लेख लेखकाच्या आवाजात ऐकण्याची मजा वेगळीच असते.
प्रथमच ऑडियो पुस्तक परिक्षण द्यायचा प्रयत्न करत आहोत.
प्रथमदर्शनीच पुस्तकाचे शीर्षक आपले लक्ष वेधून घेते आणि उत्सुकता निर्माण करते. हे एक नुसतेच प्रवासवर्णन नसून हा एका विलक्षण परंपरेचा प्रवास आहे. 'पांढरे सोने' ही उपमा सहारा वाळवंटामध्ये मिळणाऱ्या मिठाला दिलेली आहे. हजारो वर्षांपासून सहारा वाळवंटाच्या भीषण वालुकामय प्रदेशातून हे पांढरे चकचकीत मीठ आणून विकण्याचे काम तेथील उंटांचे तांडे सातत्याने आजही करत आहेत.
हजारो वर्षांपूर्वी तिथे मिठाला सोन्याचा भाव होता. टिंबक्टू हे शहर पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात येते. तेथून पुढे ताऊदेन्नी या वालुकामय वैराण ठिकाणी मिठाच्या ह्या खाणी आहेत.
ह्या मिठाचे वैशिष्ट्य असे की खाण्यासाठी, मांस टिकवण्यासाठी तर याचा उपयोग आहेच, पण ते पिढ्यान्पिढ्या टिकू शकते, व साठवता येते.
हे तांडे, ज्यांना "श्वेत सुवर्णाचे तांडे" म्हंटलं जातं, ते आता ट्रकच्या वाढलेल्या वापराने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही अजब सफर नामशेष होण्याआधी धाडसी वृत्तीच्या लेखकाला त्या सफरीचा अनुभव घ्यायचा होता.
हा सर्व प्रवास पन्नास अंश सेल्सियस तापमानात करावा लागतो. सहारा हे वाळवंट अमेरिकेपेक्षाही मोठे आहे. त्यातला दोन तृतीयांश भाग हा वालुकामय - पाणी किंवा झाडी नसलेला - रेताड आहे. कित्येक मैल चालल्यावर पाण्याची विहीर लागते. या अडचणी माहीत असूनसुद्धा लेखकाच्या साहसी वृत्तीने त्याला माघार घेऊ दिली नाही.
"जेवण म्हणून नूडल्स, चहा आणि बकऱ्याच्या मांसाचे पातळ तुकडे. त्यावरून पाम तेल व बकऱ्यांची वितळलेली चरबी ओघळत होती. वर वाळूचे बारीक कणही पडलेले दिसत होते." किंवा "सूर्यकिरण डोक्यावर प्रहार करू लागले, जणू काही माझी हाडे वितळायला सुरुवात झाली." ह्यासारखी वर्णने आपल्याला सहाराचा दाह, अशक्य कष्टप्रद प्रवासाची व वाळवंटातल्या कठीण परिस्थितीची कल्पना देतात.
तांड्यांची मध्येच होणारी ताटातूट, गाईडची मनमानी, उष्णतेचा होणारा त्रास, अन्नाचा तुटवडा अशा विपत्तींना तोंड देऊन लेखक जिद्दीने पुढे जात रहातो.
वाळवंटातला प्रवास असल्यामुळे साहजिकच असलेला रखरखीतपणा, असह्य उष्णता, वाळूची वादळे यांची वर्णनं खरोखरच आपल्याला प्रत्यक्ष प्रवासाची अनुभूती देतात. वाळवंट, वाळू, वादळ यांची वर्णनं वाचताना तोचतोपणा येत आहे असे वाटत असतानाच अचानक समोर येणाऱ्या अद्भुत गोष्टी, अनुभव वाचकाची उत्सुकता वाढवतात.
ताउदेन्नी मिठाच्या खाणींच्या शेवटच्या टप्प्याला पोहोचताना लेखकाची आतुरता, आनंद, समाधान ह्यात आपणही भान हरवून जातो. त्याच वेळी खाणीतील कष्टमय जीवनाचे वर्णन बेचैन करून टाकते. हा प्रवास लेखकाला अंतर्मुख करतो.
लेखकाची लेखन शैली अतिशय सहज सुंदर आहे. वाचताना लेखक आपल्याला त्याच्या बरोबरीने प्रवासात सामील करून घेतो.
प्रसंगानुरूप लिहिण्यात येणारी नर्मविनोदी शैली वाळवंटातल्या गारव्याच्या झुळुकीसारखीच आल्हाददायक वाटते.
प्रवासाच्या अनुषंगाने लेखक अरब, तुआरेग व इतर जमाती व त्यांची परंपरा आणि इतिहासाची पण माहिती करून देतो . या जमातींमध्ये स्त्रियांना असलले स्वातंत्र्य, बुरखा न घेण्याची पद्धत अशा रितीरिवाजांचीही ओळख होते. पुस्तकात काही फोटोंचा पण समावेश आहे.
या पुस्तकाचं मूळ लेखन तर चांगलं आहेच, पण शुभदा पटवर्धन यांनी केलेला मराठी अनुवादसुद्धा फारच अप्रतिम आहे. जणू हे पुस्तक मुळात मराठीतच लिहिलं गेलं आहे की काय असा प्रश्न पडतो. एकंदरीत हे पुस्तक प्रवास वर्णनाचा एक वेगळा अनुभव आपल्याला देऊन जाते.
- भारती सप्रे
Very nice Parikshan, audio idea is great. Bharati, your voice is so good in the audio.
ReplyDelete