही कल्पना असतात. त्यातल्या काही संकल्पनांना तर वैज्ञानिक आधारही नसतो. उदाहरणार्थ, आपल्याकडं मांजर आडवं जाणं, कावळा ओरडणं, कावळा शिवणं, मृत व्यक्तीचं श्राद्ध करणं, आत्म्याला मुक्ती मिळणं, पुनर्जन्म इत्यादी संकल्पना आहेत. ख्रिश्‍चन धर्मातसुद्धा अशा काही संकल्पना आहेत. वाचक जेव्हा परकीय साहित्याचा अनुवाद वाचत असतो, तेव्हा कधी कधी त्याला अशा संकल्पना समजू शकत नाहीत; परंतु अनुवादकाला मात्र त्यामागच्या पार्श्‍वभूमीचं सखोल ज्ञान असावंच (किंवा मिळवावं) लागतं. शिवाय, प्रसंगी तळटिपांच्या साह्यानं या संकल्पनांचं स्पष्टीकरणही द्यावं लागतं. तरच वाचकाला त्या साहित्यकृतीचा आस्वाद घेता येतो.

अनुवाद हे एक शास्त्र आहे की ती कला आहे? 
खरंतर अनुवाद ही माझ्या मते एक कला आहे. कारण जर एकच उतारा ५० अनुवादकांना अनुवादासाठी दिला, तर त्याचे ५० तर्जुमे आपल्याला मिळतील; परंतु त्याचबरोबर अनुवाद हे एक शास्त्रसुद्धा आहे आणि त्याला नियम आहेत, हेही विसरून चालणार नाही.
कधी कधी आम्ही अनुवादक मंडळी एकत्र जमलो, की गमतीनं स्वतःची तुलना तारेवर कसरत करत चालणाऱ्या डोंबाऱ्याशी करतो. याचं कारण असं, की आम्हाला लेखन करताना हजार बंधनं पाळावी लागतात. शेवटी आम्ही हे दुसऱ्याचं मूल स्वतःचं समजून त्याला जवळ करून प्रेमानं एका वेगळ्या भाषेचं आंगडं-टोपडं चढवत असतो ना?

थोर समाजसेविका सुधा मूर्ती यांच्याविषयी थोडंसं?
थोर समाजसेविका सुधा मूर्ती यांची एका कार्यक्रमात ओळख झाली. मेहता यांनी त्यांच्यासमोर माझी प्रशंसा केलेली असल्याने त्यांनी, मीच त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद मरठीत करावेत असं सुचवलं. त्यातल्या बऱ्याच गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्या ‘वाइज अँड अदरवाइज’ या पुस्तकाची तर मराठीत विक्रमी विक्री झाली असून, त्याची विसावी आवृत्तीही नुकतीच मराठीत प्रकाशित झाली. या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा राज्य पुरस्कारसुद्धा मिळाला. या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी सुधा मूर्ती यांनी माझ्याबद्दल फार हृदयस्पर्शी कौतुकोद्गार काढले. त्या म्हणाल्या होत्या- ‘‘हे पुस्तक आम्हा दोघींचं आहे. जर मी या पुस्तकाची जन्मदात्री आई देवकी असेन, तर लीनाला यशोदाच म्हटलं पाहिजे.’’ यातला सुधा मूर्ती यांचा माझ्यावरच्या प्रेमाचा भाग सोडला, तरी अनेक जाणकार लेखकांना अनुवादकाच्या या अवघड जबाबदारीची पूर्ण कल्पना असते.

अनुवादाच्या कामातून तुमचा वैयक्तिक लाभ काय झाला असं सांगाल?
अनुवादकाचं काम सुरू करण्यापूर्वी मी एक साधी गृहिणी होते. आज मागं वळून बघताना असं वाटतं, की या अनुवादानं मला भरभरून दिलं. मी आजवर अनेक देश हिंडले; पण माझ्या असं लक्षात आलं, की साहित्याचा अनुवाद करणाऱ्या माझ्यासारख्या अनुवादकांना आज भारतात, किंबहुना आपल्या महाराष्ट्रात जेवढा मान-सन्मान मिळतो, तेवढा इतरत्र कुठंही मिळत नाही.

आज तुम्ही मराठी वाचकांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे. माझ्या झोळीत दोन राज्य पुरस्कारांसहित अनेक पुरस्कार आणि सन्मान टाकले गेले आहेत. ‘जी. ए. कुलकर्णी पुरस्कार’ मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते स्वीकारण्याचं भाग्य मला मिळालं. पुरस्कारांच्या निमित्तानं का होईना, बाळशास्त्री जांभेकर,  लक्ष्मणशास्त्री जोशी, न. चिं. केळकर यांच्यासारख्या विभूतींच्या नावाशेजारी माझं नाव त्या पुरस्कारांच्या स्मृतिचिन्हांवर आज जाऊन बसलं आहे. ‘गेस्ट ऑफ ऑनर’ हा मी केलेला दुसराच अनुवाद. त्याचं प्रकाशन शांता शेळके यांच्या हस्ते झालं होतं. अनुवादाच्या निमित्तानं डॉ. किरण बेदी, सुधा मूर्ती, तस्लिमा नसरिन, संजया बारू, जेफ्री आर्चर अशा ख्यातनाम व्यक्तींशी जवळून संबंध आला. इतरही अनेक लेखकांशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क झाला. माझा अनुभव असा आहे, की लेखक हे अनुवादकांच्या कामाचं महत्त्व नक्कीच जाणतात. सुधा मूर्ती यांनी तर अनेकदा व्यासपीठावरून, पत्रकार परिषदेतून आणि टीव्हीला दिलेल्या मुलाखतींमधूनसुद्धा माझं नाव घेऊन पसंतीची पावती दिलेली आहे, तर जेफ्री आर्चर यांच्या लंडनच्या निवासस्थानी त्यांच्याच बोलावण्यावरून जाऊन मी त्यांच्याशी गप्पा मारल्या आहेत. गेली सात-आठ वर्षं याच कामाच्या निमित्तानं जेफ्री आर्चर ई-मेलवर सतत माझ्या संपर्कात आहेत.

 
याशिवाय मी अनेक संस्थांमध्ये वेळीवेळी विविध कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणी म्हणून जात असते आणि त्या निमित्तानं वाचकांचं प्रेम अनुभवत असते. माझ्या हातून लिहून झालेल्या प्रकाशित आणि अप्रकाशित अनुवादित पुस्तकांची संख्या आता ४० च्याही वर जाऊन पोचलेली आहे; पण अजूनही लोक मला ‘नॉट विदाउट माय डॉटर’ या कादंबरीची अनुवादक म्हणून ओळखतात. अनिल मेहता यांनी जेव्हा हे पुस्तक मला दिलं, तेव्हा त्याचं स्वागत मराठीत कसं होईल, याविषयी मी जरा साशंक होते. कारण, या हृदयद्रावक सत्यकथेत मनोरंजनाचा अंशही नाही; पण मेहता यांच्या आग्रहामुळंच मी ते आव्हान पेललं. जेफ्री आर्चर  आता ‘द क्‍लिफ्टन क्रॉनिकल्स’ या सात पुस्तकांच्या मालिकेतून लवकरच वाचकांच्या भेटीला येतील. रॉबर्ट जेम्स वॉलर यांच्या लेखणीतून उतरलेली दोन प्रौढांच्या जगावेगळ्या समर्पणाची प्रेमकहाणीसुद्धा अशीच अनिल मेहता यांच्या आग्रहामुळं मी केली. ‘अद्वैत’ या शीर्षकानं नुकतीच प्रकाशित झाली आहे. खरंतर ती कथा इतकी हळवी आणि हृदयंगम आहे, की तिच्या अनुवादाचं काम करताना माझी मी राहिलेच नव्हते!

माझ्या हातून मराठी साहित्याची सेवा घडावी, मोठमोठ्या विचारवंतांचे विचार माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोचावेत, यासाठी परमेश्‍वरानं ही कावड माझ्या हाती दिली आहे. मी माझ्या परीनं हे विचारधन न सांडता जसंच्या तसं तुमच्यापर्यंत आणून पोचवण्याचा प्रयत्न करीन. बुद्धी, मन, हात जोपर्यंत शाबूत आहेत आणि शरीरात श्‍वास आहे तोपर्यंत अनुवादलेखनाचं काम प्रामाणिकपणे करत राहीन, असं तुम्हा सर्व वाचकांना वचन देऊन या कार्यक्रमाची मी सांगता करत आहे. 
शब्दांकन -- रश्मी साठे

1 comment:

  1. Excellent . I was looking for experiences of a professional translator
    Now I can feel and understand what a translation is
    . Thank you profusely Sohoni Madam

    ReplyDelete